शेंबूड तुमच्या आरोग्याचा आरसा, नाकातल्या या स्रावामुळे आजार कसे ओळखता येतात? वाचा

फोटो स्रोत, Emmanuel Lafont
- Author, सोफिया क्वाग्लिया
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नाकातून येणाऱ्या चिकट स्राव म्हणजेच शेंबूड (स्नॉट). सर्दी-खोकला झाल्यावर किंवा शिंक येताना नाकातून बाहेर पडणाऱ्या या द्रव पदार्थाला आपण सामान्यपणे घाण समजतो.
मात्र, हा चिकट स्राव आपल्याला आजारांपासून वाचवण्यासाठी शरीराने दिलेली एक नैसर्गिक ढाल असते.
सध्या जगभरातील संशोधक स्नॉटचा अभ्यास करून अनेक आजार ओळखण्याचे आणि त्यावर उपाय शोधण्याचे काम करत आहेत. त्या स्रावाचा रंग पाहूनही आपल्या शरीरात काय सुरू आहे हे समजू शकतं.
प्राचीन ग्रीसमध्ये नाकातील चिकट स्राव हा शरीरातील चार महत्त्वाच्या द्रवांपैकी एक मानला जात होता. तो आरोग्य आणि स्वभाव यांचं संतुलन राखतो, असं मानलं जायचं.
हिप्पोक्रेटिस नावाच्या वैद्यानं एक सिद्धांत मांडला होता की, शेंबूड (फ्लेम/चिकट स्राव), रक्त, पिवळं पित्त आणि काळं पित्त हे चार शरीरातील द्रव (ह्युमर्स) आहेत.
या द्रवांचं योग्य संतुलन असेल तर माणूस निरोगी राहतो आणि त्याचा स्वभावही त्या प्रमाणात ठरतो. एखादा द्रव जास्त झाला, तर आजारी पडू शकतो.
त्या काळात शेंबूड मेंदू आणि फुफ्फुसांमध्ये तयार होतो, असं मानलं जायचं.
थंड आणि ओलसर हवामानात तो वाढतो आणि त्यामुळे फिट किंवा मिरगीसारखे आजार होऊ शकतात.
ज्यांच्या शरीरात फ्लेम जास्त असतो, अशा लोकांचा स्वभाव थोडा थंड, ओलसर आणि भावनांपासून दूर असा, म्हणजेच फ्लेमॅटिक स्वभावाचा असतो, असं मानलं जायचं.
अर्थात, आता आपल्याला माहीत आहे की, नाकातून येणारा चिकट स्राव माणसाच्या स्वभावावर परिणाम करत नाही किंवा आजारही निर्माण करत नाही. उलट, तो आजारांपासून आपल्याला वाचवण्याचं काम करतो.
आपल्याला वाहतं नाक आवडत नसलं, तरी नाकातला म्युकस (स्राव) ही माणसाच्या शरीरातील एक कमाल गोष्ट आहे.
ते आपल्याला बाहेरून येणाऱ्या जीवाणू, विषाणू आणि धुळीपासून वाचवतं.
'स्नॉट'मुळेच होतं नाकाचं संरक्षण
हा स्राव खास असतो, त्यावरून आपल्या शरीरात काय घडत आहे, याचा अंदाज घेता येतो.
आता शास्त्रज्ञ नाकातून येणाऱ्या स्रावाचा वापर करून कोविड-19 पासून ते दीर्घकालीन फुफ्फुसांच्या आजारांसह अनेक गोष्टींचं निदान आणि उपचार कसे करता येतील, यावर संशोधन करत आहेत.
हा चिकटसर, गुळगुळीत स्राव आपल्या नाकाच्या आतल्या बाजूचं संरक्षण करतो.
तो नाकात ओलावा ठेवत हवेतून शरीरात शिरण्याचा प्रयत्न करणारे जीवाणू, विषाणू, परागकण, धूळ-माती आणि प्रदूषण अडवतो.
नाकात असलेल्या शेकडो बारीक केसांच्या मदतीने, हा स्राव आपल्या शरीरासाठी बाहेरच्या जगाशी एक प्रकारचा संरक्षणात्मक पडदा तयार करतो.
यूकेमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील श्वसन संसर्ग आणि लसीकरण विषयातील प्रा. डॅनिएला फेरेरा सांगतात की, प्रौढ व्यक्तीच्या शरीरात रोज सुमारे 100 मिलिलीटर चिकट स्राव तयार होतो.

फोटो स्रोत, Emmanuel Lafont
मात्र, लहान मुलांमध्ये हा स्राव जास्त असतो, कारण त्यांचं शरीर प्रथमच बाहेरच्या जगातील वेगवेगळ्या कणांशी (जंतू, धूळ, परागकण वगैरे) सामना करणं शिकत असतं.
फक्त नाकातून येणाऱ्या स्रावाचा रंग आणि घट्टपणा पाहूनही आपल्या शरीरात काय सुरू आहे याचा अंदाज येतो. तो एक प्रकारचा दृश्य थर्मामीटरसारखा असतो.
पारदर्शक आणि पातळ स्राव असेल, तर तुमचं शरीर परागकण, धुळीसारख्या त्रासदायक गोष्टींना बाहेर टाकतं आहे, असं समजावं.
पांढरा स्राव म्हणजे एखादा व्हायरस शरीरात घुसला असण्याची शक्यता असते. कारण हे पांढरटपण लढायला गेलेल्या पांढऱ्या रक्तपेशींमुळे येतं.
दाट आणि पिवळसर-हिरवट स्राव असेल, तर त्या जागेवर मोठ्या प्रमाणात मृत पांढऱ्या रक्तपेशींचा साठा झालेला असतो, म्हणजे शरीराने जोरदार लढा दिला आहे.
लालसर किंवा गुलाबी स्राव म्हणजे त्यात थोडं रक्त मिसळलेलं असू शकतं. कदाचित तुम्ही नाक जोरानं ओढलं किंवा जोरात शिंकलं किंवा घर्षणामुळे आतून थोडं सूजलेलं असू शकतं.
पण स्रावाचा रंग पाहणं ही फक्त पहिली पायरी आहे.
नाकातील सूक्ष्मजीवांचं जग
आपल्या पोटातील मायक्रोबायोम म्हणजे जंतू, विषाणू, बुरशी आणि इतर सूक्ष्मजीवांचं जग. याबद्दल लोकांमध्ये बरीच जागरूकता आहे. मात्र, शास्त्रज्ञ असं मानतात की, नाकातून येणाऱ्या चिकट स्रावात असलेल्या सूक्ष्मजीवांचं जगही (मायक्रोबायोम) तितकंच महत्त्वाचं आहे.
खरं तर आता वैज्ञानिक असं मानतात की, या नाकातील स्रावामधील मायक्रोबायोमचं आपल्या आरोग्याशी आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या योग्य कार्यप्रणालीशी फार जवळचं नातं आहे.
आपण चेहरा पुसतो, वस्तूंना हात लावतो, शिंकतो आणि नकळत नाकातला स्राव इकडेतिकडे उडतो.
जेव्हा आपल्या शरीरात श्वसनासंबंधी संसर्ग असतो, तेव्हा स्रावाचा वापर विषाणू आणि जीवाणू मोठ्या प्रमाणात पसरवण्यासाठी होतो. त्यामुळे आपण हे जंतू इतर अनेक लोकांपर्यंत पोहोचवतो.
म्हणूनच असं म्हणता येईल की, नाकातील स्राव किंवा शेंबूड आपल्याला नाही, तर इतरांना आजारी पाडण्याचं काम करतो.

प्रत्येकाच्या नाकातील स्राव वेगळा असतो. म्हणजेच प्रत्येकाच्या स्रावाचा मायक्रोबायोम युनिक असतो. ते आपल्या लिंग, वय, आपण कुठं राहतो, काय खातो आणि अगदी आपण वेपिंग करतो का नाही यावरही अवलंबून असतं.
शेंबडामधील हे जंतूच आपल्या शरीराचं संरक्षण करतात आणि त्यांचे परस्पर संबंध खूप सूक्ष्म असतात.
उदाहरणार्थ, 2024 मधील एका संशोधनात असं आढळलं की, नाकात 'स्टॅफायलोकोकस' नावाचे धोकादायक जीवाणू जिवंत राहतात की नाही, हे स्रावामधील जंतू लोह (आयर्न) कसं धरून ठेवतात यावर अवलंबून असतं.
