मणिपूर : अत्याचार, बलात्कार आणि हत्यांचं भयानक दृश्य - ग्राऊंड रिपोर्ट

- Author, योगिता लिमये
- Role, बीबीसी न्यूज, मणिपूर
हिरव्यागार भाताच्या शेतासमोर एका तात्पुरत्या बनवलेल्या बंकरमध्ये चार माणसं गुडघ्यावर बसले होते.
सिमेंटच्या पिशव्यांपासून बनवलेल्या भिंतीवर त्यांनी आपल्या हातातल्या बंदुका टेकवल्या होत्या.
टिनचं छत बांबूच्या खांबावर विसावलं होतं.
घरगुती बनावटीचं बुलेट प्रूफ जॅकेट घातलेले हे लोक अर्ध्या मैलांपेक्षा कमी अंतरावर असलेल्या शत्रूच्या बंकरवर त्यांच्या शस्त्रांची चाचणी करत होते. एका खांबाला काडतुसाचा पट्टा लटकलेला होता.
इथे बसलेली माणसं ही कुणी लष्करी दलातील सैनिक नाहीत. तर, सर्वजण सामान्य नागरिक असून 'ग्राम सुरक्षा दल'चे सदस्य आहेत. त्यापैकी एकजण वाहनचालक आहे, एक मजूर तर एकजण शेतकरी आहे.
त्यांच्यासोबत तोंबा नामक (बदललेलं नाव) आणखी एक व्यक्ती आहे.
मे महिन्यात मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळण्यापूर्वी तोंबा मोबाइल फोन दुरुस्तीचं दुकान चालवत होते.
वाचकांसाठी सूचना : या लेखात हिंसाचाराचं वर्णन करण्यात आलेलं आहे जे वाचकांसाठी त्रासदायक ठरू शकतं.
भारताच्या या कोपऱ्यात दोन समुदायांमधील दुरावा इतका वाढलाय की जणू दोन देशांच्या सीमेवर सशस्त्र युद्ध लढलं जातंय.
तोंबा सांगतात, "आम्हाला स्वतःचं संरक्षण करावं लागेल कारण आम्हाला वाटत नाही की दुसरं कोणी आमचं रक्षण करू शकेल. मला भीती वाटते पण मला ती लपवावी लागेल."
तोंबा आणि त्यांच्यासोबत बंकरमध्ये उपस्थित असलेले इतर तीन सदस्य बहुसंख्य मैतेई समुदायातील आहेत, जे हिंदू धर्माचं पालन करतात.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
त्यांचा मैतेई समुदाय आणि अल्पसंख्याक कुकी समुदायामध्ये संघर्ष पेटल्यानंतर मणिपूरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या काळात हत्या आणि महिलांवरील लैंगिक गुन्हेही वाढल्याचं पाहायला मिळतंय.
आतापर्यंत 200 हून अधिक लोक मारले गेले आहेत, त्यापैकी दोन-तृतीयांश कुकी लोक आहेत. कुकी समुदायामध्ये एकत्रितपणे कुकी, झोमी, चिन, हमार आणि मिझो जमातींमधील लोकांचा समावेश होतो. यापैकी बहुतेकजण ख्रिश्चन धर्माचं पालन करतात.
4 मे रोजी मैतेई पुरुषांच्या जमावाने कुकी-झोमी समुदायातील दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर धिंड काढली होती. एका लहान मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. तिच्या वडिलांना आणि 19 वर्षीय भावाला बेदम मारहाण करण्यात आली.
पीडितांच्या अंतहीन वेदना
आम्ही या मुलीच्या आईशी बोललो. बलात्काराशी संबंधित भारतीय कायद्यांमुळे आम्ही त्यांची ओळख उघड करू शकत नाही.
हुंदके देत ती म्हणाली की, "माझा नवरा आणि मुलाला मारल्यानंतर माझ्या मुलीचा ज्या पद्धतीने छळ केला ते पाहून माझी स्वतःची जगण्याची इच्छाही मरून गेली आहे. माझ्या पतीला चर्चमध्ये खूप आदर दिला जात होता. ते विनम्र आणि दयाळू होते. त्यांना चाकूने भोसकून मारण्यात आलं.
"माझा मुलगा 12वीत होता. तोही खूप शांत होता. त्याने कधीच कुणाशी भांडण-तंटा केला नाही. त्याला देखील लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली."

