भारताची 3 राफेल विमानं पाडल्याचा पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा दावा
भारतानं पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केल्याची माहिती भारत सरकारने निवेदन प्रसिद्ध करून सांगितलं.
थोडक्यात
भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करत, पाकिस्तानवर केला क्षेपणास्त्र हल्ला
सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात 15 ठार : भारतीय लष्करी अधिकारी
भारताच्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची पाकिस्तानची माहिती
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याची भारताची माहिती, तर पाकिस्तानने 6 जागांवरच हल्ला झाल्याचे केले स्पष्ट
पाकिस्तानने भारताची 5 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केला, मात्र भारताकडून पुष्टी नाही तसेच पाकिस्तानच्या या दाव्याची बीबीसीला स्वतंत्ररित्या शहानिशा करत नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, 'आम्हाला उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार'
पाकिस्तान आणि भारताने अनेक भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत
लाईव्ह कव्हरेज
ओंकार करंबेळकर, आशय येडगे, अमृता कदम
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागजी भारत दौऱ्यावर, परराष्ट्र मंत्रालयानं काय माहिती दिली?
फोटो स्रोत, Getty Images
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागजी यांच्या भारत दौऱ्याबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक निवदेन प्रसिद्ध केलं आहे.
त्यात म्हटलं आहे, "इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अरागजी 7 ते 8 मे 2025 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भारत आणि इराणमध्ये होणाऱ्या संयुक्त आयोगाच्या 20 व्या बैठकीचं सह-अध्यक्षपद भूषवतील." परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार, ऑगस्ट 2024 मध्ये परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.
या वक्तव्यात असंही म्हटलं आहे की भारत आणि इराणमधील मैत्री कराराला 75 वर्षे झाल्यानिमित्त एक संयुक्त बैठक होईल. "या बैठकीत दोन्ही देश एकमेकांच्या हितांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील आणि भविष्यात दोन्ही देशांमधील संबंध आणखी घनिष्ठ करण्याबाबत विचार करतील."
भारतीय प्रमाणवेळेनुसार अब्बास अरागजी रात्री 10:30 वाजता पोहोचणार आहेत.
भारताने अडवलं पाकिस्तानचं पाणी, बगलिहार धरण का आहे महत्त्वाचं?
व्हीडिओ कॅप्शन, भारताने अडवलं पाकिस्तानचं पाणी, बगलिहार धरण का आहे महत्त्वाचं?
वाढत्या तणावामुळे भारत आणि पाकिस्तानातील जवळपास 550 उड्डाणं रद्द
फोटो स्रोत, Getty Images
भारतानं पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील जवळपास 550 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
फ्लाइटरडार 24 या रिअल-टाइम फ्लाइट ट्रॅकिंग सेवेच्या आकडेवारीनुसार, हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानातील 16 टक्के आणि भारतातील 3 टक्के शेड्युल्ड व्यावसायिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
फ्लाइटरडार 24 नुसार, पाकिस्तानातील 135 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर भारतातील 417 शेड्युल्ड उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
बुधवारी (7 मे) सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द झाल्यानंतर कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी वाट पाहत असताना दिसले.
नियंत्रण रेषेजवळ गुरुद्वारा साहिबवर पाकिस्ताननं केलेल्या माऱ्याबद्दल भगवंत मान काय म्हणाले?
फोटो स्रोत, ANI
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये पाकिस्ताननं केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात मारले गेलेल्यांची माहिती दिली आहे.
त्यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, "जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) असलेल्या गुरुद्वारा साहिबवर पाकिस्ताननं तोफगोळ्यांचा मारा केल्याची माहिती मिळाली आहे."
"या हल्ल्यात भाई अमरीक सिंह, अमरजीत सिंह, रणजीत सिंह आणि रूबी कौर यांचा मृत्यू झाला आहे."
त्यांनी लिहिलं आहे, "जिथे सर्वांचं हित चिंतलं जातं, तिथे अशा प्रकारचा हल्ला करणं ही अतिशय निषेधार्ह बाब आहे. सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मृतांच्या कुटुंबाकडे आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो."
केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवर लिहिलं, "पुंछमधील पवित्र गुरुद्वारा गुरु सिंह सभा साहिबवर पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही कठोर शब्दात निषेध करतो." "भाई अमरीक सिंहजी, भाई अमरजीत सिंहजी आणि भाई रणजीत सिंहजी यांचं शहीद होणं ही दुखद गोष्ट आहे. असा क्रूरपणा भारत सहन करणार नाही."
भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यांचं स्वागत- ओवैसी
"लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांचं मी स्वागत करतो. पाकिस्तानी सरकारला असा कठोर धडा शिकवला गेला पाहिजे की पुन्हा एकदा दुसरा पहलगाम हल्ला होऊ नये. पाकिस्तानच्या दहशतवादाच्या संपूर्ण यंत्रणेला नष्ट केले गेले पाहिजे. जय हिंद!"
- असदुद्दिन ओवैसी, अध्यक्ष, एमआयएम
हल्ल्यात फक्त त्यांना मारलं, ज्यांनी आमच्या निरपराध नागरिकांना मारलं- राजनाथ सिंह
फोटो स्रोत, Getty Images
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की पाकिस्तानविरोधात भारतीय सैन्यानं 'अचूकता, सतर्कता आणि संवेदनशीलते'नं कारवाई केली आहे. पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात 15 भारतीयांचा मृत्यू झाला आहे तर 43 लोक जखमी झाले आहेत.
सीमा रस्ते संघटना म्हणजे बीआरओच्या स्थापना दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले, "आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्यानं सर्व देशवासियांची मान उंचावली आहे."
ते म्हणाले की भारतीय सैन्यानं नवा इतिहास घडवला आहे. राजनाथ सिंह म्हणाले, "भारतीय सैन्यानं 'अचूकता, सतर्कता आणि संवेदनशीलते'नं कारवाई केली आहे. जे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते, योजनेनुसार त्यांनाच अचूकतेनं उद्ध्वस्त करण्यात आलं. कोणत्याही नागरी वस्तीला किंवा नागरिकांना जरादेखील त्रास होऊ न देण्याची संवदेनशीलता देखील दाखवण्यात आली."
राजनाथ सिंह यांनी रामायणातील अशोक वाटिका प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले की आम्ही (भारतीय सैन्य) हनुमानाच्या तत्वांचं पालन केलं. संरक्षण मंत्री म्हणाले, "आम्ही फक्त त्यांनाच मारलं, ज्यांनी आमच्या निरपराध नागरिकांची हत्या केली."
“दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नसतं”- राज ठाकरे
फोटो स्रोत, Getty Images
“दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नसतं,” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.
भारताने 7 मेच्या पहाटे पाकिस्तानातील काही ठिकाणांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबद्दल ते बोलत होते.
“अमेरिकेचे दोन ट्वीट टावर्स पडले, पेंटागॉनवर हल्ला केला. म्हणून त्यांनी युद्ध नाही केलं. त्यांनी ते अतिरेकी ठार मारले”. राज ठाकरे पुढे म्हणाले, पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे. आपण त्याला अजून काय बरबाद करणार? असाही प्रश्न त्यांनी विचारला.
ते पुढे म्हणाले, “ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला तेच अजून हाती सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक इतकी वर्ष जिथं जात आहेत तिथं सुरक्षेची काळजी का घेतली गेली नव्हती हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे, असं मला वाटतं. आपल्या देशांत कोबिंग ऑपरेशन करून या लोकांना शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. हवाई हल्ले करून लोकांना भरकटवणं हा पर्याय असू शकत नाही,”
ओमर अब्दुल्लाह म्हणाले, "भारत-पाकिस्तानात युद्ध व्हावं असं कोणालाही वाटत नाही, मात्र...
"जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह म्हणाले की भारत आणि पाकिस्तानात युद्ध व्हावं असं कोणालाही वाटत नाही. मात्र दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यांवर बोलताना ओमर अब्दुल्लाह म्हणाले की गेल्या महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना "जोरदार प्रत्युत्तर" देण्यासाठी भारत सरकारनं "योग्य पद्धत" निवडली आहे."
फोटो स्रोत, Getty Images
"22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यात 26 जण मारले गेले होते. या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार असल्याचं भारतानं म्हटलं होतं.
पाकिस्ताननं मात्र भारताचे आरोप नाकारले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ओमर अब्दुल्लाह म्हणाले, "पाकिस्तानातील कोणताही लष्करी तळ किंवा नागरी वस्त्यांना नाहीतर दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं. मात्र पाकिस्ताननं सीमेजवळील आपल्या काही भागात तोफगोळ्यांचा मारा केला आणि आपल्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं."
ओमर अब्दुल्लाह यांनी लोकांना धीर देत म्हटलं आहे की त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. ते म्हणाले की लोकांनी या भागातून जाण्याची आवश्यकता नाही.
भारतीय सैनिकांच्या साहस, देशप्रेमाला सलाम करतो- मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर धाडसी आणि निर्णायक कारवाई करून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या शूर सैनिकांच्या साहस, दृढनिश्चय आणि देशप्रेमाला आम्ही सलाम करतो."
फोटो स्रोत, @kharge
"पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासूनच, सशस्त्र दल आणि सरकारबरोबर एकजुटीनं उभं राहून सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाच्या विरोधातील प्रत्येक निर्णायक कारवाईला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं स्पष्टपणे पाठिंबा दिला होता.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त (PoK)मधून होत असलेल्या दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध भारताचं राष्ट्रीय धोरण खूपच स्पष्ट आणि ठाम आहे.
महान भारत देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेच्या रक्षणासाठी सर्व स्तरावर एकजुटीची सर्वाधिक आवश्यकता आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देशाच्या शूर जवानांबरोबर खांद्याला खांदा लावून उभी आहे.
आमच्या नायकांनी नेहमीच राष्ट्राच्या हिताला सर्वोच्च स्थान देत, देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी बलिदान देखील दिलं आहे, याची साक्ष इतिहास देतो.”
पाकिस्तानने भारताची 3 राफेल विमाने पाडली - शाहबाज शरीफ
फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये भाषण केलं आहे.
ते म्हणाले, पहलगाम हल्ला खेदजनक आहे. पाकिस्तानचा या हल्ल्याशी दूरदूरपर्यंत संबंध नाही.
‘आम्ही एका आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली होती, त्या चौकशीला आम्ही सहकार्य करण्याची ऑफर दिली, पण त्यांनी ऑफर मानली नाही.’
“पाकिस्तानचं सैन्य या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आधीपासूनच तयार होतं. भारतानं खरेदी केलेल्या राफेल विमानावर खूप गर्व केला, पण गर्व करायचा नसतो. हवाई दल प्रमुख जहिर बाबर यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी भारताच्या राफेल विमानांचं कम्युनिकेशन लॉक केलं. 80 विमानांच्या माध्यमातून भारतानं 6 ठिकाणी हल्ले केले. आम्ही 3 राफेल विमानं पाडली.”
पुणे येथील मॉक ड्रिलच्या वेळची दृश्यं
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 7 मे रोजी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत.
पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गृह मंत्रालयाच्या जनरल फायर सर्व्हिस, सिव्हिल डिफेन्स (नागरी संरक्षण ) आणि होमगार्ड अँड सिव्हिल डिफेन्स डायरेक्टरेट जनरलने 5 मे रोजी पाठवलेल्या सूचनांची प्रत बीबीसीकडे आहे. हे आदेश देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आले आहेत.
फोटो स्रोत, Nitin Nagarkar
फोटो कॅप्शन, कौन्सिल हॉल, पुणे
या आदेशात गृह मंत्रालयाने देशभरातील 244 सूचीबद्ध जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाचा सराव आणि मॉक ड्रिल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
नागरी संरक्षण कायद्यांनुसार, गृह मंत्रालयाला अशा मॉक ड्रिल आयोजित करण्यासाठी राज्यांना सूचना जारी करण्याचा अधिकार आहे.