जर हे जीवाणू वाढले, तर ताप, पू भरलेली फोडं यांसारखे त्रास होऊ शकतात. मात्र, योग्य मायक्रोबायोम असल्यास शरीर त्यांना रोखू शकतं.
प्रा.फेरेरा हे सध्या नाकातील चिकट स्राव आरोग्यदायी कसा असावा, याचा शोध घेण्यावर काम करत आहेत.
म्हणजे तीच माहिती वापरून नाकात मारायचं स्प्रे तयार करता येईल, पचनासाठी प्रोबायोटिक्स घेतात त्यापद्धतीनं.

फोटो स्रोत, Emmanuel Lafont
फेरेरा म्हणतात, "कल्पना करा, आपण नाकात चांगल्या प्रकारचे सूक्ष्मजंतू घालू शकलो, जे तिथेच स्थायिक होतील, तिथे वाढतील आणि वाईट जंतूंना आत येऊच देणार नाहीत. त्यामुळे आपण आजारीच पडणार नाही."
असा स्प्रे रोज वापरता आला, तर आपल्या नाकाचं आणि आरोग्याचं चांगलं रक्षण होईल.
फेरेरा यांचे सहकारी काही चांगल्या जीवाणूंची निवड करत आहेत, जे एक तंदुरुस्त आणि आरोग्यदायी नाकासाठी योग्य मायक्रोबायोम तयार करतात.
आता ते पाहत आहेत की, हे जीवाणू जर नाकात आणि श्वसनमार्गात सोडले, तर ते तिथे स्थिर राहू शकतात का आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकतात का. त्यांची अपेक्षा आहे की, हे जीवाणू तिथे वाढून, शरीराला आजारांपासून चांगलं संरक्षण देतील.
फेरेरा सांगतात की, नाकाच्या स्रावामधील मायक्रोबायोमचं आपल्या रोगप्रतिकारक शक्तीशी खूप जवळचं नातं असतं. त्यामुळे आता वैज्ञानिक यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल आणि लसींचा परिणाम कसा अधिक चांगला करता येईल, हे शोधत आहेत.
संशोधन हे सुचवतं की, एखाद्या व्यक्तीचं मायक्रोबायोम कसं आहे यावर लस किती परिणामकारक ठरेल हे अवलंबून असतं. उदाहरणार्थ, कोविड-19 लसीवर केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं की, लसीचा परिणाम स्रावाच्या मायक्रोबायोमवर झाला आणि उलट मायक्रोबायोमनेही लसीच्या परिणामकारकतेवर परिणाम केला.
नाकातून निदान करण्याची नवी पद्धत
फेरेरा यांचं परिपूर्ण आणि नाकातील आरोग्यदायी स्राव मायक्रोबायोम तयार करण्याचं काम पूर्ण होण्यासाठी अजून काही वर्षे लागू शकतात.
पण स्वीडनमध्ये शास्त्रज्ञांनी यामध्ये आघाडी घेतली आहे. त्यांनी सतत नाक बंद राहणं किंवा हाय फीव्हर असलेल्या रुग्णांच्या नाकात आरोग्यदायी व्यक्तींच्या नाकातील स्राव प्रत्यारोपित करून उपचार करण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व ऱ्हायनोसायनोसायटस नावाच्या नाकाच्या आजारासाठी वापरलं जात आहे.
संशोधकांनी 22 प्रौढ व्यक्तींना असं सांगितलं की, त्यांनी आरोग्यदायी मित्र किंवा जोडीदाराच्या नाकातील चिकट स्रावाची सिरिंज वापरून दररोज पाच दिवस आपल्या नाकात टाकावे.
या उपचारानंतर किमान 16 रुग्णांमध्ये खोकला, चेहऱ्यावरील वेदना यांसारखे त्रास तब्बल 40 टक्क्यांनी कमी झाले आणि तो परिणाम तब्बल तीन महिन्यांपर्यंत टिकला.