फोटो स्रोत, GETTY IMAGES
"त्याच्या बहिणीला वाचवण्यासाठी तो जमावाच्या मागे गेला म्हणून त्याला मारण्यात आलं. माझी मुलगी अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही. तिच्या समोरच तिचे वडील आणि भाऊ मारले गेले. तिला अजूनही जेवायला आणि झोपायला त्रास होतोय. माझ्या कुटुंबासोबत जे काही घडलं, मी कधीही शांततेत जगू शकणार नाही," त्या पुढे सांगतात.
मे महिन्यात तक्रार दाखल करूनही पोलिसांनी तपास केला नाही. जुलैमध्ये या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर आल्यावर तपास सुरू झाला. त्यानंतर भारतातील आणि जगभरातील अनेकांच लक्ष मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाकडे वेधलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी बोलले?
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मणिपूर हिंसाचारावर आपलं मौन सोडलं.
हिंसाचार कसा सुरू झाला याबद्दल वेगवेगळे तर्क-वितर्क मांडले जात आहेत. मैतेई समुदायाचे लोक प्रामुख्याने राज्यातील सर्वात समृद्ध इंफाळ खोऱ्यात राहतात. हे क्षेत्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 10 % आहे.
राज्याचा उर्वरित भाग तुलनेने कमी विकसित असलेल्या डोंगराळ भागांनी भरलेला आहे. या भागात अल्पसंख्याक समुदाय राहतो, त्यापैकी कुकी समाजाला जमातीचा दर्जा देण्यात आला होता.
भारतात, मागासलेल्या आणि वंचित समुदायांची ओळख, जमीन, संस्कृती आणि भाषा यांचं संरक्षण व्हावं म्हणून हा दर्जा घटनात्मक व्यवस्थेअंतर्गत दिला जातो.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
कुकी समाजाला मिळालेल्या या दर्जामुळे मैतेई समाजाच्या लोकांना डोंगरात जमीन खरेदी करण्याची परवानगी नाही. त्याउलट कुकी राज्यात कुठेही जमीन खरेदी करू शकतात.
3 मे रोजी मैतेई समाजाला आदिवासी दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात कुकी समाजाच्या लोकांनी रॅली काढून निषेध केला.
कुकी यांनी आरोप केलाय की, या काळात कट्टरतावादी मैतेई गटांनी इंफाळ आणि आसपास राहणाऱ्या अल्पसंख्याक कुटुंबांवर हल्ले केले. तर मैतेई म्हणतात की रॅली काढणाऱ्या कुकी समाजाच्या लोकांनी हिंसाचाराची सुरूवात केली.
मैतेई आणि कुकी यांच्यातील वाढती दरी
नेमकं काय घडलं याचा बीबीसी स्वतंत्रपणे तपास करू शकत नाही. पण, हिंसाचाराच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कुकी समुदायाचे बहुसंख्य लोक मारले गेले होते.
हिंसाचार इतका वाढला की, दोन्ही समुदायांची शेकडो घरं जाळली किंवा उद्ध्वस्त केली गेली. चर्च आणि मंदिरेही जाळण्यात आली. एका अंदाजानुसार, दोन्ही समुदायातील सुमारे 60 हजार लोक विस्थापित झाले. हे लोक शाळा, क्रीडा संकुल किंवा इतर ठिकाणी राहत आहेत आणि त्यांना त्यांच्या घरी परतणं अशक्य आहे.
हिंसाचार सुरू होऊन चार महिने लोटले तरी मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमध्ये अंतर कायम आहे. ते एकमेकांच्या प्रभावाखालील क्षेत्रात जाऊ शकत नाहीत.
मैतेई वर्चस्व असलेल्या इंफाळपासून ते दक्षिणेकडील कुकी समाजाचं वर्चस्व असलेल्या चुराचांदपूरपर्यंत सुमारे 60 किलोमीटरचा प्रवास करताना आम्हाला सात पोलीस आणि लष्करी चौक्या लागल्या.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
दोन्ही बाजूला डझनभर महिलांनी उभारलेल्या चौक्यांवर आम्हाला आमची प्रेस कार्ड दाखवावी लागली आणि अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. त्यांच्या परवानगीशिवाय आम्हाला आत जाता येत नव्हते. यावरून इथे सरकारचं नियंत्रण नसल्याचं दिसून येतं.
मैतेई समाजाच्या बंकरमध्ये आम्ही तोंबाला भेटलो तेव्हा ते आणि इतर लोक दिवसाढवळ्या शस्त्र घेऊन फिरत असल्याचं पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. त्यांना पोलिसांची किंवा सुरक्षा दलांची भीती नव्हती.
