'कोणीतरी फोन करुन सांगितलं की पूर येतोय, लाईटही गेली; सगळीकडे काळाकुट्ट अंधार झाला'

अंजू प्रधान

फोटो स्रोत, Manish Jalui / BBC

फोटो कॅप्शन, अंजू प्रधान
    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सिक्कीमची राजधानी गंगटोकच्या पायथ्यापासून तुम्ही वर चढायला सुरुवात करण्याअगोदरच तिस्ता नदीशी तुमची भेट होते. आम्ही तिथं पोहोचतो तेव्हा तिचं रौद्र रुप शांत झालेलं असतं आणि जणू काही झालं नाही अशी ती शांतपणे वाहत असते.

पण 4 ऑक्टोबरच्या त्या काळरात्रीच्या त्या जीवघेण्या जखमा, ज्या इतक्यात अजिबात मिटल्या जाणार नाहीत, त्या नदीच्या काठावर स्पष्ट दिसतात. त्या रात्री सिक्कीममधल्या हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये हाहा:कार उडाला.

तिस्ता नदीला ढगफुटीनंतर मोठा पूर आला आणि विशेषत: उतर सिक्कीममध्ये अनेकांचे जीव गेले आणि हजारो विस्थापित झाले.

समोर जे दृष्ट्य आठवड्याभरानंतरही दिसतं ते पाहता हे नक्की आहे की या स्थितीतून सिक्कीमचं आयुष्य पूर्वपदावर यायला बराच मोठा काळ जाईल.

तिस्ता नदीला ढगफुटीनंतर मोठा पूर आला आणि विशेषत: उतर सिक्कीममध्ये अनेकांचे जीव गेले.

फोटो स्रोत, Manish Jalui/BBC

फोटो कॅप्शन, तिस्ता नदीला ढगफुटीनंतर मोठा पूर आला आणि विशेषत: उतर सिक्कीममध्ये अनेकांचे जीव गेले.

आम्ही सिंगथम डाव्या हाताला वळून सिंगथम नावाच्या गावात शिरतो. हा गजबजलेला परिसर नदीकाठी आहे आणि आता पूर्ण चिखलामध्ये गुरफटलेला आहे. बहुतांश जीवितहानी इथंच झाली आहे. आठवड्याभरानंतर आजही सगळे घरातला गाळ अजून काढतच आहेत.

एका ठिकाणी नदीकडेला थांबून आम्ही पलिकडच्या काठावर नजर टाकतो. एक गाव आहे. त्याचं नाव आदर्श नगर. नदीकाठानं चार-पाच मजली शेकडो घरांची रांग आहेत.

हिमालयात सगळीकडे अशी गावं कित्येक वर्षांपासून विश्वासानं नदीकिनारी, दरीकाठाला वसली आहेत. पण आता त्या विश्वासाला तडा गेला आहे.

या घराच्या रांगेत शेवटपर्यंत दिसतं, तिस-या चौथ्या मजल्यापर्यंत जाड चिखलाचा दाट रंग आहे. त्यातलं सगळं वाहून गेलं आहे. जी पक्की आहेत ती घरं वाचली, कच्ची-जुनी घरं पत्त्यासारखी वाहून गेली.

या रांगेमध्ये वाहून गेलेल्या घरांच्या मोकळ्या जागांमध्ये नजर अडकते. उभ्या असलेल्या घरांवरचे वाळूचे थर काढण्याचं काम अविरत सुरु आहे.

जी पक्की आहेत ती घरं वाचली, कच्ची-जुनी घरं पत्त्यासारखी वाहून गेली.

फोटो स्रोत, Manish Jalui / BBC

फोटो कॅप्शन, जी पक्की आहेत ती घरं वाचली, कच्ची-जुनी घरं पत्त्यासारखी वाहून गेली.

आम्ही नदीपलीकडे पुराची दहशत पाहिलेल्या या गावात जायचं ठरवतो. पण आदर्श नगर आणि सिंगथममधला पूर त्या रात्री पुरात वाहून गेला. आता दोन किलोमीटर पुढे एका छोट्या धरणाचं काम सुरु होतं, त्याच्या अर्धवट उभ्या असलेल्या भिंतीवरुन तात्पुरती पायवाट काढली गेली आहे. त्यामुळे चार किलोमीटरचा वळसा घालून चालतच जावं लागतं. दुसरा पर्याय नाही.

