You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाशिक : तपोवनातील वृक्षतोडीला एनजीटीची अंतरिम स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने (एनजीटी) अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एकही वृक्षतोड करता येणार नाही, अशी माहिती याचिकाकर्ता श्रीराम पिंगळे यांनी दिली.
नाशिक येथील तपोवनातील वृक्षतोडीविरोधात वकील श्रीराम पिंगळे यांनी याचिका दाखल केली होती. एनजीटीने याची दखल घेत नाशिक महापालिकेला एकही झाड तोडू नयेत, असे आदेश दिले. याशिवाय, वृक्षतोडीबाबत तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.
नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड प्रस्तावित आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे.
मात्र या वृक्षतोडीला नाशिकसह राज्यातील वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, सिनेकलावंत तसेच राज्यातील विरोधी पक्षाने विरोध केला आहे. त्यानंतरही नाशिक महानगरपालिका येथील वृक्षतोडीवर ठाम होती. आता एनजीटीने तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे.
दरम्यान, याचिकाकर्ते श्रीराम पिंगळे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या वृक्षतोडीच्या बदल्यात मनपा प्रशासनाने 17 हजार झाडे लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात ती रोपे लावलेली नाहीत, अशी परिस्थिती आहे.
एनजीटीच्या आदेशात काय?
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात सुप्रीम कोर्टाचे वकील श्रीराम पिंगळे यांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हरित लवादाने निकाल देत पुढील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तपोवनातील वृक्षतोड थांबवण्याचे आदेश दिले.
नाशिक महानगरपालिकेला आदेश देत या परिसरातील एकही वृक्ष तोडू नये, यासह वृक्षतोडीबाबतचा अहवाल आणि त्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या MICE हबचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
या प्रकरणावरील पुढील सुनावणी 15 जानेवारीला असून नाशिक महापालिकेच्या संबंधित 5 अधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या सोबतच न्यायालयाने स्वतंत्र समिती गठित करून वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन्ही समित्यांचे अहवाल 15 जानेवारीला सादर करावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला होता संताप
'इथं जी झाडं मार्क केलेली आहेत, आधी ती तोडण्यासाठी मार्क केली आणि आता ते सांगत आहेत की, ते झाडं मोजण्यासाठीचं मार्कींग आहे. मूळात साधूंचं असं म्हणणंच नसतं की, झाडं तोडा.'
'झाडं तोडणं हा कोणत्याही अध्यात्मिक व्यक्तीला मान्य होणारा मार्ग असू शकत नाही. या प्रकरणी राज्य तसेच केंद्र सरकारनंही लक्ष घालावं आणि झाडं कापण्याचा निर्णय मागे घ्यावा.'
'कुंभमेळ्यासारख्या कुठल्याही धार्मिक गोष्टीचं मूळ हे प्रकृती असते. आणि तुम्ही प्रकृतीला तोडूनच या सगळ्या गोष्टी करत असाल, साधूसंत इथे कसे बसतील?'
नाशिकमधील पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या या भावना आहेत.
तपोवन परिसरातील झाडं कापली जाऊ नयेत, यासाठी हे पर्यावरणप्रेमी आंदोलन करत आहेत.
नाशिकमध्ये कुंभमेळ्यातील साधू-महंतांसाठी उभारण्यात येणाऱ्या साधूग्रामकरिता ही झाडं तोडली जाणार असल्याची भीती पर्यावरणप्रेमींना आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रयागराजच्या कुंभमेळ्यानंतर साधारण दीड वर्षांनंतर नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे.
कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवनात साधूग्राम तयार केलं जातं. आगामी कुंभमेळ्यात सुमारे 1150 एकर क्षेत्रावर अशाप्रकारचं साधूग्राम उभारण्याचं नियोजित आहे.
तपोवनमध्ये महापालिकेची जवळपास 54 एकर जागा आहे. तेथील सुमारे 1700 विविध प्रजातींच्या वृक्षांची आणि पुनर्रोपण करण्याबाबत नोटीस देऊन महापालिकेनं हरकती व सूचना मागविल्या होत्या.
मंगळवारी (18 नोव्हेंबर) त्याची मुदत संपुष्टात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याचं लक्षात आल्यावर पर्यावरणप्रेमीच नव्हे तर, नागरिकांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शेकडो नागरिकांनी हरकती उपस्थित केल्या.