फोटो स्रोत, Emmanuel Lafont
या अभ्यासाचं नेतृत्व करणारे स्वीडनमधील हेलसिंगबॉर्ग रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर अँडर्स मार्टेन्ससन म्हणाले, "हे आमच्यासाठी खूप आनंददायी होते. कुणालाही कोणतेही साइड इफेक्ट्स जाणवले नाहीत."
हा प्रयोग खरंतर आतड्यांच्या 'मायक्रोबायोम'वर आधी केलेल्या संशोधनावरून प्रेरित होता. जसं काही आजारांमध्ये फिकल ट्रान्सप्लांट केलं जातं, अगदी त्यापद्धतीने.
पहिल्या पायलट प्रोग्राममध्ये एक गोष्ट राहून गेली होती. रुग्णांच्या स्रावामधल्या मायक्रोबायोममध्ये नक्की काय बदल झाला, कोणते जीवाणू वाढले किंवा कमी झाले, याचा सविस्तर डेटा गोळा केला गेला नाही.
म्हणून आता आणखी मोठा आणि अचूक अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
खरं तर, नाकातील स्राव हा नाक आणि फुफ्फुसांचे जुनाट आजार रोखण्यासाठी एक मजबूत ढाल ठरू शकतो.

फ्लोरिडा विद्यापीठात कार्यरत डॉ. जेनिफर मुलिगन या एक कान-नाक-घसा तज्ज्ञ (ओटोलेरिन्जॉलॉजिस्ट) आहेत.
त्या नाकातील चिकट स्रावाचा वापर करून क्रॉनिक ऱ्हायनोसायनोसायटस आणि नाकात होणारे पॉलीप्स यासारख्या आजारांचा अभ्यास करतात. हा आजार जगभरात सुमारे 5 ते 12 टक्के लोकांना होतो.
त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला, त्यांना रुग्णांच्या नाकातून उती (टिश्यू) शस्त्रक्रियेद्वारे काढावी लागायची. ही प्रक्रिया किचकट आणि त्रासदायक होती.
पण आता त्यांच्या संशोधनातून असं स्पष्ट झालं आहे की, फक्त नाकातील स्राव वापरूनही शरीरात काय घडतं, हे नीट समजून घेता येतं. विशेषतः ऱ्हायनोसायनोसायटससारख्या आजारांमध्येही.
मुलिगन म्हणतात, "आपण नाकातील स्रावाचा वापर करून हे शोधत आहोत की यात खरे दोषी घटक कोणते आहेत? कोणत्या गोष्टींमुळे हा आजार वाढतो?" तसंच त्या असंही सांगतात की, प्रत्येक रुग्णांमध्ये हा आजार होण्याची कारणं थोडी वेगवेगळी असतात.
नाकातील स्राव वापरून आजार ओळखण्याकडे कल
पूर्वी या आजारासाठी उपचार हे प्रयोग करत करत (ट्रायल अँड एरर पद्धतीने) केले जायचे. प्रत्येक रुग्णावर वेगवेगळा परिणाम व्हायचा आणि काही वेळा तर महिनोंमहिने चालणाऱ्या या उपचारांवर 10 ते 15 हजार डॉलर खर्च व्हायचा.
परंतु, डॉ. मुलिगन म्हणतात की, नाकातील स्राव तपासून लगेचच योग्य उपचार किंवा शस्त्रक्रिया लागणार का ते समजू शकतं. म्हणजे उपचार जलद, अचूक आणि खर्चात बचत होऊ शकते.
डॉ. मुलिगन यांच्या पद्धतीवर सध्या जगभरात काही क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत.
दरम्यान, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील इंजिनिअर्सनी सुरू केलेल्या 'डायग-नोज' सारख्या नव्या हेल्थटेक कंपन्या नाकातील स्रावाचं (स्नॉट) विश्लेषण करणाऱ्या एआय प्रणाली तयार करत आहेत.
या कंपन्या नाकातून अतिशय अचूक प्रमाणात स्राव गोळा करणाऱ्या उपकरणांचे पेटंटही घेत आहेत.
2025 मध्ये त्यांनी पहिलं एफडीए मान्य नाकातील स्राव गोळा करणारे डिव्हाईस (नॅसल मायक्रोसॅम्पलिंग डिव्हाइस) लॉन्च केलं.
