You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अरवली पर्वतरांगेच्या नव्या व्याख्येला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, जाणून घ्या नवे निर्देश
- Author, अभिषेक डे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगांच्या व्याख्येला स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारच्या शिफारशीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ही व्याख्या स्वीकारली होती. मात्र, त्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.
सोमवारी (29 डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सांगितलं, "अरवली पर्वतरांगांच्या व्याख्येशी संबंधित 20 नोव्हेंबरचा आदेश सध्या स्थगित ठेवण्यात यावा. कारण त्यामध्ये अधिक तपासणी गरजेची असलेले अनेक मुद्दे आहेत."
खंडपीठाने अरवली पर्वतरांगांच्या व्याख्येबाबत यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या सर्व समित्यांच्या शिफारशींचे मूल्यांकन करण्यासाठी नवीन उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही दिला आहे.
न्यायालयाने अटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांना प्रस्तावित समितीची रचनेत आणि या प्रकरणात न्यायालयाला मदत करण्यास सांगितले आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे.
अरवली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून वाद निर्माण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत सोमवारी (29 डिसेंबर) या प्रकरणाची सुनावणी केली.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले, "समितीच्या शिफारशी आणि त्यानंतरचे सर्वोच्च न्यायालयाचे निष्कर्ष सध्या स्थगित राहतील, असे आम्ही निर्देश देत आहोत. या प्रकरणाची सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी होईल."
सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगांची व्याखा बदलल्यानंतर जवळपास संपूर्ण उत्तर भारतात आंदोलन सुरू झाली होती.
न्यायालयाने या व्याख्येला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर 'अरवली विरासत जन अभियान'च्या संयोजक नीलम अहलुवालिया यांनी बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांच्याशी बोलताना सांगितले, "सर्वोच्च न्यायालयाने नव्या व्याख्येच्या परिणामांवर सविस्तर आणि स्वतंत्र अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत. अरवली संरक्षणाच्या मागणीसाठी जनआंदोलन सुरूच राहील."
अरवलीच्या नव्या व्याख्येनं भीती का निर्माण झाली होती?
सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतांची व्याख्या बदलल्यानंतर जवळपास संपूर्ण उत्तर भारतात या निर्णयाविरोधात आंदोलनं सुरू झाली होती.
अरवली ही जगातील सर्वात जुनी भूगर्भीय रचनांपैकी एक आहे. ती राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि दिल्लीपर्यंत पसरलेली आहे.
केंद्र सरकारच्या शिफारशींनंतर सर्वोच्च न्यायालयाने अरवलीची नवीन व्याख्या मान्य केली होती. या व्याख्येनुसार, आजूबाजूच्या जमिनीपेक्षा किमान 100 मीटर (328 फूट) उंच असलेला भागच अरवली पर्वत मानला जाणार होता.
जर दोन किंवा त्याहून अधिक टेकड्या 500 मीटरच्या आत असतील आणि त्यांच्या मधोमध जमीन असेल, तर त्या टेकड्यांना अरवली पर्वतरांगांचा भाग मानलं जाणार होतं.
पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अरवलीची व्याख्या फक्त उंचीच्या आधारावर केल्यास 100 मीटरपेक्षा लहान असलेल्या अनेक टेकड्यांवर खाणकाम आणि बांधकामाला परवानगी मिळू शकते.
या टेकड्या झुडपांनी झाकलेल्या असल्या तरी त्या पर्यावरणासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. परंतु, केंद्र सरकारचं म्हणणं आहे की, ही नवीन व्याख्या संरक्षण कमी करण्यासाठी नाही, तर नियम अधिक मजबूत करण्यासाठी आणि सर्वत्र एकसमानता आणण्यासाठी आहे.
लोक या निर्णयाला विरोध का करत आहेत?
या आठवड्यात गुरुग्राम आणि उदयपूरसह अनेक शहरांमध्ये शांततापूर्ण आंदोलनं झाली. या आंदोलनांत स्थानिक नागरिक, शेतकरी, पर्यावरण कार्यकर्ते सहभागी झाले होते, तर काही ठिकाणी वकील आणि राजकीय पक्षांनीही सहभाग घेतला होता.
अरवलीची नवी व्याख्या तिच्या महत्त्वाच्या भूमिकेला कमकुवत करू शकते, असं 'पीपल फॉर अरवलीज' या समूहाच्या संस्थापक सदस्या नीलम अहलुवालिया यांनी बीबीसीला सांगितलं
त्यांनी सांगितलं की अरवली पर्वतरांगा या उत्तर-पश्चिम भारतात 'वाळवंटीकरण रोखण्यासाठी', 'भूजल पुनर्भरण करण्यासाठी आणि लोकांची उपजीविका टिकवण्यासाठी' खूप महत्त्वाचे आहे.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, लहान लहान झुडपांनी झाकलेल्या टेकड्या वाळवंटीकरण थांबवण्यासाठी, भूजल साठा वाढवण्यासाठी आणि स्थानिकांच्या रोजगारात महत्त्वाचं योगदान देतात.
