You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अरवली : भारताचा कणा म्हटली जाणारी ही पर्वतरांग का आहे विशेष? किती जुने आहेत हे पर्वत?
- Author, त्रिभुवन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
डिसेंबरच्या सकाळी, दिल्लीवर घनदाट काळं धुकं पसरलेलं असतं आणि रस्ते, दिवे, हे सगळं या धुक्यानी झाकून जातं.
तर गुरुग्रामच्या महामार्गावर कार आणि इतर वाहनं धातूपासून बनलेल्या सापासारखी हळूहळू पुढं सरकत असतात.
थोड्याच अंतरावर पुरातन क्वार्ट्झाइटच्या (एक कठीण, रूपांतरित खडक) रांगा दिसून येतात.
इथं बर्फाचं आवरण म्हणजेच हिमरेखा नाही, ना पोस्टकार्डसारखी सुंदर शिखरं. फक्त झिजलेल्या, तुटलेल्या अवस्थेतील उद्ध्वस्त टेकड्या आहेत. जणू काही पृथ्वीनेच आपली सगळ्यात जुनी कथा दगडांवर लिहून ठेवली आहे.
अरवलीत 'पोस्टकार्डसारखी उंच शिखरं' फारशी दिसत नाहीत, म्हणजे ती फार भव्य वाटत नाही. पण पर्यावरणासाठी ते खूप महत्त्वाचे आहेत. ते धूळ थांबवतात, पाणी जमिनीत मुरायला मदत करतात, जैवविविधतेचं संरक्षण करतात आणि वन्यजीवांना आपल्या कुशीत आश्रय देतात.
हीच ती अरवली पर्वतरांग. उत्तर-पश्चिम भारतातील ही पर्वतरांग 'भारताची सर्वात जुनी पर्वतरांग' (फोल्ड-माउंटेन बेल्ट) म्हणून ओळखली जाते.
लोक इतिहासकार श्रीकृष्ण जुगनू सांगतात की, अरवली ही अशी पर्वतरांग आहे जेथे लुनी, बनास, साबरमती, साहिबी, बेडच (अयाड), खारी, सुकडी, कोठारी, सोम, जख्मी आणि कमला यांसारख्या नद्या आहेत.
तसेच नक्की, पुष्कर, जैसमंद, मातृकुंडिया आणि बेनेश्वरसारखी अनेक सरोवरंही इथे आहेत.
भारताचा कणा
अरवली पर्वतरांग भारताचा कणा आहे. ही पर्वतरांग 4 राज्यांतून जाते आणि उत्तर-पश्चिम भारतात ती सुमारे 670 किलोमीटर लांब पसरलेली आहे.
ही पर्वतरांग दिल्लीजवळ सुरू होते, दक्षिण हरियाणा आणि राजस्थानमध्ये खोलवर पसरते आणि पुढे गुजरातमध्ये अहमदाबादजवळच्या मैदानी भागापर्यंत पोहोचते.
अरवलीचं सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. त्याची उंची सुमारे 1 हजार 722 मीटर इतकी आहे आणि ते राजस्थानच्या माउंट आबू येथे आहे. इथे उभं राहिलं की, जणू ढग आपल्याला स्पर्श करून पुढे जातात, असं वाटतं.
भूगोलतज्ज्ञ सीमा जालान सांगतात की, अरवली सुमारे 67 कोटी वर्षे जुनी पर्वतरांग आहे. जर अरवली नसती, तर उत्तर भारतातील अनेक नद्या अस्तित्वात नसत्या. अनेक जंगलं, वनस्पती, मौल्यवान खनिजं आणि मोठं पर्यावरणीय वैभवही नसतं.
'अरवली' हा शब्द संस्कृतमधील 'अर्बुदावली'पासून तयार झाला आहे. राजस्थानच्या इतिहासात या पर्वतरांगेचा उल्लेख 'आडावळ' या नावाने केला जातो.
ही पर्वतरांग एक प्रकारची संरक्षणरेषा आहे, जी वाळवंट, धूळ आणि पाण्याच्या टंचाईविरोधात शांतपणे उभी आहे.
ही उत्तर भारताची सगळ्यात जुनी 'टाइम कॅप्सूल' आहे आणि त्याच वेळी सर्वात नाजूक वर्तमानही आहे.
