संधिवात म्हणजे काय? तो टाळण्यासाठी तरुण वयातच काय काळजी घ्यावी?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

संधिवात या आजाराचं नाव सर्वांनी ऐकलेलं असतं. हा आजार बहुतांशवेळा उतारवयात किंवा वृद्धांना होतो हेसुद्धा माहिती असतं. पण हा आजार तरुणपणातही त्रास देऊ शकतो याची माहिती फार कमी जणांना असते. तसेच, भविष्यातला त्रास टाळण्यासाठी तारुण्यातच काळजी घेणं आवश्यक असतं. याचीही माहिती असणं आवश्यक आहे.

संधिवात होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात यात जनुकीय रचनेचाही प्रभाव पडतो.

संधिवात हा अनेक आजारांचा समूह आहे. यामध्ये सांध्यांमध्ये वेदना होणं तसेच सांध्यांच्या जागी दाह होणं याचा समावेश असतो. मध्यमवयाच्या लोकांमध्ये ओस्टिओआर्थरायटिसचा त्रास दिसतो. परंतु हा त्रास कमी वयातही होऊ शकतो.

सांध्यांमध्ये सातत्याने तीव्र वेदना जाणवत असतील तर, आर्थरायटीसची सुरूवात असण्याची शक्यता असते. वारंवार उद्भवणाऱ्या सांधेदुखीकडे वेळीच लक्ष दिलं नाही. तर, ही समस्या गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संधिवाताच्या प्रकारानुसार याची विविध लक्षणं दिसून येतात. पण, आर्थरायटीसची प्रमुख पाच लक्षणं आहेत.

  • सांधेदुखी
  • सांध्यांमध्ये जाणवणारी ताठरता (stiffness)
  • सूज
  • सांध्यांजवळचा भाग लाल होणं
  • चालण्या-फिरण्यात किंवा हालचाल करण्यात येणारा अडथळा

संधिवाताचे निदान करताना डॉक्टर रुग्णांची लक्षणे, शारीरिक तपासणी आणि चाचण्या करतात. सुरुवातीला, डॉक्टर रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल माहिती करुन घेतात.

थकवा, ताप आणि वजन कमी होणे यासारख्या लक्षणांचा शोध घेतला जातो.शारीरिक तपासणीमध्ये सांध्यावरील सूज,संवेदनशीलता किंवा विकृतींची तपासणी केली जाते.

सांध्यांचे मूल्यांकन करण्यासाठी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय अल्ट्रासाऊंड किंवा एमआरआय स्कॅनचा सल्ला दिला जातो.

संधिवाताचे दोन प्रकार सर्वात जास्त आढळून येतात. यात पहिला प्रकार आहे ऑस्टिओआर्थरायटिस आणि दुसरा प्रकार आहे रुमेटॉईड आर्थरायटिस.

ऑस्टिओ आर्थरायटिस

हा प्रकार साधारणतः चाळीशी पार केलेल्या लोकांमध्ये दिसून येतो. त्यातही महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त येतं. परंतु गाऊट किंवा एखाद्या दुखापतीमुळे हा आजार कोणत्याही वयात उद्भवू शकतो.

आपल्या सांध्यामध्ये पातळ गादीसारखे एक आवरण असते. त्याला कार्टिलेज असं म्हणतात. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये या कार्टिलेजवर परिणाम होतो. त्यामुळे सांधे हलवताना त्रास होतो, वेदना होऊ लागतात. हा त्रास वाढत गेला तर कार्टिलेजचं जास्त नुकसान होतं. त्यामुळे हाडं एकमेकांना घासणं, त्यांचा मूळ आकार बदलणं आणि प्रचंड वेदना होणं असा त्रास होऊ लागतो.

साधारणतः हात, मणका, गुडघे, नितंब इथं या वेदना होतात.

रुमेटॉइड आर्थरायटिस

साधारणतः तीस ते पन्नास वयोगटातील लोकांना याचा त्रास होतो. त्यातही महिलांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त असतं.

रुमेटॉईड आर्थरायटिसमध्ये शरीरातील प्रतिकारक्षमता सांध्यांवर परिणाम करते, यामुळे वेदना सुरू होतात, सांध्यांना सुजही येते.

यामुळे सांध्यांचं आवरण खराब होतं आणि त्रास होतो. हे वारंवार सुजणं आणि वेदना यामुळे हाड मोडण्यापर्यंत त्रास होऊ शकतो.

