पुणे : कामाच्या ताणामुळे तरुणीच्या मृत्यूचे नेमके प्रकरण काय? आईने केले गंभीर आरोप

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

अर्न्स्ट अँड यंग कंपनीच्या पुण्यातील कार्यालयात काम करणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीचा जुलै महिन्यात मृत्यू झाला. हा मृत्यू कामाच्या अतिताणामुळं झाला असल्याचा आरोप तिच्या आईनं केला आहे. याबाबत कंपनीचे चेअरमन राजीव मेमाणी यांना तरुणीच्या आईने ई मेल केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ई मेलमध्ये अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायिल या तरुणीच्या मृत्यूला कंपनीची कार्यपद्धती जबाबदार असल्याचं म्हणत, तिच्या आई अनिता ऑगस्टिन यांनी या अति ताणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचं म्हणलं आहे.

कामगार मंत्रालयानं या प्रकरणाची दखल घेत चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.

तर, आपण कुटुंबीयांच्या दुखात सहभागी असून त्यांनी मांडलेले प्रश्न आपण गांभिर्यानं घेतले असल्याचं अर्न्स्ट अँड यंग कंपनीनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

मूळची कोचीची राहणारी अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायिल चार्टर्ड अकाऊंटंटचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मार्च 2024 मध्ये पुण्यातील अर्न्स्ट अँड यंग या कंपनीत नोकरी करू लागली. पण, जुलै महिन्यात तिचा मृत्यू झाला.

याच पार्श्वभूमीवर अ‍ॅनाची आई अनिता ऑगस्टिन यांनी लिहिलेलं एक पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झालं आहे. त्यात अनिता कंपनीच्या कामाच्या पद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.

पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

अर्न्स्ट अँड यंग या कंपनीचे चेअरमन राजीव मेमाणी यांना लिहिलेल्या या पत्रात अनिता म्हणतात, “मूल गमावलेल्या आईच्या दुखातून मी हे लिहित आहे. हे दु:ख इतर कोणाच्या वाटेला येऊ नये म्हणून मी हे लिहिणं आवश्यक समजते.

नोव्हेंबर 2023 मध्ये सीएची परिक्षा पास झाल्यानंतर अ‍ॅना अर्न्स्ट अँड यंग या कंपनीत मार्च 19 , 2024 पासून नोकरी करायला लागली. तिची खूप स्वप्नं होती. इतक्या प्रतिष्ठीत कंपनीत पहिली नोकरी मिळाल्यानं ती आनंदी होती. पण 4 महिन्यातच तिच्या मृत्यूची बातमी आम्हाला ऐकावी लागली. ती फक्त 26 वर्षाची होती.”

“मिळालेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण करण्याकडे तिचा कल असायचा. मात्र नवं वातावरण, कामाचा ताण आणि कामाच्या वेळांचा परिणाम तिच्यावर होत होता. तिला काम सुरु केल्यानंतर काहीच दिवसांत एन्झायटी, झोप न येणं आणि तणावाचा त्रास जाणवायला लागला. पण ती याकडं दुर्लक्ष करुन काम करत राहिली.”

“6 जुलै रोजी मी आणि माझे पती पुण्याच अ‍ॅनाच्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी आलो होतो तेव्हा तिनं आठवडाभर छातीत दुखत असल्याचं आम्हांला सांगितलं. आम्ही तातडीनं तिला रुग्णालयात नेलं. पण तिचा इसीजी व्यवस्थित होता.

हृदयरोग तज्ज्ञांनी आम्हांला सांगितलं की, पुरेशी झोप मिळत नसल्यानं आणि वेळेवर खाणं होत नसल्यानं तिच्यावर हा परिणाम होत आहे. त्यांनी पित्तावरील काही औषधं लिहून दिली. त्यावेळी आम्ही कोचीवरुन आलो होतो. पण तरीही कामाचा तणाव असल्यानं आणि खूप काम राहिल्यानं ती कामावर रुजू झाली.

रविवारी तिचा पदवीप्रदान समारंभ होता. पण त्या दिवशीही दुपारपर्यंत ती घरून काम करत राहिली. स्वत:च्या पैशांनी आम्हांला पदवीप्रदान सोहळ्याला घेऊन जाणं हे तिचं स्वप्न होतं. पण तिची ही भेट शेवटची ठरेल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती,” असं त्यांनी म्हटलं.

“तिला ज्या टीमसोबत काम करायला सांगितलं होतं त्या टीम मधल्या अनेकांनी यापूर्वी कामाच्या ताणामुळं राजीनामा दिला होता. तिच्या मॅनेजरने तिला सांगितलं होतं की, तू इथं काम करुन या टीम बद्दलचं लोकांचं मत बदलून दाखव. पण हे पूर्ण करण्यासाठी तिला तिचा जीव गमवावा लागला.”

या ईमेलमध्ये अ‍ॅनाच्या आईनं म्हटलं आहे की, “तिचे मॅनेजर क्रिकेट मॅचसाठी मिटिंगच्या वेळा बदलायचे. तिला दिवसाच्या शेवटी काम दिलं जायचं त्यामुळं तिच्या तणावात भर पडत होती. कामाच्या या वाढत्या तणावाबद्दल ती आमच्याशी बोलली होती. आम्ही तिला इतकं काम करू नकोस असा सल्ला दिला होता. मात्र या तणावाकडं तिच्या मॅनेजरनं लक्ष दिलं नाही. एकदा तिला रात्री उशिरा एक काम सांगण्यात आलं जे सकाळपर्यंत पूर्ण करायला सांगितलं. तिनं आराम करायला वेळ मिळणार नाही असं सांगितल्यावर, रात्री पूर्ण करू शकतेस सगळेच करतात असं तिला सांगितलं गेलं.”