अरवली फार प्राचीन आहे, हे लोक अनेकदा उत्सुकतेने सांगतात, ती 'हिमालयापेक्षाही जुनी' आहे.
पण ही तुलना फक्त वय दाखवते, धोका नाही.
भूगर्भशास्त्रज्ञ म्हणतात की, हिमालय तरुण आहे आणि तो अजून वाढतो आहे, तर अरवली पर्वतरांग खूप जुनी आहे.
जेव्हा भारतीय प्लेट आणि प्राचीन खंडांमध्ये टक्कर झाली, जमिनीत खचदरी तयार झाली (रिफ्टिंग), अवसादन आणि अशा बदलांचा अनुभव घेतला तेव्हा अरवली पर्वतरांग तयार झाली. त्याला भूगर्भशास्त्रीय भाषेत प्रोटेरोझोइक आणि संबंधित कालखंडातील घटना म्हणतात.
काही स्रोत या प्रक्रियेला 'अरवली-दिल्ली ऑर्गेनिक बेल्ट' म्हणून अधोरेखित करतात. हा एक असा भूखंड आहे, जो महाद्वीपीय तुकड्यांच्या टक्कर आणि हळूहळू होणाऱ्या पर्वतनिर्माणामुळे तयार झाला.
यातून असं दिसून येतं की, अरवलीचे दगड आणि त्याच्या भेगा हे एका अशा भू-तंत्राचा भाग आहेत, जे तयार होण्यासाठी जितकं कठीण आहे, ते तुटणंही तितकंच सोपं होऊ शकतं. हे फोडण्यासाठी कोणत्याही स्फोटाची गरज लागत नाही. फक्त सतत खाणकाम, कापकाम, रस्ते आणि काँक्रिटीकरण करणं पुरेसं आहे.
उत्तर भारताची 'ग्रीन वॉल'
अरवलीला उत्तर भारताची 'हिरवी भिंत' म्हणजेच 'ग्रीन वॉल' म्हटलं जातं. ही पर्वतरांग पूर्वेकडे थार वाळवंटाचा विस्तार रोखणारी नैसर्गिक भिंत आहे. ती वनस्पती, माती, उतार आणि पाणी साठवण्याची क्षमता यांचं मिश्रण आहे.
नागरिकांचा गट आणि काही तांत्रिक अहवालांमध्ये अरवलीमध्ये अनेक 'गॅप्स-ब्रीच' (अंतर-भंग) दिसतात. हे असे भाग आहेत, जिथे टेकड्यांची अखंड रांग तुटली आहे आणि धूळ-वाळवंटासाठी मार्ग उघडा किंवा मोकळा झाला आहे.
या संदर्भात दिल्ली-एनसीआरमधील धुळीची वादळं फक्त हंगामी घटना नाही, तर भूगोलाचे सूचक लक्षण आहे, या पर्वतरांगेत छिद्र म्हणजेच पोकळी वाढत आहे.
ही एक कठीण कथा आहे, यासाठी कोणतंही फक्त एक कारण नाही. कुठे बेकायदेशीर खाण आहे, कुठे खाण वाढवली जात आहे, कुठे नियोजनाशिवाय शहरं वाढत आहेत, तर कुठे रस्ते आणि रेल्वे यासारख्या प्रकल्पांनी दृश्य तुकड्यांमध्ये बदलते.
दिल्लीतील 'रिज', ज्याकडे अरवलीच्या उत्तरेकडील भागाप्रमाणे पाहिलं जातं, तो शहरी पर्यावरणाचा एक भाग आहे. लोक त्याला पार्क म्हणजेच उद्यान म्हणून पाहतात. पण मुळात ती एक निसर्गाची म्हणजेच भौगोलिक- संरक्षणरचना आहे. धूळ थांबवणं, सूक्ष्म जलवायू बनवणं आणि जैवविविधता टिकवण्याची ती एक संरक्षणात्मक यंत्रणा आहे.
अरवली पर्वतरांगा दूरून ओसाड वाटतात, पण हेच वन्यप्राण्यांचं घर आहे. इथे बिबट्या, लांडगा, कोल्हा, नीलगाय, साळींदर असे प्राणी आणि इतर अनेक पक्ष्यांचे हे निवासस्थान आहे.
हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या सीमेवर बिबट्या असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत आणि वन्यजीव कॉरिडॉरबाबतही चर्चा होत आहे.
