You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंटरनेट बँकिंगद्वारे 21 कोटींचा घोटाळा, आलिशान गाड्या तसेच प्रेयसीसाठी 4 BHK फ्लॅटही घेतला
छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुलातील घोटाळ्याचं एक प्रकरण समोर आलं आहे.
या प्रकरणातील आरोपीनं इंटरनेट बँकिंगच्या मदतीनं 21 कोटी 59 लाख 38 हजारांचा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे.
या पैशांतून आरोपीनं प्रेयसीसाठी 4 BHK फ्लॅट विकत घेतला आणि आलिशान गाड्यांची खरेदी केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. पण हे प्रकरण काय आहे, ते पाहूया.
प्रकरण उघडकीस कसं आलं?
याप्रकरणी संभाजीनगरमधील जवाहर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामध्ये वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये तीन आरोपी आहेत.
आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "या प्रकरणात 3 आरोपी असून त्यांनी उपसंचालक क्रीडा विभाग यांच्या नावाचा आणि स्वाक्षरीचा बनावट ई-मेल तयार केला. त्याबाबतचं पत्र बँकेला देऊन स्वत:च्या मोबाईल नंबरवर नेट बँकिंग अॅक्टिव्हेट करण्याबाबत पत्र दिलं. आणि ती रक्कम आरोपींनी स्वत:च्या खासगी बँक खात्यावर वर्ग केली.
"त्याच्यावरुन इतर काही खात्यांमध्ये ती रक्कम वर्ग झालेली आहे. याच्यामध्ये तीन आरोपी असून दोघांना अटक करण्यात आलेली आहे. एका आरोपीचा तपास सुरू आहे. ज्या खात्यावरुन ही रक्कम वर्ग करण्यात आली होती, ते बंद करण्यात आलं आहे."
मुख्य आरोपी फरार
या प्रकरणातील आरोपींची नावे हर्षकुमार अनिल क्षीरसागर, यशोदा शेट्टी आणि बी.के.जीवन अशी आहेत. यातले दोन जण हे विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते.
त्यांना दर महिन्याला 13 हजार रुपये पगार होता.
हर्षकुमार अनिल क्षीरसागर असं मुख्य आरोपीचे नाव असून, तो एसयूव्ही कार घेऊन फरार झाला आहे.
या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू बाईक खरेदी केली, सोबतच मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये 4 बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे. शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवायची ऑर्डर दिली होती.
तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने 35 लाखांची एसयूव्ही कार खरेदी केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.
इतर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना जिल्हा न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.