फोटो स्रोत, Nitin Nagarakar
फोटो कॅप्शन, पुणे येथील मॉक ड्रीलच्या वेळची दृश्यं
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची प्रसारमाध्यमांना माहिती देणाऱ्या महिला अधिकारी कोण आहेत?
भारतीय सैन्यानं माहिती दिली आहे की त्यांनी मंगळवारी (6 मे) रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणी "दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करून हल्ला केला आहे.
बुधवारी (7 मे) या हल्ल्याबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देण्याची जबाबदारी सैन्याच्या दोन महिला अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. या महिला अधिकारी कोण आहेत, ते जाणून घेऊया...
कर्नल सोफिया कुरैशी
कर्नल सोफिया कुरैशी भारतीय सैन्यातील एक अधिकारी आहेत. 2016 मध्ये पुण्यात बहुराष्ट्रीय फिल्ड प्रशिक्षण सराव झाला होता.
एफटीएक्सच्या 'फोर्स 18' मध्ये आसियान प्लस देश सहभागी झाले होते. भारतीय भूमीवर आयोजित करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्राऊंड फोर्सेस सराव होता.
यामध्ये भारतीय सैन्यातील 40 सैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व सिग्नल कोअरच्या महिला अधिकारी, लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी यांनी केलं होतं. त्यावेळेस इतक्या मोठ्या बहुराष्ट्रीय सरावात भारतीय सैन्याच्या प्रशिक्षण तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या.
फोटो स्रोत, MEA India
व्योमिका सिंह
विंग कमांडर व्योमिका सिंह या पाकिस्तानवरील भारतीय हल्ल्याची म्हणजे 'ऑपरेशन सिंदूर'ची प्रसारमाध्यमांना माहिती देणाऱ्या दुसऱ्या अधिकारी होत्या.
व्योमिका सिंह भारतीय वायुदलात हेलिकॉप्टर पायलट आहेत.
समोर आलेल्या वृत्तांनुसार त्यांना नेहमीच पायलट होण्याची इच्छा होती. त्यांच्या नावाचं अर्थ 'आकाशाशी जोडणारा' असा होतो आणि या नावानं त्यांच्या महत्वाकांक्षेला दिशा दिली. व्योमिका सिंह, नॅशनल कॅडेट कोअर म्हणजे एनसीसीमध्ये होत्या.
त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. 2019 मध्ये त्यांना भारतीय वायुदलात फ्लाईंग ब्रँचमध्ये पायलट म्हणून पर्मनंट कमिशन मिळालं होतं.
व्योमिका सिंह यांनी एकूण 2500 तासांहून अधिक उड्डाण केलं आहे. त्यांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील कठीण परिस्थितीत चेतक आणि चीता सारखी हेलिकॉप्टर हाताळली आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक ठिकाणची विमान उड्डाणे रद्द
श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, जोधपूर, जामनगर, भुज, चंदीगड आणि राजकोट इथे जाणारी एअर इंडियाची सगळी उड्डाणं 10 मेच्या पहाटे 05:30 पर्यंत रद्द झाली आहेत.
श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाला, बिकानेर, जोधपूर, ग्वाल्हेर, किशनगड आणि राजकोटला जाणारी इंडिगोची सगळी उड्डाणं 10 मेच्या पहाटे 05:30 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर, कांगरा, कांडला, अमृतसरला जाणारी स्पाईसजेटची विमानं रद्द करण्यात आली आहेत.
