मणिपूरमधील हिंसाचार आणि खोलवर झालेले घाव

- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, मणिपूरहून
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू होऊन सुमारे नऊ महिने लोटले आहेत. पण अजूनही राज्यातून सातत्यानं लोकांच्या मृत्यूच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांत झालेल्या गोळीबारामध्ये सुरक्षा दलातील सैनिक आणि सामान्य लोकांनी जीव गमावला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
या संपूर्ण स्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या गृह मंत्रालयाच्या टीमनं त्याठिकाणचे नेते अधिकारी आणि संघटनांशी चर्चा केली आहे.
याच हिंसाचाराच्या वातावरणात 14 जानेवारीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू झाली.
यात्रेत सहभागी झालेले काँग्रेस नेते जयराम रमेश बीबीसीशी बोलताना म्हणाले की,"पंतप्रधान आठ महिन्यांपासून मौन बाळगून का आहेत? ते एका तासासाठीही इंफाळला आलेले नाहीत."
एका गावावर शोककळा
आम्ही राजधानी इंफाळपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावरील मैतेई-बहुल आकाशोई गावात पोहोचलो. त्या गावावर शोककळा पसरली आहे.
10 जानेवारीला गावातील चार जण घरीच परतले नाही, त्यावेळी याठिकाणी भयावह शांतता पसरली होती. नंतर डोंगराळ भागात त्यांचे मृतदेह आढळले होते.
ओएनाम रोमेन सिंह, अहंतेन दारा मेईतेई, थाऊदाम इबोमचा मेईतेई आणि त्यांचा मुलगा थाऊदाम आनंद सिंह लाकडं विकून दिवसभरात 100-200 रुपये कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.
या प्रकरणी पोलिसांचा सशस्त्र कट्टरतावाद्यांवर संशय आहे.
आम्ही जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा मृतांच्या घराबाहेर त्यांचे फोटो ठेवलेले होते. दारा मैतेई यांच्या पत्नी रडत-रडत बेशुद्ध झाल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाण्याचा शिंपडा मारला आणि नंतर त्यांना घरात नेलं.
ओयनाम रोमेन सिंह यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रमोदिनी लेइमा यांनी खाणं-पिणं सोडलं होतं. घरात सामानामध्ये ठेवलेल्या अंथरुणावर त्या डोळे बंद करून पडलेल्या होत्या. त्यांना ड्रिप (सलायन) लावलेलं होतं. मुलं घाबरलेले होते.
परीक्षेत चांगले मार्क मिळवले तर काहीतरी चांगलं खाऊ घालण्याचं वचन मुलांना देऊन ओयनाम गेले होते. परीक्षेचा निकाल आला पण ओयनाम परतले नाहीत.
सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. आई लेइंबी लेइमा बोलता-बोलताच मोठ्यानं रडू लागत होत्या.

मृतांमध्ये त्यांचे जावई थोऊदाम इबोमचा मेईतेई आणि नातू थोऊदाम आनंद सिंह यांचाही समावेश होता. तीन घरं सोडून ते राहत होते.
त्या म्हणाल्या, "आम्ही कुणा-कुणाच्यासाठी रडावं. मुलगा गेला म्हणून सुनेबरोबर रडावं की, जावई आणि नातू गेला म्हणून मुलीबरोबर रडावं. कुणासाठी आम्ही अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी."
"या हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आल्या. समोरा-समोरच्या युद्धात त्यांचा मृत्यू झाला असता तर आम्ही काही म्हटलं नसतं. पण निशस्त्र लाकूडतोड्यांवर जीवघेणा हल्ला करून त्यांची हत्या केल्यानं आम्ही फार दुःखी आहोत. आम्ही याचा तीव्र निषेध करतो."