मैतेई आणि कुकी भागाच्या सीमेजवळ नागरिक शस्त्रे घेऊन मुक्तपणे फिरताना आम्हाला दिसले. पोलीस आणि सुरक्षा दल समोर असतानाही ते असं फिरत होते. अल्पवयीन मुलांनी देखील बंदुका धरल्याचं आम्हाला दिसलं.
लोकांच्या पोलिसांविरुद्ध काय तक्रारी आहेत?
30 ते 40 च्या दरम्यान वय असलेले तोंबा सांगतात, "एक महिन्यापूर्वी, माझ्या गावातील एका माजी सैनिकाने मला बंदूक वापरण्याचं प्रशिक्षण दिलं. या बंदुका गावकऱ्यांनी गोळा केल्या आणि आम्हाला दिल्या."
तोंबा यांनी सांगितलं की, "ते 24 तास पहारा ठेवतात. प्रत्येक कुटुंबातील एका पुरुषाने ड्युटी पोस्टवर पहारा देणं आणि एका महिलेने चेकपोस्टवर पहारा देणं आवश्यक आहे. पोलीस कधीच वेळेवर येत नाहीत हा आमचा अनुभव आहे. केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या सुरक्षा दलांवर आमचा विश्वास नाही. त्यांना कुकी समाजासाठी तैनात करण्यात आलंय. असं असूनही, कुकी आमच्या गावापर्यंत कसे पोहोचले?
"आम्ही बंकरमधून बाहेर पडलो तेव्हा स्फोटाचा आवाज ऐकू आला. कुठेतरी मोर्टार शेल फुटल्यासारखं वाटत होतं. पण कोणत्या बाजूने गोळीबार झाला हे सांगणं कठीण आहे."

तोंबा यांनी जे काही सांगितलं त्यातून या गुंतागुंतीच्या संघर्षाचा आणखी एक पदर उलगडला.
मणिपूरचे पोलीस राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. इथे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग आहेत. कुकी समुदायातील लोकांनी आम्हाला सांगितलं की, त्यांचा बिरेन सिंग आणि मणिपूर पोलिसांवर विश्वास नाही.
याशिवाय आसाम रायफल्सचे जवानही मणिपूरमध्ये तैनात करण्यात आले आहेत. हे अराजकता विरोधी दल केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते.
मैतेई समाजाच्या लोकांनी सांगितलं की, त्यांना आसाम रायफल्स कुकी समाजासोबत आहे असं वाटतं.
मैतेई लोकांचं वर्चस्व असलेल्या भागात पोलिसांच्या शस्त्रागारातून हजारो शस्त्र लुटण्यात आली आहेत.
मणिपूर पोलीस आणि आसाम रायफल्स यांना बीबीसीने विचारलं की, ते कोणा एकाच्या बाजूने आहेत का? सशस्त्र नागरिकांना का अटक केली जात नाही? त्यांचे परवाने का तपासले जात नाहीत? यावर दोघांनीही उत्तर देण्याचं टाळलं.
सामान्य लोक करतात युद्धाची भाषा
पोलिसांनी आम्हाला त्यांच्या एक्स (ट्विटर) वरील अकाउंटला भेट देण्यास सांगितलं. त्यावर जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांची छायाचित्रे पोस्ट केली जात आहेत.
मणिपूरमधील हिंसाचारामुळे आतापर्यंत किमान सहा पोलीस अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आसाम रायफल्सने आम्हाला एक रेकॉर्ड केलेला व्हीडिओ मेसेज पाठवला होता. यात त्यांचे महासंचालक सांगत होते की, ते शस्त्रे जप्त करत आहेत आणि निष्पक्षपणे आपले कर्तव्य बजावत आहेत.
तोंबाच्या बंकरपासून अर्ध्या मैलाहून कमी अंतरावर असलेल्या दुसऱ्या बंकरमध्ये खाखम (नाव बदललं आहे) बसले होते. त्यांच्या हातात डबल बॅरल शॉटगन होती. ते कुकी-झोमी जमातीचे आहेत. ते मजुरी आणि शेती करतात.

ते म्हणतात, "आम्ही इथे कोणत्याही वाईट हेतूने बसलेलो नाही. आम्हाला हिंसा नको आहे. मैतेई समुदायाच्या लोकांनी आम्हाला आमच्या संरक्षणासाठी शस्त्र उचलण्यास भाग पाडलं."