“ती रात्री उशिरा कामावरुन परतायची तेव्हा प्रचंड थकलेली असायची. झोपी जात असतानाच तिला कामाबाबतचे मेसेज यायचे. तरीही दिलेल्या वेळात काम पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करत होती. अ‍ॅनाने कधी तिच्या मॅनेजर्सच्या या वागण्याबद्दल तक्रार केली नाही. पण नव्यानं नोकरीवर रुजू होणाऱ्यांना असं प्रचंड दिवस रात्र काम करावं लागणं, वीकेंड्सना काम करत राहणं हे मला पटत नाही. कामाच्या या तणावामुळेच आमच्या या तरुण मुलीला जीव गमवावा लागला आहे. पण या प्रकारानंतरही तिच्या अंत्यसंस्काराला कंपनीकडून कोणी आलं नाही.

मी तिच्या मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यालाही कोणताही प्रतिसाद दिला नाही. सीए होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अनेक वर्ष खर्ची घातली. पण इतक्या वर्षांची मेहनत कंपनीच्या या चार महिन्यांच्या तणावानं वाया घालवली.

आता तरी या पत्राची दखल घेतली जाईल आणि कंपनीत आवश्यक बदल केले जातील जेणेकरून आमच्या वाट्याला आलेलं दु:ख दुसऱ्या कोणाला भोगावं लागू नये, अशी मी आई म्हणून आशा करते.”

कंपनीची भूमिका

याविषयी बीबीसी मराठीशी फोन वरुन बोलताना अर्न्स्ट अँड यंगच्या कम्युनिकेशन विभागाच्या असोसिएट डायरेक्टर पुष्पांजली सिंग यांनी, कंपनीचे चेअरमन राजीव मेमाणी यांना हा ई मेल मिळाला असल्याचं मान्य केलं. तसंच तो मेल आला त्याचवेळी तो समाजमाध्यमांवर व्हायरल देखील झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.

बीबीसी मराठीशी बोलताना सिंग म्हणाल्या की, “अ‍ॅनाला हार्ट अटॅक आला असल्याचं तिच्या मैत्रिणीनं आम्हाला कळवलं. त्यानंतर तातडीनं तिचे मॅनेजर, एच आर आणि सहकारी रुग्णालयात पोहोचले. तिच्या मृत्यूनंतर आम्ही सातत्यानं तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत आणि अशा पद्धतीची कोणतीही नाराजी त्यांनी यापूर्वी व्यक्त केली नव्हती.

"हा ईमेल आल्यानंतर चेअरमन राजीव मेमाणींनी तातडीनं त्याला प्रतिसाद दिला आहे. तसेच तिच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी एका टीमला पाठवायची सूचना देखील केली आहे. तिचे अंत्यसंस्कार कोचीमध्ये झाले असण्याची शक्यता आहे, त्यामुळं कोणी जाऊ शकलं नसेल,” सिंग म्हणाल्या.

दरम्यान याप्रकरणावर कंपनी तर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटलं की, “अ‍ॅनाच्या मृत्यूबद्दल आम्ही दुखी आहोत. ती आमच्या एस आर बाटलीबोई यांच्या नेतृत्वातील ऑडिट टीम मध्ये काम करत होती. तिचा करिअरचा प्रवास या दु:खद घटनेमुळं थांबला. आमच्यासाठी हे न भरुन निघणारं नुकसान आहे. कुटुंबीयांना झालेल्या दुखाची भरपाई आम्ही कोणत्याही प्रकारे करू शकत नाही. मात्र त्यांना आवश्यक ती सर्व मदत आम्ही पुरवली आहे. तसेच यापुढेही पुरवत राहू.”

तिच्या कुटुंबीयांकडून पाठवल्या गेलेल्या या मेलची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. आमच्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य अत्यंत महत्तवाचे आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी आणि आमच्या एक लाख कर्मचाऱ्यांना कामासाठी उत्तम वातावरण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं यात म्हटलं आहे.

सरकारकडून दखल

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दखल आता थेट केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी एक्स या प्लॅटफाँर्मवर या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, “अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायिल हिच्या मृत्यूमुळं आम्ही दुखी आहोत. या प्रकरणात कामाचे ठिकाण सुरक्षित नसल्याचे आणि तिथे शोषण होत असल्याचे जे आरोप झाले आहेत त्याबाबत आम्ही चौकशी करत आहोत. कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यासाठी कामगार मंत्रालयाकडून तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे.”

तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे.

एक्स या प्लॅटफॉर्मवर अजित पवार यांनी पोस्ट करत म्हणले आहे की “अतितणावाचा सामना करणाऱ्या तरुणांची अवस्था चिंताजनक आहे. तणावामुळं तरुणांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रकरणांकडं आपण लक्ष देणं आवश्यक आहे."

त्यांनी अर्न्स्ट अँड यंग या कंपनीला कामाच्या ठिकाणी तणाव दूर करण्यासाठी सुधारात्मक उपाय लागू करण्यास सांगितले आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.