You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'काच फोडून मी आत शिरलो,' संभाजीनगर आगीतील प्रत्यक्षदर्शीने सांगितलं काय पाहिलं?
आज पहाटे (बुधवार) छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी भागात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
छ. संभाजीनगरच्या कँटोनमेंट भागात एका टेलरिंगच्या दुकानात ही आग लागली होती.
औरंगाबादचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी एएनआय वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले, छत्रपती संभाजीनगरच्या कँटोनमेंट भागात एका टेलरिंगच्या दुकानाला पहाटे 4 वाजता आग लागली.
ही आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही. मात्र प्राथमिक तपासानुसार 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे दिसत आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे.
'काचा फोडून मी मुलांचे मृतदेह बाहेर काढले'
पहाटे आग लागली तेव्हा याच इमारतीच्या मालकांचे पुत्र सुहेल खान ज्या मजल्यावर आग लागली तिथे पोहोचले. सुहेल खान आणि त्यांचे कुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहते.
आग दोन्ही मजल्यावर पोहोचली होती, असं त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
"मी चार वाजता आलो. तेव्हा दोन्ही मजल्यावर मोठी आग लागली होती. अग्नीशमन दलाचे कर्मचारी पाणी मारत होते. पण आग कमी होतच नव्हती. मग आम्ही आणखी एक अग्नीशमन दलाचा बंब मागवण्यासाठी फोन केला. तेव्हा वीस मिनिटांत दुसरा बंब तिथे पोहोचला.
"अग्नीशमन दलाचे कर्मचारी शिडीवरून वर चढायला तयार नव्हते. तेव्हा मी स्वत: वर मी चढलो. तेव्हा पूर्ण धूर झाला होता. मी टॉर्चने आत पाहिलं तर मृतदेह पडले होते. त्यात मुलं पण होती. त्यानंतर काच फोडून मुलाचं मृतदेह मी बाहेर काढले.
अग्नीशमन दलाचे कर्मचारी शिडीवरून वर चढायला तयार नव्हते. ते फक्त खालून पाणी मारत होते. तेव्हा मी स्वत: वर मी चढलो. तिथे पूर्ण धूर झाला होता. मी टॉर्चने आत पाहिलं तर मृतदेह पडले होते. त्यात मुलंही होती. काच फोडून मुलाचं मृतदेह मी बाहेर काढले."
‘वरच्या मजल्यावर जाणं शक्यच नव्हतं’
आग एवढी मोठी होती की ती ताबडतोब विझवणं शक्यच नव्हतं, असं अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं.
"वरच्या मजल्यावर जायला कोणतीही संधी नव्हती. आम्ही शिडी लावली आणि पाण्याचा मारा मारला. नंतर इमारतीच्या दुसऱ्या बाजूने वर चढलो. पण आग विझवण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता.
"आग कमी झाल्यावर आम्ही काचा तोडल्या आणि कर्मचारी आतमध्ये गेले. तिथून चार वर्षाच्या मुलाला सगळ्यात आधी बाहेर काढलं. आम्ही सगळ्यांनी मिळून एकूण सात मृतदेह बाहेर काढले, असं त्यांनी सांगितलं.
खासदार इम्तियाज जलील काय म्हणाले?
खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
“तुम्ही कल्पना करा की 7 जणांचं कुटुंब रात्री झोपतं आणि काही तासांतच सर्वांचा मृत्यू होतो. दोन भाऊ वसीम आणि सोहेल यांचा भाजल्याने मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा गुदमरून मृत्यू झाला. यामध्ये 4 आणि 3 वर्षांच्या दोन मुलांचा समावेश होता.
"अग्निशमन दलाला पोहोचण्यास थोडा वेळ लागला आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार त्यांना कोणतीही मदत करता आली नाही. कारण ते नवीन भरती झालेले होते. त्यांना अशा परिस्थितींना तोंड देण्याचा फारसा अनुभव नव्हता,” असं इम्तियाज जलील यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी घटनास्थळी भेट दिली.
या घटनेची मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीय आणि सरकारकडून तातडीची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं ते म्हणाले.
“सुदैवाने या कुटुंबातील एक मुलगा जागा असल्याने वाचला आहे. रमजान महिन्यात ही दुर्दैवी घटना घडलीय. याची मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली आहे. सरकारकडून लवकरात लवकरात मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहतो. आम्ही या कुटुबिंयांच्या दु:खात सहभागी आहोत,” असं संजय शिरसाट यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं.