'या' शहराच्या खाली सापडली कवट्या आणि हाडांची रास, इथे नेमकं काय घडलेलं?

त्या अंधाऱ्या बोगद्यात मानवी हाडांचा, कवट्यांचा ढीग पडला होता. पण प्राध्यापक कायेटानो विलाव्हिसेन्सियो मात्र त्यातून निवांत फिरत होते. ते गेली कित्येक वर्ष या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहेत. याचं संरक्षण करणं याला त्यांनी आपलं ध्येय बनवलंय.

त्या स्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तीला ते सांगत होते, "बघा, यातल्या काही मांड्यांची हाडं किती मोठी आहेत."

आम्ही सॅन फ्रान्सिस्को डी एसिस कॉन्व्हेंट या मठात गेलो होतो. हा मठ पेरूची राजधानी लिमाच्या अगदी मध्यभागी असून याच्या खाली भूमिगत कबर आहे.

लिमातील या प्रसिद्ध प्रार्थना स्थळाखालील उत्खननात ही कबर सापडली असून इथे स्पॅनिश राजवटीतील हजारो लोकांचे अवशेष सापडले आहेत.

"ही लॅटिन अमेरिकेची दफनभूमी होती," असं प्राध्यापक विलाव्हिसेन्सियो यांनी सांगितलं.

पेरुव्हियन सरकारच्या पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर याची माहिती देण्यात आली आहे.

कॉन्व्हेंट (मठ) मध्ये वसाहतीच्या काळात बांधलेल्या युरोपियन शैलीतील कलाकृतींचा खजिना आहे. 1535 मध्ये याची निर्मिती करण्यात आली. स्पॅनिश राजवटीच्या काळातच इथे फ्रान्सिस्कन्स आणि इतर धर्मीयांचे दफन केले जाऊ लागले.

पण इथल्या भूमिगत कबरीतील हाडं, कवट्या पर्यटकांना आकर्षित करतात. या दफनभूमीत अगदी सुव्यवस्थित पद्धतीने काळजीपूर्वक हाडं रचण्यात आली आहेत.

विलाव्हिसेन्सियो सांगतात की, "इथे पुष्कळ साऱ्या कवट्या आणि मांड्यांची हाडं आहेत. बऱ्याच काळापासून त्याचं जतन करण्यात आलं आहे.”

स्टर्नमचे अवशेष (छातीचे हाड), कोक्सीक्सचे तुकडे (मणक्याचा शेवटचा भाग) अशी हाडं देखील इथे सापडली आहेत.

या ठिकाणी नेमक्या किती लोकांना दफन करण्यात आलंय हे कोणालाच माहीत नाही. या दफनभूमीत सुमारे 25 हजार लोक दफन करण्यात आले असावेत, असा अंदाज आहे. मात्र विलाव्हिसेन्सियो यांच्या मते, इथे कदाचित एक लाखाहून अधिक लोक दफन करण्यात आले असावेत.

विलाव्हिसेन्सियो सांगतात, या कॉन्व्हेंटमध्ये (मठात) अनेक भूमिगत रस्ते आणि कलादालनं आहेत. अशीही काही ठिकाणं आहेत जिथे अद्याप उत्खनन झालेलं नाही.

अर्थात, व्हाइसरॉयल काळात धार्मिक दफनविधी होणारे हे एकमेव ठिकाण नव्हते. इतर चर्चमध्येही असेच अवशेष सापडले आहेत.

तज्ज्ञांना शंका आहे की, पेरूच्या राजधानीच्या मध्यभागी नेहमीच वर्दळ असलेल्या परिसराच्या खाली एक मोठी भूमिगत दफनभूमी कशी काय अस्तित्वात असू शकते?

सॅन मार्कोसच्या नॅशनल मेजर युनिव्हर्सिटीचे पुरातत्वशास्त्रज्ञ पीटर व्हॅन डॅलेन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "इथे आतापर्यंत केवळ 30 ते 40 टक्केच उत्खनन झालं आहे. पण लिमाच्या खाली पसरलेल्या ऐतिहासिक बोगद्यांच्या उत्खननाबद्दल आम्हाला विचार करावा लागेल."

हे बोगदे किती मोठे आहेत हे कोणालाच माहीत नाही. काही स्थानिक तज्ञ सांगतात की ते सरकारी राजवाडा किंवा एल कॅलाओ बंदराजवळ उघडत असावेत.

या दफनभूमीत नेमकं काय आहे?

अवशेषांच्या प्रचंड संख्येमुळे ही भूमिगत दफनभूमी पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण बनली आहे. 1940 च्या दशकात या दफनभूमीचा शोध लागला तेव्हापासून लोक इथे भेट देऊ लागले.

हाडांचा आणि कवट्यांचा खच पडलेल्या या ठिकाणी काही जणांना भीती वाटू शकते.

