You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
32 वर्षांपूर्वीच्या भूकंपानं कसा बदलला मेक्सिको सिटीचा चेहरा?
19 सप्टेंबर, 1985ची ती सकाळ होती. घडाळ्यात 7.19 वाजले होते. तेव्हाच 8.1 रिश्टर स्केल एवढी तीव्रता असलेला एक भूकंप झाला आणि मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी पूर्णपणे हादरून गेली.
शहराचा मध्यवर्ती भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. शेकडो इमारती कोसळून त्यात हजारो लोक दगावले आणि आज, 32 वर्षांनंतर त्याच तारखेला मेक्सिको सिटी पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपामुळे हादरली.
या शक्तिशाली भूकंपात 200पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत. या भूकंपात शेकडो घरं जमीनदोस्त झाली आहेत. इमारती कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. भूकंपामुळे जीवितहानीसह मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे.
बचावपथकाकडून ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. असं असलं तरीही मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मेक्सिको सिटीच्या एका शाळेत काही मुलं अडकली असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक मदतीसाठी सरसावले आहेत.
मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी टीव्हीवरून एक संदेशाही जारी केला आहे. त्यात त्यांनी बचावकार्यासाठी सैन्य तैनात केलं असून बचाव आणि मदतकार्य दिवस-रात्र सुरू राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
तीन दशकांपूर्वी
32 वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात नेमके किती लोकं मारले गेले, त्याची पक्की माहिती आजपर्यंत मिळालेली नाही.
सरकारच्या माहितीनुसार, त्यावेळी भूकंपात 3693 लोक मारले गेले होते. मात्र रेड क्रॉस संस्थेच्या आकडेवारीनुसार, त्या भूकंपात बळींची संख्या 10 हजारांपेक्षा जास्त होती.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये जखमी झालेल्यांची तसंच मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची ठोस अशी काही माहिती उपलब्ध नाही आणि ही दुर्घटना घडून आता 3 दशकांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे.
नवीन नियम कायदे
त्या भूकंपाच्या धक्क्यानंतर मेक्सिको सिटी नव्या उमेदीनं उभी राहिली. जमीनदोस्त झालेल्या इमारतींच्या जागी आता नवीन इमारती, पार्क किंवा कल्चरल सेंटर्स उभी राहिली.
या भूकंपापासून धडा घेत, सरकारने नवीन इमारती उभारताना नवीन नियम-कायदे तयार केले.
पीडितांच्या मदतीसाठी जे हजारो लोक पुढे आले, ते पुढे जाऊन सामाजिक आंदोलनांचे सूत्रधार झाले आणि त्यांनी या देशाचं राजकीय चित्रही बदललं.
नैसर्गिक आपत्ती
भूकंपानंतर नागरी संरक्षणाची संस्कृती विकसित झाली. ती भूकंपांसाठी मर्यादित न राहता, पूर, आग किंवा चक्रीवादळातही दिसून आली.
आता शाळा, सार्वजनिक इमारती आणि काही कंपन्यांमध्ये वर्षांतून एकदा तरी मॉक ड्रिल घेतली जातात.
अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी उपयुतक्त ठरणारा एक नवा कायदा मेक्सिकोनं केला. त्याअंतर्गत आपत्कालीन परिस्थितीत ताबडतोब सक्रीय होऊ शकतील असे कर्मचारी सर्व सरकारी विभाग आणि खाजगी कंपन्यांनी नियुक्त करावेत, अशी अट आहे.
ते थरथरत होते ...
1985नंतर जन्माला आलेल्या 40 लाख लोकांनी मेक्सिकोचा तो जुना चेहरा पाहिलेलाच नाही. 1985च्या भूकंपाचा केंद्रबिंदू प्रशांत महासागरातील मिकोअकानजवळ होता.
दोन मिनिटांत भूकंप देशाच्या राजधानीच्या केंद्रापर्यंत पोहोचला होता. त्या वेळी अनेक लोक झोपेतत होते. त्यामुळे त्यांना बाहेर पडायला वेळच मिळाला नाही.
अॅलर्ट सिस्टीम
1991 मध्ये, मेक्सिकोने एक अशी व्यवस्था तयार केली, ज्यात पृथ्वीवरच्या हालचालींवर नजर ठेवली जाऊ शकते.
ही सिस्टीम प्रशांत महासागरच्या ग्वेरेरोच्या किनाऱ्यावर बसवण्यात आली आहे. मेक्सिकोतील शास्त्रज्ञांनी हीच जागा निवडली कारण हे शहर मेक्सिको सिटीपासून जवळ आहे.
या भागात 1911 सालापासून आजपर्यंत 7.5पेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झालेला नव्हता.
किनारपट्टी क्षेत्र
भूकंपाचा अभ्यास करणारी ही प्रणाली रिश्टर स्केलवर 5 तीव्रतेपेक्षा जास्त भूकंपांची नोंद घेते.
शहरी भागात 5 पेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झाला, तरच धोका वाढतो असं मानलं जातं. मेक्सिको सिटीमध्ये भूकंप होण्याच्या 50 सेकंद अगोदर अलार्म वाजायला सुरुवात होते.
2003मध्ये मेक्सिकोनं ही सिस्टीम संपूर्ण किनारा क्षेत्रात बसवली. मेक्सिकोच्या पश्चिम भागात भूकंप होण्याची शक्यता जास्त असते.
जुनी घरं
1985च्या भूकंपानंतर लोकांना असं जाणवलं की, ज्या इमारती कोसळल्या त्या मुख्यतः नवीन होत्या.
वसाहत काळातील जुन्या घरांची आणि राजवाड्यांची फारशी हानी झाली नव्हती.
याबद्दल असं म्हटलं जातं की, नंतरच्या काळात बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये वापरण्यात आलेल्या माती- सिमेंटच्या गुणवत्तेची काळजी घेतली नव्हती आणि मूल्यमापनाच्या नियमांचीही कमतरता होती.
तीव्र भूकंप सहन करण्याची क्षमता
असंही म्हटलं जातं की जे नियम कायदे अस्तित्वात होते, त्याकडे बिल्डरांनी दुर्लक्ष केलं आणि सरकारनेही त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही.
याचा परिणाम असा झाला की 800 पेक्षा जास्त इमारती कोसळल्या आणि हजारो घरं जमीनगदोस्त झाली.
या दुर्घटनेनंतर नियम कायद्यात बदल करण्यात आले आणि नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये 8 रिश्टर तीव्रतेचा भूकंप सहन करण्याची ताकद असेल याची काळजी घेतली गेली.
मेक्सिकोचा चेहरा
तीव्र भूकंपात नुकसान कमी होण्याच्या दृष्टीने अशा एजन्सी तयार केल्या गेल्या, ज्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदत आणि बचाव कार्यात लगेच सक्रिय केल्या जाऊ शकतात.
जाणकारांच्या म्हणण्यानुसार 1985च्या भूकंपानंतर इथल्या नागरिकांना अजून काही असे अनुभव आले ज्यातून त्यांनी नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण कसं मिळवावं आणि अशा परिस्थितीतून स्वतःचा कसा बचाव करावा यासारख्या काही मोठे धडे घेतलं.
1985च्या भूकंपानंतर मेक्सिकोने अनेक बदल पाहिले, जुन्या इमारतींच्या जागी पहिल्यापेक्षा भव्य आणि आरामदायी इमारती उभारण्यात आल्या. त्या सुरक्षेच्या दृष्टीनेही परिपूर्ण होत्या. हाच आहे आजच्या मेक्सिकोचा चेहरा.