भारतानं 'या' 9 ठिकाणांवर केला हल्ला; तिथं 25 मिनिटांत नेमकं काय घडलं?

भारतानं पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित भागात हल्ला केलेलं ठिकाण

फोटो स्रोत, BBC Urdu

भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील 9 ठिकाणी हल्ला केला.

विशेष म्हणजे, 7 मेच्या मध्यरात्री केवळ 25 मिनिटांमध्ये ही कारवाई करण्यात आली. मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी सुरू झालेलं 'ऑपरेशन सिंदूर' 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत चालल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलानं दिली.

दुसरीकडे, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताने 6 ठिकाणी विविध शस्त्रांचा वापर करून एकूण 24 हल्ले केल्याचं म्हटलं.

"पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणी दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं," अशी माहिती भारत सरकारनं दिली. या हल्ल्यांमध्ये नागरिक किंवा लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं नाही, असंही भारतानं नमूद केलं.

भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील नेमक्या कोणत्या ठिकाणांना लक्ष्य केलं? ते ठिकाणं नेमकी कुठं आहेत आणि तिथं नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.

कुठल्या ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं?

भारतीय सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, "भारतानं सवाई नाला कॅम्प (मुझफ्फराबाद), सय्यद ना बिलाल कॅम्प (मुझफ्फराबाद), गुलफूर कॅम्प (कोटली), बरनाला कॅम्प (भिमबर), अब्बास कॅम्प (कोटली) या पाकव्याप्त भागात कारवाई केली."

याशिवाय सरजल कॅम्प (सियालकोट), मेहमुना जोया कॅम्प (सियालकोट), मरकझ तोयबा (मुरीदके), मरकझ सुभानअल्लाह (भवलपूर) या पाकिस्तानातील ठिकाणांना लक्ष्य केलं.

भारतानं हल्ला केलेले पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित भागातील ठिकाण

फोटो स्रोत, BBC Urdu

पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने मंगळवारी (6 मे) रात्री जारी केलेल्या निवेदनात सांगितलं, "भारतानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अहमदपूर शार्किया, मुरीदके, सियालकोट, शकरगढ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली व मुझफ्फराबाद येथे हल्ला केला आहे."

भारतानं हवाई हल्ल्यात लक्ष्य केलेल्या ठिकाणांबद्दल काय सांगितलं?

लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमीका सिंग यांनी भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईची माहिती दिली. ती पुढीलप्रमाणे-

1. सवाई नाला कॅम्प - मुझफ्फराबाद

पाकिस्तान प्रशासित काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून 30 किमी दूर - लश्कर ए तोएबाचं प्रशिक्षण केंद्र - 20 ऑक्टोबर 2024 सोनमर्ग, 24 ऑक्टोबर 2024 गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 पहलगामच्या हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांनी इथूनच प्रशिक्षण घेतलं होतं.

2. सय्यद ना बिलाल कॅम्प - मुझफ्फराबाद

हा जैश ए मोहम्मदचा महत्त्वाभा भाग आहे. हा शस्त्रं, स्फोटकं आणि प्रशिक्षणाचं केंद्रही होतं.

भारतानं हल्ला केलेले पाकिस्तानमधील ठिकाण

फोटो स्रोत, Red Crescent

3. गुलफूर कॅम्प - कोटली

हे नियंत्रण रेषेपासून दूर असलेलं लष्कर ए तोएबाचं तळ होतं. ते राजौंरी, पुंछमध्ये सक्रिय होतं. 20 एप्रिल 2023 ला पुंछमध्ये आणि 9 जून 2024 ला तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांच्या बस हल्ल्याची दहशतवाद्यांना इथूनच प्रशिक्षित केलं होतं.

4. बरनाला कॅम्प - भिमबर

नियंत्रण रेषेपासून 9 किलोमीटर दूर आहे. इथं शस्त्रं चालवणं, आयडी आणि जंगलात कसं सर्व्हाईव्ह करावं याचं प्रशिक्षण देण्यात येत होतं.

5. अब्बास कॅम्प - कोटली

नियंत्रण रेषेपासून 13 किलोमीटर दूर आहे. लष्कर ए तोयबाचे आत्मघातकी हल्लेखोर इथं प्रशिक्षित केले जात होते. 15 दहशतवादी प्रशिक्षित करण्याची याची क्षमता होती.

भारतानं हल्ला केलेले पाकिस्तानमधील ठिकाण

फोटो स्रोत, Credit Naseer chaudhry

पाकिस्तानात असलेले लक्ष्य

6. सरजल कॅम्प - सियालकोट

आंतरराष्ट्रीय सीमेपासून 6 किलोमीटर दूर आहे. साबा कठुआच्या समोर. मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या 4 जवानांची हत्या करण्यात आली होती. त्या दहशतवाद्यांना इथूनचं प्रशिक्षित करण्यात आलं होतं.

