अचानक वजन कमी झालं? पोट बिघडतंय? कॅन्सरच्या या लक्षणांकडे पाठ फिरवू नका

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या आणि त्यावरील उपचार पद्धती यामध्येही मोठे बदल होत आहेत. पोटातील अवयवांच्या कर्करोगावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असते. त्यापैकीच एका कर्करोगाची माहिती आपण घेणार आहोत. हा प्रकार आहे स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजेच पॅनक्रिएटिक कॅन्सर (pancreatic cancer)

साधारणतः साठी उलटलेल्या लोकांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण दिसून येते. चाळीशी किंवा चाळीस ते साठ वयोगटातील लोकांमध्ये याचं प्रमाण कमी असलं तरी स्वादुपिंडाच्या कर्करोगाची माहिती सर्वांना असणं आवश्यक आहे.

सर्वात आधी आपण स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज या अवयवाची माहिती घेऊ. स्वादुपिंड ही एक ग्रंथी आपल्या पोटात असते. आपल्या अन्नाच्या पचनामध्ये आणि रक्तातील साखरेच्या पातळीच्या नियंत्रणात तिची भूमिका फार महत्त्वाची असते.

स्वादुपिंडाची दोन महत्त्वाची कामं आहेत. त्यातलं एक काम म्हणजे आपण चावून गिळलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी काही पाचकद्रव्यांची निर्मिती करणं. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी इन्शुलिनसारख्या संप्रेरकांची निर्मिती करणं.

स्वादुपिंडात कर्करोगाची निर्मिती कशी होते?

आता या स्वादुपिंडात कॅन्सरची लागण कशी होते ते पाहू. स्वादुपिंडात काही पेशी अनियंत्रित रीत्या वाढतात आणि त्याची गाठ तयार होते. हा कर्करोग स्वादुपिंडाच्या कोणत्याही भागात तयार होऊ शकतो. पण बहुतांशवेळा ते एक्झॉर्सिन पेशींमध्ये तयार होतात.

या कॅन्सरला सायलेंट कॅन्सर असं म्हटलं जातं. कारण याची लक्षणं प्राथमिक पातळीवर सहसा दिसून येत नाहीत. त्याची लक्षणं दिसेपर्यंत कॅन्सरने पुढचा टप्पा गाठलेला असतो.

स्वादुपिंडाच्या कॅन्सरची लक्षणं

स्वादुपिंड आपल्या पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडतं. पाचकद्रव्यांच्या निर्मितीसाठी ते आवश्यक असतं. पण कॅन्सरची गाठ तयार झाली की कोणती लक्षणं दिसू लागतात हा प्रश्न आम्ही फरिदाबाद येथील अमृता हॉस्पिटल येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. जया अग्रवाल यांना विचारला.

त्या म्हणाल्या, "कर्करोगामुळे अन्नपचनात बिघाड होतो. यामुळे शरीराचं पोषण होत नाही, वजन कमी होतं. अन्नातील मेदाचं पचन नीट न झाल्यामुळे मेदपदार्थ शौचावाटे बाहेर पडतात. ही गाठ वाढली तर इन्शुलिन आणि इतर संप्रेरकांच्या निर्मितीत अडथळा येतो. यामुळे एकतर डायबेटिस सुरू होतो किंवा असलेला डायबेटिस अधिक गंभीर होतो."

त्या पुढे म्हणाल्या, "कर्करोगाच्या या गाठीनं जर यकृतातून आतड्याकडे जाणाऱ्या पित्तरसाच्या वाटेत अडथळा आणला तर काविळ होते, शरीर आणि डोळे पिवळे झालेले दिसतात. मूत्राचा रंग गडद होतो आणि मलाचा रंग फिकट होतो. ही गाठ वाढत गेली तर आजूबाजूच्या उती आणि नसांवर त्याचं आक्रमण बोतं. यामुळे पोटात दुखायला लागतं. जेवल्यावर किंवा आडवं झाल्यावर या वेदना वाढल्याचं दिसून येतं."

स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या आणखी लक्षणांचा विचार केला तर अशा रुग्णांना एक टोकाचा अशक्तपणा येतो.

रोगप्रतिकारक्षमतेवर परिणाम होतो आणि कोणत्याही उपायांविना, कारणाविना वजन कमी होत गेल्याचं दिसतं. कर्करोगाच्या गाठीमुळे पचनात बिघाड होतो त्यामुळे मळमळल्यासारखं होणं, उलटी होणं असे त्रासही होतात.

स्वादुपिंडाचा कॅन्सर होण्याची मुख्य कारणं काय असावीत?

स्वादुपिंडाचा कॅन्सर होण्याची मुख्य कारणं अद्याप समजलेली नाहीत. मात्र तरीही काही गोष्टींमुळे ही स्थिती निर्माण होत असावी अशी कारणं डॉक्टरांच्या निरीक्षणात आलेली आहेत. काही घटकांमुळे स्वादुपिंडाच्या कॅन्सरची शक्यता वाढत असावी असं डॉक्टरांच्या निरीक्षणात दिसून आलेलं आहे.

यामध्ये सर्वांत महत्त्वाचं कारण डॉक्टरांना दिसतं ते म्हणजे तंबाखू सेवन आणि धूम्रपान. डॉ. जया अग्रवाल सांगतात, स्वादुपिंडाच्या कर्करोगातील वीस ते तीस टक्के रुग्ण धूम्रपान करत होते असं दिसतं. धूम्रपानामुळे घातक विषद्रव्य आपल्या शरीरात जातात आणि स्वादुपिंडात कर्करोगपेशींच्या निर्मितीला चालना मिळते असं त्या सांगतात.

