चांगला फोन आणि कारसाठी चांगले टायर्स हवे म्हणून 3 पर्यटकांची हत्या, महिलेला 20 वर्षांचा तुरुंगवास; नेमकं प्रकरण काय?

फोटो स्रोत, Instagram@Callum10Robinson
- Author, केली एनजी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पर्यटकांच्या हत्या होण्याचे प्रकार जगभरात घडत असतात. अशाच एका घटनेत दोन भाऊ आणि त्यांचा एक मित्र यांची हत्या झाली आहे.
प्रेयसीनं तिच्या प्रियकराकडे तिला एक चांगला फोन आणि तिच्या कारसाठी चांगले टायर्स हवे असल्याची मागणी केली होती.
तिची ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रियकरानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं या पर्यटकांचा पाठलाग केला आणि त्यांना लुटलं.
यात त्या तिन्ही पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जेक रॉबिन्सन आणि कॅलम रॉबिन्सन हे दोन ऑस्ट्रेलियन भाऊ आणि त्यांचा अमेरिकन मित्र कार्टर ऱ्होड यांची मेक्सिकोत हत्या झाल्याचं हे प्रकरण आहे. त्यांच्यावरील वरील हिंसक हल्ल्याला चिथावणी दिल्याबद्दल एरी गिसेल असं 23 वर्षांच्या मेक्सिकन तरुणीला दोषी ठरवण्यात आलं आहे.
एरी ही मेक्सिकन महिला असून तिनं तिचा प्रियकर जेसस याच्याकडे चांगला फोन आणि या पर्यटकांच्या कारमध्ये रस दाखवला होता. तिनं ही मागणी केल्यावर जेसस गेरार्डो यानं त्याच्या साथीदारांसह जेक रॉबिन्सन आणि कॅलम रॉबिन्सन, त्यांचा मित्र कार्टर ऱ्होड यांच्या कारचा पाठलाग केला. नंतर त्यांची लुटमार करताना जेक, कॅलम आणि ऱ्होड यांची गोळी घालून हत्या केली. या तिघांच्या हत्येच्या प्रकरणात, एरी गिसेलला मेक्सिकोत 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अशी झाली हत्या
गेल्या वर्षी मेक्सिकोत जेक रॉबिन्सन आणि कॅलम रॉबिन्सन तसंच त्यांचा मित्र कार्टर ऱ्होड असे तिघेजण कारमधून जात असताना त्यांना धमकावत आणि लूटमार करत असताना त्यांची हत्या झाली होती.
हे तिघेजण एप्रिल 2024 मध्ये उत्तर मेक्सिकोतील बाजा कॅलिफोर्निया राज्यात एका सर्फिंग ट्रीपसाठी (सर्फिंग हा समुद्राच्या लाटांवर खेळला जाणारा खेळ असतो) गेलेले होते. त्यावेळेस हे तिघेही बेपत्ता झाले होते.
नंतर या तिघांचे मृतदेह एका खोल विहिरीच्या तळाशी सापडले होते. त्यांच्या डोक्यावर गोळीबाराच्या जखमा होत्या.
एरी गिसेलनं या सर्फर्सच्या कारच्या टायर्समध्ये रस दाखवला होता. न्यायालयासमोर मांडण्यात आलं की, तिनं तिचा प्रियकर जेसस गेरार्डोला सांगितलं होतं की "माझ्यासाठी एक चांगला फोन आण आणि माझ्या पिकअप कारसाठी चांगले टायर्स आण." त्यानंतर जेसस आणि त्याच्या साथीदारांनी पर्यटकांचा पाठलाग केला.
हत्या करणाऱ्यांचे ड्रग माफियाशी संबंध
आरोपींची फक्त पहिली आणि मधली नाव उघड करण्यात आली आहेत. त्यांची आडनावं उघड करण्यात आलेली नाहीत. मेक्सिकोतील न्यायालयाच्या रिपोर्टिंगसंदर्भातील नियमांनुसार तसं करण्यात आलं आहे.
जेसस गेरार्डो आणि त्याच्यासोबत इरिनिओ फ्रान्सिस्को आणि एंजल जेसस या दोघांनी रॉबिन्सन बंधू आणि त्यांचा मित्र कार्टर ऱ्होड या पर्यटकांच्या कारचा जवळून पाठलाग केला. हे पर्यटक ज्या कॅम्पसाईटवर राहत होते, तिथपर्यंत ते त्यांच्या मागे गेले.
