बोईंग स्टारलायनर असं परतणार अंतराळवीरांशिवाय

बोईंग स्टारलायनर असं परतणार अंतराळवीरांशिवाय

फोटो स्रोत, Getty Images

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांना घेऊन गेलेलं बोईंग स्टारलायनर अंतराळ यान आता या दोन अंतराळवीरांशिवायच पृथ्वीवर परतणार आहे.

या यानात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ते अंतराळवीरांना पृथ्वीवर परत घेऊन येण्यासाठी सुरक्षित आहे का, याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. त्यानंतर हे दोन अंतराळवीर आणखी काही महिने स्पेस स्टेशनलाच मुक्काम करून स्पेस एक्सच्या यानाने परततील, असं नासाने जाहीर केलं. आता बोईंग स्टारलायनर यानाचा परतीचा प्रवास मानवरहित असेल.

स्टारलायनर स्पेसक्राफ्ट पृथ्वीवर परत आणण्यासाठीच्या चाचण्या नासा आणि बोईंगने पार पाडल्या आहेत. आता 6 सप्टेंबरला हे अंतराळयान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून - Undock म्हणजेच विलग होईल आणि पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करेल. शेवटच्या क्षणी काही तांत्रिक अडचणी आल्या किंवा हवामान बदललं, तरंच यामध्ये काही बदल होईल.

स्पेस एक्सचं क्रू 9 मिशन 24 सप्टेंबरला झेपावणार आहे. हेच यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन फेब्रुवारी 2025मध्ये परत येईल. पण या यानाला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला डॉक होता यावं - म्हणजे जोडलं जाता यावं, यासाठी तिथून बोईंग स्टारलायनर विलग होणं गरजेचं आहे. तरच डॉकिंग पोर्ट स्पेस एक्स क्रू ड्रॅगनसाठी उपलब्ध होईल.

बोईंग स्टारलायनर

फोटो स्रोत, NASA

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून विलग झाल्यापासून पुढच्या प्रवासासाठी स्टारलायनरला 6 तास लागतील. या प्रवासानंतर स्टारलायनर न्यू मेक्सिकोमधल्या व्हाईट सँड्स स्पेस हार्बरमधल्या लँडिंग झोनला पोहोचेल. शनिवारी 7 सप्टेंबरला मध्यरात्री 12.03 वाजता हे यान या लँडिंगच्या ठरलेल्या जागी उतरण्याचा अंदाज आहे.

हे यान पॅराशूटचा वापर करत लँड होईल आणि या प्रक्रियेत ते आदळू नये म्हणून फुगवलेल्या एअरबॅग्सचा वापर करण्यात येईल. त्यानंतर या ठिकाणच्या रिकव्हरी टीम्स लँडिंग झोनमधून हे स्पेसक्राफ्ट ताब्यात घेऊन ते फ्लोरिडातल्या नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधल्या बोईंग स्टारलायनरच्या फॅक्टरीमध्ये नेतील.

हे यान अंतराळवीरांशिवाय परत येणार हे ठरल्यानंतर स्टारलायनरच्या मिशन मॅनेजर्स आणि फ्लाईट कंट्रोलर्सनी यातल्या यंत्रणांमध्ये मानवरहित उड्डाणासाठीची माहिती अपडेट केली.

आता हे यान स्वतःच परतीच्या प्रवासादरम्यान यंत्रणा हाताळेल. म्हणजेच हा प्रवास Fully autonomous असेल आणि याचे फ्लाईट कंट्रोलर्स अमेरिकेतल्या ह्युस्टनमधल्या स्टारलायनर मिशन कंट्रोल आणि फ्लोरिडातल्या बोईंग मिशन कंट्रोल ऑफिसमध्ये असतील.

गरज पडल्यास पृथ्वीवरचे हे कंट्रोलर्स स्पेसक्राफ्टला पृथ्वीवरूनच commands म्हणजे सूचना देतील आणि स्पेस स्टेशनपासून विलग होणं, म्हणजेच Undocking, पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा शिरणं आणि पॅराशूटच्या मदतीने लँड होणं या प्रक्रिया पार पाडतील.

यापूर्वी या बोईंग स्टारलायनर यानाने अंतराळ कक्षेतल्या दोन चाचणी उड्डाणांच्यावेळी कोणत्याही क्रू शिवाय पृथ्वीच्या वातावरणात शिरणं आणि लँड होणं, ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. यातल्या एका प्रक्रियेमध्ये यानाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून विलग होण्याची प्रक्रियाही स्वतः सुरक्षितपणे पूर्ण केली होती.

बोईंग स्टारलायनरची ही मोहीम म्हणजे नासाच्या अंतराळवीरांना घेऊन जाण्यासाठीची चाचणी होती. यामध्ये नासाचे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर सहभागी झाले आणि जून महिन्यात त्यांनी या स्टारलायनरमधून अंतराळात झेप घेतली.

