बऱ्याच काळापासून हिंसेत जळणारं मणिपूर अजूनही का धुमसत आहे - ग्राउंड रिपोर्ट

- Author, राघवेंद्र राव
- Role, बीबीसी प्रतिनिधी
राज्यभरात कर्फ्यू. इंटरनेटही बंद आणि रस्त्याच्या मधोमध जळत असलेली गाडी. साधारण दीड वर्षापूर्वीची मणिपूर राज्यातली ही परिस्थिती. इम्फाळ या राज्याच्या राजधानीत आम्ही 5 मे 2023 ला पोहोचलो आणि विमानतळावरून बाहेर पडताच हे दृश्य समोर दिसलं. आज दीड वर्षानंतर इम्फाळची तीच अवस्था दिसते. मणिपूरमधल्या संघर्षानं पुन्हा डोकं वर काढलं आहे.
मणिपूरमधल्या कुकी आणि मैतेई या दोन समाजांमध्ये 3 मे 2023 ला संघर्ष सुरू झाला.
आत्तापर्यंत या हिंसाचारात 258 लोक मारले गेलेत. हजारो विस्थापित झालेत. इतकंच नाही, तर दोन्ही समाजांमधली अविश्वासाची दरी आणखी खोल झाली आहे.
हिंसा पुन्हा उसळण्यामागचं कारण काय?
मणिपूरमध्ये अलीकडेच म्हणजे 7 नोव्हेंबरला पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरूवात झाली.
जिरिबाम जिल्ह्यातल्या जहालमतवाद्यांनी एका आदिवासी महिलेला गोळी मारून तिचा मृतदेह जाळल्याचं म्हटलं जाऊ लागलं. हा हल्ला करणारे मैतेई समाजाचे होते असेही दोषारोप लावले गेले.
त्यानंतर चार दिवसांनी 11 नोव्हेंबरला जिरिबाममधल्या मैतेई समाजाच्या एका मदत केंद्रावर हल्ला झाला. तिथल्या तीन महिलांसोबत तीन लहान मुलं बेपत्ता झाली.
त्याच दिवशी जिरिबामच्या सुरक्षा दलाने 10 सशस्त्र लोकांना मारलं. हे सगळे लोक अतिरेकी असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं.
पण काही दिवसांनी म्हणजे 16 ऑक्टोबरला पुन्हा एक बातमी पसरायला सुरूवात झाली.
मदत केंद्रातून 11 नोव्हेंबरला बेपत्ता झालेल्या सहा लोकांचे मृतदेह आसाम सीमेजवळच्या एका नदीत सापडले असल्याचं सांगितलं जाऊ लागलं.
या बातमीनंतर इम्फाळमधले लोक रस्त्यावर उतरून विरोध व्यक्त करू लागले. हळूहळू हे आंदोलन उग्र होत गेलं.
रागावलेल्या जमावाने स्थानिक आमदारांच्या घरांवर हल्ले केले. त्यानंतर इम्फाळ आणि इतर अनेक भागात पुन्हा कर्फ्यू लावला गेला. इंटरनेट सेवा बंद केली गेली.

हा सगळा प्रकार पाहता केंद्र सरकारने अतिरिक्त सुरक्षा दलातल्या 9 हजार सैनिकांना मणिपूरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला.
अखेर, मदत केंद्रातून बेपत्ता झालेल्यांची हत्या कुकी अतिरेक्यांनी केली असल्याचं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी जाहीर केलं. आरोपींचा तपास सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं.
आमदारांच्या घरांवर हल्ले
भारतीय जनता पक्षाचे पाटसोई मतदारसंघातून निवडून आलेले आमदार सपम कुंजकेश्वर यांच्या इम्फाळमधल्या घरी आम्ही गेलो होतो.
तिथं 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी जमावानं बरीच तोडफोड केली होती. त्याच्या खुणा तिथं दिसत होत्या.