पलिकडच्या गावातले लोक 5 तारखेपासून हेच करत आहेत. कधीपर्यंत असंच चालावं लागणार हे त्यांना माहित नाही. आम्ही पण तेच करतो.

आता इथं परत कसं येणार?

आदर्श नगरमध्ये आता फक्त जेसीबी आणि बुलडोझरचं राज्य आहे. अनेक स्थानिक स्वयंसेवकही इथं जणू वस्तीला येऊन राहिले आहेत. रात्रंदिवस फक्त एकच काम, रस्ते, घरं, सगळं वाळूतनं वर काढणं.

तिस्ता नदीकाठच्या आदर्श नगर मध्ये गेली लग्नानंतर चाळीस वर्षं राहणा-या अंजू प्रधान आम्हाला भेटतात. त्यांच्या वाहून गेलेल्या घराच्या चौथ-यावर वृद्ध सासूसोबत बसून होत्या. त्यांचा सगळा संसार पूरानं वाहून नेला. घर गेलं, त्यातलं सगळं गेलं. फक्त नेसत्या कपड्यांनीशी आणि जीवानीशी त्या वाचल्या.

अंजू सध्या नदीच्या पलिकडे सिंगथममध्ये तात्पुरत्या, रिलिफ कॅम्पमध्ये राहतात,.रोज नदी ओलांडून येतात. पडक्या घराकडे पाहून परत शून्यातून सगळं कसं उभं रहायचं याचा विचार करतात.

"पहिले दोन दिवस इकडे येऊच शकले नाही. नंतर धरणावरुन चालत येऊ लागले. दिवसा इथे तीन-चार किलोमीटर चालत येते. जे मदतीला लोक आले आहेत त्यांच्यासोबत थांबते. रात्री पुन्हा कॅम्पमध्ये रहायला निघून जाते," अंजू सांगतात.

त्या आम्हाला नसलेल्या घराच्या सगळ्या जागा दाखवायला लागतात. "इथं माझं किचन होतं, इथं मुलांच्या खोल्या होत्या, इथं कपाटं होती. हा रस्ता बाहेरच्या छोट्या परसात जायचा जिथं मी छोटी बाग लावली होती," अंजूंच्या डोळ्यासमोर घर आहे तसं दिसतं असतं आणि आम्हाला मात्र वाळूचा दोन फूट थर बसलेला रिकामा चौथरा दिसत असतो.

अनेक रस्ते वाहून गेले आहेत.

फोटो स्रोत, Manish Jalui / BBC

फोटो कॅप्शन, अनेक रस्ते वाहून गेले आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अंजू आपले पती, सासू आणि दोन मुलांसह इथं राहायच्या. लग्न होऊन इथं आल्या, पण एवढ्या वर्षांत तीस्ता नदी अशी जीवघेणी झालेली त्यांनी पाहिली नव्हती. त्या दिवशीची रात्र भयानक होती.

"वरुन कोणी तरी फोन करुन सांगितलं की पूर येतोय, पाणी येतंय, तुम्ही पळा. लगेच लाईटही गेली. सगळीकडे काळाकुट्ट अंधार झाला. काहीच दिसत नव्हतं. सगळेच दिसेल तिकडं पळत होते. आम्ही पण पळालो," त्या सांगतात.

अंजू, त्यांचं कुटुंब आणि बहुतांश सगळे गावकरी केवळ नेसत्या कपड्यांनिशी पुलाच्या दिशेनं पळाले. घर, संसार मागे सोडला. पूल ओलांडून सिंगथमच्या काठावर पोहोचले आणि मग अंधार जे जसं दिसतंय तसं मागे वळून पाहू लागले.

पाचेक मिनिटांत त्यांना पाण्याचा मोठा लोट येतांना दिसलाच. त्यांच्या समोरच तो पूलही पाण्यासोबत वाहून गेला. गाव दिसलंच नाही. दोन दिवसांनी पलिकडे पोहोचले तेव्हा समजलं की काहीही उरलं नाही, फक्त जीव वाचला.

