You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणनं कतारमधील ज्या अमेरिकन तळावर हल्ला केला तिथं नेमकं काय घडलं?
- Author, शॉन सेडॉन आणि गॅब्रिएला पॉमेरॉय
- Role, बीबीसी न्यूज
अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केल्यानंतर इस्रायल-इराण यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला.
इराणनं सोमवारी (23 जून) कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. अमेरिकेनं अणुऊर्जा केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात हा हल्ला केल्याचं इराणनं नंतर स्पष्ट केलं.
कतारची राजधानी दोहा येथे आकाशात मोठा आवाज ऐकू आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. तर काही व्हीडिओंमध्ये हवाई संरक्षण प्रणालींनी हवेतच क्षेपणास्त्रं रोखण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचं वर्णन 'अत्यंत कमजोर' आणि 'अपेक्षित' असं वर्णन केलं. त्याचबरोबर या भागात शांतता प्रस्थापित होऊ शकते, असंही त्यांनी सुचवलं.
दरम्यान, मंगळवारी (24 जून) डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविराम लागू झाला असल्याचे जाहीर केलं.
परंतु, या दोन्ही देशांमधील तणावाची परिस्थिती अजूनही कायम असल्याचे दिसून येते. या संपूर्ण परिस्थितीबद्दल आपण जाणून घेऊयात.
इराणनं नेमकं काय लक्ष्य केलं आणि का?
इराणच्या क्षेपणास्त्रांनी आखाती देशातील सर्वात मोठे अमेरिकन लष्करी तळ अल-उदैदवर निशाणा साधला. शनिवारी (21 जून) सायंकाळी अमेरिकेनं इराणच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित तीन अणू केंद्रांवर बॉम्ब फेकले होते. त्याला हा हल्ला प्रत्युत्तर असल्याचं इराणनं स्पष्ट केलं होतं.
अल-उदैद हे अमेरिकन लष्कराचं हवाई मोहिमांसाठीचं मुख्यालय आहे. काही ब्रिटिश लष्करी अधिकारीही तिथे रोटेशन (आळीपाळीनं) पद्धतीनं सेवा बजावतात.
या हल्ल्याची पुष्टी सर्वप्रथम इराणी सरकारी माध्यमांनी केली आणि नंतर लष्करानेही त्याची अधिकृत घोषणा केली.
"इराण आपल्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला सहन करणार नाही. प्रत्येक हल्ल्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. या भागातील अमेरिकन तळ हे ताकदीचे नाहीत उलट ते असुरक्षित आहेत," असं इराणच्या लष्करातील सर्वात ताकदवान शाखा 'आयआरजीसी'नं आपल्या निवेदनात म्हटलं.
अमेरिकेनं यापूर्वीच इराणला त्यांच्या अणू केंद्रांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर न देण्याचा इशारा दिला होता. इराणला त्यांनी या भागातील संघर्षावर द्विपक्षीय मार्गानं तोडगा काढण्यासाठी सहमत होण्याचं आवाहन केलं होतं.
या हल्ल्यात इराणनं किती क्षेपणास्त्रं डागली याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळे वृत्त आले आहे. इराणनं 6, अमेरिकेनं 14 असं सांगितलं, तर कतारनं 19 क्षेपणास्त्रं असल्याचं रॉयटर्सनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. ही सर्व क्षेपणास्त्रं रोखल्याचीही माहिती त्यांनी दिली.
या हल्ल्यात कोणी जखमी झालं नाही किंवा कोणाचा मृत्यूही झाला नाही.
हल्ल्याच्या काही तासांपूर्वी, अमेरिका आणि ब्रिटननं कतारमधील त्यांच्या नागरिकांना 'सुरक्षित स्थळी आश्रय' घेण्याचा सल्ला दिला होता. स्टेट डिपार्टमेंटनुसार, सुमारे 8,000 अमेरिकन आणि हजारो ब्रिटिश नागरिक कतारमध्ये राहतात.
हल्ल्यानंतर कोण, काय म्हणाले?
इराणनं क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी तयारी करत असल्याचा इशारा दिला होता. 'न्यूयॉर्क टाइम्स'नं तीन इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं याबाबतचं वृत्त दिलं होतं.
जीवितहानी कमी होण्याच्या दृष्टीने इराणनं कतारला आपले इरादे कळवले होते, असं त्यात म्हटलं होतं.
या हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे आभार मानले होते.
इराणनं आम्हाला लवकर सूचना दिली. त्यामुळं कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळं त्यांचे आभारी आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं.
त्यांनी याचं वर्णन 'अत्यंत कमजोर' हल्ला असा केला होता. या हल्ल्यात कोणताही अमेरिकन व्यक्ती जखमी झालेला नाही आणि फारसं नुकसानही झालेलं नाही. आता 'शांततेची संधी' आहे, असं ते म्हणाले होते.
