You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुटुंबातील सातही जणांचा होरपळून मृत्यू, उरला फक्त शिलाई मशीन्सचा सांगाडा - ग्राऊंड रिपोर्ट
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"आग लागली, आग लागली, असं आमच्या गल्लीतला मुलगा मोठमोठ्यानं ओरडू लागला. त्यानंतर आम्हाला जाग आली. खाली पाहिलं तर खूप लोक गोळा झाले होते. ते म्हणत होते की, खाली उतरा, दुकानाला आग लागलीय.”
सोहेल शेख 3 एप्रिलच्या पहाटे संभाजीनगरमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेविषयी सांगत होते.
सोहेल शेख संभाजीनगरच्या छावणी परिसरातल्या दाना बाजार भागात राहतात. इथं त्यांची तीन मजली इमारत आहे. या इमारतीत खालच्या मजल्यावर त्यांचं स्वत:चं टेलरिंगचं दुकान आहे.
पहिल्या मजल्यावर सोहेल शेख यांचं कुटुंब राहतं, तर दुसऱ्या मजल्यावर एक 7 जणांचं कुटूंब भाड्याने राहत होतं. तिसऱ्या मजल्यावरही दोन जण भाडेकरू होते.
3 एप्रिलच्या पहाटे दुकानाला लागलेल्या आगीत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एकाच कुटुंबातील 7 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला.
मृतांमध्ये 2 पुरुष, 3 महिला, तर एका लहान मुलीचा आणि एका मुलाचा समावेश आहे.
आसिम वसीम शेख (3), परी वसीम शेख (2), वसीम शेख (30), तन्वीर वसीम शेख (23), हमीदा बेगम (50), शेख सोहेल (35), रेश्मा शेख (22) अशी मृतांची नावे आहेत.
संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी घटनेविषयी माहिती देताना म्हटलं की, “छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात एका टेलरिंगच्या दुकानाला पहाटे 4 वाजता आग लागली. ही आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचू शकली नाही. प्राथमिक तपासानुसार, 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं दिसत आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू आहे.”
आम्ही सकाळी साडेनऊच्या सुमारास घटनास्थळी पोहोचलो तर तिथं मोठी गर्दी जमलेली होती.
'एकाच घरातले 7 जण गेले, खूपच भयंकर घटना घडली,' असं जवळपास प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला येत होतं.
सर्वपक्षीय राजकारणी येत होते आणि ते पीडित कुटुंबासाठी अधिकाअधिक आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन देत होते.
घटनास्थळी पोलीस दाखल झालेले होते. घटनास्थळी जळून खाक झालेले कपडे दिसत होते. तसेच, शिलाई मशीन्सचा सांगाडाही दिसत होते.
इमारतीवरील आगीचे लोळ आणि त्यामुळे तिच्यावर उमटलेला काळा रंगही दिसत होता.
नेमकं काय घडलं?
आमची दुपारी सोहेल शेख यांच्याशी भेट झाली. ते नमाज पढून येत होते. त्यांच्या मालकीच्या या इमारतीत ते पहिल्या मजल्यावर राहत होते.
आज पहाटे नेमकं काय घडलं, असा प्रश्न केल्यावर ते म्हणाले, “रमजानचा महिना आहे, त्यामुळे आमची बुकिंग चालू होती. मी रात्री पावणेतीन वाजता दुकान बंद केलं. त्यानंतर वडील वरती आले. सव्वा तीनच्या सुमारास आम्ही झोपलो. त्यानंतर ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. बोर्डाजवळ शॉर्ट सर्किट झालं आणि त्यानंतर स्पार्क झाला. तो बाहेर उभ्या असेलल्या गाडीवर आला.
“मोईबूल या आमच्या गल्लीतल्या मुलानं मोठमोठ्यानं आग लागली, आग लागली असा आवाज द्यायला सुरुवात केली. त्यानंतर आम्हाला जाग आली. खाली पाहिलं तर खूप लोक गोळा झाले होते. ते म्हणत होते की, खाली उतरा, दुकानाला पूर्ण आग लागली आहे.”
सोहेल पुढे सांगायला लागले, “मी घराचा दरवाजा उघडला तर त्याच्यातून फक्त धूर येत होता. शेजारी असलेल्या प्रतीक जैस्वाल यांना मी काठी किंवा टेबल वगैरे आणण्यास विनंती केली. कारण त्याच्याशिवाय तिथून निघणं आमच्यासाठी शक्य नव्हतं. तोवर दरवाज्यांना आग लागली होती. त्यानंतर प्रतीक शिडी घेऊन आला. तिच्यावरुन मग मी माझ्या सगळ्या कुटुंबाला खाली उतरवलं. माझ्या आईचं नुकतचं ऑपरेशन झालं, तिच्या पायाला रॉड तसाच होता. त्यास्थितीत आम्ही तिला खाली उतरवलं.