हे उपकरण शास्त्रीय संशोधनासाठी एकसंध आणि अचूक नमुने मिळवण्यासाठी वापरलं जातं, जेणेकरून तपासणीत चुकांची शक्यता कमी होईल.
"फक्त टिश्यू कापून तपासल्याने जे काही समजू शकलं नसतं, ते सगळं नाकातील स्राव तपासून आम्हाला कळलं आहे," असं डॉ. मुलिगन म्हणतात.
"यामुळे या आजाराविषयीचं आपलं संपूर्ण ज्ञानच बदललं आहे आणि भविष्यात रुग्णांची तपासणी कशी केली जाईल, त्यांना उपचार कसे मिळतील, हे सगळंही बदलणार आहे."
डॉ. मुलिगन त्या स्राव तपासणीच्या (स्नॉट टूल्स) साधनांचा वापर लोकांच्या सुगंध ओळखण्याच्या संवेदना का कमी होतात, हे समजून घेण्यासाठीही करतात.
त्यांच्या टीमने आधीच शोधलं आहे की, धूम्रपानामुळे झालेल्या जळजळीतून संवेदना गमावलेल्या लोकांमध्ये, नाकावाटे वापर होणारा व्हिटॅमिन-डीचा स्प्रे संवेदना पुन्हा जागृत करायला मदत करू शकतो.
डॉ. मुलिगन सांगतात की, फुफ्फुसात जे होतं, तेच नाकातही होतं आणि याच्या उलटही. म्हणूनच या चाचण्या आणि उपचार पद्धती फुफ्फुसाच्या आजारांसाठीही उपयोगी पडू शकतात.

नवीन संशोधनातून असं दिसून आलं आहे की, रुग्णाच्या स्रावामध्ये आयएल-26 नावाचं प्रोटीन किती आहे, हे पाहून डॉक्टर ओळखू शकतात की एखाद्या व्यक्तीला 'क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मनरी डिसीज' (सीओपीडी) होण्याची शक्यता किती आहे.
हा आजार धूम्रपान करणाऱ्यांमध्ये सामान्य असून, संपूर्ण जगात मृत्यूचं चौथं सर्वाधिक कारण आहे. स्राव तपासणीमुळे रुग्ण ओळखता येतात आणि लवकर उपचार सुरू करता येतात.
जगभरात अनेक संशोधक टीम्स आता नाकातील चिकट स्राव वापरून विविध आजार ओळखण्याचे साधन विकसित करत आहेत. या पद्धतीद्वारे दमा, फुफ्फुसाचा कर्करोग, अल्झायमर आणि पार्किन्सनसारखे आजार शोधता येऊ शकतात.
शिवाय, नाकातील चिकट स्राव वापरून एखाद्या व्यक्तीला किती किरणोत्सर्ग (रेडिएशन) झाला आहे हेही कळू शकतं.
नुकत्याच काही संशोधनांतून असंही दिसून आलं आहे की, नाकातील चिकट स्राव तपासून एखाद्या व्यक्तीला हवेतील जड धातू किंवा मायक्रोपार्टिकल्ससारख्या प्रदूषण घटकांशी किती संपर्क झाला आहे, हेही अचूक सांगता येऊ शकतं.
"नाकातील चिकट स्राव म्हणजे वैयक्तिक उपचारपद्धतीचं भविष्य आहे. मला त्यावर पूर्ण विश्वास आहे," असं मुलिगन म्हणतात.

डिस्क्लेमर
या लेखात दिलेली सर्व माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिली आहे. ती आपल्या डॉक्टरांचा किंवा आरोग्य तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला म्हणून वापरू नये.
या साईटवरील माहितीवर आधारित युजर्सनी केलेल्या कोणत्याही निदानासाठी 'बीबीसी' जबाबदार नाही. इथे दिलेल्या कोणत्याही बाह्य संकेतस्थळाच्या सामग्रीसाठी किंवा त्यावर सांगितलेल्या कोणत्याही उत्पादन किंवा सेवेसाठी 'बीबीसी' जबाबदार नाही किंवा त्याची शिफारस करत नाही.
आपल्या आरोग्याबाबत जर चिंता वाटत असेल, तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