सर्व स्तरातून त्यास कडाडून विरोध होत आहे. अनेक मोठ्या, प्रौढ, सावलीदार व परिसंस्थेतील महत्वाच्या झाडांवर पिवळ्या रंगाच्या खुणा केल्या आहेत.
यात कडूनिंब, चिंच, जांभूळ यांसारखी भारतीय ओळख दर्शविणाऱ्या प्रजातीही सुद्धा आढळल्याचं पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे.
अनेक झाडं इतकी जुनी, मोठी व पसरट आहेत की त्यांची प्राचीन अर्थात हेरिटेज वृक्ष म्हणून नोंद होऊ शकते.
असे वृक्ष तोडणं हा केवळ पर्यावरणीय नव्हे तर अध्यात्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या वेदनादायी निर्णय ठरेल, याकडं काहींनी लक्ष वेधलं आहे.
पर्यावरणप्रेमींचा विरोध
या जागेवरची जवळपास 1800 झाडं तोडावी लागणार असल्याची नोटीस महापालिकेनं काढली असल्याचं समोर आलं आहे.
तसेच, तपोवनातल्या काही झाडांचं पुर्नरोपण करावं लागणार असून, काही झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी लागणार असल्याचंही महापालिकेनं दिलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
मात्र, आता त्याविरोधात पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
पर्यावरण प्रेमी भारती जाधव म्हणतात की, "इथं जी झाडं मार्क केलेली आहेत, आधी ती तोडण्यासाठी मार्क केली आणि आता ते सांगत आहेत की, ते झाडं मोजण्यासाठीचं मार्कींग आहे. झाडांमुळे इथं फार मोठी इकोसिस्टीम उभी राहिलेली आहे."
"इथं अनेक प्रकारचे पक्षी येतात, प्राणी येतात. हा नाशिकचा ग्रीन झोन आहे. मूळात साधूंचं असं म्हणणंच नसतं की, झाडं तोडा. उलट ते जंगलात वगैरे राहून तप करतात. कुभंमेळ्यासाठी ही झाडं आहे तशीच राहू देऊनही तयारी करता येईलच."
अगदी असाच मुद्दा पर्यावरण प्रेमी रोहन देशपांडेही मांडतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "कुंभमेळ्यासारख्या कुठल्याही धार्मिक गोष्टीचं मूळ हे प्रकृती असते. आणि तुम्ही प्रकृतीला तोडूनच या सगळ्या गोष्टी करत असाल, साधूसंत इथे कसे बसतील? शिवाय, कुंभमेळा हा अल्पकाळासाठी आहे. मात्र, इथली ही जैवविविधता ही अनेक पिढ्यांसाठीची आहे."
सिनेअभिनेते आणि 'सह्याद्री देवराई' या संस्थेचे प्रमुख सयाजी शिंदे यांनीही यावर परखड टीका केली आहे.
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, "मला नाशिकमधून फोन येत आहे, मला तिकडे जाणं शक्य नाही, पण असे लाखो वनप्रेमी आहेत जी अशा झाडांसाठी झटत आहेत आणि हे असे जर आंदोलन होत असेल तर त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे."
"तपोवनमधील वृक्षतोडीचा जो काही मुद्दा आहे, त्या संदर्भात माझा तेथील वन्यप्रेमींना पूर्ण पाठिंबा आहे. एक झाड तोडलं तर दहा झाडं लावू, असं म्हणत आहेत. पण तुम्ही चेष्ठा करत आहात का?
आतापर्यंत कोणत्या हायवेच्या कडेला तुम्ही झाडं लावली आहेत? असा थेट सवालही यावेळी सयाजी शिंदे यांनी यावेळी केला आहे, तसेच एक झाड तोडलं तर आम्ही शंभर लोक मरायला तयार आहोत, झाड तोडून दाखवा."
हवामान, जलसाठा आणि हवा गुणवत्तेचं नुकसान
1800 च्या आसपास झाडं तोडण्याचा निर्णयाचा परिणाम नाशिकचं हवामान, जलसाठा आणि हवा गुणवत्तेवर दीर्घकालीन नुकसान करणारा ठरू शकतो.
जे रामकाळातील दंडकारण्य होते, रामाने तपश्चर्या केली, अशा तपोवनसारख्या तपोभूमीत संतांच्या निवासासाठीच जर हरित कुंभ कार्यक्रम करणाऱ्या महापालिकेनं इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली तर अत्यंत चुकीचा संदेश जाईल.