परंतु, कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं या हल्ल्याला 'आश्चर्यकारक' ठरवलं. हा हल्ला 'आमच्या सार्वभौमत्वाचं स्पष्टपणे उल्लंघन' असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
त्यांनी कतार हा या भागातील इस्रायल आणि इतरांच्या तणावाबाबत आधीच सतर्क राहण्याचा इशारा देणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक असल्याचं सांगितलं.
दरम्यान, इराणनं या हल्ल्यात कोणालाही दुखापत किंवा नुकसान केलेलं नाही, पण त्यांचा देश कोणाच्याही अन्यायासमोर झुकणार नाही, असं इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांनी स्पष्ट केलं.
"आम्ही कोणावरही अन्याय केलेला नाही आणि कुणी आमच्यावर अन्याय केला, तर तो आम्ही कधीच स्वीकारणार नाही. आम्ही कोणाच्याही अन्यायासमोर झुकणार नाही, हाच इराणी जनतेचा विचार आहे," असं त्यांनी 'एक्स'वर म्हटलं. (बीबीसी पर्शियनच्या भाषांतरानुसार).
मंगळवारी (24 जून), इस्रायलनं ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला सार्वजनिकपणे मान्यता दिली. तर इराणनं, इस्रायलनं हल्ले थांबवल्यासच ते आपले हल्ले थांबवतील, असं स्पष्ट केलं.
शस्त्रसंधी सुरू होण्यापूर्वीच इराणनं 'एक शेवटचा क्षेपणास्त्र हल्ला' केला, असं इराणच्या सरकारी माध्यमांनी जाहीर केलं होतं.
दरम्यान, "शस्त्रसंधीचं कोणतंही उल्लंघन झाल्यास इस्रायल कठोर प्रत्युत्तर देईल," असा इस्रायली सरकारनं इराणला इशारा दिला होता.
हल्ला होणार, याचे काही संकेत मिळाले होते का?
इराण कतारवर क्षेपणास्त्र डागण्याच्या तयारीत आहे, असे संकेत अमेरिकेला मिळाले होते.
हल्ल्याच्या काही तास आधी कतारनं आपले हवाई क्षेत्र तात्पुरतं बंद करण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी अमेरिका आणि ब्रिटननं कतारमधील आपल्या नागरिकांना 'सुरक्षित स्थळी आश्रय' घ्या, अशी सूचनाही केली होती.
परंतु, या इशाऱ्यांमधून हल्ला होणार आहे हे स्पष्टपणे कळत नव्हतं. अमेरिकेनं सांगितलं की, त्यांनी ही सूचना 'फक्त काळजीपोटी' जारी केली होती, तर ब्रिटननं अमेरिकेच्या सूचनेनुसार पावलं उचलत असल्याचं म्हटलं होतं.
मात्र, हल्ल्याच्या सुमारे एक तास आधी 'बीबीसी'ला त्या तळाला 'खात्रीशीररित्या धोका' असल्याची माहिती मिळाली होती.
इराणनं कतारकडे क्षेपणास्त्र डागण्यासाठी मिसाइल लाँचर्स तैनात केल्याचे वृत्त काही अमेरिकन माध्यमांनी अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्यांच्या नावानं दिलं होतं.
मिसाइल लाँच होण्यापूर्वीच विमानं दुसऱ्या विमानतळांकडे वळू लागल्याचे फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सवर दिसत होतं.
फ्लाइट रडार 24 नुसार, मिसाइल लॉन्च होण्याच्या अगोदर दोहाकडे सुमारे 100 विमानं जात होती.
हमद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जगातील सर्वात व्यग्र 10 विमानतळांपैकी एक आहे. इथून दररोज सुमारे 1,40,000 प्रवासी प्रवास करतात.
या भागातील बहारीन आणि कुवेत या देशांनीही काही काळासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते.
हे सर्व कशामुळं झालं?
शनिवारी (21 जून) अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर हल्ले केले.
13 जूनपासून इराण आणि इस्रायल यांच्यात एकमेकांविरोधात लष्करी कारवाई सुरू झाली होती. यात अमेरिका हस्तक्षेप करेल की नाही, याची चर्चा सुरू असतानाच अमेरिकेनं इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ले केले.
इस्रायल दररोज इराणमधील अणू व लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. इराणला अण्वस्त्रं करण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे, असं इस्रायल सातत्यानं सांगत आलं आहे.
इस्रायल आणि अमेरिकेच्या सरकारांनी इराणला अण्वस्त्रं मिळवण्यापासून नेहमीच रोखण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा अणू कार्यक्रम नागरी उद्देशांसाठी असल्याचं इराण सातत्यानं सांगत आला आहे.
आमच्या हल्ल्यांमुळे इराणच्या आण्विक केंद्रांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेनं केला, पण या हल्ल्यांचा नेमका किती परिणाम झाला हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते.
युद्धविराम लागू होण्यापूर्वी रविवारी (22 जून) आणि सोमवारीसुद्धा (23 जून) इराण आणि इस्रायल यांच्या परस्पर हल्ले सुरूच होते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.