त्यांच्या घराबाहेरच रस्त्यावर एक जळलेली गाडी पडली होती. त्या दिवशी संध्याकाळी शेकडो लोक आमदारांच्या घरात घुसले असं सुरक्षा कर्मचारी सांगत होते.
त्यांनीच गाडी घरातून बाहेर काढली आणि भर रस्त्यात पेटवून दिली.

कुंजकेश्वर यांच्या घरासमोरच्या अंगणात डझनभर तुटलेल्या कुंड्या, घराच्या काचा आणि फर्निचर पडलं होतं.
हल्ला झाला तेव्हा कुंजकेश्वरही त्याच घरात होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनं त्यांना इजा होऊ दिली नाही. पण त्यांच्या घरात त्यावेळी तैनात असलेल्या मणिपूर रायफल्सच्या सैनिकांना त्या संतापलेल्या जमावाला थांबवता आलं नाही.
रात्रीपर्यंत आमदारांच्या घरासमोर केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक सशस्त्र गट तैनात करण्यात आला.
मणिपूरच्या सरकारमध्ये मंत्रिपदावर असणाऱ्या आणि खुरई मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या लेइशांगथेम सुसिन्द्रो मैतेई यांच्या घरावरही त्याच संध्याकाळी हल्ला झाला.
तिथल्या सीमा सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
या आमदारांच्या घरी आम्ही पोहोचलो तेव्हा तिथेही काचांचे तुकडे पडलेले दिसले. शिवाय या घटनेनंतर त्यांच्या घराभोवती तटबंदी उभारली आहे. काटेरी तारांचं एक लोखंडी दारही बसवलेलं दिसतं. आता सीमा सुरक्षा दलाचे कर्मचारी हत्यारं घेऊन उभे असतात.
सीमा सुरक्षा दलाचा एक सैनिक त्या घटनेत जखमी झाला. सध्या रुग्णालयात त्यावर उपचार चालू आहेत.
कॅमेरासमोर बोलणं आमदारांनी नाकारलं. पण आमच्याशी गप्पा मारल्या.
त्यांच्या घरावर हल्ला करणारे आंदोलनकर्ते नव्हते असं त्यांनी सांगितलं. मणिपूरमध्ये सुरू असणाऱ्या संघर्षात तेल ओतण्याचं काम त्यांना करायचं होतं. त्यातले अनेक लोक हातोडा आणि इलेक्ट्रिक ड्रिल घेऊन आले होते, असंही लेइशांगथेम सुसिन्द्रो मैतेई सांगत होते.

घरात चोरी करून जाळपोळ करणं हा त्यांचा हेतू होता.
हल्ला झाला तेव्हा आमदार त्यांच्या घरी नव्हते. त्या संपूर्ण दिवसात अनेक महिला आणि वृद्ध घरी त्यांच्या भेटीला आले होते. त्यांच्या कुटुंबियांशी बोलून परत गेले.
पण संध्याकाळ होऊ लागली तसे शेकडो लोक त्यांच्या घराभोवती जमू लागले. त्यानंतर हिंसेला सुरूवात झाली.
मिळालेल्या माहितीनुसार 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी डझनभर आमदारांच्या घरांवर हल्ले झाले. त्यातले बहुतेक आमदार भाजपचे होते.
या घटनांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. आरोपींविरोधात कारवाई केली जाईल असं आश्वासन सरकारने दिलं आहे.
चुराचांदपूरची बिकट वाट
इम्फाळवरून आम्ही चुराचांदपूरला गेलो. गेल्या वर्षी 3 मेला सुरू झालेल्या कुकी आणि मैतेई समाजामधल्या हिंसाचाराच्या उगमाचं हेच ते गाव. इथूनच संघर्ष हळूहळू संपूर्ण राज्यात पसरला.
चुराचांदपूर इम्फाळपासून जवळपास 60 किमी दूर आहे. इम्फाळमध्ये मैतेई समाजाचे बहुतेक लोक रहतात. तर चुराचांदपूर हा कुकी-बहुल भाग आहे.
