भारतानं पाकिस्तानात जिथं क्षेपणास्त्र हल्ला केला, तिथं काय स्थिती आहे?

फोटो स्रोत, BBC Urdu
भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करत, पाकिस्तानातील 9 ठिकाणांना क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्य केलं आहे. भारत सरकारनं एका निवेदनाद्वारे या क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती दिली.
भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलंय की, "या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली."
भारताच्या कारवाईबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिलीय.
शाहबाज शरीफ म्हणाले की, "भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत. संपूर्ण पाकिस्तान लष्करासोबत उभा आहे आणि देशाचं मनोधैर्य मजबूत आहे."
भारतानं पाकिस्तानवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचे लाईव्ह अपडेट तुम्ही इथे क्लिक करून पाहू शकता.
तर संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी 'संयम बाळगण्याचं' आवाहन केलं आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रवक्त्याने सांगितलं की, "नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताने केलेल्या लष्करी कारवाईमुळे आम्हला तीव्र चिंता वाटते आहे."
ते पुढे म्हणाले, "महासचिव दोन्ही देशांना जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. जगाला पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षाचा धोका पत्करता येणार नाही."

फोटो स्रोत, Reuters
बीबीसी उर्दूच्या प्रतिनिधींनी काय माहिती दिली?
भारताने ज्या ठिकाणी हल्ला केला, त्या पाकिस्तानातील मुरीदके येथील इमारतीच्या बाहेरून बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी उमरदराझ यांनी हे फोटो आणि माहिती पाठवली आहे.
"मुरीदके हे एक छोटं शहर आहे. पाकिस्तानच्या लाहोरपासून हे शहर तीस ते चाळीस किलोमीटरवर आहे. भारताने ज्या इमारतीवर हा हल्ला केला आहे ती इमारत एका शैक्षणिक आणि आरोग्य संस्थेच्या मधोमध उभी आहे.
"ही संस्था अनेक एकरवर पसरलेली आहे. सध्या हा परिसर सर्व बाजुंनी काटेरी तारांच्या कुंपणांनी संरक्षित केला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी काही विशिष्ट एंट्री आणि एक्झिट पॉईंट्स बनवले आहेत तिथूनच मध्ये जाता येतं. सध्या या ठिकाणी पोलीस आणि संरक्षण दलाच्या जवानांचा पहारा आहे. इथे कुणालाही जाण्याची परवानगी नाही. पत्रकारांनाही मज्जाव करण्यात आला आहे, त्यामुळे आम्ही मध्ये जाऊन इमारतीचं नेमकं किती नुकसान झालं आहे हे बघू शकत नाही.
"या परिसराच्या बाहेर उभा राहून जे मला दिसतंय त्यावरून सध्या इथे बचाव कर्मचारी, अँब्युलन्स आणि अग्निशामक दलाच्या गाड्या दिसत आहेत. नुकसान झालेल्या इमारतीमध्ये जाऊन बचावपथक काम करण्याचा प्रयत्न करत आहे. शिड्यांचा वापर करून ते मध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत."

फोटो स्रोत, BBC Urdu
बीबीसीचे प्रतिनिधी उमरदराझ यांनी पुढे सांगितलं की, "स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात राहणारे बहुतांश लोक इथून निघून गेले होते त्यामुळे हल्ला झाला त्यावेळी इथे जास्त लोक नव्हते. हल्ला झाला त्या इमारतीच्या एका बाजूला दवाखाना आणि शैक्षणिक संस्था होती आणि दुसऱ्या बाजूला घरं होती. या घरांमध्ये याच संस्थेत काम करणारे कर्मचारी राहत असल्याची माहिती आहे.
"हल्ला झाला त्यावेळी या घरांमध्येही जास्त लोक राहत नव्हते. सध्या इथे सामान्य लोक नाहीयेत, फक्त बचाव कर्मचारी, सैनिक आणि पाकिस्तानी रेंजर्स आहेत. मला उद्ध्वस्त झालेल्या इमारतीचा राडारोडा मोठ्या मैदानावर पसरलेला दिसत आहे."