7. मेहमुना जोया कॅम्प - सियालकोट

आंतरराष्ट्रीय सीमेपासून 12-18 किलोमीटर दूर होतं.ते हिज्बुल मुजाहीदीनचं मोठं तळ होतं. कठुआ जम्मू भागात दहशत पसरवण्याचं नियंत्रण केंद्र होतं. पठाणकोट एअरफोर्स बेसवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा कट इथंच तयार करण्यात आला होता.

भारतानं हल्ला केलेले पाकिस्तानमधील ठिकाण

फोटो स्रोत, Getty Images

8. मरकझ तोयबा मुरीदके

आंतरराष्ट्रीय सीमेपासून 18-25 किलोमीटर दूर आहे. अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसह 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहशवाद्यांना इथंच प्रशिक्षित करण्यात आलं होतं.

9. मरकझ सुभानअल्लाह - भवलपूर

आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर दूर आहे. हे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय होते. इथं भरती, प्रशिक्षण केंद्रही होतं. प्रमुख दहशतवादी याठिकाणी नेहमी येत होते.

कोणत्याही लष्करी तळावर हल्ला करण्यात आला नाही. तसंच आतापर्यंत कोणतीही नागरी हानी झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

पाकिस्ताननं हवाई हल्ल्यात लक्ष्य केलेल्या ठिकाणांबद्दल काय सांगितलं?

पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी भारताने 6 ठिकाणी हल्ला केल्याची माहिती दिली. या 6 ठिकाणांविषयी जाणून घेऊयात.

अहमदपूर शार्किया (बहावलपूर)

अहमदपूर शार्किया हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या भागातील सुभान मशिद परिसरात 4 हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये मशीद आणि परिसराचं नुकसान झालं."

बंदी घातलेल्या जैश-ए-मुहम्मद संघटनेचे मध्यवर्ती मुख्यालय देखील बहावलपूरमध्ये आहे. मदरसा अल-सबीर आणि जामिया मस्जिद सुभान हे त्याचाच भाग आहेत.

भारतानं हल्ला केलेले पाकिस्तानमधील ठिकाण

फोटो स्रोत, Credit Naseer chaudhry

मुरीदके

मुरीदके हे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील शेखुपुरा जिल्ह्यातलं शहर आहे. ते लाहोरपासून उत्तरेकडे 40 किलोमीटर अंतरावर आहे.

लाहोरच्या बाहेरील बाजूस असलेलं हे शहर याआधी जमात-उद-दावाचे केंद्र 'दावत-उल-इर्शाद'मुळे चर्चेत राहिले आहे.

लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितलं की, मुरीदके येथील उम्म अल-कुरा मशीद आणि आजूबाजूच्या परिसरात भारताकडून चार हल्ले करण्यात आले.

मुझफ्फराबाद

मुझफ्फराबाद शहर पाकिस्तानव्याप्त काश्मीरची राजधानी आहे. तेथे अनेक महत्त्वाची कार्यालये आणि सरकारी इमारती आहेत.

पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, या ठिकाणी बिलाल मशिदीला लक्ष्य करण्यात आले.

पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बिलाल मशिदीवर सात हल्ले करण्यात आले.

कोटली

कोटली हे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये इस्लामाबादपासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर नियंत्रण रेषेजवळ आहे.

पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, कोटली येथील एका मशिदीलाही लक्ष्य करण्यात आलं.

भारतानं हल्ला केलेले पाकिस्तानमधील ठिकाण

फोटो स्रोत, Red Crescent

सियालकोट

सियालकोट हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक महत्त्वाचं शहर आहे. ते चिनाब नदीच्या काठावर आहे. येथून भारत प्रशासित जम्मूचा प्रदेश उत्तरेला फक्त 48 किलोमीटर अंतरावर आहे.

पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सियालकोटच्या उत्तरेला असलेल्या कोटली लोहारन या गावावर दोन हल्ले करण्यात आले. त्यापैकी एकाचा स्फोट झाला नाही. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शकरगढ

शकरगढ हे पाकिस्तान पंजाबमधील नारोवाल जिल्ह्याचं तालुक्याचं ठिकाण आहे. हे शहर आंतरराष्ट्रीय सीमा आणि भारत-पाकिस्तान कार्यसीमा दोघांशी जोडलेलं आहे. त्याच्या पूर्वेला भारतातील गुरुदासपूर जिल्हा आहे आणि उत्तरेला जम्मूची सीमा आहे.

पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, शकरगढ येथेही दोन शेल्सचा मारा करण्यात आला. त्यामुळे एका दवाखान्याचे किरकोळ नुकसान झाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)