जीभ बाहेर काढलेली, चित्रविचित्र चेहरा; 'तो' तरुण कामगार टीव्हीवर दिसणारा जगातला पहिला व्यक्ती कसा ठरला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ग्रे मॅककेविट
- Role, बीबीसी कल्चर
1850 च्या दशकापासून वैज्ञानिक टीव्हीचा शोध लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यावर बरंच संशोधन सुरू होतं. मात्र एका स्वतंत्रपणे, इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं विचार करणाऱ्यानं प्राथमिक स्वरुपाचं साहित्य वापरून टेलिव्हिजन म्हणजे टीव्ही नावाची गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वात आणली.
जॉन लोगी बेअर्ड यांनी हा महान शोध लावला. मात्र हा शोध लागण्यापूर्वी जॉन यांनी अनेक शोध लावले होते आणि त्यांना मिश्र स्वरुपाचं यश मिळालं होतं.
ते आयुष्याचा बहुतांश काळ आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. जॉन यांचे वडील पाद्री होते. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस लष्करात सेवा देण्यासाठी जॉन यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं.
जॉन बेअर्ड यांनी एका वीज कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांच्यात उद्योजक होण्याची उर्मी होती. एच. जी. वेल्स हे विज्ञान कथांचे प्रसिद्ध लेखक आहेत. वेल्स हे जॉन यांचे आदर्श होते.
वेल्स यांच्या एका लघुकथेपासून प्रेरणा घेत जॉन यांनी प्रचंड प्रमाणात वीजेचा वापर करून कार्बनपासून कृत्रिम हिरे बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यांना केवळ ग्लासगो शहराचा वीज पुरवठा खंडित खंडीत करण्यात यश आले.
जसं मूळव्याधावरच्या त्रासदायक घरगुती उपचारांबद्दल टीव्हीवरील सूत्रसंचालक "तुम्ही हे घरी करून पाहू नका" असा इशारा देतो, तशाप्रकारचं हे उदाहरण होतं.
मात्र इतक्या अडचणी, अपयश येऊनदेखील जॉन बेअर्ड यांनी काही प्रमाणात व्यावसायिक यश मिळवलं. त्यांचा मोजे आणि साबणाचा व्यवसाय होता.
मोजे आणि साबणाच्या विक्रीतून मिळालेल्या अतिरिक्त भांडवलातून त्यांनी 1923 मध्ये इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावरील हेस्टिंग्जमध्ये एक साधी जागा भाड्यानं घेतली.
समुद्राकाठची हवा त्यांच्या फुफ्फुसांसाठी चांगली होती. त्यांच्या कामाच्या ठिकाणचं वातावरण, त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी मात्र एखाद्या भयावह स्वप्नासारखं होतं.
जॉन यांची नवीन प्रयोगशाळा
टीव्हीचा शोध लावण्यासाठीचे प्रयोग करण्यासाठी त्यांनी एक प्रयोगशाळा सुरू केली. मोटर बसवलेल्या जुन्या चहाच्या क्रेटसारख्या टाकाऊ, रद्दी सामानाचा वापर करून ते त्यांच्या या उपकरणात सुधारणा करत होते.
बेअर्ड यांच्या या प्रयोगाच्या केंद्रस्थानी एक मोठी डिस्क किंवा चकती होती. ती अतिशय वेगानं फिरत असे. फोटोडिटेक्टर आणि तीव्र स्वरुपाच्या प्रकाशाचा वापर करून एका ओळीनं किंवा एकापाठोपाठ एक प्रतिमा स्कॅन करण्याचं काम ही डिस्क करत असे.
हे सिग्नल किंवा संदेश प्रसारित करण्यात आले आणि ते पुन्हा गोळा करून त्यापासून हलत्या प्रतिमा तयार करण्यात आल्या. मग जॉन यांनी जेव्हा फिकट पार्श्वभूमीवर गडद रंगाची प्रतिमा यशस्वीरित्या प्रसारित केली, तेव्हा टीव्ही तयार करण्याचं त्यांचं स्वप्न सत्यात अवतरलं.

फोटो स्रोत, Getty Images
हेस्टिंग्जमधील प्रयोगशाळेत जॉन भाजले आणि दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी लंडनला जायचं ठरवलं. त्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सोहोमधील 22 फ्रिथ स्ट्रीटवरील एका दुकानाच्या वरच्या बाजूला एक फ्लॅट भाड्यानं घेतला. तिथेच त्यांनी त्यांची नवीन प्रयोगशाळा उभारली.