या कॉरिडॉरचा प्रश्न केवळ 'प्राणी वाचवा' इतक्यापुरता मर्यादित नाही; हा लँडस्केपचा परिसर अखंड ठेवण्याचाही प्रश्न आहे.
जेव्हा पर्वतांमध्ये रस्ते आणि रिअल इस्टेट 'कट-लाइन' तयार करतात, तेव्हा निवासी जागा लहान लहान बेटांमध्ये विभागली जाते.
लहान बेटांमध्ये मोठे शिकारी प्राणी टिकू शकत नाहीत आणि मग मनुष्य आणि प्राणी यांच्यात संघर्ष वाढतो. शेवटी 'वन्यजीव राहिलेच नाहीत' हे कारण पुढे करून विकासाच्या नावाखाली विनाश होतो.
अरवलीच्या दक्षिण भागातील, उदयपूर-मेवाड क्षेत्रात, वन्यजीवांचा इतिहास हा केवळ नैसर्गिक इतिहास नाही, तर राजकीय आणि सामाजिक इतिहासही आहे.
'इतिहासाचा फॉरेन्सिक पुरावा'
या संदर्भात एम. के. रणजित सिंह यांचा उल्लेख महत्वाचा आहे. त्यांनी मेवाडमधील वाघ नष्ट होण्याविषयी एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार तिथे शिकार, जंगलतोड आणि जंगली शाकाहारी प्राण्यांच्या ऱ्हासामुळे पर्यावरणाचा कणा मोडला जात आहे.
रणजित सिंह लिहितात की, एका शासकाने 'सुमारे 200 प्रौढ वाघ' असायला हवेत असं म्हटलं. तरीही आपल्या काळात 375 पेक्षा जास्त वाघांची शिकार त्यांनी केली.
यावर अलीकडेच पर्यावरण इतिहासकार डॉ. भानू कपिल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उमा भाटी यांनी संशोधन केलं आहे.
डॉ. भानू कपिल सांगतात की, जर अरवली पर्वतरांग नसत्या, तर महाराणा प्रताप आपल्या तुटपुंज्या सैनिकांच्या मदतीने त्या काळात मुघल बादशाह अकबरच्या सैन्याशी कसं लढू शकले असते?
ते सांगतात की, महाराणा कुंभा यांनी मेवाडच्या संरक्षणासाठी 32 किल्ले बांधले होते. ते ऐतिहासिकदृष्ट्या 'ग्रीन फोर्ट' (हरित किल्ले) म्हणून ओळखले जातात.
आज जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असलेलं उदयपूर अरवलीशिवाय वसू शकलं नसतं. ते त्या काळातील 'रिंग फेन्स शहर' होतं, जे प्रत्येक प्रकारच्या हल्ल्यापासून लोकांचं संरक्षण करत असत.
अरवली हेच ते जीवनतत्त्व आहे, ज्याने पाणी, जंगल आणि मातीचे महत्त्व दाखवलं.
डॉ. भानू कपिल म्हणतात की, बिजौलियाचे शेतकरी आंदोलन असो किंवा भिल्ल आंदोलन असो, ते अरवली पर्वतरांगांच्या संरक्षणाशीही जोडलेले होते. कारण त्या काळात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जंगलांमध्ये प्राण्यांची शिकार वाढवली होती.
या परिसरातील केवड्याचा कालवा असो की चंदनच्या झाडांची रांग किंवा इतर वनस्पती, हे सर्व अरवलीमुळेच टिकून राहिलं आहे. पूर्वी इथे चंदन आणि सागवानाची झाडं मोठ्या प्रमाणात होती.
ते पुढे सांगतात की, 1949–1954 या 5 वर्षांत मेवाडने अरवलीतून सुमारे 140 वाघ गमावले, म्हणजे सरासरी दरवर्षी 28 वाघ. याचा अर्थ असा की, 1960 च्या दशकापर्यंत मेवाडमधील वाघ नामशेष झाले. तसेच जंगल आणि जंगली शाकाहारी प्राणीही जवळजवळ संपुष्टात आले.
अशा तथ्यांमुळे अरवलीच्या आजच्या गोष्टीत 'इतिहासाचे न्यायवैद्यक पुरावे' जोडले गेलेत.
विकासासाठी कोणती किंमत?
