महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्यात कांदा देतोय शेतकऱ्यांना आधार, लागवड वाढण्याची कारणं काय?

    • Author, डॉ. सोमिनाथ घोळवे
    • Role, लेखक आणि कृषी विषयाचे अभ्यासक

दुष्काळी भागात पीक पद्धतीत बदल केला, तर दुष्काळाची तीव्रता कमी केली जाऊ शकते, असे अनेक अभ्यासक आणि जलतज्ज्ञ यांची मतं आहेत. पीक पद्धतीमध्ये बदल करायचा म्हणजे 'जास्त पाण्यावरील पिके न घेता कमी पाण्यावर येणारी पिके घ्या' असा सल्ला असतो.

याशिवाय पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने, नवनवीन तंत्रज्ञान वापरणे, तसंच कमी पाण्यावर उत्पादन पदरात पडेल, अशा पिकांचे वाण (बियाणे) वापरणे होय. पण शेती कसण्याची प्रचलित असलेली पिके सोडून इतर दुसरे कोणते पीक घ्यायचे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतोच.

पिकांसाठी योग्य मार्गदर्शन शासन व्यवस्था, शासकीय कृषी विद्यापीठ आणि प्रशासनाकडून (कृषी विभागाकडून) करण्यात येत नाही, असा आतापर्यंतचा शेतकऱ्यांना अनुभव आहे.

मात्र, कोरडवाहू भागातील शेतकरी पीक पद्धतीत बदल करायला तयार नसतात. कारण शेतीमध्ये पीक घेण्यासाठी जेवढी गुंतवणूक केली आहे, त्या तुलनेत नफ्याचा परतावा मिळेल, असे कोणते पीक आहे? याविषयी खूप मोठा गोंधळ, संदिग्धता शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे.

नवीन पीक घ्यायचं म्हणजे जोखीम आली. ही जोखीम कोणत्याही स्थितीत शेतकरी स्वीकारायला तयार नसतात. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने शेती कसण्याकडे, पीक लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे.

काही गावांमध्ये पाझर तलाव आणि इतर मार्गाने शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध झाला, तर लगेच ऊस या पिकाची लागवड झाल्याचे सर्रास पाहण्यास मिळते. मात्र, गेल्या दहा-पंधरा वर्षात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महारष्ट्र वर्षभर पाणी मिळेल, असा स्त्रोत शेतकऱ्यांकडे नाही.

मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यासाठी शेतीसाठी विहीर, तलाव आणि बोअरवेल याद्वारे जलस्त्रोत उपलब्ध असेल तर खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगामामध्ये नगदी पीक घेण्याकडे कल वाढला आहे.

या नगदी पिकांमध्ये 'कांदा पीक' इतर नगदी पिकांच्या तुलनेत भरवशाचं वाटू लागलं आहे. त्यामुळे कोरडवाहू परिसरातील शेतकरी कांदा पीक घेण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे.

गुंतवणुकीचा परताव्याचे गणित समजून घेऊ

कांदा पिकातील गुंतवणूक आणि त्यातील परताव्याचं गणित बीडमधील केजच्या एकुरका गावातील सुमंत केदार या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या उदाहरणावरून समजून घेऊ.

सुमंत केदार यांच्या अर्धा एकरावर लागवड करण्यात आलेल्या कांदा उत्पादनाचा तपशील यासाठी उदाहरण म्हणून घेऊया.

पाळी – 400, बियाणे - 4600, पहिली फवारणी (रोप असताना) – 250, खत – 260, दुसरी फवारणी - 600, तिसरी फवारणी – 400, टॉनिक फवारणी - 500, औषधे - 900, खताची बकेट (बाय पावर) - 600, खताचे पोते - (10:26:26) - 1300, पहिली खुरपणी - 700, दुसरी खुरपणी – 700, तिसरी खुरपणी – 700, कांदा लागवडीचा मजुरी खर्च – 1800, वाहतूक खर्च (मुंडेवाडी ते सोलापूर) – 2000 रुपये, घरचे व्यक्तीचा मेहनत, खर्च, वेळ आणि मजुरी पकडली नाही.

असा एकूण 15 हजार 710 रुपये खर्च आला. एकूण कांदा 11.90 क्विंटल उत्पादन मिळाले.

रोगराई आणि अतिवृष्टीने खूप नुकसान केले होते. सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये कांदा विक्री केला. मोठ्या आकाराच्या कांद्याला 22 रुपये, मध्यम आकार 19 रुपये, फांगडी असलेला 15 रुपये आणि चिंगळ्या असलेला 5 रुपये किलो दर मिळाला. एकूण 22 हजार रुपयांचा झाला.

शिवाय, 7 हजार रुपयांचे रोप विकले असे एकूण 29 हजार रुपये एकूण उत्पन्न मिळाले. खर्च वजा करता 13 हजार 290 रुपये निव्वळ परतावा शिल्लक राहिला.