"पोलिसांनी त्यांना सोडून दिल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही," असा दावा त्यांनी केलाय.
खाखमला शस्त्र आणि प्रशिक्षण मिळण्याची गोष्ट तोंबांसारखीच आहे.
दोन्ही बाजूने युद्धाची भाषा वापरली जात आहे. दोन बंकरमधील क्षेत्राला 'फ्रंट लाईन', 'बफर झोन' किंवा 'नो मॅन्स लँड' असं म्हटलं जातंय.
खाखम म्हणतात, "आता आम्ही मैतेई समाजासोबत एकत्र राहू शकत नाही. हे अशक्य आहे."
भावाच्या मृत्यूचं दुःख
जेव्हा तुम्हाला हिंसाचाराबद्दल तपशीलवार माहिती मिळते, तेव्हा तुम्हाला समजतं की कटुता इतक्या लवकर आणि इतक्या प्रमाणात का वाढली आहे.
कुकी-हमार समुदायाशी संबंधित असलेले 33 वर्षीय डेव्हिड तुओलोर लांगझा (ग्रामीण सुरक्षा दल) चा भाग होते. मैतेई समाजाच्या जमावाने डेव्हिड यांना 2 जुलै रोजी त्यांच्या गावातून पकडल्याचं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
त्यांच्या मृत्यूनंतर एक ऑनलाईन व्हीडिओ समोर आला. यामध्ये त्यांचे छाटलेले शीर कुंपणात अडकलेले दिसले.

डेव्हिडचा धाकटा भाऊ अब्राहम सांगतो की, "हे बघणं खूप वेदनादायक होतं. मला झोप येत नाहीये. मी माझ्या फोनमध्ये त्याचे फोटो देखील ठेवलेले नाहीत, कारण ते बघून मला तेच आठवते. खूप त्रास होतो आणि मी तसाच विचार करू लागतो."
अब्राहम सांगतो की, डेव्हिडचा छळ करून ठार मारण्यात आलं. नंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला. नंतर काही हाडं सापडली. ही हाडं डेव्हिडची असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांचं मत आहे.
डेव्हिडच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी म्हणजेच 7 जुलै रोजी मैतेई समाजातील 29 वर्षीय नगालाईबा सगोलसेम, उत्तर मणिपूरमधील कुकी-प्रभावित भागाजवळून बेपत्ता झाले.
एका दिवसानंतर, एक व्हीडिओ समोर आला ज्यामध्ये ते जमिनीवर गुडघे टेकून बसले होते. पाठीमागे हात बांधलेले असून चेहऱ्यावर रक्ताचे डाग होते. काही लोक त्यांना मारहाण करत होते. 2 महिन्यांनंतर, त्यांचा आणखीन एक व्हीडिओ समोर आला ज्यामध्ये ते त्याच अवस्थेत होते. त्यानंतर नगालाईबाच्या डोक्यावर गोळी झाडून त्यांना खड्ड्यात टाकण्यात आलं.
मुलगी परतण्याची वाट पाहत बसलेले वडील
कुकी समाजातील लोकांनी त्यांची हत्या केल्याचं नगालाईबाच्या कुटुंबीयांना वाटतं.
दहा वर्षांपूर्वी शाळेत भेटलेल्या नगालाईबा आणि सिल्बियाचा प्रेमविवाह झाला होता.
सिल्बिया सांगतात, "तो अतिशय साधा माणूस होता. सर्वांचं त्यांच्यावर प्रेम होतं. त्यांचं वागणं लहान मुलांसारखंच होतं आणि त्यांना मुलांसोबत खेळायला खूप आवडायचं. आमच्या जीवनात आनंदी आनंद होता."
हे सांगताना सिल्बियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्यानं दोन मुलं आहेत. एक चार वर्षांचा आहे, तर दुसरा सात महिन्यांचा आहे.
रडत रडत त्या सांगतात, "मोठा मुलगा विचारतो की पप्पा कुठे आहेत. आम्हाला त्यांचा मृतदेह सापडला नाही, त्यामुळे ते परत येतील अशी मला आशा आहे. मी अनेकदा दार उघडून त्यांची वाट पाहत असते. मी त्यांच्या नंबरवर कॉल करत असते."

इंफाळ शहरात आणखी एक कुटुंब आपल्या मुलीची काहीतरी बातमी येईल म्हणून वाट पाहत आहे. 6 जुलै रोजी, 17 वर्षांची मैतेई समाजातील लिन्थोइगम्बी हिजाम तिचा मित्र हेमनजीत सिंग सोबत कुकीबहुल भागातून बेपत्ता झाली होती.