या दोन शहरांच्या मध्ये येतं विष्णुपूर. मागच्या वर्षीच्या हिंसाचारात या भागाला ‘बफर झोन’ म्हटलं जात होतं. तिथं भारतीय सैन्य मोठ्या प्रमाणावर तैनात केलं आहे.
या दोन्ही शहरांमधलं दळणवळण आता फार जटील झालंय. इम्फाळवरून चुराचांदपूरला जाणं किंवा तिकडून इकडे येणं सोपं राहिलेलं नाही. विष्णुपूरच्या बफर झोनमध्ये थोड्या थोड्या अंतरावर तपासणी नाके सुरू केलेत.
या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला प्रवासाचे तपशील द्यावे लागतात.

मागच्या वेळी तर तपशील दिल्यानंतर लगेचच पुढे जाता येत होतं. मात्र यावेळी प्रत्येक नाक्यावर चुराचांदपूरला जायची परवानगी आहे का याची विचारणा झाली. तिथल्या सुरक्षा रक्षकांनी नाक्याचे फोटो किंवा व्हीडिओ घ्यायलाही मनाई केली.
चुराचांदपूरला आम्ही कशासाठी जात आहोत? तिथे जाऊन काय करणार? कोणाला भेटणार? अशी सगळी चौकशी केली.
असे प्रश्न विचारण्यामागचं कारण विचारलं तेव्हा एक सुरक्षा रक्षक म्हणाला, “परिस्थिती गंभीर आहे. कधीही काहीही होऊ शकतं.”
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर बोलल्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने त्यांनी आम्हाला चुराचांदपूरच्या दिशेनं जायची परवानगी दिली.
“तुम्ही तुमच्या जबाबदारीवर जात आहात हे लक्षात ठेवा. तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल,” एक सुरक्षा रक्षक म्हणाला.
चुराचांदपूमध्येही तणाव आणि असंतोषाचं वातावरण
चुराचांदपूरमधलं वातावरण वरवर व्यवस्थित वाटत होतं. पण त्याखाली दबलेला तणाव अनुभवण्यासाठी फार वेळ लागला नाही.
अनेक ठिकाणी मोठे बॅनर लावलेले दिसले. त्यावर 10 लोकांचे चेहरे लावले होते. सुरक्षा दलासोबत 11 नोव्हेंबरला जिरिबाममध्ये झालेल्या झटापटीत मारले गेलेले हे लोक होते. त्यातले 8 चुराचांदपूरचे रहिवासी होते, असं समजलं.
हे अतिरेकी असल्याचं मणिपूर सरकारचं म्हणणं आहे.
त्यांनी जिरिबाम जिल्ह्यातल्या बोरोबेकरा भागातल्या मदत केंद्रावर आणि पोलिस स्टेशनवर 11 नोव्हेंबरला हल्ला केला होता.
“भीती पसरवणं हा त्यांचा हेतू होता. तिथल्या सीआरपीएफच्या जवानांनी वेळेवर परिस्थिती हाताळली आणि हल्ला परतवून लावला,” असं मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले.
जवानांच्या बहादुरीनं आणि चपळाईनं 10 अतिरेक्यांना जागीच ठार केलं गेलं. त्यामुळे मदत केंद्रातल्या शेकडो निर्दोष लोकांचा जीव वाचला असंही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
पण हे आठ जण गावातून आमच्या समाजातल्या लोकांच्या रक्षणासाठी स्वयंसेवक म्हणून जिरिबामला गेले होते असं चुराचांदपूरमधल्या लोकांचं म्हणणं आहे.


मागच्या वर्षी कुकी आणि मैतेई समाजामध्ये हिंसाचार सुरू झाला तेव्हा दोन्ही पक्षाने आपापल्या गावातून सशस्त्र गट तयार केले होते. तेव्हापासून या सशस्त्र गटांकडून अनेक हिंसाचाराच्या घटना राज्यभर घडत आहेत.
काही मृतांच्या कुटुंबियांना आम्ही भेटलो.