"जे पळू शकले नाहीत त्यांनी जीव गमावला. सिंगथम बाजारात अजूनही मृतदेह सापडताहेत. सगळं संपलं. बाजारात आमचं दुकान होतं ज्यावर गुजराण चालायची. तेही वाहून गेलं," अंजू सांगतात.

'जे पळू शकले नाहीत त्यांनी जीव गमावला'

फोटो स्रोत, Getty

फोटो कॅप्शन, 'जे पळू शकले नाहीत त्यांनी जीव गमावला'

पुरासोबत आलेल्या दु:खाचा कढ काही काळानं ओसरून जाईलही, पण मुख्य प्रश्न आहे की पुढं काय? आता सगळं परत कसं उभारणार?

आणि फक्त अंजू प्रधानच नाहीत, तर या नदीकाठच्या गावातली शेकडो कुटुंबं अशी मोकळ्या आभाळाखाली फेकली गेली आहेत. त्यांना भविष्य माहीत नाही, पण एक नक्की माहित आहे की, या गावात ते आता राहू शकत नाहीत.

"एक तर नक्की आहे की आता इथं राहू शकत नाही. तो प्रश्नच निर्माण होत नाही. नदीच्या किना-याला आता कसं राहणार? परत पूर आला तर? मनात खूप भिती आहे. रात्री झोपूही शकणार नाही. आम्हाला दुसरीकडेच जावं लागेल. आम्ही सरकारला विनंती करतो आहोत की दुसरीकडे आम्हाला सुरक्षित जागा द्या," अंजू यांच्या स्वरात विनवणी असते.

अंजू प्रधान यांच्याशी बोलून आम्ही निघतो तेव्हा शेजारचा एक घरांचा पट्टा आम्हाला दिसतो. तिथं आता एकही घर नाही आहे. एक वयस्क महिला वाळूच्या ढिगा-यात काही खोदत असतात. थोड्या वेळात त्यांना काही मिळतं. तो एक फोटोंचा अल्बम असतो. काठी घेऊन त्या फोटोंवरचा थर त्या एकेक करुन पुसायला लागतात.

धरणाच्या कामावर बिहारहून इथं आलेले हे मजूर कुटुंब होतं. तात्पुरतं घर वाहून गेलं. पण या फोटोतल्या आठवणी किमतीपलिकडच्या. सोबत त्यांना एक प्लास्टिकची पिशवी सापडते. त्यात लाल रंगाच्या पावत्या असतात. काही ओल्या झाल्या म्हणून ते सुकवायला लागतात.

काय आहे, मी विचारतो. त्या रोजंदारीच्या कामाच्या रोजचं काम केल्याच्या पावत्या आहेत. त्या दाखवून ठेकेदाराकडून पैसे घ्यायचे असतात.

'तिला हाका मारत राहिलो, पण उत्तर आलंच नाही'

ही अशीच कहाणी उत्तर सिक्कीममधल्या असंख्य गावांची आहे. इथल्या चार जिल्ह्यांतले हजारो लोक विस्थापित झाले आहेत. आणि सहा हजाराहून अधिक रिलिफ कॅम्पमध्ये तात्पुरता आसरा घेऊन राहत आहेत.

आम्ही सिंगथाम गावात परत येतो. गावाच्या आजूबाजूला सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे. नदीकाठचा परिसर तर केक कापावा तसा पुरानं कापून नेला आहे. या वर्दळीच्या भागात अनेकांना त्या दिवशी जीव गमवावे लागले.

देशभरातून, औषधं, अन्न, कपडे मदत म्हणून इथे येऊन जमा होतं आहे.

फोटो स्रोत, Mayuresh Konnur/BBC

फोटो कॅप्शन, देशभरातून, औषधं, अन्न, कपडे मदत म्हणून इथे येऊन जमा होतं आहे.

इथल्या एका देवळात उभारलेली तात्पुरती छावणी होती. आम्ही तिथं जातो. दाराशीच मदत म्हणून आलेल्या कपड्यांचा मोठा ढीग लागला आहे. त्यावर काही लहान मुलं त्यांना कोणते कपडे बसतील हे शोधत होती.

बाजूला औषधांचेही बॉक्सेस होते. देशभरातून, औषधं, अन्न, कपडे मदत म्हणून इथे येऊन जमा होतं आहे. भाज्या कापणं चालू होतं. एक मोठा भटारखाना मागच्या भागात सतत चालू असलेला दिसला.