गाऊट

आपल्या शरीरात तयार होणारं युरिक अॅसिड आपलं मूत्रपिंड (किडनी) शरीराबाहेर लघवीच्या माध्यमातून फेकत असते.

मात्र किडनीमधील काही बदलांमुळे किंवा शरीरात युरिक अॅसिडचं प्रमाणच वाढल्यामुळे रक्तातील युरिकची पातळी वाढते. हे वाढलेलं युरिक अॅसिडच या त्रासासाठी कारणीभूत असतं. युरिक अॅसिडचे स्फटिक पायाच्या, हाताच्या हाडांजवळ, सांध्यांमध्ये साचल्यामुळे वेदना होऊ लागतात.

त्यामुळे सूज येते आणि वेदनादायक दाह होऊ लागतो. या आजाराला गाऊट असंही म्हणतात.

अशा वेदना अचानक येण्याला आणि त्या काही काळ राहाण्याला गाऊट अॅटॅक असं म्हणतात.

प्युरिन या पदार्थापासून युरिक अॅसिडची निर्मिती होत असते. त्यामुळेच प्युरिनचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ कमी खावेत असा सल्ला दिला जातो.

युके गाऊट सोसायटीने दिलेल्या सूचनांनुसार मांस, मासे, समुद्रातील जीव, यीस्ट घातलेले पदार्थ-पेयं, दारू, चिकन, द्वीदल धान्यं यामध्ये प्युरिनचे प्रमाण अधिक असते, दूध, चीज, दही, लोणी, अंडी, फळं- भाज्या यांमध्ये प्युरिनचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे प्युरिनचं प्रमाण कमी असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

इतर प्रकार

संधिवाताचे इतरही प्रकार आहेत. यामध्ये अंकिलोजिंग स्पाँडिलाटिसचा समावेश आहे. या प्रकारामध्ये हाडं, लिगामेंटस, स्नायू, मणका यामध्ये होणाऱ्या दाहामुळे सांधेदुखू लागतात. सर्वायकल स्पाँडिलायटिसमध्ये मानेच्या हाडांवर आणि सांध्यांवर परिणाम होतो. लुपुसमध्ये शरीरातल्या विविध अवयवांमधील उतींवर परिणामहोतो. फायब्रोमायल्जियामध्येही स्नायूंवर व लिगामेंटसवर परिणाम होतो. सोरायसिस असणाऱ्या रुग्णांमध्ये सोरायटिक आर्थरायटिसचा त्रास दिसून येतो.

तरुणांनी काय काळजी घ्यावी?

संधिवातासारखा विकार हा उतार वयात उद्भविणारा विकार असला तरी चुकीच्या जीवनशैलीमुळे हल्ली तरुणांमध्ये देखील हा विकार सर्रासपणे पहायला मिळतो.

हा विकार हाडांची झालेली झीज, त्यांना मिळणारे अपुरे वंगण, शरीरामध्ये क्षारांची, ड जीवनसत्वाची कमतरता, सांध्यांना झालेली दुखापत, संसर्ग, कॅल्शियमची कमी अशा अनेक कारणांनी संधीवाताचा विकार उद्भवू शकतो.

तरुण वयामध्ये संधीवात होण्यामागे आजकालची चुकीची जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव कारणीभूत ठरत आहे, असं डॉक्टर सांगतात. लहान मुलांमध्ये आर्थ्रायटीस सर्रास आढळत नसला, तरी हे अशक्य नाही.

याबाबत बोलताना मुंबईतल्या झायनोवा शाल्बी रुग्णालयातील ऑर्थोपेडिक अँड जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. धनंजय परब म्हणाले, “आजकाल तरुणांमध्ये सांधे आणि हाडांचे दुखणे वाढले आहे. संधिवात, सांध्याभोवतालच्या कुशनिंग पॅडची जळजळ, लठ्ठपणा, ल्युपस, गाऊट, सांध्यांना झालेली दुखापत, फायब्रोमायल्जिया आणि ऑस्टिओपोरोसिस हे सांधेदुखीमागील काही चिंताजनक घटक आहेत. हल्ली 20 ते 40 वयोगटातील तरुण सांधेदुखीची तक्रार घेऊन उपचाराकरिता डॉक्टरांकडे धाव घेत असल्याचे पहायला मिळते. बैठे काम आणि त्याचबरोबर जास्त चरबीयुक्त, शर्करायुक्त आहार घेतल्याने सांधेदुखीची तक्रार वाढत आहे.”

