पाय 3 इंच लांब करण्यासाठी ऑपरेशन केलं, पण ते फसलं, वाचा नेमकं काय घडलं?

    • Author, टॉम ब्राडा
    • Role, बीबीसी न्यूज

इलेन फू यांच्या पायावर काळ्या-निळ्या रंगाचे मोठ-मोठे व्रण आहेत, जे पाय लांब करण्यासाठी केलेल्या सर्जरीच्या भयंकर अनुभवाची त्यांना आठवण करून देतात.

2016 साली 49 वर्षांच्या इलेन यांच्या पाच सर्जरी आणि तीन बोन ग्राफ्ट झाले होते. यात त्यांची आयुष्यभराची कमाई तर गेलीच, पण त्यांना त्यांच्या सर्जनविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले.

मात्र, कोणताही जबाब न नोंदवता जुलैमध्ये हे प्रकरण निकाली काढण्यात आलं.

इलेन यांच्यावरील उपचारादरम्यान त्यांच्या पायाच्या हाडात धातूची एक तीक्ष्ण वस्तू घुसली होती, तर दुसऱ्या वेळी त्यांना पायाच्या आतील बाजूस तीव्र जळजळ जाणवली होती.

त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी उपचारादरम्यान कुठल्याही प्रकारची हयगय केल्याची बाब वारंवार नाकारली. तसंच, या उपचारादरम्यानच्या गुंतागुंतीबाबत ही त्यांना आधीच अवगत करण्यात आल्याचेही डॉक्टर म्हणाले. तर काही समस्या या इलेनच्या स्वत:च्या कृतीमुळे उत्पन्न झाल्या.

इलेनने शस्त्रक्रिया का केली?

इलेन यांना त्यांच्या उंचीबाबत नेहमीच तक्रार होती. त्या सांगतात, “12 वर्षांपर्यंत माझी उंची माझ्या वयातील मुलींच्या तुलनेने चांगली होती. मात्र, 14 वर्षांची होईपर्यंत मी बाकी मुलींच्या तुलनेने लहान दिसू लागले. मलाही त्यांच्यासारखी उंची हवी होती. मला सतत असं वाटायचं की, उंच असणं म्हणजे अधिक चांगलं आणि सुंदर दिसणं, उंच लोकांसाठी अधिक संधी आहेत.”

वाढत्या वयानुसार त्यांचं उंचीबाबतच वेड आणखीनच वाढलं.

इनेल या ‘बॉडी डिस्मॉर्फिया’ने ग्रस्त होत्या. ही एक अशी मानसिक अवस्था आहे, ज्यात व्यक्ती स्वत:च्या दिसण्याबाबत अधिक चिंताग्रस्त होत जातो. इतरांना ते जरी सामान्य वाटत असले तरी त्यांच्यासाठी ते कठीण असतं. याचे परिणाम खूप भयंकर होऊ शकतात.

25 व्या वर्षी इलेन यांनी पायांची लांबी वाढवणाऱ्या चिनी क्लिनिकबाबत एक लेख वाचला. या लेखात मध्ययुगीन काळासारख्या पायांचं वर्णन आणि इतर सविस्तर माहिती दिली होती. या लेखाने त्या आकर्षित झाल्या.

इलेन म्हणतात, “मला माहित आहे की, लोक यावर विविध प्रश्न उपस्थित करतील. पण तुम्हाला बॉडी डिस्मॉर्फिया असेल, तर तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल इतकं वाईट का वाटतं, या प्रश्नांचं कोणतही तार्किक उत्तर तुमच्याकडे नसतं”.

'तीन इंच उंच व्हायची इच्छा होती'

या घटनेच्या 16 वर्षांनंतर इलेन यांना लंडनमधल्या एका खासगी क्लिनिकबद्दल कळलं, जिथे अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जायची.

त्या क्लिनिकमध्ये जीन-मार्क गुईशेट नावाचे अस्थिरोगतज्ज्ञ काम करत होते. ते हाडांची लांबी वाढवण्यात तज्ज्ञ होते. यासाठी त्यांनी 'गुईशेट नेलट' नावाचं एक उपकरण बनवलं होतं.

इलेन म्हणतात की, "माझ्यासाठी ही एक खूप आनंदाची बातमी होती. कारण आता लंडनमध्येच माझ्यावर उपचार होऊ शकत होते. आणि मी इथेच बरी देखील होऊ शकत होते."

"डॉ. गुईशेट यांंनी अगदी मोकळेपणाने या शस्त्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींची कल्पना दिली होती. यामुळे मज्जातंतूंचे नुकसान, रक्ताच्या गुठळ्या, हाडे एकत्र न होणे असे परिणान होऊ शकतात, असे ते म्हणाले होते.