पर्यावरणाचा नाश बऱ्याचदा 'हळूहळू' होतो, पण जेव्हा तो दिसतो, तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
अरवलीमधून वाघ गायब होणे हा फक्त एका प्रजातीचा अंत नव्हता; ते जंगलाच्या संपूर्ण पिरॅमिडचे ढासळणे होते, जे पाणी, माती, शेती आणि समाजापर्यंत पसरते.
सरकारी यंत्रणा आणि न्यायालयीन आदेशांच्या संघर्षात अरवलीचे भविष्य अडकले आहे, जिथे 'विकासा'ची भाषा अनेकदा 'भूगोला'ला गप्प करून टाकते.
अरवली नष्ट करण्याची मानवी किंमत अकल्पनीय आहे. मेंढपाळ, शेतकरी आणि शहराच्या सीमेवर राहणाऱ्या लोकांवर याचा भयंकर परिणाम होऊ शकतो.
परंतु, सध्या अरवलीतील जुन्या मेंढपाळांना स्पष्टपणे जाणवते की, उन्हाळा वाढला आहे, कारण हिरवळ कमी झाली आहे. पावसाचे पाणी पटकन वाहून जाते, कारण उतारावर धूप वाढली आहे, जनावरांना चरण्यासाठीचे क्षेत्र कमी झाले आहे. अनेक ठिकाणी 'जंगल' हे आता सुरक्षिततेचे स्थान नाही, तर संघर्षाचे ठिकाण बनले आहे; कारण निवासी जागा कमी झाल्यामुळे मानव आणि वन्यप्राणी एकाच अरुंद भागात एकत्र येतात.
ही गोष्ट फक्त 'पर्यावरण विरुद्ध विकास' नाही.
विकासासाठी कोणती किंमत द्यावी लागते आणि कोणाच्या वाट्याला ही किंमत येते, हा मोठा प्रश्न आहे.
तरीही अरवलीसाठी एक विश्वासार्ह आशेचा किरणही आहे, जसं की पुनर्निर्माण.
यासाठी गुरुग्रामच्या अरवली बायोडायव्हर्सिटी पार्कचं (जैवविविधता उद्यान) उदाहरण नेहमी दिलं जातं. इथे गंभीर नुकसान झालेल्या जमिनीलाही नागरिकांचा पुढाकार, वैज्ञानिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीने पुन्हा जिवंत करण्यात आलं होतं.
अशा प्रकल्पांमुळे दिसून येतं की, चर्चा फक्त 'वाचवण्याची'च नव्हे, तर 'पुन्हा तयार करण्याची' म्हणजेच 'टू रिस्टोअर' करण्याची देखील आहे.
पण पुनर्निर्माणाचा अर्थ फक्त पार्क तयार करणे असा नाही; याचा अर्थ आहे, कॉरिडॉर जोडणे, खाणकामाचे नियोजन पारदर्शक करणे आणि शहराच्या नियोजनात पर्वतांकडे 'लँड बँक' म्हणून नाही, तर 'जीवन आधार प्रणाली' (लाइफ सपोर्ट सिस्टिम) म्हणून पाहणे.
पर्यावरणतज्ज्ञ टी. आय. खान सांगतात की, 1980 च्या दशकात अरवलीत फक्त 12 'गॅप' होते. आता त्यांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. तेव्हा दिल्लीकडे वाळवंट पुढे सरकत असल्याने तत्कालीन पर्यावरण सचिव टी. एन. शेषन खूप चिंतेत होते. म्हणूनच त्यांनी त्या काळात 'सँड ड्यून एस्टब्लायजेशन डिपार्टमेंट' (वाळू ढिगारा स्थिरीकरण विभाग) स्थापन केला होता.
मेवाडमधील वाघांचा अंत एम. के. रणजित सिंह यांनी आकडेवारीत नोंदवला आहे, हा एक इशारा आहे. जंगलाचा नाश फक्त जंगलापुरता मर्यादित राहत नाही; तो शासन, समाज आणि भविष्यालाही धोक्यात टाकतो.
अरवली उत्तर भारताची ढाल आहे, कारण ती हवा रोखून धरते, पाणी साठवायला मदत करते आणि जीवनाला जोडून ठेवते.
प्रश्न हा नाही की, अरवली किती जुनी आहे, प्रश्न हा आहे की, आपण तिला किती काळ जिवंत ठेवणार आणि तेही कोणत्या किमतीवर.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)