दातांची झीज थांबणार, दातदुखीवरील उपचार पद्धतीत नव्या क्रांतीची शक्यता

एनॅमलची झीज होते.. तेव्हा दाताची दुखणी सुरू होतात. 

फोटो स्रोत, PA Media

    • Author, लियाम बर्न्स
    • Role, बीबीसी ईस्ट मिडलंड्स

दातातल्या Cavities म्हणजे दाताची झीज होऊन पोकळी निर्माण होणं - खड्डा पडणं. जवळपास सगळ्यांना कधीना कधी हा त्रास होतोच.

पण आता यापुढे कदाचित या त्रासाला तोंड द्यावं लागणार नाही. दातांबद्दलच्या एका संशोधनामुळे या कॅव्हिटीजबद्दलची एक नवी उपचार पद्धती अस्तित्वात येण्याची चिन्हं आहेत. दातदुखी का होते हे समजून घेण्यासाठी दाताची रचना समजून घेणे आवश्यक आहे.

दाताचा सगळ्यात बाहेरचा - आपल्याला दिसणारा पांढरा - टणक भाग असतो त्याला म्हणतात Dental enamel. हे एनॅमल म्हणजे कवच आतल्या भागाचं अ‍ॅसिड्स, दुखापत आणि एकूण वापरामुळे होणारी झीज यापासून संरक्षण करतं. आपण जेव्हा अन्न चावतो, त्यावेळी या एनॅमलमुळेच आपल्याला तो टणक सपोर्ट मिळतो. पण याच एनॅमलची झीज होते.. तेव्हा दाताची दुखणी सुरू होतात.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरातल्या तब्बल 3.7 अब्ज लोकांना मुखाच्या विविध आजारांचा - Oral diseases चा सामना करावा लागतो. आणि आवरणाची झीज - enamel degradation हे यामागचं मुख्य कारण असतं.

दातांवरच्या कवचाची झीज कशी टाळता येईल, दातांचं आरोग्य कायम राखण्यासाठी काय करता येईल हे या टीमने अभ्यासलं.

फोटो स्रोत, University of Nottingham

फोटो कॅप्शन, इनॅमल घासलं गेल्यावर दातांची स्थिती आणि उपचारांनंतर दोन आठवड्यांनी बदललेली स्थिती

दाताच्या या आवरणाची झीज झाल्याने इन्फेक्शन होऊ शकतात, दातांमधली sensitivity म्हणजे दातांत वळ येणं, झिणझिण्या येणं याचं प्रमाण वाढू शकतं. दात पडू शकतो. शिवाय मधुमेह आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांशीही याचा संबंध असू शकतो.

एनॅमल झिजल्याने होणाऱ्या त्रासासाठी सध्या फ्लोराईड वॉर्निशसारख्या उपचारांचा आधार घेतला जातो. पण यामुळे एनॅमल नैसर्गिकरीत्या भरून येत नाही वा पुन्हा नव्याने तयार होत नाही.

पण आता संशोधकांनी असं नवं जेल शोधलंय जे दातावरच्या एनॅमलची झीज भरून काढायलाही मदत करेल आणि नवीन एनॅमल तयार करण्यासाठीही मदत करेल. यामुळे दातांसाठीच्या उपचार पद्धतीच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात असं संशोधकांनी म्हटलंय.

युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघमच्या स्कूल ऑफ फार्मसीच्या केमिकल आणि एन्व्हार्यनमेंटल इंजिनियरिंग टीमने यासाठी जगभरातल्या संशोधकांसोबत काम केलं.

दातांवरच्या कवचाची झीज कशी टाळता येईल, दातांचं आरोग्य कायम राखण्यासाठी काय करता येईल हे या टीमने अभ्यासलं.

दातांवरचं हे एनॅमल आपण लहान बाळ असतानाच विकसित होत असतं. संशोधकांनी विकसित केलेल्या जेलमधले प्रोटीनयुक्त घटक साधारण हीच प्रक्रिया पार पाडतात आणि लाळेतल्या म्हणजे Saliva मधल्या कॅल्शियम आणि फॉस्फेटच्या ions म्हणजे विद्युतभारीत कणांपासून दातांचं संरक्षण करतात असं विद्यापीठाने म्हटलंय.

हे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स या विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलंय.

दात

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आपण जे अन्नपदार्थ खातो वा पेय पितो, त्यामधल्या आम्ल म्हणजे अ‍ॅसिडमुळे किंवा बॅक्टेरियामुळे दातांवरच्या एनॅमलमधल्या कॅल्शियम आणि पोटॅशियमसारख्या महत्त्वाच्या खनिजांची घट होते.

युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगघमच्या बायोमेडिकल इंजिनियरिंग आणि बायोमटेरियल्स विभागाचे प्रमुख प्रा. अल्वारो माटा हे या संशोधनाचे प्रमुख होते.

या संशोधनाबद्दल ते म्हणतात, "हा नवा घटक सहज आणि वेगाने लावता येण्याजोगा आहे. आम्ही अतिशय भारावलो आहोत कारण हे तंत्रज्ञान डॉक्टर्स आणि पेशंट्सना लक्षात घेऊनच तयार करण्यात आलेलं आहे. पुढच्या वर्षीपर्यंत पहिलं उत्पादन तयार होईल आणि लवकरच या संशोधनाचा फायदा जगभरातल्या रुग्णांना होईल, अशी आशा आम्हाला आहे."

या संशोधनाबद्दल बोलताना शेफील्डच्या दंतवैद्यक कॉलेजच्या बायोमटेरियल्सचे प्राध्यापक पॉल हॅटन म्हणाले, "दातांची झीज भरून काढण्यासाठी नैसर्गिक एनॅमलची निर्मिती करणं हा गेल्या अनेक वर्षांपासून दंतवैद्यक क्षेत्रातल्या संशोधकांचा ध्यास राहिलेला आहे. यामध्ये यश मिळाल्याचं या संशोधनावरून वाटतं."

दातांच्या समस्या असणाऱ्या जगभरातल्या सगळ्यांसाठीच हा आशेचा किरण असेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)