भारताने हल्ला केलेल्या ठिकाणी किती नुकसान, काय आहे परिस्थिती; जाणून घ्या 10 फोटोंमधून
फोटो स्रोत, Getty Images
भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणी 'दहशतवादी तळांवर' हल्ले केल्याची माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे 7 मेच्या मध्यरात्री केवळ 25 मिनिटांमध्ये ही कारवाई झाली. मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी सुरू झालेलं 'ऑपरेशन सिंदूर' 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत चालल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलानं दिली.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणी 'दहशतवादी पायाभूत सुविधांना' लक्ष्य केल्याची माहिती भारत सरकारनं दिली. या हल्ल्यांमध्ये नागरिक किंवा लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले नाही, असंही भारतानं नमूद केलं.
भारतानं हल्ला केलेली ठिकाणं नेमकी कुठे होती, या हल्ल्यानंतर किती नुकसान झालं आहे, तिथली परिस्थिती कशी आहे, जाणून घेऊया 10 फोटोंच्या माध्यमातून.
पाकिस्ताननं भारताच्या उच्चायुक्तांना बोलावून काय सांगितलं?
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं एका वक्तव्यात म्हटलं आहे की त्यांनी पाकिस्तानातील भारताच्या उच्चायुक्तांना बोलवून भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
या वक्तव्यात म्हटलं आहे की या हल्ल्यामुळे महिला आणि मुलांसह अनेक नागरिक मारले गेले आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, भारतीय उच्चायुक्तांना सांगण्यात आलं आहे की भारताने केलेले हल्ले म्हणजे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं स्पष्ट उल्लंघन आहे. या प्रकारचे हल्ले हे आंतरराष्ट्रीय कायदे, संयुक्त राष्ट्र संघाची नियमावली आणि दोन्ही देशांमधील संबंधांवर नियंत्रण ठेवणाऱ्या परंपरांचा देखील उल्लंघन आहे.
फोटो स्रोत, AFP
या वक्तव्यात पुढे म्हटलं आहे की भारताला इशारा देण्यात आला आहे की या प्रकारच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण होतो.
मंगळवारी (06 मे) रात्री भारतानं पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले.
पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यानुसार या हल्ल्यांमध्ये 26 नागरिक मारले गेले आणि 46 जण जखमी झाले.
भारतानं देखील म्हटलं आहे की जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात किमान 10 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेकजण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानात जिथे हल्ला झाला, त्या मुरीदकामधल्या प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं..
व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानात जिथे हल्ला झाला, तिथ मुरीदकामधल्या प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं...
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरिदके येथील रहिवासी मोहम्मद युनूस शहा यांनी बीबीसीला सांगितले की, भारताने डागलेली चार क्षेपणास्त्रं तिथल्या एका शैक्षणिक संकुलावर पडली.
त्यांनी सांगितलं की, "पहिली तीन क्षेपणास्त्रं एकामागोमाग आली, तर चौथं सुमारे पाच ते सात मिनिटांच्या अंतराने आलं."
या शैक्षणिक संकुलामध्ये शाळा, कॉलेज, वसतिगृह, मेडिकल कॉलेज तसंच एक मशीद आहे. या मालमत्तेचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.
शहा यांनी सांगितलं की, या संकुलात निवासी वसाहतही आहे, जिथे काही कुटुंब राहतात. येथील परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
बचाव कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी तसंच पोलिस या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना इथून सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचंही मोहम्मद युनुस यांनी सांगितलं.
पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील काही गावातल्या लोकांनी सोडली घरं
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये निर्माण झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातल्या काही गावातल्या ग्रामस्थांनी घरे मोकळी केली आहेत. हा जिल्हा पाकिस्तानच्या सीमेवर आहे.
फिरोजपूरच्या हुसैनीवाला भागातील 12 ते 14 गावांची सीमा पाकिस्तानला लागून आहे.
फोटो कॅप्शन, पंजो बाई
या गावांमधील लोकांनी आपले सामान ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन नातलगांकडे जाण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये धान्य आणि इतरगृहसाहित्याचा समावेश आहे. घरातील एक किंवा दोन सदस्य राखणीसाठी मागे राहात आहेत,
इथं भीतीचं वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया गाव सोडणारे स्थानिक जीत सिंग यांनी बीबीसीशी बोलताना दिली. ते झुगे हाजरा गावातले ग्रामस्थ आहेत.