विस्थापित कुटुंबांनी मिळेल त्या कोप-यातली जागा पकडली होती. या छावण्यांमध्ये ४ ऑक्टोबरच्या रात्रीच्या आयुष्य उध्वस्त करणा-या कहाण्या उराशी घेऊन अनेक जण दिवस काढत आहेत.

याच छावणीत आम्हाला भेटतात श्याम बाबू प्रसाद आणि त्यांचं वाचलेलं कुटुंब. त्यांना एक खोली वेगळी दिलेली आहे. नजरेतच त्यांच्या वाट्याला काय आलं ते दिसतं. श्याम यांच्या पायाला जखम झाली आहे. ते हालचाल करु शकत नाही.

पण जे त्यांच्यासोबत झालं ते पाहता जीव वाचला हेच महत्वाचं. पण त्यांच्या मनात त्याबद्दलही शंका आहे.

श्याम बाबू प्रसाद आणि त्यांचं वाचलेलं कुटुंब.

फोटो स्रोत, Manish Jalui/BBC

फोटो कॅप्शन, श्याम बाबू प्रसाद आणि त्यांचं वाचलेलं कुटुंब.

श्याम इथल्याच नदीकाठच्या गजबजलेल्या लालबाजार भागात रहायचे. त्यांच रेशनिंगची दुकान लागूनच होतं. वडिलांनी ते सुरु केलं होतं. त्यांचं चार महिन्यांपूर्वीच जूनमध्ये लग्न झालं होतं. पत्नी दुर्गावती आणि वयस्क आईसोबत रहायचे. पण त्या रात्री तीस्तेचं पाणी काळ होऊन आलं.

"आम्ही झोपलो होतो. पण एकदम पाण्याचा लोट येऊ लागला. माझ्या बायकोनं फोन घेतला आणि टॉर्च लाईटमध्ये ती पाणी किती आहे हे पाहू लागली. पण तेवढ्या पाणी जोरात वाढलं. जवळपास १५ फूट ती लाट होती. आम्हाला तिघांनाही त्या लाटेनं जोरात दूर फेकून दिलं. काहीच समजलं नाही. पाणी कोणाला कुठं घेऊन गेलं, काहीच कळलं नाही," श्याम डोळ्यात पाणी आणून सांगतात.

बाजूला बसलेल्या त्यांच्या आई कांती देवी यांच्या डोळ्याची धार तर थांबतच नाही आहे.

श्याम यांची पत्नी दुर्गावती (डावा फोटो) आणि बहिण संतोषी देवी (उजवा फोटो)
फोटो कॅप्शन, श्याम यांची पत्नी दुर्गावती (डावा फोटो) आणि बहिण संतोषी देवी (उजवा फोटो)

श्यामचा हात सिलिंगच्या पंख्याला लागला. त्याला धरुन ते बसून राहिले. दुस-या सकाळी दहा वाजता, जवळपास आठ तासांनंतर, त्यांना बाहेर काढलं गेलं. पण बाहेर आल्यावर त्यांना समजलं की पत्नी दुर्गावती कुठंच नाही आहे. आठवड्याभरानंतरही दुर्गावतींचा ठावठिकाणा नाही आहे आणि त्यांचा मृतदेहही मिळाला नाही आहे.

"मी सिलिंगवर चढल्यावर बायकोला हाका मारत राहिलो. पायाला लागलं होतं, श्वासही घेता येत नव्हता, तरीही मी फक्त तिच्या नावानं हाका मारत राहिलो. पण सगळीकडे अंधार होता. कुठूनच आवाज आला नाही," हे सांगतानाही श्यामचा श्वास अडखळत होता.

श्याम यांच्या कुटुंबाची शोकांतिका इथंच थांबत नाही. त्यांच्या शेजारीच त्यांची मोठी बहिण संतोषी देवी रहायच्या. त्यांची सिलिगुडीमध्ये ११ वीत शिकणारी मुलगी चांदनी वाढदिवसासाठी घरी आली होती. त्यांच्याही घरात पाणी घुसलं. चांदनी वाचली, पण आईचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला.