“त्यानंतर मी परत वरती गेलो. सोहेल भाई, सोहेल भाई असं म्हणत त्यांना तीन-चार वेळेस आवाज दिला. पण ते काही उठले नाही. त्यानंतर मग मी तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मलिक भाईंना आवाज दिला. त्यांनी दरवाजा उघडला. मी त्यांना आग लागल्याचं सांगितलं. त्यानंतर मग आम्ही दोघांना सोहेल यांना आवाज दिला. हातानं-लातेनं दरवाजा ढकलला, पण तो काही उघडला नाही. आम्हाला आत काहीच दिसत नव्हता. आतून फक्त धूर येत होता. पूर्णपणे गुदमरल्यासारखं होत होतं. आत केवळ अंधार होता.”
सोहेल यांच्या इमारतीत वसीम शेख आणि सोहेल शेख यांचं 7 जणांचं कुटुंब चार-पाच महिन्यांपासून भाड्यानं राहत होते. यापैकी वसीम दुचाकी दुरुस्तीचं काम करत होते. तर सोहेल दूध विकायचं काम करायचे.
तिसऱ्या मजल्यावर अजून दोन राहत होते. असे या इमारतीत जवळपास 16 जण राहायला होते.
सचिन दुबे यांच्या घराची भिंतं सोहेल शेख यांच्या दुकानाला लागूनच आहे. आगीच्या घटनेनंतर त्यांच्या घरासमोरील मीटर बंद पडलं होतं. ते वायरच्या साहाय्यानं लोंबकळत होतं.
महावितरणचे कर्मचारी घटनास्थळावरील वायरिंगची पाहणी करत होते.
बीबीसी मराठीशी बोलताना सचिन म्हणाले, “सकाळी साडेतीनच्या दरम्यान आम्ही झोपेत होतो. तर आतून स्फोटासारखा आवाज झाला. आम्ही खाली येऊन बघितलं तर इथं आग पसरली होती. माझे आई-वडील म्हातारे आहेत. मी त्यांना शेजारच्या ठिकाणी नेऊन बसवलं. तोपर्यंत गल्लीतले आणि बाहेरचे लोक पळत आले. त्यांनी लाकडी शिडी लावून पहिल्या मजल्यावरच्या लोकांना काढण्याचा प्रयत्न केला.
“काही लोक आमच्या घरातील टेरेसवर गेले आणि तिथून त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. फायर ब्रिगेडची गाडी आली. रस्ता अरुंद असल्यामुळे तिला आत यायला वेळ लागला. त्याच्याबरोबर छावणीचे दोन टँकर आले. त्यांनी लगेच पाणी सप्लाय चालू केला.”
इलेक्ट्रिक बाईकमुळे आग लागली?
या दुकानाच्या समोर इलेक्ट्रिक बाईक होती. ती चार्जिंगला लावल्यामुळे हा स्फोट झाला का, असं काही जण विचारत होते.
याविषयी विचारल्यावर सोहेल म्हणाले, “दुकानात आत शॉर्ट सर्किट झाल्याचं दिसत आहे. नेमकं काय झालं ते नाही सांगू शकत.”
या घटनेत सोहेल यांच्या दुकानाचं नुकसान झालंय.
“आता आमचा रमझानचा सीझन सुरू होता. कपड्याचं दुकान होतं आमचं. सगळे कपडे, टेलरिंगच्या मशिन सगळं काही जळून खाक झालं. 35 ते 40 लाखांचं नुकसान झालं.”
या घटनेमुळे परिसरातील लाईट रात्रीपासून गेल्याचं काही जण म्हणत होते.
लोक येऊन घटनास्थळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं दुकान, वस्तू पाहून जात होते. मेलेल्यांप्रती हळहळ व्यक्त करत होते.
मी थोडं बाजूला गेलो, तर एक महिला स्कूटरवर येत होती. इमारतीपासून काही अंतरावर तिनं गाडी थांबवली. तिच्या मागे मुलगी बसलेली होती आणि मुलीच्या पाठीवर दप्तर होतं.
“बाई, जे गेले त्याच्यामध्ये 2 लेकरं पण होते. खूप वाईट झालं,“ असं ती महिला पुटपुटत होती.
मदतीचा प्रस्ताव
या घटनेतील पीडित कुटुंबांना मदत देण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाला सादर केल जाईल, असं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, “या घटनेत जी काही मदत करता येईल ती केलेली आहे. तरीसुद्धा रीतसर तपासणी आणि पंचनामा ही सगळी शासकीय कार्यवाही पार पाडली जात आहे. मृतांच्या नातेवाईंकाना शासनाच्या नियमांप्रमाणे मदत करण्याचा जो काही प्रस्ताव राहिल, तो शासनाला सादर करतो आहे.”
“अशा घटना होऊ नये यासाठी खबरदारीच्या सूचनांची जनजागृती पुन्हा करावी लागणार आहे. सिलेंडर, वायर कनेक्शन्स याची नागरिकांनी तपासणी करुन घ्यावी. उन्हाळ्यात अशा आगीच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असतात. त्या होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे,” पण नागिरकांनीही खबरदारी घ्यायला हवी, असंही स्वामी म्हणाले.
दरम्यान, आगीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहांना शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे आणि पुढील तपास सुरू आहे, असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे.