कझाखस्तानमध्ये अनेक महिने मिथेनची गळती, पण ही गळती लक्षात कशी आली?

    • Author, मार्को सिल्वा, डॅनियल पालुम्बो, एरवान रिव्हॉल्ट
    • Role, बीबीसी व्हेरिफाय

गेल्या वर्षी कझाखस्तानमधील एका विहिरीमधून आजवरची मिथेन गॅसची सर्वात धोकादायक गळती नोंदवण्यात आली आहे. बीबीसी व्हेरिफाय सोबत शेअर केलेल्या एका विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे.

विहिरीत स्फोट होऊन लागलेल्या आगीनंतर सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत सुमारे 1 लाख 27 हजार टन गॅसची गळती झाल्याचा अंदाज बांधला जातोय.

मिथेन हा कार्बन डाय ऑक्साईडपेक्षा खूप अधिक शक्तिशाली हरितगृह वायू आहे. ज्या विहिरीतून गळती झाली ती विहीर बुचाजी नेफ्ट नावाच्या कंपनीच्या मालकीची आहे. कंपनीने ‘अतिरिक्त प्रमाणात’ गॅस गळती झाल्याचं नाकारलंय.

तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?

ग्रीनहाऊस गॅस इक्विव्हलन्सी कॅल्क्युलेटर ही अमेरिकन संस्था पर्यावरणावर देखरेख ठेवते. संस्थेच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण वर्षभर 7 लाख 17 हजारांहून अधिक गाड्या चालवल्यानंतर पर्यावरणावर जो परिणाम होईल, तितका परिणाम एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या गॅस गळतीमुळे झालाय.

"गळतीचं प्रमाण आणि कालावधी खूप असामान्य आहे," असं संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय मिथेन उत्सर्जन वेधशाळेचे प्रमुख मॅनफ्रेडी कॅलटागिरोन म्हणाले. “ही खूप मोठी घटना आहे.''

9 जून 2023 रोजी या गळतीला सुरूवात झालेली. विहीर खोदत असताना स्फोट झाल्याने ही घटना घडली. दक्षिण-पश्चिम कझाखस्तानमधील मांगिस्टाऊ भागातील ही घटना आहे. या घटनेनंतर तिथे आग लागली, जी वर्षअखेरपर्यंत कायम होती.

25 डिसेंबर 2023 रोजी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या या विहिरीला सिमेंटने बंद करण्यात येतंय, असं स्थानिक अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.

नैसर्गिक वायू हा प्रामुख्याने मिथेनपासून तयार करण्यात येतो. मानवी डोळ्यांना न दिसणारा तो एक पारदर्शक वायू आहे.परंतु जेव्हा सूर्यप्रकाश मिथेनच्या ढगांमधून आरपार जातो तेव्हा तो असे काही ठसे मागे सोडतो जे काही उपग्रहाद्वारे सहजपणे शोधले जाऊ शकतात.

मिथेनच्या धुराचे लोट किती वेळा पाहायला मिळाले?

या गळतीची चौकशी सर्वप्रथम फ्रान्सची भू-विश्लेषण संस्था कैरोसने केली होती. त्यांनी केलेलं विश्लेषण आता स्पेनमधील नेदरलँड्स इन्स्टिट्यूट फॉर स्पेस रिसर्च आणि स्पेनच्या पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी ऑफ व्हॅलेन्सियाद्वारे व्हेरिफाय केलं जातंय.

उपग्रहाच्या आकडेवारीचं विश्लेषण केल्यानंतर शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की, जून ते डिसेंबर दरम्यान 115 वेगवेगळ्या प्रसंगी मिथेनची तीव्र घनता दिसून आली.

या आधारे या एका विहिरीतून 1 लाख 27 हजार टन मिथेनची गळती झाल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मानवी हस्तक्षेपामुळे झालेली मिथेनची ही आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी गळती असू शकते.

नॉर्ड स्ट्रीममध्ये झालेल्या तोडफोडीमुळे गळती होऊ शकते, असं गळतीची पडताळणी करण्यात मदत करणारे स्पेनच्या पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी ऑफ व्हॅलेन्सियाचे लुईस गुंटर यांचं म्हणणं आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये पाण्याखाली झालेल्या स्फोटात रशियाच्या गॅसला जर्मनीत वाहून नेणारी नॉर्ड स्ट्रीम-1 आणि 2 पाईपलाइन छिन्नविछिन्न झालेल्या. त्यामुळे वातावरणात 2 लाख 30 हजार टन मिथेन वायू सोडला गेला होता.

इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या मते, औद्योगिक क्रांतीनंतर जागतिक तापमानात वाढीसाठी जबाबदार घटकांमध्ये मिथेनचा वाटा 30 टक्के आहे.

उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा ढगांसारख्या गोष्टींमुळे प्रभावित होऊ शकतात, त्यामुळे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, या एकाच विहिरीतून मोठ्या प्रमाणात मिथेनची गळती झाल्याची त्यांना "पूर्ण खात्री" आहे.

फक्त विहिरीतूनच मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाल्याची शास्त्रज्ञांना खात्री असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

उपग्रहांनीसुद्धा घेतला मिथेनचा शोध

"मिथेनच्या धुराचे लोट शोधणाऱ्या पाच वेगवेगळ्या उपग्रहांमधून आम्ही मिथेनचा शोध घेतला,” असं गुंटर म्हणतात. "यापैकी प्रत्येक उपकरण मिथेनबाबत एक विशिष्ट अंदाज बांधतं, परंतु आम्ही यापैकी फक्त सुसंगत आकडेवारीच विचारात घेतली आहे."