शेतकरी सुमंत केदार यांच्या मते, "अतिवृष्टी झाली नसते तर निश्चीत जास्त उत्पन्न मिळाले असते. मात्र, अर्ध्या एकरात कांदा वगळता इतर कोणतेही पीक 13 हजार 290 रुपये परतावा देऊ शकत नाही. त्यामुळे सोयाबीन ऐवजी प्रथम प्राधान्य कांदा पिकास देत आहे."

दुष्काळी परिसरातील थोड्याफार फरकाने असेच अनुभव इतरही शेतकऱ्यांचे पाहण्यास मिळतात.

दुष्काळी परिसरात कांदा पीक का वाढत आहे?

दुष्काळी भागात गेल्या 10 वर्षांपासून वेगानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण वाढण्यामागे कांद्याचा मसाल्यात आणि आहारात सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने कांदा सर्वात महत्वाचं पीक आहे.

कांदा पिकास महाराष्ट्रातील वातावरण अनुकूल आहे. मात्र, महसुली नोंदी वास्तवात होत नसल्याने किती क्षेत्र कांदा लागवडीखाली आहे, याची खरी आकडेवारी उपलब्ध होत नाही. तरीही एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर प्रतिवर्षी लागवड होत असेल, असा अंदाज कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्याकडून सांगितला जातो.

शिवाय, वर्षभरात तिन्ही हंगामात लागवड केली जाते. कोरडवाहू परिसरात खरीप आणि रब्बी अशी दोन हंगामात लागवड मोठ्या प्रमणात करण्यात येऊ लागली आहे.

राज्यात नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनासाठी ओळखले जातात. नाशिक जिल्हा तर कांदा उत्पनासाठी देशात प्रसिद्ध आहे. त्यात कांदा विक्रीसाठी लासलगाव बाजारपेठ खूपच आवक असणारी आहे. एकूण कांदा उत्पादनापैकी महारष्ट्र राज्यातील 37 टक्के तर देशात 10 टक्के केवळ नाशिक जिल्ह्यात घेतला जातो.

अलीकडे दुष्काळी भागातील बीड, धाराशिव, जालना, लातूर, छ. संभाजीनगर आणि सोलापूर या जिल्ह्यामधील अनेक कोरडवाहू/दुष्काळी तालुक्यात कांदा पीक लागवड केली जाते. या कांद्यासाठी सोलापूर ही बाजारपेठ उपयुक्त ठरत आहे. कांदा लागवडीने शेतमजुरीसाठी (उसतोडणी आणि इतर कामे) होणारे स्थलांतर कमी होऊ लागले आहे.

या संदर्भात शेतकरी नानासहेब मुंडे (मुंडेवाडी ता. केज जि. बीड ) सांगतात की, "मी उसतोडणी करण्यसाठी जावे लागत होते, मात्र खरीप आणि रब्बी असा दोन्ही हंगामात कांदा लागवड सुरु केली आणि उसतोडणीसाठीचे स्थलांतर थांबले"

अशाच कहाण्या अनेक अल्पभूधारक आणि स्थलांतरीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आहेत.

कांदा लागवडीसाठी पोषक जमीन आणि हवामान

दुष्काळी परिसरात कांदा पिकासाठी पावसाला आणि हिवाळा या हंगामातील वातावरण पोषक असल्याचं मानलं जातं. कांद्याच्या वाढीला थंड तर पोषणासाठी थोडेसे उष्ण वातावरण आवश्यक असतं. ते पावसाला आणि हिवाळा असे दोन्ही हंगामात मिळतं.

उदाहरणार्थ, जून-जुलैमध्ये खरीप हंगामाची लागवड करून ऑक्टोबरमध्ये काढला जातो. तर नोहेंबरमध्ये लागवड करून रब्बी कांदा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात काढला जातो.

दुसरे, कांदा पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी आणि भूसभूशीत (सेंद्रिय खतासा साथ देणारी आणि मध्यम कसदार) जमीन हवी. कांदा पिकाचे वाण (बियाणे) वेगवेगळे आहेत.

शेतीचा पोत, कस आणि जिवंतपणा कोणत्या प्रकारचा आहे आणि हंगाम कोणता आहे, त्यानुसार बियाणे वाण निवडले जाते. सर्वसाधारपणे 100 ते 150 दिवसांत या पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती मिळतं.

कांदा पिकाचे वैशिष्टे असे की, पूर्ण वाढ होण्यापूर्वी पाणी कमी करून पीक काढू शकतात. या पिकाची ओळख कमी पाण्यावर येणारे पीक अशीच आहे. कांदा पिकाचे उत्पादन हेक्टरी 200 ते 250 क्विंटलपर्यंत घेणारे शेतकरी महाराष्ट्रात आहेत. मात्र, कोरडवाहू परिसरात 150 ते 160 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळतं.

कांद्याचे बियाणे इतर पिकांच्या तुलनेत थोडेसे महाग असते. त्यामुळे काही शेतकरी विक्रीच्या कांदा लागवड करण्याऐवजी बियाणाचे उत्पादन घेतात आणि बाजारात विकतात. बियाणांच्या उत्पादनातून देखील कांदा लागवडीएवडे उत्पन्न मिळते असे अनेक शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.

