मार्क्स कमी पडले म्हणून वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू; हा तणाव जीवघेणा ठरतोय का?

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"तुम्हाला देखील कमी मार्क मिळत होते. तुम्ही तर कुठे कलेक्टर झालात? तुम्हीही शिक्षकच झालात ना?," साधना भोसले या बारावीत शिकणाऱ्या मुलीने तिच्या वडिलांना उद्देशून म्हटलेलं हे वाक्य.

हे ऐकून चिडलेल्या धोंडीराम भोसले यांनी साधनाला मारहाण केली आणि याच मारहाणीनंतर साधना भोसलेचा मृत्यू झाला.

नीटच्या (वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशपरीक्षा) परीक्षेत कमी मार्क कसे पडतात? यावरून बापलेकीमध्ये सुरु झालेल्या वादाने हिंसक वळण घेतलं आणि सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या नेलकरंजी गावात राहणाऱ्या साधनाचा मृत्यू झाला.

नीटच्या सराव परीक्षेत मार्क कमी पडत असल्याने बापलेकीत वाद झाला आणि त्या वादाची परिणती मारहाणीत झाली.

नेलकरंजीत घडलेल्या या प्रकाराने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची मानसिक परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

नेलकरंजीत राहणारे धोंडीराम भोसले उच्चशिक्षित होते. त्यांच्या पत्नी नेलकरंजीच्या माजी सरपंच होत्या.

मुलीच्या मृत्यूनंतर साधनाची आई प्रीती भोसले यांनी धोंडीराम भोसले यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आणि धोंडीराम भोसले यांना 24 जून पर्यंत कोठडी मिळाली आहे.

बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर असणारा परीक्षांचा दबाव, या दबावाला कारणीभूत असणारी कौटुंबिक, सामाजिक कारणं, या सगळ्या प्रक्रियेत पालकांकडून नकळतपणे होणाऱ्या चुका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात पालकांची भूमिका याविषयी पुन्हा एकदा नव्याने चर्चा होणं गरजेचं आहे.

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना याबाबत काय वाटतं. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काय केलं पाहिजे आणि मानसोपचारतज्ज्ञांची याबाबतची मतं काय आहेत याबाबत आम्ही तज्ज्ञांशी बोललो आणि त्यातून पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपयोगाच्या काही गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.

आपल्या मुलाने इंजिनियर किंवा डॉक्टरच व्हावं असं पालकांना का वाटतं?

दरवर्षी लाखो विद्यार्थी नीटची (NEET) परीक्षा देत असतात. मात्र यापैकी काही हजार विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो पण मागच्या काही वर्षांमध्ये देशभरात या प्रवेश परीक्षांची तयारी करून देणाऱ्या कोचिंग क्लासेसमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे.

कोरोनानंतर लाखो रुपये फीस घेऊन ऑनलाईन कोचिंग देणाऱ्या क्लासेसची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

याविषयी बोलताना शिक्षण क्षेत्रातील जाणकार भाऊसाहेब चासकर म्हणतात, "पालकांकडे पैसे आहेत म्हणून नीट किंवा जेईईसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी शिकवणी लावली जाते. दहावीत मिळालेले भरमसाट मार्क्स अकरावी-बारावी विज्ञान आणि त्यापुढील प्रवेश परीक्षेत फारसे कामाला येत नाहीत. आपली मुलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा आयआयटीमध्ये जाण्याची स्वप्नं यांनी उराशी बाळगलेली असतात. गुंतवणूक आणि परतावा अशी मार्केटची भाषा पालक मुलांसाठी वापरताना दिसतात. पैसे खर्च केले तर मार्क्स मिळायला हवे असा आग्रह असतो."

आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हावं ही पालकांची मानसिकता नेमकी कुठून तयार होते?

या प्रश्नाचं उत्तर देताना पुण्यात मानसोपचारावर काम करणारी 'मनोब्रम्ह' ही संस्था चालवणारे डॉ. किरण चव्हाण यांनी सांगितलं, "बऱ्याचदा पालकांना एखाद्या क्षेत्रात करियर करण्यात अपयश येतं आणि मग त्यांच्या मुलांनी त्यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करावं असं त्यांना वाटू लागतं. हे करत असताना आपल्या मुलाची क्षमता आहे का, त्याची त्या क्षेत्रात आवड आहे का हे तपासलं जात नाही आणि मुलांवर सरसकट या गोष्टी लादल्या जातात."

"अनेक पालकांना इंजिनियरिंग किंवा मेडिकल हा गरिबीतून सुटकेचा मार्ग वाटतो आणि त्यातून मुलांच्या शिक्षणावर मोठी गुंतवणूक केली जाते. ग्रामीण आणि शहरी भागातील अकरावी, बारावीचे कॉलेजेस एकीकडे ओस पडले आहेत आणि दुसरीकडे प्रवेश परीक्षांची तयारी करणारे कोचिंग क्लासेस ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे या स्पर्धा परीक्षांना तोंड देताना मुलांवर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास व्हायला हवा," असं भाऊसाहेब चासकर म्हणतात.