विलाव्हिसेन्सियो सांगतात की, "इथे काही पर्यटक हरवले होते. तेव्हापासून आम्ही मार्ग चिन्हांकित करण्यासाठी व्यवस्था केली आहे."

लिमामधील इतर चर्चमध्येही मोठ्या प्रमाणात लोकांचं दफन करण्यात आलं आहे. त्यात सॅन लाझारो, सांता याना आणि सँटिसिमो कोराझोन डी जीझस या चर्चचा समावेश आहे. अनाथांचं चर्च अशी त्यांची ओळख आहे. इथे बऱ्याच लहान मुलांचे अवशेष देखील सापडले आहेत.

व्हॅन डॅलेन सांगतात की, "चर्च, कॉन्व्हेंट आणि इतर धार्मिक संस्थांमध्ये सापडलेल्या या सगळ्या अंत्यसंस्कार संरचना आहेत. वसाहती कालखंडात लिमा आणि शहराच्या आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांना इथे दफन करण्यात आलं होतं."

ते पुढे सांगतात, "सुरुवातीला इथे फक्त धार्मिक दफनविधी व्हायचे. पण नंतरच्या काळात साथरोग आणि भूकंप अशा अनेक घटनांमध्ये बळी पडलेल्या मृतांना इथे दफन करण्यात आलं."

चर्च आणि मंदिरांजवळ मृतांना दफन केल्याने त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळतो असा दृढ विश्वास त्याकाळी होता.

दफनामागील सामाजिक पार्श्वभूमीचं संशोधन करणारे प्राध्यापक विलाव्हिसेन्सियो सांगतात की, "ते धार्मिक वेदींच्या जितके जवळ असतील तितकेच ते देवाच्या जवळ जातील."

येथे कोण दफन आहे?

विलाव्हिसेन्सियो सांगतात, की इथे स्पॅनिश, क्रेओल्स (अमेरिकेतील फ्रेंच आणि स्पॅनिश स्थायिक), इंडियन्स (अमेरिकेचे मूळ) आणि काळ्या लोकांना दफन करण्यात आलंय. त्याकाळी लोकांमध्ये सामाजिक मतभेद होते, दफनविधीही त्याला अपवाद नव्हता.

या दफनभूमीतील बहुतांश अवशेषांची ओळख अद्याप पटलेली नाही. ते कोणाचे आहेत हे माहीत नाही. पण ते सर्व निनावी नाहीत. यात 1648 ते 1655 पर्यंत पेरूचे व्हाईसरॉय असलेले गार्सिया सार्मिएन्टो डी सोटोमायोर यांना दफन करण्यात आलं आहे. ते त्या काळातील प्रसिद्ध व्यक्ती होते.

मृतदेह शवपेटीमध्ये न टाकता एकामागून एक पुरण्यात आले आहेत. त्यांच्यामध्ये थोड अंतर ठेऊन एक ओळ पूर्ण झाली की दुसऱ्या ओळीत मृतदेह पुरले जायचे.

कॉन्व्हेंटच्या फ्रान्सिस्कन भिक्षूंनी 1949 मध्ये आत काय आहे हे बघण्यासाठी ही जागा उघडली तेव्हा त्यांना जमिनीवर हाडं विखुरलेली आढळली.

या प्रकरणाकडे स्थानिकांचे आणि स्थानिक माध्यमांचे लक्ष वेधले आणि लोकांची उत्सुकता वाढली. त्यामुळे त्याला संग्रहालयासारखं रूप आलं.

हे दफनविधी कधी थांबले?

अर्जेंटिनाचे जनरल खोसे डी सॅन मार्टिन यांनी 28 जुलै 1821 रोजी लिमा येथील प्लाझा मायोर येथे पेरूच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

पेरूतील सॅन मार्टिन शहरात स्वच्छतेचा अभाव होता. मात्र, पेरूच्या स्वातंत्र्यानंतर चर्चमध्ये भूमिगत दफन करण्यास बंदी घालण्यात आली होती.

त्यावेळी काही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त करताना म्हटलं होतं की, भूमिगत दफनांमुळे केवळ सार्वजनिक आरोग्यालाच हानी पोहोचत नाही तर इमारतींच्या स्थैर्यालाही धोका निर्माण होतो.

1808 च्या सुरुवातीला, लिमामध्ये प्रेस्बीटेरो मेस्ट्रो स्मशानभूमी सुरू झाली. मात्र, सुरुवातीच्या काळात स्थानिक लोक इथे दफनविधी करण्यास तयार नव्हते. पण नंतर या ठिकाणी जुन्या पद्धतीने अंत्यसंस्कार सुरू झाले.

नंतरच्या काळात ही प्रथा हळूहळू बंद झाली. दफनविधी थांबले असले तरीही सॅन फ्रान्सिस्कोचे कॉन्व्हेंट एक स्मारक आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)