अरवली वाचवण्याच्या आंदोलनाशी संबंधित पर्यावरण कार्यकर्ते विक्रांत टोंगड म्हणतात की, "अरवलीची व्याख्या फक्त उंचीवरून नाही, तर तिच्या पर्यावरणीय, भूगर्भीय आणि हवामानाशी संबंधित महत्त्वावरून ठरवली गेली पाहिजे."
त्यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावर टेकड्या आणि पर्वतरांगा त्यांच्या कामगिरीवर ओळखल्या जातात, केवळ उंची पाहून नाही.
त्यांचं म्हणणं आहे की, "ज्या जमिनीग आहे आणि जो पर्यावरण संरक्षणासाठी किंवा वाळवंटीकरण रोखण्यासाठी महत्त्वाचा आहे, तो कितीचा भाग अरवलीचा भूगर्भीयदृष्ट्या भाही उंच असो, त्याला अरवलीच मानलं पाहिजे."
सरकार अरवलीची वैज्ञानिक निकषांवर व्याख्या करेल, ज्यात त्याचा भूगोल, पर्यावरण, वन्यजीव, आणि हवामान तटस्थ ठेवण्याची क्षमता यांचा समावेश असेल, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत
टोंगड इशारा देतात की, न्यायालयाच्या नवीन व्याख्येमुळे खाणकाम, बांधकाम आणि व्यवसाय वाढू शकतात, ज्यामुळे निसर्गाचं संतुलन म्हणजेच इकोसिस्टिमचं नुकसान होण्याचा धोका वाढेल.
या प्रकरणात विरोधी पक्षांनीही आवाज उठवला आहे. नवीन व्याख्येमुळे पर्यावरण आणि निसर्गावर मोठा परिणाम होऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे.
अरवलीचं रक्षण 'दिल्लीचं अस्तित्व वाचवण्यापासून वेगळं केलं जाऊ शकत नाही', असं समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
राजस्थान काँग्रेसचे नेते टीका राम जुल्ली यांनी अरवली ही राज्याची 'जीवनरेखा' (लाइफलाइन) असल्याचं वर्णन केलं. ही पर्वतरांग नसती, तर 'दिल्लीपर्यंतचा संपूर्ण परिसर वाळवंटात बदलला असता', असं म्हटलं.
सरकारचं मत काय आहे?
केंद्र सरकार ही चिंतेची बाब नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
रविवारी (21 डिसेंबर) जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, नवीन व्याख्या नियम मजबूत करण्यासाठी आणि सर्वत्र एकसमानता आणण्यासाठी आहे.
सर्व राज्यांमध्ये खाणकामाचे समान पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ व्याख्येची गरज होती, असंही निवेदनात म्हटलं आहे.
निवेदनात पुढं म्हटलं आहे की, नवीन व्याख्येत संपूर्ण पर्वत प्रणालीचा समावेश होतो, ज्यात टेकड्या, आसपासची जमीन आणि मधला भागही आहे, जेणेकरून पर्वत गट आणि त्यांचे संबंध सुरक्षित राहतील.
100 मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या प्रत्येक जमिनीवर खाणकाम करण्याची परवानगी मिळेल, असं मानणं चुकीचं आहे, असं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने म्हटलं आहे.
सरकार म्हणतं की, अरवलीतील टेकड्या किंवा पर्वतरांगांमध्ये नवीन खाणकाम परवाने दिले जाणार नाहीत. जुने परवाने फक्त ते टिकाऊ किंवा शाश्वत खाणकामाचे नियम पाळतील तेव्हाच चालू राहतील.
मंत्रालयाने हेही स्पष्ट केलं की, 'अभेद्य' भागांमध्ये जसं की संरक्षित जंगलं, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको-सेन्सिटिव्ह क्षेत्र) आणि पाणथळ, तिथे खाणकामावर पूर्णपणे बंदी आहे.
परंतु काही खास, धोरणात्मक किंवा अणूउर्जेच्या खनिजांचा अपवाद असू शकतो, ज्यास कायद्याने परवानगी दिली असेल.
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, 1,47,000 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या अरवली पर्वतरांगेतील फक्त सुमारे 2 टक्के भाग खाणकामासाठी वापरला जाऊ शकतो, आणि तेही सखोल अभ्यास आणि अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच.
परंतु, आंदोलकांनी यासाठी आंदोलन सुरू राहील असं म्हटलं आहे. न्यायालयाच्या नवीन व्याख्येला आव्हान देण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधत आहोत, असं विरोध करणाऱ्या अनेक गटांनी सांगितलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)