त्यातला लालथानेयी इन्फिमाते फक्त 22 वर्षांचा होता. तो रंगकाम आणि बांधकामाचं काम करत असे. आपला धाकटा भाऊ आता या जगात नाही यावर राममासुओचा अजूनही विश्वास बसत नाही.
“डोळे बंद करतो तेव्हा त्याचा चेहरा दिसतो. मृतांपैकी कुणीही अतिरेकी वगैरे नाही. पोलिसांचं म्हणणं अगदी चुकीचं आहे,” ते सांगत होते.
गावातून स्वयंसेवक म्हणूनच लालथानेयी जिरिबामला गेला होता असं राममासुओ यांचं म्हणणं आहे.
“मणिपूरमध्ये संघर्ष सुरू झाला तेव्हापासूनच आमच्या गावातले सगळेजण स्वयंसेवक म्हणूनच वावरतात. आपलं घर, आपला गाव वाचवण्यासाठी त्यांना पुढे यावंच लागतं,” असं ते म्हणाले.
“आम्ही सगळे गरीब लोक आहोत. कुणीही श्रीमंत घरातून येत नाही. ज्या दिवशी काम करू त्या दिवशी खायला मिळतं. या लोकांसोबत जे झालं ते फार चुकीचं होतं,” असंही राममासुओ पुढे सांगत होते.
त्यांच्या घरापासून काही अंतरावरच दुसऱ्या घरातही सूतक पाळलं जात होतं.
मुलगा जोजफ याच्यासोबत बार्था 10 नोव्हेंबरला शेवटचं बोलल्या. दुसऱ्याच दिवशी आपला विशीतला मुलगा जिरिबाममध्ये मारला गेला असल्याचं त्यांना कळालं.
“माझा मुलगा स्वयंसेवक म्हणून गेला होता. पण सगळे त्याला अतिरेकी म्हणत आहेत. माझ्या मुलाला अतिरेकी म्हणू नये अशी सरकारला विनंती आहे,” बार्था म्हणाल्या.
जोजफ लालदितुम खोबुंग दहावीच्या परिक्षेची तयारी करत होता असं त्याचे कुटुंबीय सांगत होते. सोबतच गाडी चालकाचं कामही तो शिकत होता.
“आम्ही भारताचेच नागरिक आहोत. बाहेरून आलेले परदेशी नाही. आम्ही अतिरेकी नाही. आम्हालाही समान अधिकार मिळायला हवेत. न्याय मिळायला हवा,” बार्था म्हणत होत्या.
जिरिबाममध्ये मारले गेलेले हे 10 लोक मार या समाजातले आहेत. त्यांच्या मृत्यूनं चुराचांदपूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्या सगळ्यांचे मृतदेह चुराचांदपूरच्या जिल्हा रुग्णालयात ठेवलेत.
हे मृतदेह सरकार कधी सोपवेल याची मृत व्यक्तींचे कुटुंबीय आणि मार समुदायाचे लोक वाट पाहत आहेत. समाजाच्या परंपरेनुसार मृत व्यक्तीवर अंतिम संस्कार होत नाहीत तोपर्यंत त्यांना एकटं सोडता येत नाही.
यामुळेच मार समाजातले लोक दररोज चोवीस तास आळीपाळीनं शव गृहाच्या बाहेर मोठ्या संख्येनं थांबलेले असतात.
काही दिवसांपूर्वीच चुराचांदपूरमधल्या काही कुकी संघटनांनी मृत लोकांच्या आठवणीत मोकळ्या शवपेट्या घेऊन एका रॅलीचं आयोजन केलं.
“लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे. 2023 मे नंतर पहिल्यांदाच 10 लोकांना मारून टाकलं. त्यामुळे लोकांमध्ये राग आणि असंतोष पसरला आहे,” मार समाजाचे प्रवक्ते डेविड बहरिल म्हणाले.
हे सगळं पाहता हिंसेत जळणारा मणिपूर शांततेपासून अजून कोसो मैल दूर आहे हेच लक्षात येतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