"एकदम जोरात पाणी आलं. आईचा आणि माझा हात सुटला. आम्ही काहीही करुन धरुन बसलो होतो. माझा फोनही बुडाला. तो सापडला आणि मी फोन लावत राहिले. मी आईला खूपदा आवाज दिला. पण आई तिथं नव्हती. नंतर जेव्हा सगळंच तुटलेलं पाहिले तेव्हा समजलं की आई तिथूनच बाहेर ओढली गेली होती," चांदनी सांगते.

चांदनी म्हणते की तिच्या आईनं तिला कायमच तिला हवं ते करण्याचं, शिकण्याचं स्वातंत्र्य दिलं. ती या परिस्थितीतूनही उभी राहून शिकणार आहे.

कारणमीमांसा: ढगफुटी की पूर की धरण?

उत्तर सिक्कीममध्ये उंचावर जसंजसं प्रवास करत आम्ही पुढे जातो, नदीकाठी आणि डोंगरावरच्या वस्त्यांमध्येही असंच अपरिमित नुकसान झालं आहे. ते पदोपदी दिसतं. रस्ते तुटले आहेत, काही वाहून गेले आहेत. पूल तर अनेक वाहून गेले आहेत.

जोपर्यंत ते पुन्हा उभारले जाणार नाहीत तोपर्यंत पलिकडच्या गावांशी संपर्क होऊ शकणार नाही. ते कधी होणार हे सांगता येणार नाही.

तिस्ता नदीचं सिक्किममधलं खोरं

फोटो स्रोत, Mayuresh Konnur/BBC

फोटो कॅप्शन, तिस्ता नदीचं सिक्किममधलं खोरं

आम्ही प्रवास करत उत्तरेकडे सरकतो तेव्हा गावागांवर सुरु असलेली मदत दिसते. जी गावं संपर्कातून तुटली आहे त्यांच्यापर्यंत अन्न, जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी अनेक स्वयंसेवक ते पाठीवर घेऊन डोंगर चढून जातांना दिसले.

दर पाच मिनीटांनी आर्मीचं हेलिकॉप्टर डोक्यावरुन जातांना दिसतं कारण अजूनही एअरलिफ्टिंग चालू आहे. पर्यटकही अडकले आहेत.

जीव वाचलेले लोक गावं सोडताहेत कारण तिथं राहणं धोक्याचं आहे. सिक्कीम सरकारच्या माहितीनुसार 60 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येला फटका बसला आहे. 40 हून अधिकांना जीव गमवावा लागला आहे, पण हा आकडा वाढू शकतो कारण शंभर पेक्षा अधिक बेपत्ता आहेत आणि 50 पेक्षा अधिक मृतदेहांची ओळख अद्याप पटली नाही आहे.

सावरायला खूप मोठा काळ लागेल.

पण आता या प्रलयानंतर सिक्किम आणि ईशान्य भारतात एक खूप मोठी आणि गंभीर चर्चा सुरु झाली आहे. ती म्हणजे हा प्रलय केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणायची की यामागे काही मानवनिर्मित कारणंही आहेत?

60 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येला फटका बसला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 60 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येला फटका बसला आहे.

आतापर्यंतच्या माहितीनुसार, उत्तर सिक्किममधल्या उंच हिमालयातल्या ल्होनक या ग्लेशियल तलावावर ढगफुटी झाली. त्यातून पाण्याचा मोठा प्रपात आला आणि मग खाली तिस्ता नदीच्या खो-यात तिला पूर आला.

अशाच प्रकारची स्थिती 2010 मध्ये केदारनाथ प्रलयावेळेस झाली होती. ढगफुटी आणि ग्लेशियल लेक ओव्हर फ्लडिंग (GLOF) ही पर्यावरणीय घटनेचा संबंध जागतिक वातावरण बदल आणि तापमान वाढीशी आहे असं अनेक अभ्यासक सांगतात.

पण त्याच बरोबर सिक्किममध्ये अजून एक घटना घडली. ती म्हणजे, या ल्होनक लेकच्या खालच्या दिशेस, तिस्ता नदीवर चुंगथांग इथे एक धरण बांधण्यात आलं आहे ज्यातून 1200 मेगवॉट विजेची निर्मितीही होते.