त्याचवेळी मांगिस्टाऊ परिसराच्या पर्यावरणशास्त्र विभागाने खात्री केली आहे की 9 जून ते 21 सप्टेंबर दरम्यान 10 ठिकाणी मिथेन एकाग्रतेची पातळी कायदेशीर पातळी ओलांडली गेली आहे.

स्फोटानंतर काही तासांत मिथेनची पातळी निर्धारित पातळीपेक्षा 50 पट जास्त होती, असंही त्यात म्हटलंय.

परंतु विहिरीची मालकी असलेल्या ‘बुचाजी नेफ्ट’ या कझाखस्तानच्या कंपनीने मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याचा आरोप फेटाळून लावलाय.

विहिरीत गॅसचं प्रमाण नगण्य असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. विहिरीतून बाहेर येताच गॅस पेटला असावा, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की, वातावरणात केवळ पाण्याची वाफ सोडली गेली, ज्यामुळे अंतराळातून दिसणारे पांढरे ढग तयार झाले.

"आम्ही परिस्थिती जबाबदारीने हाताळली आहे.”, असं कंपनीच्या धोरणात्मक विकास विभागाचे उपसंचालक दानियार दुयसेमबायेव यांनी बीबीसीला सांगितलं.

‘बुचाजी नेफ्ट’ कंपनीनेसुद्धा या प्रकरणाचा बाहेरील तज्ज्ञांकडून अभ्यास करून घेतलाय. मात्र सदर अहवाल बीबीसीला उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. यामध्ये कैरोस या फ्रेंच संघटनेच्या निकालांवर शंका उपस्थित करण्यात आली आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार उपग्रहांना चुकून वातावरणात मिथेनऐवजी इतर काही वायू सापडले असावेत, उदा. बाष्पयुक्त पाणी. याशिवाय स्फोटापूर्वी हवेत मिथेनचे प्रमाण किती होतं हे वैज्ञानिकांनी सांगितलेलं नाही.

कैरोसच्या टीमने हे निष्कर्ष नाकारले आहेत.

"आम्ही पाण्याची वाफ किंवा धुराचे संभाव्य परिणाम तपासले आहेत आणि आमच्या मोजमापांशी साधर्म्य साधणारे कोणतेही संकेत आम्हाला मिळालेले नाहीत.”, असं व्हॅलेन्सियाच्या पॉलिटेक्निक विद्यापीठाचे लुईस गुंटर यांनी म्हटलंय.

शास्त्रज्ञ फक्त एकाच प्रकारच्या मिथेनचा धूर शोधत होते आणि ज्या पद्धतीने याचा शोध घेतला जात होता त्यानुसार वातावरणात आधीपासूनच असलेल्या मिथेनचा परिणाम होण्याचं काहीच कारण नाही, असं त्यांनी सांगितलं.

कझाखस्तानचं मिथेन उत्सर्जन कमी करण्याचं वचन

अटायराऊच्या औद्योगिक सुरक्षा समितीने या अपघाताच्या कारणांचा तपास केला. बुचाजी नेफ्ट यांनी विहीर खोदताना योग्य ती काळजी घेतली नसल्याचं समितीच्या निदर्शनास आलंय.

याशिवाय झमान एनर्गो हा कंपनीचा उपकंत्राटदार उत्खननादरम्यान योग्य प्रक्रियेचं पालन न केल्याबद्दल दोषी आढळला. झमान एनर्गो यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

कझाखस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने बीबीसीला एका निवेदनात सांगितलं की, गळती हाताळणं ही एक जटिल तांत्रिक समस्या होती आणि अशाप्रकारच्या अपघातांना रोखण्यासाठी कोणताही एकच खात्रीलायक उपाय उपलब्ध नाही.

मध्य आशियात मोठ्या प्रमाणात मिथेनची गळती होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

शेजारच्या तुर्कमेनिस्तानप्रमाणे कझाखस्तानमध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात मिथेन सोडल्याच्या डझनवारी नोंदी आहेत. शास्त्रज्ञ अशा घटनांना 'सुपर-एमिटर' म्हणतात.

मांगिस्टाऊ प्रदेशात अशा घटना पाहिल्याचं गुंटर सांगतात. “माणसांमुळे झालेल्या अपघातातून झालेली आणि आम्ही आतापर्यंत शोधलेली मिथेनची ही सर्वात मोठी गळती आहे," असं ते म्हणाले.

क्लायमेट ॲक्शन ट्रॅकरच्या हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, नैसर्गिक वायू उत्पादनात वाढ झाल्याचा अंदाज बांधल्यास, कझाखस्तानला गॅस पाइपलाइनमधून मिथेन गळती होण्याचा धोका आहे.

गेल्या वर्षी झालेल्या COP28 हवामान शिखर परिषदेत कझाखस्तान ग्लोबल मिथेन प्रतिज्ञेमध्ये सामील झाला. 2030 पर्यंत मिथेन उत्सर्जन 30 टक्क्यांनी कमी करण्यासाठी 150 हून अधिक देशांनी केलेला हा ऐच्छिक करार आहे.

हेही नक्की वाचा