तरुण लोकांनी याबाबत घेण्याच्या काळजीबद्दल मुंबईतल्या ग्लेनिग्लस हॉस्पिटल येथील वरिष्ठ कन्सल्टंट डॉ. अनुप खत्री म्हणाले, “तरुण वयातील संधिवात 20 ते 50 वयोगटातील लोकांना होतो. मुख्य म्हणजे आनुवंशिक आजारांमध्ये तरुण वयातील संधिवाताचा समावेश होतो. तरुण वयातील संधिवाताचे लवकर निदान करून वेळेवर उपचार केल्यास त्याचे प्रमाण कमी ठेवता येते. औषधोपचार, व्यायाम, संधिवातावरील औषधे नियमितपणे वर्षांनुवष्रे घ्यायला लागतात. ती या आजाराची गरज असते. लवकर निदान व उपचार केल्यास सांध्यातील आवरणाचा आजार हाडाला इजा करत नाही व सांध्याची हालचाल बरेच वर्षे चांगली ठेवता येते.”

ते सांगतात, “जसजसे तुमचे वय वाढत जाईल तसतसे तुमचे सांधे नैसर्गिकरित्या झीजू लागतात. संधिवात वाढणे थांबवणे नेहमीच शक्य नसते, परंतु काही जोखीम घटक बदलून तुम्ही त्याची प्रगती कमी करू शकता. वजन नियंत्रणात ठेवणे, सांध्यांची दुखापत टाळणे,व्यायाम करणे, धुम्रपान टाळणे,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.”

डॉ. खत्री यांनी, “संधिवात टाळायचा असेल तर आपल्या आहारात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा. आलं, लसूण, मासे, शेंगदाणे, बेरी वर्गातली फळं, प्रत्येक रंगाची फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन करावे. याशिवाय जास्त प्रमाणात मीठ, साखर, प्रक्रिया केलेले आणि रिफाइन्ड पदार्थ, तसेच सॅच्युरेटेड फॅट्स खाऊ नका.” असा सल्लाही दिला आहे.

सांधेदुखी होत असेल तर डॉ. धनंजय परब काही तात्काळ करायचे उपाय सुचवतात. ते म्हणतात, “सांधेदुखीचा त्रास सतावत असवल्यास सांध्यावर अतिरिक्त ताण येण्यासारख्या कृती करू नका. वेदना होणाऱ्या भागास हलक्या हाताने मसाज करा जेणेकरून सांधेदुखीपासून तात्परता आराम मिळेल. जरी तुम्हाला कमी वयात संधिवात झाला असेल, तरीही त्याचा परिणाम भविष्यात होऊ शकतो. जर तुमच्या गुडघ्यांमध्ये ताठरता येणे, सूज येणे, नीट चालता येत नसेल किंवा तुमचा गुडघा जास्त दुखत असेल अशी लक्षणे दिसत असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांना भेटले पाहिजे. वेळीच उपचार व निदान केल्यास भविष्यातील गुंतागुत टाळता येऊ शकते व सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो.”

आजकाल तरुणांमध्ये गाऊटचाही त्रास दिसून येतो. त्याबद्दल गाऊट अॅटॅकच्या परिस्थितीमध्ये तात्काळ काय करता येईल यावर डॉ. तेजस खानोलकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.

ते म्हणाले, "गाऊटच्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी वैद्यकीय उपचारांचीच गरज असते. तोपर्यंत क्रायोथेरेपी अर्थात बर्फने 10 मिनिटे शेकल्यास दुखणे कमी होण्यास बरीच मदत होते.

डॉ. तेजस खानोलकर सांगतात, "दुखणे कमी झाल्यानंतर संध्याची हालचाल पूर्ववत होण्यासाठी हालचालीचे आणि सांध्याच्या भोवतालच्या स्नायूची ताकद वाढीचे व्यायाम फिजिओ तुम्हाला देतात. Acute phase मध्ये फिजिओ पेशन्टला काही splints देऊ शकतात ज्यामुळे दुखणाऱ्या भागाची कमीत कमी हालचाल होऊन त्याला थोडा आराम मिळू शकतो. भविष्यकाळात हा त्रास पुन्हा पुन्हा होऊ नये ह्यासाठी आहार आणि जीवनशैली बदलणे तसेच अतिरिक्त वजन कमी करणे फायद्याचे ठरते."