त्यांच्याप्रमाणेच पंजो बाई नावाच्या महिला म्हणाल्या, “आम्ही सुरक्षित राहाण्यासाठी मोगा जिल्ह्यात जात आहोत. इथं युद्ध होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान रात्री हल्ला करू शकतो. आम्ही कधी पुराचा सामना करतो तर कधी युद्धाचा. प्रत्येक सहा महिन्यांनी अशा स्थितीला तोंड द्यावं लागतं.”
द रेझिस्टन्स फ्रंट TRF काय आहे?
फोटो स्रोत, Getty Images
पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईनंतर टीआरएफ अर्थात द रेझिस्टन्स फ्रंट ही संघटना चर्चेत आली आहे.
7 मे रोजी सकाळी भारताच्या संरक्षण विभागानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारतानं केलेल्या कारवाईमागचं कारण स्पष्ट करताना टीआरएफचं नाव घेतलं.
टीआरएफ ही संघटना लष्कर ए तोयबा या पाकिस्तानस्थित कट्टरवादी संघटनेचा मुखवटा असल्याचं मिस्री म्हणाले आहेत.
फोटो स्रोत, Getty Images
TRF काय आहे?
2019 मध्ये भारताने कलम 370 रद्द केलं त्यानंतर TRF हा गट उदयास आला.. सुरुवातीला त्यांचा भर ऑनलाईन प्रचारावर होता. पण नंतर हा गट सशस्त्र कारवायांकडे वळल्याचं सांगितलं जातं.
गेल्या काही वर्षांत या गटाने काश्मीरमध्ये आलेले स्थलांतरीत आणि भारतीय सैन्यावर हल्ले केल्याचा दावा केला.
मार्च 2020 मध्ये, उत्तर काश्मीरच्या छिंदवाडा शहरात झालेल्या हल्ल्यात लष्कराचे एक कर्नल, एक मेजर आणि एक पोलीस उपनिरीक्षक मृत्युमुखी पडले होते.
5 ऑगस्ट 2023 रोजी कुलगाम जिल्ह्यातील हलान मंजगाम भागात टीआरएफच्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान मारले गेले होते.
सप्टेंबर 2023 मध्ये अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागवर झालेल्या कट्टरपंथी हल्ल्यात एक कर्नल, भारतीय लष्करातील एक मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलीस प्रशासनातील डीएसपी मृत्युमुखी पडले.
तर 20 ऑक्टोबर 2024 रोजी भारत प्रशासित काश्मीरच्या गांदरबल इथे एका बोगद्याचं काम करणाऱ्या सहा स्थलांतरित कामगार आणि एका डॅाक्टरचा गोळीबारात मृत्यू झाला होता. TRF या संघटनेनं या हल्ल्यांची जबाबदारी घेतली होती.
भारत सरकारने 2023 साली UAPA कायद्या अंतर्गत या गटाला दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. तसंच TRF चा संस्थापक शेख सज्जाद गुलला दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं.
तरुणांना भडकावून आपल्यात सहभागी करून घेणे, इंटरनेटवर दहशतवादी माहितीचा प्रसार करणे तसंच जम्मू-काश्मिरमध्ये अवैधरित्या हत्यारांची तस्करी करणे असे आरोप TRF वर आहेत.
"TRF च्या कारवाया भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणाऱ्या आहेत," असं तेव्हा भारत सरकारने म्हटलं होतं.
पण काश्मीरमध्ये आधीपासूनच काही कट्टरवादी संघटना कार्यरत असताना नव्यानं असा गट स्थापन करण्याची गरज का भासली असावी?
त्याविषयी जम्मू-काश्मीर पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, 2016 नंतर आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी संबंधित फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मते जागतिक सत्ता पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट करण्याचा धोका देखील होता.
