मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, वृद्धाच्या हत्येनंतर झालेल्या हिंसाचारात चौघांचा मृत्यू

मणिपूर

फोटो स्रोत, ANI

मणिपूरमध्ये आसामच्या सीमेलगत असलेल्या जिरीबाम जिल्ह्यात शनिवारी (7 सप्टेंबर) सकाळी झालेल्या हिंसाचारात चार संशयित कट्टरपंथी आणि एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

संरक्षण दलांनी दिलेल्या माहितीनुसार जिरीबामच्या मोंगबुंग गावाजवळ ही घटना घडली. काही संशयित कट्टरपंथींनी मैतेई समाजाच्या वाय कुलचंद्र या वयस्कर व्यक्तीची घरातच हत्या केल्यानंतर तिथे हिंसा पेटली.

सध्या या परिसरात तणाव वाढला आहे आणि सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत.

63 वर्षीय कुलचंद्र यांची पत्नी वाय बेम्चा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पाचच्या सुमारास त्या स्वयंपाक करत होत्या, त्यावेळी तीन हत्यारबंद हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले आणि नवऱ्याला गोळी मारून पळून गेले. ही घटना घडली, ते निंगथेम खुनौ हे गाव जिरीबाम पोलिस स्टेशनपासून काही किलोमीटरवरच आहे.

मणिपूर पोलीस

फोटो स्रोत, MANIPUR POLICE

स्थानिक सांगतात की, या घटनेनंतर मैतेई समाजाच्या सशस्त्र गटात आणि कुकी जमातीचे ‘ग्राम रक्षा स्वयंसेवक’ यांच्यात शनिवारी (7 सप्टेंबर) सकाळीपासून गोळीबार सुरू झाला.

मणिपूरमध्ये तैनात संरक्षण अधिकाऱ्यानं माहिती दिली आहे की, "सकाळी कट्टरपंथींच्या गावात घुसून एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर या परिसरात गोळीबार सुरू झाला. ही हत्या मैतेई आणि कुकी समुदायातल्या जातीय संघर्षातून घडली आहे. आम्हाला रिपोर्ट मिळाला आहे की मरणाऱ्यांमध्ये मैतेई आणि कुकी, या दोन्ही समुदायांचे लोक आहेत. "

दरम्यान, पोलिसांनी दावा केला आहे की राज्यात हिंसाचाराच्या ताज्या घटनेत अत्याधुनिक ड्रोन आणि आरपीजी (रॉकेट प्रोपेल्ड गन) म्हणजे खांद्यावर ठेवून रॉकेट दागणारी गन वापरण्यात आली आहे.

अशी हत्यारं साधारणपणे युद्धादरम्यान वापरली जातात. सामान्य नागरिकांविरोधात यांचा वापर हा एक मोठा आणि चिंताजनक बदल आहे.

"यासाठी हल्लेखोरांना ट्रेनिंग, तांत्रिक विशेषज्ञता आणि मदती मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही," असं पोलिसांनी म्हटलं आहे.

मणिपूर पोलीस

फोटो स्रोत, MANIPUR POLICE

दरम्यान, मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी शनिवारच्या हिंसक घटनेनंतर संध्याकाळी चार वाजता कॅबिनेट बैठक बोलावली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारनं केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे आणि कट्टरपंथी संघटनांनी ड्रोन, बाँब आणि रॉकेट लाँचरसारख्या गोष्टी वापऱ्याच्या मुद्द्यावरून कडक कारवाईची विनंती केली आहे.

मणिपूर गेल्या जवळपास सोळा महिन्यांपासून जातीय संघर्षानं ढवळून निघालं आहे. 27 मार्च 2023 रोजी मणिपूर हायकोर्टानं राज्य सरकारला आदेश दिला की मैतेई समुदायाला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करण्याविषयी लवकर विचार केला जावा.

त्या आदेशानंतर हिंसाचाराच्या घटना सुरु झाल्या ज्यात अनेकांचा जीव गेला, हजारो बेघर झाले आणि सार्वजनिक संपत्तीचंही नुकसान झालं.