"मी याबाबत खूप संशोधन केलं होतं आणि मी एका खूप महागड्या डॉक्टरांकडे जाणार होते. त्यामुळे मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. माझं स्वप्न होतं की माझी उंची 3 इंचाने वाढेल."

त्यांनी 50 हजार पाऊंड (जवळपास 53.5 लाख रुपये) खर्चावर 25 जुलैला सर्जरी केली. इलेनसाठी उंची वाढीचे स्वप्न पूर्ण होण्याची ही सुरुवात होती.

पाय लांब करण्याची वैद्यकीय सुविधा तुलनेने सामान्य नाही. परंतु ही वैद्यकीय प्रक्रिया जगातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 16 लाख ते 1.5 कोटी रुपयांपर्यंत असू शकते.

इलेन सांगतात, “सर्जरीनंतर मी खूप उत्साहित होते. सुरुवातीला कुठलाच त्रास झाला नाही. सर्जरी झालीय असं वाटतच नव्हतं. मात्र, 90 मिनिटांनी खूप असह्य त्रास सुरू झाला. पायांची आग व्हायला लागली. मी वेदनेने ओरडू लागले सकाळी 6 वाजेपर्यंत मी ओरडत होते.”

या थोडा त्रास होतो, कारण प्रक्रियेत पायाच्या हाडाचे दोन भाग करून मधे मेटल रॉड बसवला जातो.

हळूहळू त्या हाडांच्या मधे बसवलेल्या मेटल रॉडची लांबी वाढवली जाते, जेणेकरून रुग्णाची लांबी वाढेल.

नंतर हाडाचे हे दोन्ही भाग पुन्हा जुळतात आणि त्यांच्यामधील खाली भाग भरला जातो. पण ऑपरेशनची ही प्रक्रिया खूप किचकट असते.

लांब आणि गुंतागुंतीची प्रक्रिया

ब्रिटिश ऑर्थोपेडिक असोसिएशनचे पूर्व प्रमुख हामिश सिम्पसन सांगतात की, “या प्रक्रियेत दोन-तीन महिने जातात, तर पूर्णपणे ठीक होण्यास दुप्पट कालावधी जातो. बहुतांश लोकांना बरे होण्यास एक वर्षही लागतो.”

सर्जरीनंतर इलेन यांनी पाय लांब करण्यासाठी कठीण व्यायाम केले, जेणेकरून रॉड पूर्णपणे फीट होईल. पण उलट झालं आणि त्रास वाढत गेला.

इलेन सांगतात, “मला असह्य वेदना होत होत्या. मी बेडवर होते, कुस बदलत असताना अचानक काहीतरी आवाज आला, आणि असह्य त्रास सुरु झाला.”

इलेनची भीती खरी ठरली, दुसऱ्या दिवशी स्कॅन केलं असता त्यांच्या डाव्या पायात लागलेला एक नेल हाडाला छेदून आरपार गेला होता. फेमर (पायाच्या वरच्या भागाचे हाड) तोडून बाहेर आले होते. फेमर शरीरातील सर्वात मजबूत हाड असतं.

इलेन काळजीत पडल्या. मात्र, डॉ. गुईशेट यांनी त्यांना दिलासा दिला.

इलेनच्या म्हणण्यानुसार, “त्यांनी सांगितलं की घाबरण्याची गरज नाही, आपण जखम बरी होण्याची प्रतीक्षा करू आणि नंतर प्रक्रिया पुन्हा सुरू होईल.”

या दरम्यान इलेनच्या उजव्या पायाची प्रक्रिया सुरू राहिली आणि डाव्या पायावरील शस्त्रक्रियेची तारीख निश्चित करण्यात आली.

ऑपरेशनसाठी जास्तीचे पैसे लागतील हे त्यांना माहीत होते, पण ही प्रक्रिया पूर्ण होईल याबाबत त्या आनंदी होत्या.

आरोग्याविषयी इतर काही महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा :

'पाठीचा कणा वाकडा झाला'

सप्टेंबरपर्यंत त्यांचा उजवा पाय 7 सेमीने वाढला होता. पण गोष्टी नेहमीप्रमाणे होत नव्हत्या. त्यांचे दोन्ही पाय लहान-मोठे झाले होते, त्यामुळे त्यांच्या पाठीचा कणा वाकडा झाला होता. त्यांना सतत वेदना होत होत्या.

सहा आठवड्यांनंतर त्यांचे पाय स्कॅन केले गेले आणि त्यामध्ये उजव्या पायाच्या हाडांची वाढ थांबल्याचं दिसून आलं. या पायात, फेमरचे दोन तुकडे रॉडच्या मदतीने जोडले होते.

त्यानंतर इलेन यांनी डॉक्टरांना भेटून मिलानच्या एका हॉस्पिटलमध्ये दुसरं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल 2017 मध्ये डॉक्टरांनी इलेन यांचा डावा पाय मोठा करण्याची प्रक्रिया सुरु केली. ही प्रक्रिया सुरु असताना उजव्या पायातील हाड वाढावं यासाठी त्या पायात बोनमॅरो (मज्जारज्जू) टाकण्यात आला.

इलेन शस्त्रक्रियेनंतर शुद्धीवर आल्या आणि त्यांना आणखीन एक वाईट बातमी कळली.

इलेन म्हणतात की, "डॉ. गुईशेट यांनी मला सांगितलं की ते पायातील खिळा काढत असताना तो तुटला. त्यांच्याकडे आणखीन एका रुग्णाचा स्क्रू होता. तो स्क्रू ते इलेन यांच्या पायात लावणार होते. पण त्यासाठी होणार खर्च आधीपेक्षा जास्त होता."

शस्त्रक्रियेच्या तीन दिवसांनंतरही, इलेन यांना हालचाल करता येत नव्हती. पण त्यांना लवकर घरी परतायचं होतं, म्हणून त्या लंडनला परत आल्या.

त्यावेळी डॉक्टर गुईशेट यांच्याशी झालेलं संभाषण चांगलं झालं नसल्याचं इलेन म्हणतात. त्यांच्यातील रुग्ण-डॉक्टरांचं नातं संपल्याचं जाणवलं असं त्या म्हणतात.

डॉक्टरांवर खटला आणि नंतर त्यावरचा तोडगा

आता मदतीसाठी कोणाकडे जावे हे इलेन यांना कळत नव्हतं. जुलै 2017 मध्ये त्यांनी NHS मधील तज्ञ ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घेतला.

सर्जनने त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान पाच वर्षं लागतील असं सांगितलं.

इलेन यांच्या पहिल्या शस्त्रक्रियेला आठ वर्षं झाली आहेत. इलेन म्हणतात की, अजूनही या प्रक्रियेमुळे झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

इलेन म्हतणत की, त्यांच्या शारीरिक हालचालींमध्ये अनेक समस्या आहेत आणि त्या पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) ने ग्रस्त आहेत.

इलेन म्हणतात की, "2017 ते 2020 याकाळात मी स्वतःला जगापासून लपवत होते. त्या काळात मी खूप एकटी होते, माझ्या हाताला काम नव्हतं. एक एक रुपयासाठी मी दुसऱ्यांवर अवलंबून असायचे आणि मला अपंगत्व आलं होतं."

मागच्या वर्षी जुलै महिन्यात त्यांची कायदेशीर लढाई संपली. कारण, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. गुईशेट यांनी घडल्या प्रकारची कोणतीही जबाबदारी न घेता, इलेन यांना मोठी रक्कम देऊन प्रकरण मिटवण्याचं मान्य केलं.

या डॉक्टरांच्या वकिलांनी त्यांच्या अशिलाकडून कसलाही निष्काळजीपणा झाला नाही, असं कोर्टात सांगितलं. यासोबतच रुग्णाच्या हाडांची वाढ उशिराने होणे आणि फ्रॅक्चर होणे हा प्रकार दुर्दैवी असल्याचं त्या म्हणाल्या. त्यांनीच इलेन यांच्यावर स्क्रू वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आणि अँटी-डिप्रेसंट औषधं घेतल्याचा आरोप केला.

वकील म्हणाले की, शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला त्याच्याशी संबंधित सर्व अडचणींची माहिती दिली जाते.

यासोबतच इलेन यांनी डॉ. गुईशेट यांनी फिजिओथेरपी आणि इतर व्यायामासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सातत्याने नकार दिला होता, असंही डॉक्टरांच्या वकिलाने कोर्टात सांगितलं.

इलेन यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. त्या म्हणाल्या की या आजाराशी अँटी-डिप्रेसंट औषधांचा काहीही संबंध नाही.

इलेन यांना असं वाटलं होतं की, जास्त पैसे खर्च केल्यावर त्या सुरक्षित राहतील. पण, यामुळे आर्थिक अडचणींशिवाय त्यांना इतर वेदनांचाही सामना करावा लागला.

इलेन म्हणाल्या की, "माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगला काळ मी गमावला. मला माहित आहे की, लोकांना मला पश्चात्ताप झाल्याचं ऐकायचं आहे. पण आता जर मला कोणी विचारलं की सगळ्या गोष्टींची माहिती असती तर मी हे केलं असतं का? तर याचं उत्तर मी नक्कीच नाही असं देईल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)