मोठ्या बहिणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, मग दोन्ही बहिणींना बुडवून मारलं, 54 वर्षीय आरोपीचं कृत्य

फोटो स्रोत, Getty Images
पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमधील दोन सख्ख्या बहिणींचा ड्रम मध्ये बुडवून खून करण्यात आला आहे.
यातील एका मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उघड होईल या भीतीनं आरोपी अजय चंद्रमोहन दास (वय 54) याने दोन्ही बहिणींची हत्या केली.
राजगुरूनगरमधल्या एका कुटुंबातील 8 आणि 9 वर्षांच्या दोघी बहिणी बुधवारी दुपारपासून बेपत्ता होत्या. नातेवाईक आणि इतर ग्रामस्थ या मुलींचा शोध घेत होते.
समाजमाध्यमांवरही मुलींची माहिती प्रसारित करण्यात आली होती. मात्र, दिवसभर शोधूनही मुलींचा शोध लागला नाही.
त्यानंतर मुलींच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस तपासादरम्यान मुलींचे मृतदेह आरोपी राहत असलेल्या खोलीच्यावर असलेल्या दुसऱ्या खोलीत पाण्याच्या ड्रममध्ये सापडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलींचं कुटुंब राहत असलेल्या घराच्या वरच्या खोलीमध्ये 54 वर्षांचा अजय दास हा गेल्या 6-7 वर्षांपासून राहात होता.


घरापासून जवळ असलेल्या एका रेस्तराँ आणि बार मध्ये तो आचारी म्हणून काम करायचा. त्याच्यासोबत इतर काही वेटरही इथं राहायचे. पण घटनेच्या दिवशी ते बाहेरगावी गेले होते.
खाऊचे आमिष दाखवले
बीबीसी मराठीशी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितलं की, "दासच्या सोबत राहत असलेले, वेटर लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. तेव्हा त्यानं खाऊ देण्याच्या अमिषानं या मुलींना घरात बोलावलं.
त्यानंतर तो मोठ्या म्हणजे 9 वर्षांच्या मुलीला घेऊन बाथरुममध्ये गेला. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, पण ती ओरडली. त्यामुळं धाकट्या मुलीनेही ओरडायला सुरुवात केली.
त्यांच्या आवाजाने ही घटना उघडकीस येईल म्हणून त्याने मोठ्या मुलीला आतच कोंडले. तसंच धाकट्या मुलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले. त्यानंतर मोठ्या मुलीलाही तशाच पद्धतीने मारले."
दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये टाकून तो पसार झाला. पोलीस तपास सुरू असताना या ड्रममध्ये दोन्ही मुलींचे मृतदेह बुडवलेल्या अवस्थेत सापडले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
आरोपीचा शोध सुरू असताना पोलिसांना तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पहाटे पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली.
त्याच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार खून, बलात्कार आणि अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार या आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी आक्रमक होत सलग दोन दिवस आंदोलन सुरू ठेवले आहे. गुरुवारी स्थानिकांनी पोलीस ठाण्याबाहेर जमत आरोपीला शिक्षा करण्याची मागणी करत आंदोलन केलं.
यावेळी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण करत मुलींचे मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला.
स्थानिक नागरीक माध्यमांशी बोलताना म्हणाले की, " एका 9 आणि 8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन त्यांचा ड्रममध्ये टाकून खून करण्यात आला आहे. याची जबाबदारी कोण घेणार? आमची मागणी आहे की त्याला तातडीने कडक शिक्षा करण्यात यावी. त्याचबरोबर पीडित कुटुंबाला मदत जाहीर करण्यात यावी."
आंदोलनानंतर मुलींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, यानंतर घटनेचा निषेध नोंदवत राजगुरूनगरमध्ये दुकानं बंद ठेवण्यात आली. दरम्यान, या आरोपीचे वकिलपत्र घेण्यात येऊ नये अशी मागणी देखील आता करण्यात येत आहे.
फास्ट ट्रॅकवर कोर्टात चालवणार खटला - चाकणकर
घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली.
बहुंताश वेळा अशा घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तीकडूनच असे प्रकार केले जात असल्याने त्याबाबत जागृत राहण्याची गरज असल्याचं मत त्यांनी नोंदवलं. शाळेत जनजागृती आणि सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की, "राजगुरुनगरमध्ये झालेली घटना समाजात वाढत असलेल्या विकृतीमुळं घडली आहे. पोलीस प्रशासन, शासन त्यांच्या स्तरावर उत्तम काम करत आहे. पण या घटना अस्वस्थ करतात," असंही त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
आरोपी पश्चिम बंगालचा आहे. तो वरच्या मजल्यावर राहत होता. आरोपी मुलींच्या ओळखीचा होता. ओळखीचा फायदा घेऊन त्याने मुलींची हत्या केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन-तीन तासांत तपास लागला, असंही त्या म्हणाल्या.
एफआयआर दाखल झाल्यापासून पोलिसांनी मंगल कार्यालयातही तपास केला. त्यानंतर आरोपीचा तपास केल्यानंतर तातडीच्या सूचना देऊन पहाटे 4 वाजता आरोपीला अटक झाली.
मुलींना न्याय देण्यासाठीची प्रक्रिया फास्टट्रॅक मध्ये चालेल. तातडीने आरोपपत्र दाखल केलं पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहीजे अशी आमची मागणी आहे. तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि इतर माध्यमातून कुटुंबाला मदत केली जाईल, असंही चाकणकर म्हणाल्या.
भारतीय न्याय संहितेअंतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात कडक शिक्षेची तरतूद आहे. त्यानुसार फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी असल्याचं चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