फोटो स्रोत, Getty Images
अशा परिस्थितीत काश्मीरमधील सशस्त्र हिंसाचाराला स्थानिक रंग देता यावा आणि त्याला धार्मिक चळवळीऐवजी स्थानिक विरोधी गट म्हणून सादर करता यावं यासाठी लष्कर-ए-तैय्यबा ही टीआरएफच्या स्वरूपात आणि जैश-ए-मोहम्मद ही संघटना पीपल्स अँटी फासिस्ट फ्रंटच्या स्वरूपात सक्रिय झाली.
स्थानिक पोलिसांच्या दाव्यानुसार, टीआरएफ काश्मीर खोऱ्यात जास्त सक्रिय आहे तर पीएएफएफ जम्मूच्या राजौरी आणि पूंछमध्ये जास्त सक्रिय आहे.
सैन्यविषयक इतिहासाचे अभ्यासक श्रीनाथ राघवन यांनी बीबीसी प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांच्याशी बोलताना TRF हा गट म्हणजे लष्कर-ए-तोयबाशी निगडीत एक शाखा असल्याचं सांगितलं होतं.
‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहर कंदाहर हायजॅकनंतर कसा सुटला?
जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरकडून एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. भारताने बहावलपूरमधील सुभानअल्लाह जामा मशिदीवर केलेल्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातले 10 लोक आणि 4 नीकटवर्तीय ठार झाल्याचं यात म्हटलं आहे. बीबीसी उर्दूने यासंदर्भात माहिती प्रकाशित केली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
29 जानेवारी 1994 रोजी मसूद अझहर पहिल्यांदा एका बांगलादेशी विमानामधून ढाक्यातून दिल्लीला आला होता. त्याच्याजवळ पोर्तुगालचा पासपोर्ट होता.
इंदिरा गांधी विमानतळावर उतरल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याला विचारलं, "तुम्ही तर पोर्तुगाली दिसत नाही?"
मसूद म्हणाला, "मी मूळचा गुजराती आहे."
हे ऐकल्यावर त्या अधिकाऱ्यानं त्याच्याकडे न पाहता त्याच्या पासपोर्टवर शिक्का मारला.
त्यानंतर काही दिवसांमध्येच मसूद श्रीनगरच्या गल्ल्यांमध्ये फिरताना दिसू लागला. भावना भडकावणारी भाषणं द्यायची आणि फुटीरतावादी समूहांमधील मतभेदांमध्ये मध्यस्थी करायची, हे त्याचं वैशिष्ट्य होतं. काश्मिरी तरुणांना कट्टरतावादाकडे आकृष्ट करणं, त्यासाठी प्रेरणा देणं, हे त्याचं आणखी एक काम.
एके दिवशी अनंतनागमध्ये सज्जाद अफगाणीबरोबर एका ऑटोमधून जात असताना त्याला अटक करण्यात आली. लष्कराच्या जवानांनी त्यांना थांबवलं, तेव्हा त्या ऑटोमधले दोघंही उतरून पळू लागले. मग जवानांनी त्यांना पकडलं.
"भारत सरकार फार काळ मला कारागृहातमध्ये ठेवू शकणार नाही," अशी तो शेखी मिरवायचा.
जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरकडून एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. भारताने बहावलपूरमधील सुभानअल्लाह जामा मशिदीवर केलेल्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातले 10 लोक आणि 4 नीकटवर्तीय ठार झाल्याचं यात म्हटलं आहे. बीबीसी उर्दूने यासंदर्भात माहिती प्रकाशित केली आहे.
या निवेदनात मसूद अझहरची थोरली बहीण, तिचे पती, मसूदचे भाचे, भाच्याची पत्नी, एक भाची आणि 5 मुलांचाही समावेश आहे.
या निवेदनात त्याचे एक नीकटवर्तीय, त्यांची आई आणि इतर दोन लोक मृत्युमुखी पडले आहेत.
या निवेदनात मसूदने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून धमकीवजा शब्दात ‘या जुलमी वर्तनानं सर्व कायदे मोडले गेले आहेत आता कोणत्याही करुणेची अपेक्षा ठेवू नका.’