कोलकाता येथील मणिपाल हॉस्पिटलमधील कर्करोगतज्ज्ञ डॉ. सागनिक रे सुद्धा दारू आणि धूम्रपानामुळे या कॅन्सरची निर्मिती होते असं सांगतात. डॉ. रे सांगतात पोटात जिथं पित्ताशय आणि स्वादुपिंडातील नलिका एकत्र येतात त्या जागी गुंतागुंत निर्माण झाल्यामुळेही या कॅन्सरची निर्मिती होऊ शकते.

तसेच काही जनुकीय घटकही यासाठी कारणीभूत असतात, असं डॉ. रे सांगतात. अर्थात याबद्दल अधिक अभ्यास अद्याप होणं बाकी आहे, असंही त्या सांगतात.

हा कॅन्सर साधारणतः वृद्धांमध्ये तसेच साठी उलटलेल्या लोकांमध्ये जास्त दिसून येतो. ज्या लोकांच्या

स्वादुपिंडात दीर्घकाळ दाह म्हणजे इन्फ्लमेशन असते त्यांच्या स्वादुपिंडातील पेशींचं नुकसान होतं आणि कर्करोग वाढीला लागू शकतो.

डॉ. अग्रवाल सांगतात, कर्करोगासाठी आहार आणि जीवनशैलीही कारणीभूत ठरू शकते. मांसाहारी पदार्थांचा आहारात भरपूर समावेश असेल आणि आहारात फळं व भाज्या कमी असतील तर ते कर्करोगाचं कारण ठरू शकतं. भरपूर मेदपदार्थ आहारात असतील तसेच अँटिऑक्सिडंट्स नसतील तर त्यामुळे कर्करोगास पोषक स्थिती तयार होते. भरपूर फळं, भाज्या खाणं, तंतूमय पदार्थ खाणं यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. अर्थात त्यातला सहसंबंध अजून स्पष्ट समोर आलेला नाही.

स्वादुपिडांच्या कॅन्सरचं निदान आणि तपासणी- उपचार

या कॅन्सरचं निदान करण्यासाठी डॉक्टर रुग्णाची पूर्ण तपासणी करतात. शारीरिक तपासणी तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती घेतात. यामध्ये व्यक्ती धूम्रपान करते का, कुटुंबातील इतर कोणाला याचा त्रास होता का तसेच डायबेटिस वगैरे आहे का याची तपासणी करतात. तसेच पोटात दुखणे, काविळीची लक्षणं याचाही विचार करतात.

यानंतर रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये काही लक्षणं दिसली की अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, MRI, एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड चाचण्या केल्या जातात. त्यानंतर बायोप्सीद्वारे कर्करोग आहे का याचं निदान केलं जातं. अर्थात यासर्व गोष्टी डॉक्टर रुग्णाची पूर्ण तपासणी करुन करत असतात.

स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया, रेडिएशन, किमोथेरपी असे अनेक प्रकारचे उपचार केले जातात. हा निर्णयही डॉक्टर प्रत्येक रुग्णाच्या तपासणीनंतर, चाचण्यांनंतर घेत असतात.

मुंबईतील लिलावती रुग्णालयातील कर्करोगतज्ज्ञ डॉ. दीपक छाबरा सांगतात, "या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर वेळीच वैद्यकीय सल्ला तसेच उपचार घेणे आवश्यक आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त भाग शस्त्रक्रियेने काढून टाकणे हे एकतर स्वादुपिंड-ड्युओडेनेक्टॉमी किंवा डिस्टल पॅन्क्रिएक्टोमी, ट्यूमरच्या स्थानावर अवलंबून असते.

"रेडिएशन थेरपी म्हणजे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी उच्च-वेगाने ऊर्जेचा वापर केला जातो, तर केमोथेरपी कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी औषधांचा वापर करते. टोटल पॅन्क्रिएक्टोमी तुमचे संपूर्ण स्वादुपिंड, पित्ताशय, प्लीहा आणि तुमच्या पोटाचा आणि लहान आतड्याचा काही भाग काढून टाकते. शस्त्रक्रियेसह केमोथेरपी, रेडिएशन आणि टार्गेटेड थेरपीचाही सल्ला रुग्णांना दिला जाऊ शकतो," असं छाबरा सांगतात.

स्वादुपिंडाचा कॅन्सर टाळण्यासाठी काय करायचं?

असा कॅन्सर टाळण्यासाठी खात्रीशीर ज्ञात मार्ग नाही. मात्र चांगली जीवनशैली, चांगला आहार, शारीरिक हालचाल करत राहाणे आणि घातक पदार्थांचं सेवन टाळणे हे काही उपाय आपल्या हातात आहेत.

धूम्रपान, तंबाखू-दारूचं सेवन टाळावं. वजन योग्यप्रमाणात ठेवून लठ्ठपणापासून दूर राहावं असं डॉ. जया अग्रवाल सांगतात.

आपल्या आहारात तंतूमय पदार्थ, फळं, भाज्या असाव्यात. प्रक्रीया केलेले पदार्थ कमी असावेत, अती तेलकट, मसालेदार, मेदयुक्त पदार्थ कमी असावेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आठवड्यात किमान 150 मिनिटं व्यायाम करावा. साखरेचं प्रमाण आहारात अत्यंत कमी असावं. ताण टाळण्यासाठी काही ध्यानधारणा, योगासनं यांचाही अवलंब करावा असं डॉक्टर सुचवतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.