थोऊदाम इबोमचा मेईतेई यांच्या पत्नी आणि मृत ओएनाम रोमेन सिंह यांची बहीण थाऊदान सुमिला लेइमा म्हणतात की, "आम्हाला जगायची इच्छा तर आहे, पण कसं आणि का जगावं. भीती एवढी वाढली आहे की, आम्हाला केव्हा मृत्यूचा सामना करावा लागेल हेही समजेनासं झालंय."
अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगणाऱ्या या कुटुंबांचं भवितव्य अंधारात आहे. संरक्षण व्यवस्थेनं चिंता वाढवली आहे. ठिकठिकाणी तंबूसारखी ठिकाणं दिसली. लोक याठिकाणी रात्री पहारा देतात, असं आम्हाला सांगण्यात आलं.
हा हिंसाचार गेल्यावर्षी मे महिन्यात सुरू झाला होता. राज्यातील प्रभावी मैतेई समुदायाला अनुसुचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी ही या हिंसाचाराचं मुख्य कारण समजलं जातं.
त्याचा विरोध मणिपूरच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या जमातीचे लोक करत आहेत. त्यात प्रामुख्यानं कुकी जमातीतील लोकांचा समावेश आहे.
हिंसाचारामुळं भीतीचं वातावरण

आकाशोई गावापासून काही किलोमीटर अंतरावर हाऊतक टँफाखुनाऊ गाव आहे. हा भाग दुर्गम डोंगर आणि झाडांनी भरगच्च असा आहे.
गावात स्मशान शांतता पसरली होती. रस्ते रिकामे होते. गावात आम्हाला काही पुरुषांबरोबर सुनील मॅसनाम भेटले. त्यांनी सांगितलं की, शेतीवर अवलंबून असलेल्या या गावात मेईतेईंच्या गावात 400 लोक होते. पण बॉम्बहल्ले आणी गोळीबारानंतर फक्त 100 लोकच शिल्लक राहिले आहेत.
ते म्हणाले की, "याठिकाणच्या सर्व महिला आणि मुलांनी गाव सोडलं आहे. इथं फक्त पुरुष राहत आहेत. लोक कधी कुठून गोळी येईल या भीतीमध्ये आहेत. राहिलेले लोकही इथून गेले तर घरं जाळली जातील अशी भीती आहे."

परत येताना सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मोठ्या घरात आम्ही पोहोचलो. त्याठिकाणी गावातील 45-50 महिलांनी मुलांसह आसरा घेतला आहे.
एकीकडं चादरी आणि गाद्यांचा ढीग होता. काही लहान मुलं रिकाम्या जागेत खेळत होते. उन्हं पडलेली होती. पण रात्रीच्या वेळी याठिकाणी थंडी प्रचंड वाढत असते.
याठिकाणी राहणाऱ्या रेविका यांनी सांगितलं की, सगळे लोक घाई-घाईत घर सोडून पळाले होते.
त्या म्हणाल्या, "आम्ही एवढे कपडे, पांघरुणंही आणली नाहीत. आम्ही जेव्हा रात्री झोपतो, तेव्हा चादरीचा जो वरचा भाग असतो, तिथपर्यंत पाणी येतं आणि प्रचंड थंडीत आम्हाला झोपावं लागतं. खूप कठीण आहे."
मदत शिबिरांतील जीवन
स्थानिक लोकांच्या मते, अजूनही हजारो लोक नाइलाजानं मदत शिबिरांमध्ये राहत आहेत. पण त्यांचा योग्य आकडा स्पष्ट झालेला नाही.
इंफाळच्या एका मदत शिबिराच्या मोठ्या हॉलमध्ये इतर कुटुंबांबरोबर राहणाऱ्या 26 वर्षीय मॅबराम व्हिक्टोरिया चानू यांनी नुकतीच कृषीमध्ये मास्टर्स पूर्ण केलं आहे.
या शिबिरात 79 लोक राहत आहेत. कुकी-बहुल चुराचांदपूरच्या मेईतेई कुटंबात जन्मलेल्या व्हिक्टोरियानं सांगितलं की, त्या कुकी, मिझो समुदायाच्या मित्रांबरोबर लहानाच्या मोठ्या झाल्या. पण हिंसाचारात त्यांचं संपूर्ण घर उध्वस्त झालं.
इतर कुटुंबांप्रमाणेच त्यांच्या घरातील सामानही तिथंच ठेवलेलं होतं.
त्या म्हणाल्या "हे प्रचंड विचित्र आहे. एवढ्या दीर्घकाळासाठी एकत्र राहिलो पण घटनेनंतर आमचे संबंध तुटले. त्यांनी संपर्क केला नाही, अन मीही संपर्क केला नाही. आमच्यामध्ये एकप्रकारचं अंतर असून ते वाढत जात आहे. काय होईल माहिती नाही."