मराठवाड्यातील वाढती कांदा लागवड

गेल्या दोन दशकांमध्ये कोरडवाहू परिसरात कापूस आणि सोयाबीन ही दोन नगदी पिके पुढे आली होती. मात्र, बाजारभाव आणि रोगराई कारणांमुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे पाठ फिरवली आहे.

तर गेल्या पाच वर्षात सोयाबीनच्या बाबतीत बोगस बियाणे, उत्पादन घसरण, बाजारभाव आणि मजूरखर्च वाढणे इत्यादीमुळे गुंतवणुकीचा परतावा अत्यल्प मिळू लागला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकास पर्यायी पीक म्हणून कांदा पिकाकडे पहिले जाऊ लागले आहे.

कांदा पिकाचे वैशिष्टे असे की, कमी पाण्यावर येणारे आणि काहीना काही उत्पन्नाची शाश्वती देणारे पीक आहे. तीन महिन्यात पीक पदरात मिळणारे शेतकऱ्यांचे अनुभव आहे. शिवाय नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते.

खरीप हंगामात शेतकरी मूग, उडीद, सोयाबीन, धने ही पिके घेतात. या पिकांच्या पाठीवर (बेवडावर) कांदा लागवड केली जाते. त्यामुळे हे पीक अगदी जोमाने येते. शिवाय उन्हाळा कांदा बाजारात येणे कमी झाले असता, लाल (पावसाळी) कांदा बाजारात विक्रीसाठी आला असता, तास बाजारभाव देखील चांगला मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांच्या मनात आहे.

पावसाळी कांदा (लाल कांद्यावर) पिकावर येणारी संकटे

अलीकडे वातावरणातील बदल आणि अवेळी येणारा पाऊस या कारणाने प्रत्येक वर्षी लाल कांदा (पावसाळी कांदा) यावर संकट येते.

पावसाला हंगामात रोगराई आणि अतिवृष्टीने कांदा पीक येणाऱ्या संकटाच्या संदर्भात बीडमधील केजच्या वाघे बाभूळगावचे शेतकरी रामेश्वर खामकर सांगतात की, "पावसाळा कांद्यावर सर्वात जास्त संकटे येऊन शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत राहते, तरीही शेतकरी कांदा लागवड करू लागले आहेत.

कारण रोगराई आणि अतिवृष्टीने जरी कांदा पिकांचे खूप नुकसान झाले, तरी गुंतवणुकीची मुद्दल दिल्याशिवाय (जेवढी गुंतवणूक तेवढेच उतपन्न) राहिलेला नाही. तसंच, हिवाळा हंगामातील कांदा लागवड अनेक शेतकऱ्यांकडून मोठ्या जोमाने केली जाते".

संकटांच्या संदर्भात मुंडेवाडी (ता. केज जिल्हा. बीड) गावातील शेतकऱ्यांशी झालेल्या संवादावरून, चालू वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर एका मागोमाग एक अशी अनेक संकटे येत राहिली. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले. मात्र, कांदा लागवड कमी झाली नाही. कारण किमान पातळीवर कांदा पीक जेवढे परतावा देते, तेवढा परतावा इतर पीक देत नाही असे शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

एकूणच दुष्काळी परिसरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या संथगतीने वाढत आहे. तसंच, कांदा लागवड, रोपांचे संगोपन, पाणी देण्याची पद्धती, खतांचा डोस देण्याची पद्धत, रोगराई पडली तर काळजी घेण्याचे तंत्रज्ञान, कांदा पक्रिया, साठवण, या घटकांमध्ये अनेक त्रुटी आहेत. याविषयी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

कांदा जास्त दिवस टिकण्यासाठी मार्गदर्शन आणि सुविधा देखील मिळण्याची अपेक्षा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची आहे. पण हवे तसे लक्ष शासन आणि प्रशासनाने दिलेले नाही. कांदा चाळ उभारण्यासाठी जाहीर केलेल्या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना अर्ज करूनही मिळालेला नाही.

कांदा प्रकिया युनिट आणि कांद्यापासून इतर पदार्थ बनवण्याचे केंद्र विकसित झालेले नाही. ते विकसित करणे गरजेचे आहे. अशा अनेक उणिवा या पिकामध्ये आहेत. त्या कशा दूर केल्या जातील याविषयी धोरणात्मक बाबीची गरज आहे.

एकूणच कांदा या पिकाच्या रूपाने दुष्काळी भागात पीक पद्धतीतील नगदी पीक घेण्याचा मार्ग सापडला आहे. कारण दुष्काळी भागातील अनेक गावामधील ऊसतोडनिसाठी जाणारे मजूर हळूहळू या पिकाकडे वळताना दिसून येत आहेत.

(लेखक डॉ. सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाजव्यवस्थेचे अभ्यासक आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.