इराण आणि इस्रायलमधील युद्धविरामाच्या घोषणेनंतर आतापर्यंत काय काय घडलं?

इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांदरम्यान युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतरही दोन्ही देश एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत.

इस्रायलचं असं म्हणणं आहे की, इराणने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. दुसरीकडे, इराणने या दाव्याला फेटाळून लावलं आहे.

आतापर्यंत काय काय घडलं?

भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 10:38 वाजता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितलं की, इराण आणि इस्रायलदरम्यान युद्धविराम लागू झाला आहे.

या घोषणेच्या एका तासानंतर इस्रायलने म्हटलं की, आम्ही अमेरिकेच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाशी सहमत झालो आहोत. दुसऱ्या बाजूला, इराणने त्याआधी म्हटलं होतं की, जर इस्रायलकडून हल्ले रोखले गेले तर आम्हीदेखील आमच्या बाजूने हल्ले थांबवू.

भारतीय वेळेनुसार, दुपारी एक वाजता, इस्रायली सैन्यानं सांगितलंय की त्यांनी इराणने डागलेले क्षेपणास्त्र ओळखले असून ते उत्तर इस्रायलवर रोखले आहेत.

दुसऱ्या बाजूला, इराणने मात्र कोणत्याही प्रकारची क्षेपणास्त्र डागल्याच्या दाव्यांना फेटाळून लावलं आहे. परंतु, आयडीएफनं म्हटलं आहे की इस्रायल "पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल".

शस्त्रसंधी लागू होण्यापूर्वी, दोन्हीही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हवाई हल्ले झाले. इराणच्या सरकारी माध्यमांचं असं म्हणणं आहे की, इस्रायलकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांनी राजधानी आणि इतर शहरांना लक्ष्य केलं. यामध्ये कमीतकमी नऊ जण मारले गेले आहेत. या नऊ जणांमध्ये एका अणुशास्त्रज्ञाचाही समावेश आहे.

इस्रायलच्या बेअरशेबा शहरात किमान चार जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले.

इराणकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास सडेतोड उत्तर देऊ - इस्रायल

इराणवरील हल्ल्यांचं "उद्दिष्ट साध्य" झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला सहमती दर्शवल्याचे इस्रायली सरकारनं म्हटलं आहे.

आपल्या एका वक्तव्यामध्ये इस्रायल सरकारने म्हटलं आहे की, "युद्धविरामाचं कोणत्याही प्रकारचं उल्लंघन झाल्यास इस्रायल सडेतोड उत्तर देईल."

इस्रायलने इराणकडून अण्वस्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा दुहेरी धोका दूर केला आहे, असाही दावा या निवेदनात करण्यात आला आहे.

इस्रायलने इराणच्या लष्कराचं "मोठं नुकसान" केलं आहे, तसेच इराण सरकारच्या अखत्यारित असणारी कित्येक ठिकाणं नष्ट केली आहेत. यासोबतच, एका वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाची हत्या केली असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे.

"इराणकडून असलेला अणुधोका दूर करण्यासाठी अमेरिकेने दिलेला पाठिंबा आणि भागीदारीबद्दल इस्रायल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानतो," असंही या निवेदनात म्हटलं आहे.

इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने 'एक्स'वर लिहिलं आहे की, "पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सोमवारी रात्री संरक्षण मंत्री, आयडीएफचे प्रमुख आणि मोसादचे संचालक यांच्यासमवेत सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत असा रिपोर्ट देण्यात आला की, इस्रायलने ऑपरेशन 'रायझिंग लायन'ची बहुतेक उद्दिष्टं साध्य केली आहेत."

त्यात असंही म्हटलं आहे की, "ऑपरेशन 'रायझिंग लायन'सह, इस्रायलने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यासोबतच, जगातील प्रमुख शक्तींमध्ये स्वतःला पहिल्या रांगेत नेऊन ठेवलं आहे. हे इस्रायलच्या लोकांसाठी आणि आपल्या सैनिकांसाठी एक मोठं यश आहे."

ट्रम्प म्हणतात 'इराण-इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाली'

इराणने आता अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे, अशी घोषणा इराणच्या सरकारी माध्यमांनी केली आहे. इराणची वृत्तसंस्था तस्निमने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने कतार आणि इराकमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागल्याचे सांगितले आहे.