या कुटुंबांनी नऊ महिन्यांपूर्वी कदाचित असा विचारही केला नसेल की, त्यांचं जीवन अशा प्रकारचं असेल. आमच्याशी बोलताना अनेकांनी राज्य आणि केंद्र सरकार आणि अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
एका प्रश्नाचं उत्तर देताना मणिपूरचे सुरक्षा सल्लागार पत्रकारांना म्हणाले की, "मी राजीनामा का देऊ? तुम्ही म्हणाले किंवा मलाही असं वाटलं की, मी कर्तव्य पार पाडलं नाही तर त्याचदिवशी मी राजीनामा देईल. मी झोपणं आणि खाणं सोडलं तर 24 तास काम करत आहे. सुरक्षादलांमध्ये ताळमेळ, त्यांना कुठं तैनात करायचं आणि कारवाई यासाठी मी काम करत आहेत."
सरकारनं सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. पण राज्यात हिंसाचार सुरुच आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी भारत-म्यामार सीमेवर कुंपण लावल्यानंही अनेक वक्तव्यं आणि प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
रिटायर्ड ब्युरोक्रॅट आणि स्तंभलेखक डॉक्टर आरके निमाई सिंह यांनी प्रश्न उपस्थित केला. "तुम्ही भारतात वर्णभेदी हिंसाचार एका आठवड्यापेक्षा जास्त काळ चाललेला पाहिला आहे का? जास्तीत जास्त तीन-चार दिवस ते चालतं. पण फक्त मणिपूरमध्येच ते आठ किंवा नऊ महिन्यांपासून सुरू आहे. यावरून दिसतं की, जेवढे प्रयत्न करायला हवे होते, तेवढे करण्यात आले नाही."
चुराचांदपूरमधील आयुष्य
इंफाळमधून आम्ही सुरक्षेच्या अनेक चेक पॉइंट्सहून पुढं चुराचांदपूरला पोहोचलो. त्यावेळी तिथं प्रचंड गर्दी जमलेली होती. बोलणारे एकापाठोपाठ म्हणणं मांडत होते. लोकांच्या हातातील बॅनरवरून स्पष्ट होत होतं की, ते राज्याच्या बीरेन सिंह सरकारवर नाराज होते. तसंच ते वेगळ्या प्रशासनाची मागणीही करत होते.
आम्हाला सांगण्यात आलं की, इथं दर आठवड्याला अशी आंदोलनं होत असतात. अनेक महिन्यांनंतरही याठिकाणच्या वेदना कमी झालेल्या नाहीत, हे दाखवलं जात आहे.
लिंगनेकी लुंगडिन या जेव्हा हिंसाचार सुरू झाला तेव्हा पतीबरोबर इंफाळमध्ये होत्या. तीन दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता. त्यांनी म्हटलं की, चार मे रोजी त्यांचे पती आणि भावाची जमावानं प्रचंड मारहाण करत हत्या केली. त्या स्वतः खूप प्रयत्नांनंतर वाचू शकल्या.

जवळच राहणाऱ्या जांगलेट हाओकिप यांनी सांगितलं की, 3 मेच्या रात्री त्यांचा पुतण्या नेहमिनलून यालाही गर्दीनं घेरून त्याची हत्या केली होती.
नेहमिनलूनचे काका जांगलेट हाओकिप यांनी सांगितलं की, "मी जेव्हा त्या घटनेबाबात विचार करतो तेव्हा मला खूप दुःख होतं. ज्या प्रकारच्या अडचणी आणि वेदना आम्ही सहन केल्या आहेत, ते शब्दामध्ये सांगणं कठिण आहे. भविष्याबाबत विचार करुनही चिंता होते."
सामान्य लोकांच्या अडचणींवर तोडगा काय?
या वेदना सहन करणारे लोक, अजूनही स्थिती का सुधारली नाही? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. परिणामी राजधानी इंफाळ आणि कुकी-बहुल चुराचांदपूर यांच्यातील संपर्क अजूनही थांबलेला आहे.
याचा परिणाम 47 वर्षांच्या चिनखोनेंग बायते यांच्यावरही झाला आहे. मदत शिबिरात राहणाऱ्या चिनखोनेंग यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे.