शिक्षण आणि मानसशास्त्र या विषयावर संशोधन करणाऱ्या डॉ. श्रुती पानसे यांना वाटतं की, मुलांवर पालकांचा असणारा अविश्वास ही मोठी अडचण आहे. त्या म्हणतात, "डॉक्टर, इंजिनिअर किंवा भरपूर पैसे मिळवून देणारा एखादा व्यवसाय किंवा नोकरी हीच कशी महत्त्वाची आहे हे पालकांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे. आपलं मूल त्याला आवडेल त्या क्षेत्रामध्ये पुढे जाईल असा विश्वास पालकांना मुलांवर अनेकदा ठेवावासा वाटत नाही. आपल्याला हे माहितीच आहे की अनेक कॉलेजेस मध्ये केवळ विज्ञान आणि कॉमर्स या शाखा शिकवल्या जातात. पण कला शाखेचे विषय त्या कॉलेजमध्ये नसतातच. याचं कारण डॉक्टर इंजिनिअर सारख्याच काही क्षेत्रांकडे असलेला खूपच मोठा ओढा."

मुलांवर केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीची सुरुवात त्यांच्या बालपणापासूनच होते असं डॉ. श्रुती पानसे यांना वाटतं.

त्या म्हणतात, "बालवाडी पासून ते कॉलेजपर्यंत आणि विविध कोर्सेसना जी काही भली मोठी फी आकारली जाते ती काहीही करून देण्याची पालकांची तयारी असते. एकदा का आत्ता पैसे खर्च झाले तरी चालतील पण एकदा का शिक्षण झालं आणि नोकरी लागली की मुलांना यशाचे मार्ग खुले होतील अशी आशा पालकांच्या मनात असते. पण यामुळे पालक खूपच तणावात येतात. वेळोवेळी ती आर्थिक गुंतवणूक मुलांना बोलून दाखवतात . यामुळे मुलांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ताण आल्याशिवाय राहत नाही."

पालकांच्या या 'गुंतवणुकीचा' मुलांवर काय परिणाम होतो?

सध्या आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या एका मुलाचे पालक म्हणतात, "आयआयटीची तयारी करत असताना अचानक एका मध्यरात्री माझा मुलगा माझ्याकडे येऊन रडायला लागला. नेमकं काय झालंय हेच मला कळेना. त्याच्याशी बोलल्यावर कळलं की त्याने आयआयटीच्या प्रवेश परीक्षेचा ताण घेतला आहे. मी कधीच माझ्या मुलावर अपेक्षांचं ओझं लादलं नाही, पण तरीही त्याच्यावर दबाव निर्माण झाला होता. शेवटी त्याला आम्ही सांगितलं की तू अपयशी झालास तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत."

या संवादानंतर त्या मुलाने जोमाने परीक्षेचा अभ्यास केला, रात्रंदिवस मेहनत घेतली आणि सध्या तो मुंबई आयआयटीमध्ये शिकतो आहे.

जर त्यादिवशी त्याच्या पालकांसमोर तो रडला नसता तर? जर तो दबावात आहे हे त्याच्या पालकांना कळलंच नसतं तर? मुलांवर तयार होणारा हा दबाव वेगवेगळ्या कारणांमुळे होत असल्याचं डॉ. किरण चव्हाण म्हणतात.

"विद्यार्थ्यांना त्यांच्यावर येणारा दबाव कसा हाताळला पाहिजे हे सांगितलं जात नाही. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष न देता त्यांच्यावर या गोष्टी लादल्या जातात. यापैकी काही मुलं सकारात्मक पद्धतीने हा दबाव हाताळतात आणि काही मुलांवर याचे नकारात्मक परिणाम होतात, आणि हळू हळू मुलांना नैराश्य येऊ लागतं. बऱ्याचदा पालकांनी केलेल्या खर्चाचा देखील दबाव मुलांवर तयार होतो," असं किरण चव्हाण म्हणतात.

अभ्यासाचा तणाव आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

भाऊसाहेब चासकर यांना वाटतं की, "या परिस्थितीत पालक सबळ होतात आणि मुलं दुबळी होतात. हा दबाव निमूटपणे सहन करण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणताही पर्याय नसतो. यातूनच मुलांमध्ये नैराश्य येऊ शकतं. नीट (NEET) आणि जेईई (JEE) या परीक्षांच्या तयारीसाठी राजस्थानमधल्या कोटा येथे गेलेल्या मुलांपैकी अनेक मुलं कमी मार्क्स घेऊन येतात तेव्हा त्यांना पालकांचे जणू गुन्हेगार आहोत असा अपराधगंड छळत असतो. तिकडं मुलांच्या होणाऱ्या आत्महत्या हा गंभीर चिंतेचा विषय असूनही अनेक मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय पालक मुलांना या चरकात ढकलतात. दिवसेंदिवस ही समस्या आणखीन उग्ररूप धारण करते आहे."