त्यांच्या त्या उपकरणातून इतकी प्रचंड उष्णता बाहेर पडायची की, ती माणसांना सहन करणं शक्य नसायचं. त्यांच्या प्रयोगांमध्ये त्यांना स्टूकी बिल या टोपणनावाचं बोलकं बाहूलं वापरावं लागलं. मात्र 2 ऑक्टोबर 1925 ला वयाच्या 37 व्या वर्षी जॉन यांनी एक मानवी गिनी पिगची भरती केली आणि एक विस्मयकारक यश मिळवलं.
'बनी'
इथेच या कहाणीत येतो विल्यम टेंटन. हा 20 वर्षांचा तरुण कामगार जॉन बेअर्ड यांच्या तात्पुरत्या स्वरुपातील प्रयोगशाळेच्या तळमजल्यावर काम करत असे.
40 वर्षांनी विल्यम यांनी बीबीसीला सांगितलं, "जॉन बेअर्ड उत्साहानं खाली धावत आले आणि त्यांनी माझ्या ऑफिसमधून मला जवळपास बाहेर खेचून काढलं आणि त्यांच्या छोट्या प्रयोगशाळेत घेऊन गेले."
"मला वाटतं की, त्यावेळेस ते इतक्या प्रचंड उत्साहात होते की, त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. त्यांनी जवळपास मला पकडलंच आणि शक्य तितक्या लवकर वरच्या मजल्यावर येण्यास सांगितलं."
विल्यम टेंटन म्हणाले की, ज्यावेळेस ते जॉन बेअर्ड यांच्या जुनाट प्रयोगशाळेत गेले, तेव्हा त्यांना तिथून पायऱ्या उतरून खाली पळून जावंसं वाटत होतं. आधी त्यांना छतावरून लटकणाऱ्या आणि जमिनीवर विखुरलेल्या वायर्समधून मार्ग काढावा लागला.

फोटो स्रोत, Getty Images
विल्यम म्हणाले, "त्यावेळेस मी वापरलेलं उपकरण म्हणजे सावळागोंधळ होता. माझ्याकडे सायकलच्या लेन्स, कार्डबोर्ड डिस्क आणि त्यासारख्या वस्तू होत्या. सर्वप्रकारचे दिवे, जुन्या बॅटरी होत्या. तसंच काही खूपच जुनाट मोटर्स होत्या. ज्या मी डिस्क फिरवण्यासाठी वापरल्या."
जॉन बेअर्ड यांनी विल्यम यांना त्यांच्या ट्रान्समीटरसमोर बसवलं. विल्यम हे एक मानवी वस्तू होते जे आवश्यक ती हालचाल करू शकत होते. विल्यम टेंटन म्हणाले की त्यांना तिथली उष्णता जाणवू लागली आणि ते घाबरले.
मात्र जॉन बेअर्ड यांनी त्यांना सांगितलं की त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही.
"मग रीसीव्हरकडे जाऊन तिथे प्रतिमा दिसते का हे पाहण्यासाठी ते गेले," असं टेंटन म्हणतात.
"मी त्या प्रकाशझोतासमोर येण्यास यशस्वी झालो, मात्र दिव्यांमधून येणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे मी तिथे मिनिटभर देखील उभा राहू शकलो नाही. त्यामुळे मी तिथून मागे हटलो," असं टेंटन म्हणाले.
टेंटन यांनी जो त्रास सहन केला होता त्यासाठी जॉन बेअर्ड यांनी त्यांच्या हाती अर्धा क्राऊन म्हणजे दोन शिलिंग आणि सहा पेन्स ठेवले.
ते अर्थातच "टीव्हीवर येण्यासाठीचं पहिलं पेमेंट होतं." त्यानंतर जॉन यांनी टेंटन यांना पुन्हा त्या कामासाठी राजी केलं.
टीव्हीच्या शोधाचे टेंटन असे झाले साक्षीदार
आपण शोधलेल्या नव्या उपकरणावर कोणत्याही प्रकारची हालचाल टिपता यावी यासाठी जॉन यांनी टेंटन यांना जीभ बाहेर काढायला आणि चित्रविचित्र चेहरा करण्यास सांगितलं.
मात्र तिथे असलेली उष्णता आणि एकूणच परिस्थितीमुळे टेंटन यांची भीती वाढत होती. टेंटन यांनी जॉन यांना सांगितलं की, "मी जिवंत भाजला जातो आहे."
टेंटन म्हणाले, "त्यावर ते माझ्यावर ओरडले, 'विल्यम जर शक्य असेल आणखी काही सेकंद थांब.' मी तसंच केलं आणि मला जितकं सहन करणं शक्य होतं तितका वेळ स्थिर उभा राहिलो. त्या प्रचंड उष्णतेमुळे माझं लक्षच उडालं. ती खूपच गैरसोयीची जागा होती."