यानंतर त्यांचे फोन बंद येऊ लागले. मुलीचे वडील कुलजीत हिजाम दावा करतात की, त्यांच्या मुलीच्या मित्राचा मोबाइल कुकी महिलेच्या नावाने नोंदणीकृत सिमकार्डने चालू झाला होता. त्यांच्या समाजातील लोकांच्या मदतीने त्यांना ही माहिती मिळाली.
ते म्हणतात की, "आमच्या मुलीचं काय झालं हे जाणून घेण्यासाठी कोणीही आम्हाला मदत करत नाही. मला खूप असहाय्य वाटतंय.'
"मला माहीत आहे की जर माझ्या मुलीला तिच्या अपहरणकर्त्यांशी बोलण्याची संधी मिळाली तर ती त्यांना तिला सोडून देण्यास पटवू शकेल. मला वाटतं की ती परत आल्यावर ती मला आश्चर्यचकित करेल."
तणावामागचं कारण काय आहे?
आतापर्यंत दोन्ही बाजूंनी कोणताही संवाद प्रस्थापित झालेला नाही. शिवाय कुकी प्रभावित भागात पोलिसांनाही जाता आलेलं नाही. अशा स्थितीत कुलजित सारख्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार?
जमिनीवरील हक्क हे या तणावामागचं कारण आहे. मैतेई समुदाय राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आहे. राज्याचे बहुतांश मुख्यमंत्रीही मैतेई समाजाचेच राहिले आहेत.
तणावाचं आणखी एक कारण म्हणजे म्यानमारमधील जमातींतील लोकांचा वाढता ओघ. हे लोक वांशिकदृष्ट्या कुकी समुदायासारखे आहेत. डोंगराळ भागात अफूची बेकायदेशीर शेती हे देखील संघर्षाचं एक कारण आहे.
मैतेई आणि कुकी समाजाच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की, ते राज्य सरकारवर नाराज आहेत. कुकींचा आरोप आहे की सरकार त्यांच्या विरोधातील हिंसाचाराचे समर्थन करते, तर मैतेई म्हणतात की सरकारने हिंसाचार थांबवण्यासाठी काहीही केलं नाही.
मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या मुलाखतीसाठी त्यांच्या कार्यालयाला विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांच्या कार्यालयाने विनंतीला प्रतिसाद दिला नाही. ईमेलद्वारे पाठवलेल्या प्रश्नांचीही उत्तरं दिली नाहीत.

मैतेई आणि कुकी हे दोन्ही समुदाय केंद्र सरकारवर नाराज आहेत.
मैतेई समाजाचे तोंबा म्हणतात, "कुकी महिलेचा व्हीडिओ समोर आल्यानंतरच पंतप्रधान मोदी बोलले याचं मला खूप वाईट वाटलं. मणिपूर हा भारताचा भाग नाही का? आमच्याकडे दुर्लक्ष का केलं जात आहे?"
मणिपूरचं सरकारही नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाकडून चालवलं जात आहे. अशा स्थितीत केंद्राची इच्छा असेल तर हे संकट तातडीने दूर होऊ शकतं असं राज्यातील अनेकांना वाटतं.
खाखम म्हणतात, "आतापर्यंत आम्हाला त्यांच्याकडून (भारतीय सरकार) काहीच ऐकायला मिळालेलं नाही. त्यांना भारतीय नागरिकांच्या जीवनाची आणि त्यांच्या समस्यांची पर्वा नाही. आम्ही त्यांची प्राथमिकता नाहीये असं दिसतंय."
कुकी समाज राज्यात वेगळ्या प्रशासनाची मागणी करत असल्याचंही खाखम यांनी सांगितलं.
मणिपूरमध्ये शांतता?
मणिपूरमध्ये हळूहळू शांतता प्रस्थापित होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
मात्र गेल्या तीन आठवड्यांत या भागात हिंसाचाराच्या किमान पाच घटना घडल्या आहेत.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
रजेवर आलेल्या भारतीय लष्कराच्या जवानाचे इंफाळ येथील घरातून अपहरण करून हत्या करण्यात आल्याची ताजी घटना गेल्या रविवारी घडली.
हजारो सशस्त्र, संतप्त आणि घाबरलेल्या नागरिकांच्या मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि संवेदनशील आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