तलावातून आलेला पाण्याचा प्रपात या धरणाच्या पाण्यात आला, ते धरण हा धक्का सहन करुन शकलं नाही आणि ते जवळपास उध्वस्त झालं. या धरणातल्या पाण्यामुळे पुराची तीव्रता आणि नुकसान अधिक भयावह झालं का, हा प्रश्न आता विचारला जातो आहे.

चुंगथांग धरणाच्या परिसराची पुराअगोदर सॅटेलाईट इमेज

फोटो स्रोत, Google Earth

फोटो कॅप्शन, चुंगथांग धरणाच्या परिसराची पुराअगोदर सॅटेलाईट इमेज

याला इतिहास सुद्धा आहे. चुंगथांगच्या धरणाला इथे 2007 पासून खूप विरोध होतो आहे. इथं मोठं आंदोलनही त्याविरोधात गेली 17 वर्षं सुरु आहे. विशेषत: या भागातल्या स्थानिक आदिवासींचा या धरणाला विरोध होता.

कारण यामुळे हिमालयाला, इथल्या इकोसिस्टिमला हानी पोहोचले असं त्यांची म्हणणं होतं. पण विरोध असतांनाही आणि सरकारं बदलली तरीही, धरण बांधण्यात आलं आणि वीजनिर्मिती सुरुही झाली.

आता हा प्रलय झाल्यावर पुन्हा चर्चा सुरु झाली की या विरोधाकडे लक्ष दिलं गेलं असतं तर नुकसान टाळता आलं असतं का? आम्ही 'अफेक्टेड सिटिझन्स ऑफ तिस्ता' या आंदोलकांच्या संघटनेशी बोललो.

ग्यात्सो लेपचा हे त्यांचे नेते आहेत. त्यांच्या घरी उत्तर सिक्किममध्ये प्रत्यक्ष भेटायचं होतं, पण त्यांच्या भागाचा संपर्क पूर्ण तुटला आहे. त्यामुळे फोनवरच बोलावं लागलं.

"वरुन पाणी आलं. ते वेगानं खालच्या धरणात आलं. त्या धरणात अगोदरचं एवढं पाणी होतं. जर मोजू तर वीस हजार स्वीमिंग पूलचं एकत्र केलं तर तेवढं पाणी होतं. जर तुम्ही भूगोल बघाल तर सलग उतार आहे पुढे. त्यामुळे पूर आला, धरण पडलं आणि तेही पाणी वेगात खाली निघालं. त्यानं काय होईल तेच झालं. आम्ही आदिवासी एवढ्या वर्षांपासून आंदोलन करतो आहोत. तेव्हा आम्हाला म्हणायचे की तुम्ही एक्स्पर्ट्स नाही. पण आम्ही हे सगळं अगोदरच पाहिलं होतं," ग्यात्सो सांगतात.

जीव वाचलेले लोक गावं सोडताहेत कारण तिथं राहणं धोक्याचं आहे.

फोटो स्रोत, Manish Jalui/BBC

फोटो कॅप्शन, जीव वाचलेले लोक गावं सोडताहेत कारण तिथं राहणं धोक्याचं आहे.

सध्या पूर्णपणे स्थिती पूर्वपदावर आणण्यात व्यस्त असणा-या सिक्कीम सरकारचं मात्र यावर वेगळं म्हणणं आहे. "जेवढा पाऊस झाला ते पाहता सगळीच धरणं आणि बांध ओव्हरफ्लो झाली. त्यातून मोठ्या प्रमाणात बाहेर पाणी बाहेर आलं. आता धरणं फुटलं की अजून काही झालं, याची नक्की चौकशी होईल," असं सिक्किमचे मुख्य सचिव विजय भूषण पाठक 'बीबीसी'शी बोलतांना म्हणाले.

ल्होनक ग्लेशियल तलावावर झालेल्या ढगफुटीचा संबंध जागतिक हवामान बदलाशी आहे असं हवामान तज्ञ सांगत आहेत. धरणाचा हिमालयाच्या शरीरावर होणारा परिणाम पर्यावरणतज्ञ सांगत होतेच.

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्किम इथल्या पर्वतरांगांमध्ये उभारल्या जाणा-या मोठ्या धरणांच्या वेळेस तज्ञांनी कायमच इशारा दिला आहे. त्यामुळे माणसाचा आपत्तीच्या कारणातला वाटा टाळता येणार नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)