उपचारासाठी त्यांनी जवळपास सर्व मालमत्ता विकली आहे. उपचारासाठी आधी इंफाळला जाणाऱ्या चिनखोनेंग यांना आता रस्त्याच्यामार्गे आयझोलहून गुवाहाटीला जावं लागतं.
आधी जो प्रवास दोन तासांचा होता तो आता सुमारे दोन दिवसांचा झाला आहे. परत आल्यावर तर एवढा थकवा येतो की, सुमारे आठवडाभर आराम करावा लागतो.
"मला भविष्याबाबत माहिती नाही. मला माझं जुनं जीवन आठवतं. तसे याठिकाणचे लोक खूप दयाळू, मदत करणारे आहेत. इथं मोठ्या संख्येनं लोक आहेत, पण शौचालयं फक्तं दोनच आहेत. हे अत्यंत आव्हानात्मक आहे. ही एक सरकारी शाळा आहे. आम्ही इथं किती दिवस राहणार? माझ्या आजाराच्या दृष्टीनं हे योग्य नाही," असं त्या म्हणाल्या.

आदिवासी बहुल चुराचांदपूरमध्ये असलेल्या स्थानिकांच्या मते, जोपर्यंत प्रशासन नसेल, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही.
परिस्थितीचा परिणाम याठिकाणचं शिक्षण, अर्थव्यवस्था यावर पडतो. रस्त्यात आम्हाला लोक बाटल्यांमधून पेट्रोल विकताना दिसले. स्थानिकांच्या मते, महागाई वाढल्यामुळं जीवन जगणं कठिण झालं आहे.
इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमचे प्रवक्ते गिंजा वुअलजॉग सांगतात की, "दोन्ही बाजूंनी एवढा रक्तपात झाला आहे की, आता दोन्हीकडचे लोक एकत्र येतील असं मला वाटत नाही. आम्ही केंद्र सरकारकडं आमच्या राजकीय मागण्या मान्य करून प्रशासन नियुक्त करावं अशी मागणी करत आहोत. हे जेवढ्या लवकर होईल, तेवढ्या लवकर शांतता प्रस्थापित होईल."
पण मेईतेई या मागणीच्या विरोधात आहेत. मेईतेईंच्या हितांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कोकोमी या संस्थेला राहुल गांधींच्या न्याय यात्रेकडून काही अपेक्षा आहेत का?
कोकोमीचे अथुबा खुरइजाम यांच्या मते, "आमच्या दृष्टीनं काँग्रेसनं एक अजेंडा घेऊन काम केल्याचं आम्ही पाहिलेलं नाही. अनेकदा राहुल गांधींनी संसदेत काही प्रमाणात भाजप मणिपूरचं प्रकरणं कसं हाताळत आहे याबाबत असंतोष नक्कीच व्यक्त केला. पण मणिपूरची समस्या ही 2008 पासून सुरू होते. 2008 ते 2017 पर्यंत मणिपूरमध्येही काँग्रेसचं सरकार होत. दिल्लीत 2014 मध्ये आणि मणिपूरमध्ये 2017 मध्ये सरकार बदललं पण तिथलं धोरण कायम राहिलं."
लोक शांततेच्या शोधात
जाणकारांच्या मते, मैतेई आणि कुकी दोघांनाही शांतता हवी आहे. पण परिस्थितीचे परिणाम सामान्य लोक भोगत आहेत.
निवृत्त नोकरशहा आणि स्तंभलेखक डॉक्टर आरके निमाई सिंह म्हणाले की, "दोन्ही बाजू अडून असल्यानं स्थिती खराब आहे. अर्थव्यवस्था असो किंवा आरोग्य, शिक्षण याचा राज्याच्या स्थितीवर परिणाम होत असल्यानं, मेैतेई आणि कुकी दोघांनाही शांतता हवी आहे. चुराचांदपूरमध्ये डॉक्टरांची कमतरता आणि निमोनिया यामुळं मुलांचे मृत्यू होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. दोन्ही बाजुला महागाई वाढली आहे. नेते आरामात आहेत, पण सामान्य नागरिक त्रस्त आहेत."

सीमेवरून तथाकथित घुसखोरी, शस्त्रांचा वापर, ड्रग्जची भूमिका यावर चर्चा सुरू असताना त्याचा परिणाम मणिपूरमध्ये समाजाच्या प्रत्येक वर्गाला भोगावा लागला आहे.
इथं मनामध्येच दुरावा निर्माण झाला आहे. जे लोक आधी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत होते, ते बदलत्या काळाबरोबर एकमेकांपासून दूर गेले आहेत. या हिंसाचाराच्या जखमा अत्यंत खोलपर्यंत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