आणि त्यानंतर, जॉन बेअर्ड हवेत हात उंचावत धावत आले. ते म्हणाले, "मी तुला पाहिलं आहे, विल्यम, मी तुला पाहिलं आहे. अखेर मी टीव्हीचा शोध लावला आहे. टेलिव्हिजनवरील पहिली खरी प्रतिमा मला मिळाली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
टेंटन यांना मात्र 'टेलिव्हिजन' म्हणजे काय याची अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे जॉन बेअर्ड यांनी त्यांना जागा बदलण्याचा सल्ला दिला. मग टेंटन तिथून आनंदानं निघून गेले. कारण त्यांना वाटलं की त्या क्षणी जॉन बेअर्ड खूपच उत्साहात होते आणि थोडेसे रागावलेले होते.
त्यांनी एका छोट्या बोगद्यातून पाहिलं आणि त्यांना, "साधारण 5 x8 सेमी आकाराची एक छोटी प्रतिमा दिसली."
ते म्हणाले, "अचानक जॉन बेअर्ड यांचा चेहरा स्क्रीनवर दिसला. त्यांचे डोळे बंद होताना, त्यांचं तोंड आणि ते करत असलेल्या हालचाली दिसत होत्या. अर्थात ते काही फारसं चांगलं, स्पष्ट दिसत नव्हतं. त्यातून काहीही कळत नव्हतं, फक्त सावली दिसत होती आणि वाढलेल्या रेषा दिसत होत्या."
"मात्र ती एक प्रतिमा होती आणि ती हलत होती. जॉन बेअर्ड यांनी साध्य केलेली ती मुख्य गोष्ट होती. त्यांना टेलिव्हिजनवरची खरी प्रतिमा मिळाली होती."
नुकताच जे काही घडलं होतं, त्यामुळे जॉन अत्यंत उत्साहित झाले होते. त्यामुळे त्यांनी टेंटन यांना त्यांच्या या शोधाबद्दल काय वाटतं असं विचारलं.
त्यावर टेंटन म्हणाले, "मी स्पष्टपणे म्हटलं, मला फारसं काही वाटत नाही. ते खूपच कच्च्या स्वरुपाचं हे. मला तुमचा चेहरा दिसतो आहे, मात्र ते स्पष्ट स्वरुपात नाही.' मग त्यांनी निदर्शनास आणून दिलं की नाही, ही फक्त एक सुरुवात आहे. ते म्हणाले की हा पहिला टेलिव्हिजन आहे. तुला तो आता देशातील प्रत्येक घरात आणि संपूर्ण जगभरात दिसेल."
जगभरातील घरांमध्ये टीव्हीला मिळालं स्थान
पुढील वर्षी 26 जानेवारीला जॉन बेअर्ड यांनी लोकांसमोर जगातील पहिल्या टेलिव्हिजनचं प्रात्यक्षिक सादर केलं.
त्यांच्या या पहिल्या यंत्राला अधिक संसाधनं असलेल्या कंपन्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानानं मागे टाकलं असलं तरी त्यानंतर झालेल्या सर्व गोष्टींसाठी जॉन यांनी मार्ग मोकळा केला होता.
1951 मध्ये, जॉन बेअर्ड यांचा वयाच्या 57 व्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर पाच वर्षांनी, विल्यम टेंटन सोहोमधील 22 फ्रिथ स्ट्रीटवर, एका स्मारकाच्या निळ्या फलकाचं अनावरण करण्यासाठी आले.

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळेस टेलिव्हिजन सोसायटीचे चेअरमन रॉबर्ट रेनविक यांनी तिथे उपस्थित असलेल्या सांगितलं, "जरी हे स्मारक लंडनच्या मध्यवर्ती भागात असलं तरी त्यांचं खरं स्मारक देशभरात वेगानं वाढत चाललेल्या अँटेनांच्या जंगलात आहे."
1965 मध्ये टेंटन यांनी टीव्हीच्या प्रसारणाच्या इतिहासातील त्यांच्या संक्षिप्त भूमिकेची आठवण करून दिल्यानंतर, काही वर्षांनीच, जगभरातील लोक, चंद्रावर मानव उतरत असल्याचं पाहण्यासाठी त्यांच्या घरातील टीव्हीसमोर चिकटून बसलेले होते.
एक विज्ञानकथा, कल्पनेची भरारी आता एक वास्तव बनली होती.
हा लेख मूळात बीबीसी कल्चरवर प्रकाशित झाला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