तर तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण शस्त्रसंधीची घोषणा केली आहे.

शस्त्रसंधी यापुढे सहा तासांत होईल असं ते सोशल मीडियावर म्हणाले आहेत.

परंतु अशी शस्त्रसंधी झाली आहे की नाही यावर इराण आणि इस्रायल यांनी अद्याप काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.

इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्सशी संलग्नित असलेल्या फार्स न्यूज एजन्सीने शस्त्रसंधी झालीच नसल्याचे म्हटले आहे. हे वक्तव्य 'पूर्णतः खोटे' असल्याचे फार्सने म्हटले आहे.

याआधी कतारमधून स्फोटाचे आवाज आले होते. रॉयटर्स आणि एएफपी या वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार असे स्फोटांचे आवाज ऐकू आले होते.

अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीबीसीला माहिती दिली. कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ल्यांच्या धोक्याची जाणीव व्हाईट हाऊस आणि संरक्षण मंत्रालयाला असून ते या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या शस्त्रसंधी प्रस्तावाला आपण सहमती देत आहोत असं इस्रायल सरकारने म्हटलं आहे. एका सरकारी घोषणेत जर कोणत्याही प्रकारे या शस्त्रंसधीचं उल्लंघन झालं तर आपण त्याला पुरेपूर उत्तर देऊ असंही म्हटलं आहे.

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल- अन्सारी यांनी सोशल मीडिया एक्सवर या हल्ल्यांचा निषेध केला आहे.

ते म्हणतात, "या हल्ल्यांना आम्ही कतारचे सार्वभौमत्व, त्याची हवाई हद्द आणि आंतरराष्ट्रीय कायदे तसेच संयुक्त राष्ट्र कराराचे उल्लंघन मानतो."

ते म्हणाले, "कतारच्या हवाई संरक्षण व्यवस्थेने हल्ल्यांना यशस्वीरित्या नष्ट करुन इराणी क्षेपणास्त्रांना थांबवलं आहे."

ते सांगतात, "अल उदिद हवाईतळ आधीच मोकळा करण्यात आला होता."

या हल्ल्यात कोणीही मृत पावले नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही असा दावाही त्यांनी केला.

ते सांगतात, "या बेशरम आक्रमक हल्ल्यांना आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामानुसार प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आम्ही राखीव ठेवत आहोत."

कतारची राजधानी दोहाजवळ असणाऱ्या अल उदैद हवाईतळ हे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या एअर ऑपरेशन्सचे मुख्यालय आहे. यात जवळपास 8हजार अमेरिकन सैनिक असतात.

या हवाईतळावर आलटूनपालटून ब्रिटनचे सैनिकही असतात. सध्याच्या स्थितीत हा हवाईतळ अमेरिकेच्या मोहिमांसाठी मुख्यालयाप्रमाणे काम करतो आणि अमेरिकेला मोहिमेसाठी लागणारं साहित्य ठेवण्याचंही केंद्र आहे.

या हवाईतळावर आखाती भागातील सर्वात लांब धावपट्टीही आहे. कतारने हा हवाईतळ वापरण्यास अमेरिकेला 2000 साली परवानगी दिली होती.

इराणकडून प्रतिक्रिया

इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अब्बास अरागची म्हणाले, जर इस्रायलनं सैन्य मोहीम बंद केली असेल तर आमचाही प्रत्युत्तर देण्याचा कोणताही विचार नाही.

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफऑर्म एक्सवर लिहिलं, जर इस्रायल आपलं अवैध आक्रमण बंद करेल तर इराणही प्रत्युत्तर देण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याच्या विचारात नाही.

अरागची म्हणतात, आतापर्यंत शस्त्रसंधी किंवा लष्करी मोहीम समाप्तीवर कोणताही करार झालेला नाही. अर्थात इराणी प्रमाणवेळेनुसार सकाळी चारपासून इस्रायलने आपले हल्ले थांबवले तर आम्ही कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर देणार नाही.

ते म्हणतात, आमची लष्करी मोहीम थांबवण्याचा अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.