त्यानंतर जेसस आणि त्याच्या साथीदारांनी या तिन्ही पर्यटकांना लुटलं आणि मग त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या तिघांविरुद्धच्या खटल्यांवर अजूनही न्यायालयात सुनावणी होते आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ला सिला रोटा या मेक्सिकेतील वृत्तपत्रानुसार, जेसस गेरार्डो आणि इरिनिओ फ्रान्सिस्को याचे सिनालोआ या अंमली पदार्थाशी संबंधित संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या समूहाशी (ड्रग कार्टेल किंवा ड्रग माफिया) संबंध आहेत. सिनालोआचं नेतृत्व अनेक वर्षांपासून अंमली पदार्थांचा कुख्यात गुन्हेगार (ड्रग लॉर्ड) जोआक्विन 'एल चापो' गुझमनकडे होतं.
जेसस आणि इरिनिओच्या या गुन्हेगारी टोळीशी असलेल्या संबंधांमुळे या दोघांना एल होंगोमध्ये ठेवण्यात आलं आहे. हा बाजा कॅलिफोर्निया प्रांतातील सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था असलेला तुरुंग आहे. एंजल जेससला एन्सेनाडा शहरातील एका वेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (एबीसी) नुसार, या हत्या आणि संघटित गुन्हेगारी टोळी यांच्यात कोणताही संबंध असल्याचं सरकारी वकिलांना वाटत नाही.
'आमची स्वप्नं आता संपली आहेत'
बुधवारी (26 नोव्हेंबर) या खटल्याच्या सुनावणीला पीडितांची कुटुंबं व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होती. त्यावेळेस त्यांनी भावनिक वक्तव्यं केली.
एबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार यावेळेस कॅलम आणि जेक यांची आई डेब्रा रॉबिन्सन म्हणाल्या, "आम्ही स्वप्नं पाहिलं होतं की ते मोठे होतील, त्यांना मुलं होतील. मात्र ते सर्व आता संपलं आहे."
"आता आम्ही त्यांच्या अनुपस्थित जगत आहोत."
33 वर्षांचा कॅलम रॉबिन्सन ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल लॅक्रॉस टीमचा सदस्य होता. तो सॅन डिएगोमध्ये राहत होतो. सॅन डिएगो हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील शहर असून ते मेक्सिकोतील बाजा कॅलिफोर्नियापासून जवळ आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तर कॅलम यांचा धाकटा भाऊ जेक (30 वर्षे) ऑस्ट्रेलियात राहत होतो. तो कॅलमला भेटण्यासाठी अमेरिकेत गेलेला होता. तिथून परतल्यावर तो डॉक्टर म्हणून त्याच्या नवीन नोकरीची सुरूवात करणार होता.
या दोन्ही भावांचा मित्र, 30 वर्षांचा ऱ्होड सॅन डिएगोचा रहिवासी होता. तो एक तंत्रज्ञान सेवा कंपनीत काम करत होता. हत्या झाली तेव्हा काही महिन्यांतच ऱ्होडचं लग्न होणार होणार होतं. त्याचा साखरपुडा झालेला होता.
नताली वियर्ट्झबरोबर ऱ्होडचा साखरपुडा झाला होता. नतालीनं न्यायालयाला सांगितलं की "या जगात तो माझी सुरक्षा होता. आता माझं आयुष्य एखाद्या दु:स्वप्नासारखं झालं आहे."
एरीकची कबुली
एरी गिसेलनं न्यायालयात रडत माफी मागितली. तिनं कबूल केलं की "मी काहीही बोलली तरीदेखील त्यामुळे तुमचं जे नुकसान झालं आहे, त्याची भरपाई होऊ शकत नाही किंवा त्यामुळे तुम्हाला शांतता मिळू शकणार नाही."
"मी आता चांगली व्यक्ती होण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे आणि तुम्ही जे गमावलं आहे त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटतं," असं एरिनं म्हटल्याचं ला सिला रोटा वृत्तपत्रानं म्हटलं आहे. एरि एक सिंगल मदर म्हणजे एकल आई आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