नेलकरंजीत घडलेली घटना हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. पण या वयोगटातील विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध दबावांचा सामना करावा लागतो. त्यातूनच अनेक विद्यार्थी नैराश्याचा सामना करतात तर काही विद्यार्थी आत्महत्येचा पर्याय देखील निवडत असल्याचं दिसून आलं आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवर आधारित एक अहवाल 28 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित करण्यात आला.

IC3 या संस्थेने विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवर हा अहवाल ('Student suicides: An epidemic sweeping India') प्रकाशित केला होता. यातील आकडेवारीनुसार विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावरचं राज्य आहे. त्याखालोखाल तामिळनाडू आणि मध्य प्रदेशचा नंबर लागतो.

महाराष्ट्रात 2022 मध्ये 1764 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि 2021 मध्ये 1834 विद्यार्थ्यांनी त्यांचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या प्रमुख कारणांमध्ये त्यांच्यावर असलेला अतिरिक्त शैक्षणिक ताण, जबरदस्तीने लादलेले करियरचे पर्याय, शैक्षणिक संस्थांकडून सहकार्याचा अभाव, भेदभाव, रॅगिंग, कुटुंबातली बदलती परिस्थिती, भावनिक दुर्लक्ष अशी कारणे आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीत पालकांनी काय समजून घेतलं पाहिजे?

आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हावं असं वाटण्यामागे अनेक सामाजिक, आर्थिक कारणं असू शकतात. बऱ्याचदा पालकांच्या वैयक्तिक आयुष्यात मुलांवर लादलेल्या करियरची कारणं सापडू शकतात.

याबाबत बोलताना डॉ. किरण चव्हाण म्हणतात की, "मुलांवर कुठलाही अभ्यास लादण्याआधी पालकांनी हे तपासलं पाहिजे की खरोखर त्यांच्या मुलांची ते करण्याची इच्छा आहे का. जी परीक्षा द्यायची त्यानंतरच करियर त्यांना माहिती आहे की नाही, त्यांनी इतर पर्यायांची चाचपणी केली पाहिजे की नाही हे देखील बघितलं पाहिजे."

डॉ. किरण पुढे म्हणतात की, "पालकांना त्यांच्या मुलांची बलस्थानं आणि कमकुवत बाजू पक्क्या माहिती असतात. मात्र तरीही त्या स्वीकारायची तयारी अनेकदा दिसत नाही. पालकांनी प्रामाणिकपणे हे तपासलं पाहिजे आणि मग पुढचा निर्णय घेतला पाहिजे. यासाठी पालकांचा मुलांसोबतचा संवाद खूप महत्त्वाचा ठरतो."

बारावीच्या मुलांचं पालकत्व ही अनेकांसाठी तारेवरची कसरत ठरू शकते. मुलं नुकतीच वयात आलेली असताना एकाच वेळी वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यत मुलांना नवनवीन आव्हानांचा सामना करायचा असतो आणि अशा परिस्थितीत पालकांसोबतचा संवाद खुंटला तर चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता असते.

भाऊसाहेब चासकर म्हणतात, "मुलांच्या भविष्याची प्रामाणिक काळजी पालकांना वाटते हे वास्तव नजरेआड करता येत नाही. आपल्या मुलांचं काय होईल? अशी असुरक्षितता पालकांच्या मनात असते. ती स्वाभाविक आहे. मात्र या गोंधळाचे याचे थेट परिणाम मुलांवर होत आहेत. याबाबत समाजात जाणीवजागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे."

"वाढत चाललेला स्क्रीन टाईम, अकॅडमिक ओव्हरलोड, आकर्षणातून निर्माण होणाऱ्या लैंगिक समस्या, हिंसा आणि व्यसनांचे आकर्षण अशा अनेक गोष्टी आहेत. मुलं ताणात आणि त्रासात आहेत. प्रत्येक माध्यमिक शाळेत आणि महाविद्यालयात समुपदेशकाची नेमणूक करण्याची मागणी करूनही सरकार दुर्लक्ष करत आले आहे," अशी तक्रार चासकर यांनी केली.

तर श्रुती पानसेंना असं वाटतं की मुलांना त्यांची आवड जोपासण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं.

"मुलांना एखादी विशिष्ट परीक्षा पास होता आली नाही याचा अर्थ त्याच्या समोरच्या सर्व वाटा संपल्या असं होत नाही. आजच्या काळात तर अनेक प्रकारच्या वाटा मुलांसमोर आहेत. त्यामुळे निराश न होता मुलांना त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार, आवडीच्या क्षेत्रात करियर घडवू देणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाची सूचना

जर मानसिक तणाव किंवा कुठल्याही प्रकारचे दडपण तुमच्यावर येत असेल तर ही समस्या मानसोपचारतज्ज्ञांच्या साहाय्याने सोडवता येते. कृपया खालील हेल्पलाईन्सवर संपर्क साधावा.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
  • iCALL - 9152987821
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.