या उड्डाणादरम्यान स्टारलायनरच्या थ्रस्टर्समध्ये झालेले बिघाड पुढेही कायम राहिल्याने हे दोन अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्येच अडकून राहिले. स्टारलायनर या दोघांना परत घेऊन येऊ शकेल का, हा प्रवास सुरक्षित होऊ शकतो का, याची चाचणी सुरू होती. पण अखेर विल्यम्स आणि विल्मोर हे स्पेस एक्सच्या यानाने दुसऱ्या मोहीमेसोबत परततील असा निर्णय घेण्यात आला.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर

सध्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळ स्थानकात एक्सपिडीशन 71/72 च्या अंतराळवीरांसोबत काम करत असून फेब्रुवारी 2025 पर्यंत ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला असतील. त्यानंतर स्पेस एक्सच्या क्रू 9 मिशनसोबत ते पृथ्वीवर परततील. विल्यम्स आणि विल्मोर यांना परत घेऊन येता यावं, यासाठी सप्टेंबरमध्ये अंतराळात जाणाऱ्या मिशनदरम्यान ड्रॅगन स्पेसक्राफ्ट यानात 2 जागा रिकाम्या ठेवण्यात येणार आहेत.

याविषयी बोलताना नासाचे अॅडमिनिस्ट्रेटर बिल नेल्सन म्हणाले, "अगदी सुरक्षित आणि नेहमीचा वाटणारा अंतराळ प्रवासही धोक्याचाच असतो. टेस्ट फ्लाईट ही सुरक्षितही नसते आणि रूटीन म्हणजे सामान्यही नसते. सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध असल्यानेच बुच आणि सुनी यांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्येच ठेवण्याचा आणि बोईंग स्टारलायनर क्रूशिवाय परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नासा आणि बोईंग या दोन्ही टीम्स करत असलेल्या अचाट आणि तपशीलवार कामासाठी मी त्यांचा आभारी आहे."

बोईंगसाठी स्टारलायनरची मोहीम महत्त्वाची का?

अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला नेण्यासाठी व तिथून परत आणण्यासाठी नासाकडून स्वतःच्याच यानांचा वापर करण्यात येत होता.

हे काम खासगी कंपनीच्या यानाच्या मदतीने करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इलॉन मस्क यांची स्पेस एक्स आणि बोईंग या दोन कंपन्यांदरम्यान स्पर्धा आहे.

यातल्या स्पेस एक्सला यापूर्वीच अशा उड्डाणांसाठीची परवानगी मिळाली असून या कंपनीची यानं नियमित प्रवास करत असतात.

बोईंग स्टारलायनरच्या मानवरहित उड्डाणांच्या दोन चाचण्या पार पडल्या. पण त्यातही अडथळे आणि विलंब आले. अंतराळवीरांसह उड्डाण चाचणीही अडचणी आल्याने पुढे ढकलावी लागली होती.

अखेरीस 6 जूनला हा लाँच पार पडला आणि सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांसह हे यान झेपावलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

6 जूनला पृथ्वीवरून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या दिशेने प्रवास करणाऱ्या स्टारलायनरमधून हेलियमची गळती होत असून यानाच्या थ्रस्टर्समध्ये बिघाड झाल्याचं नासा आणि बोईंगच्या लक्षात आलं.

तेव्हापासून इंजिनियरिंग टीम्सनी यानामध्ये अनेक कामं केली आहेत. सोबतच यानामधला वेगवेगळा डेटाही गोळा करण्यात आलेला आहे. आणीबाणीची वेळ आली तर काय करायचं, या यानाला परत आणण्यासाठीच्या विविध पर्यायी योजना यासाठीची आखणीही करण्यात आली होती.

पण मानवी मोहिमेसाठी म्हणजे अंतराळवीरांना परत घेऊन येण्याच्या प्रवासासाठी हे यान सुरक्षित नसल्याचं आणि त्याची कामगिरी अपेक्षेएवढी नसल्याचं लक्षात आल्याने नासाने स्टारलायनर मोहिमेच्या दोन अंतराळवीरांना दुसऱ्या यानाने परत आणण्याचा निर्णय घेतला.

प्रतिस्पर्धी स्पेस एक्स कंपनीच्या यानाने अंतराळवीरांना परत आणावं लागणं ही बोईंगसाठी नामुष्की असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यातही मानवरहित प्रवासादरम्यान स्टारलायनरची कामगिरी कशी होतेय, याकडेही सर्वांचं लक्ष असेल.

स्पेस स्टेशनमधून अंतराळवीरांची नियमित ने-आण करण्यासाठी बोईंगला नासाच्या कमर्शिय क्रू प्रोग्रामची मान्यता मिळणं गरजेचं आहे. आता स्टारलायनर पृथ्वीवर परतल्यानंतर मिशनशी संबंधित सगळ्या डेटाचा अभ्यास करण्यात येईल. आणि नासाचं सर्टिफिकेशन मिळण्यासाठी आणखी काय करणं गरजेचं आहे, हे ठरवलं जाईल.

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)