फोटो स्रोत, BBC Urdu
भारताने अजूनही हल्ला केलेल्या ठिकाणांचा तपशील उघड केलेला नाही. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने 6 जागांवर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे, तर भारताने 9 ठिकाणी हल्ला केल्याचा दावा केला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला तिथल्या परिस्थितीची माहिती दिली.
मुझफ्फराबादमध्ये राहणाऱ्या शाहनवाज यांनी सांगितलं, "आम्ही आमच्या घरांमध्ये गाढ झोपेत होतो. त्याचवेळी स्फोटांच्या आवाजाने आम्हाला हादरवून टाकलं. आता आम्ही आमच्या कुटुंबियांना महिलांना आणि लहान मुलांना घेऊन सुरक्षित जागेच्या शोधात भटकत आहोत."
शहरात दहशत पसरली असून, लोकांना आणखीन हल्ले होण्याची भीती सतावत आहे.
मुझफ्फराबादच्या ज्या बिलाल मशिदीजवळ हल्ला झाला, तिथे राहणारे मोहम्मद वाहिद म्हणतात, "पहिला हल्ला झाला तेव्हा मी गाढ झोपेत होतो. आमचं संपूर्ण घर या हल्ल्यामुळे हादरलं."
ते पुढे म्हणाले, "मी लगेच बाहेर पळालो आणि बघितलं की इतर लोकही घरातून रस्त्यावर आले होते. आम्हाला नेमकं काय घडलं आहे हे कळू लागलं होतं आणि त्यातच आणखीन तीन क्षेपणास्त्रं इथे येऊन पडली. यामुळे संपूर्ण परिसरात दहशत आणि गोंधळाचं वातावरण आहे."
वाहिद यांनी दावा केला की, "अनेक महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. जखमींना इथून 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सीएमएच हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. आम्ही मुझफ्फराबाद शहराच्या खूप जवळ आहोत. पोलीस आणि लष्कर इथे पोहोचलं आहे."
एअर इंडियासह अनेक विमाने वळवली
काही भारतीय विमान वाहतूक कंपन्यांनी भारत प्रशासित काश्मीरला जाणारी विमानं रद्द केली आहेत. तसेच राजस्थान आणि पंजाबसारख्या सीमेवर असणाऱ्या राज्यांमध्ये जाणारी विमानं देखील वळवण्यात किंवा रद्द करण्यात आली आहे.
एअर इंडियाने म्हटलं आहे की, त्यांनी जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंडीगढ आणि राजकोटला जाणारी सर्व विमानं रद्द केली आहेत. आज दुपारी 12 पर्यंतची विमानं रद्द केल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच अमृतसरला जाणारी दोन आंतरराष्ट्रीय विमानं दिल्लीला वळवण्यात आली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
स्पाइसजेटने म्हटले आहे की, धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील काही भागांमधील विमानतळ बंद करण्यात आले आहेत, ज्यामुळे या ठिकाणांहून येणाऱ्या त्यांच्या विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला.
इंडिगो एअरलाइन्सने एक्सवर पोस्ट केली आहे की, बदलत्या हवाई परिस्थितीमुळे या शहरांना जाणाऱ्या आणि येणाऱ्या त्यांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
हल्ल्यांमधील तपशील समोर येताच, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी देखील लाहोर आणि कराची या प्रमुख शहरांचे हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताच्या हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे,
शाहबाज शरीफ यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून म्हटलं आहे की, "शत्रूने पाकिस्तानच्या पाच ठिकाणांवर भ्याड हल्ला केला आहे. भारताच्या या हल्ल्याला 'अॅक्ट ऑफ वॉर'(युद्धाची कृती) असं म्हटलं जाईल."
शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे, "भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत."
ते म्हणाले की, संपूर्ण पाकिस्तान लष्करासोबत उभा आहे आणि देशाचं मनोधैर्य मजबूत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले, "पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या सैन्याला शत्रूशी कसा मुकाबला करायचा हे ठाऊक आहे. आम्ही शत्रूचा वाईट हेतू कधीही यशस्वी होऊ देणार नाही."
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बीबीसी उर्दूला सांगितलं, "त्यांनी (भारत) दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. पण मी आंतरराष्ट्रीय माध्यमांना येथे सर्व बाजूंनी तपासणी करण्याचं आवाहन करत आहे , मग ते दहशतवादी छावण्या असतील किंवा आमच्या दोन मशिदींसह आमचे नागरिक असतील."
"या हल्ल्यात एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. एका महिलेचा मृत्यू झाला आहे. माझ्याकडे मृतांची ताजी संख्या नाही परंतु या सात लक्ष्यांपैकी दोन काश्मीरमध्ये आहेत आणि पाच पाकिस्तानमध्ये आहेत. सामान्य नागरिकांनाच लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले," असं मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 2 लहान मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
शरीफ म्हणाले, "या हल्ल्यात वेगवेगळ्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघड उघड उल्लंघन आहे."
भारत प्रशासित काश्मीरमधील शाळा बंद करण्याचा निर्णय
भारत प्रशासित काश्मीरमधील जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ परिसरातील शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संस्था आज बंद राहतील.
त्याआधी, भारतीय सैन्याने सांगितले की पाकिस्तानने भिंबर गली परिसरात भारत-प्रशासित काश्मीरमध्ये हल्ला तोफांच्या साहाय्याने केला आहे. स्थानिकांनी या परिसरात स्फोटांचे आवाज ऐकल्याची माहिती बीबीसीला दिली आहे.
पाकिस्तानने देखील राजधानी इस्लामाबाद आणि पंजाब प्रांतातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलं आहे. भारताच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं पाकिस्तानच्या सरकारने म्हटलं आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. जेव्हा त्यांना या ऑपरेशनबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, "हे लज्जास्पद आहे."
व्हाईट हाऊसमधून बोलताना ते म्हणाले, "आम्ही ओव्हल ऑफिसमध्ये प्रवेश करत असतानाच आम्हाला याबद्दल कळलं."
ट्रम्प पुढे म्हणाले, "माझी फक्त एवढीच इच्छा आहे की हे खूप लवकर संपलं पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटलं आहे की, ते भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
अमेरिकेतील भारतीय दूतावासाने सांगितले की भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी रुबियो यांच्याशी चर्चा केली आहे आणि 'त्यांना भारताने केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे.'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारताच्या हल्ल्याबद्दल माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर दिले होते आणि हा हल्ला 'लज्जास्पद' असल्याचं तर म्हणाले होते.
मार्को रुबियो म्हणाले की अमेरिकन राष्ट्राध्यक्षांप्रमाणेच त्यांनाही असं वाटतं की हा तणाव लवकर संपेल. ते असेही म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये 'शांततापूर्ण तोडगा' निघावा यासाठी ते भारतीय आणि पाकिस्तानी नेतृत्वाशी संपर्क साधत राहतील.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रवक्त्याने सांगितलं की, "नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताने केलेल्या लष्करी कारवाईमुळे आम्हला तीव्र चिंता वाटते आहे."
ते पुढे म्हणाले, "महासचिव दोन्ही देशांना जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. जगाला पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षाचा धोका पत्करता येणार नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