त्यामुळे वृक्षतोडीचा निर्णय तातडीनं स्थगित करावा. नागरिकांना हरकतींसाठी योग्य मुदतवाढ द्यावी. तज्ज्ञांसोबत प्रत्यक्ष संयुक्त पाहणी आयोजित करावी.
उपलब्ध असल्यास सर्व पर्यावरणीय अहवाल व पर्यायी जागांचं मूल्यमापन सार्वजनिक करावं अशी मागणी हरकतींमधून झाली आहे.
तसेच यावरची सुनावणी तपोवन भागातच घेण्यात यावी. ही सूचना देखील केली गेली आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी पर्यावरणप्रेमींशी संवादही साधला.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "नाशिकमधील वृक्षप्रेमींची भूमिका योग्य आहे, निसर्गाचा समतोल राखला पाहिजे, यात काहीच दुमत नाही. पण, आपल्याकडे बारा वर्षांनी कुंभमेळा येतो आणि जगाचं लक्ष या कुंभ मेळ्याकडे आहे.
यावेळी तिप्पट-चौपट गर्दी होणार आहे. पंचवटीतील ही जागा साधुग्रामसाठी राखीव आहे. शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आहे. इथे साधूंची निवासस्थानं असतात."
"कुंभमेळ्यासाठी अवघ्या दीड वर्षावर कालावधी राहिला आहे. ही झाडं 8 ते 10 वर्षात झाडे उगवलेली आहेत. मला वाटतं की, ही छोटी झाडं आहेत, ती काढावी लागणार. ती काढल्याशिवाय साधूंची व्यवस्था होऊ शकणार नाही.
हे करणं अपरिहार्य आहे. त्यासंदर्भातील काम सुरू झालेलं आहे. महापालिकेकडून तसा प्रस्ताव दिला आहे. पुन्हा दुसरीकडे झाडे लावता येतील. त्याबद्दल आम्ही उपाययोजना करतो आहे.
"एका झाडाच्या बदल्यात आम्ही 10 झाडे लावू. आम्ही त्याची जबाबदारी घेतली आहे. पण सगळ्यांचे ऐकून पुढचा निर्णय घेऊ. कारण, साधूग्राम उभं करण्यासाठी आपल्याकडे दुसरा पर्याय नाही," असंही ते म्हणाले आहेत.
नाशिक महानगरपालिकेचं स्पष्टीकरण
यावर नाशिक महानगरपालिकेच्यावतीनं अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या नावानं एक प्रेस नोट देत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, "महापालिकेच्या वतीने साधुग्राममध्ये वृक्ष सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे 1825 वृक्षांना खुणा केल्या असून वृक्षतोडीसंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानं नागरिकांमध्ये गैरसमज पसरला आहे.
प्रथम केवळ वृक्ष सर्वेक्षण करून जे वृक्ष बांधकाम बाधित होणार असतील आणि ज्या वृक्षांचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे, तसेच जी छोटी झुडपे आहेत तीच तोडली जाणार आहेत."
"अधिक काळाचे जुने वृक्ष जतन केले जाणार असून 10 वर्षा पेक्षा कमी वयाचे वृक्ष तोडल्यास तितक्या वयाच्या संख्येचे वृक्षारोपण नियमानुसार मनपा उद्यान विभागाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
उदाहरणार्थ 7 वर्षांचे झाड तोडल्यास 7 नवीन झाडांचं वृक्षारोपण करणार. मनपा तपोवन परिसरातील झाडं वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे."
पुढे त्यात म्हटलं आहे की, "सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मनपानं विकासकामं हाती घेतली असली तरी जुने वृक्ष जतन करण्याची जबाबदारी प्रथम मनपाची आहे.
मनपाच्या वतीनं मी आवाहन करते की, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. वृक्ष वाचवणं, संवर्धन करणं ही मनपाची जबाबदारी आहे."
मात्र, या स्पष्टीकरणावरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नागरिकांनी म्हटलं आहे की अनेक देशी व जुन्या झाडांवरही खुणा आहेत, हे कसं काय शक्य आहे?
तर एखादं झाड 7 किंवा 10 वर्षाचं आहे हे कोण ठरवणार? आपल्या आयुष्यातील 10 वर्ष महापालिका देणार का? असाही सवाल पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित करत आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.