You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुम्ही अतिसंवेदनशील पालक आहात की नाही हे कसं ओळखायचं?
जर एखाद्यानं लहान मुलांच्या आई-वडिलांना त्यांना कधी मुलांच्या बाबतीत कंटाळा आल्याची भावना निर्माण झाली आहे का? असा प्रश्न विचारला तर, कदाचित सर्वांचंच उत्तर 'हो' असेल.
कोणत्याही घरात अगदी कितीही चांगले आणि शांत वातावरण असलं तरी मुलांचा गोंधळ आणि मस्ती कधी-कधी जास्त होऊ लागते आणि त्यानं आई-वडिलांना कंटाळा येतो, असं होतंच.
ही अगदी सामान्य वाटत असली, तरी आपल्या व्यक्तिमत्त्वातील अशी बाब आहे, ज्यामुळं कौटुंबिक जीवनावर परिणाण होऊ शकतो.
2018 मधील एका सर्वेक्षणानुसार, सुमारे 20 ते 30 टक्के लोक 'हायली सेंसिटिव्ह पर्सन' (एचएसपी) म्हणजे अतिसंवेदनशील असतात.
ही संवेदनशीलता एखादा सुगंध, दृश्य किंवा आवाजाच्या बाबतीतही असू शकते. अशा लोकांना चमकदार आणि भडक रंग किंवा मोठ्या आवाजाचाही त्रास होतो.
शास्त्रज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये या विषयावर अधिक चर्चा होऊ लागली आहे.
सर्वात पहिला प्रश्न असा निर्माण होतो की, तुम्ही अतिसंवेदनशील व्यक्ती आहात किंवा नाही हे कसं समजेल?
तुम्ही किती संवेदनशील आहात?
यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठाशी संलग्न अनेक शास्त्रज्ञांनी एक नवीन फ्री ऑनलाइन टेस्ट विकसित केली आहे.
त्यात त्यांच्या असं लक्षात आलं की, अत्यंत संवेदनशील असणं हा काही आजार किंवा समस्या नाही. हे केवळ आपल्या व्यक्तीमत्त्वातील एक ट्रेट (वैशिष्ट्य) आहे.
सामान्य भाषेत सांगायचं झाल्यास, तुम्ही आजुबाजुच्या परिस्थितीत कशी प्रतिक्रिया देता, त्या आधारावर तुम्ही किती संवेदनशील आहात, हे ठरत असते.
सामान्य लोकांसाठी ही फारशी महत्त्वाची बाब नसली तरी, आई-वडिल असलेल्यांनी अतिसंवेदनशील असणं, ही मोठी बाब आहे.
दिल्लीतील वरिष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉक्टर शेख अब्दुल बशीर यांच्या मते, ट्रेट आणि डिसऑर्डर यात फरक असतो. तसंच प्रत्येक ट्रेट म्हणजे डिसऑर्डर नसते.
एखाद्या व्यक्तीच्या सवयीमुळं आपल्या जीवनावर परिणाम होऊ लागतो, तेव्हा ती डिसऑर्डर असते, असं त्यांचं मत आहे.
अतिसंवेदनशील असलेले आई-वडिल अस्थित वातावरणात ज्या आव्हानांचा सामना करतात, त्यामुळं त्यांच्या मुलांच्या पालन-पोषणावर वाईट परिणाम होतो, असं मत लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीतील डेव्हलपमेंटल सायकॉलॉजिस्ट आणि फ्री ऑनलाइन टेस्ट तयार करताना सहकारी असलेले, मायकल प्लूइस यांनी मांडलं.
अशा आई-वडिलांनासाठी पालकत्वाचा सुरुवातीचा काळ अत्यंत तणावाचा असतो, हे संशोधनातून समोर आलं आहे.
पण जेव्हा त्यांची मुलं नऊ महिन्यांची होतात, त्यानंतर त्यांच्या पालकत्वामध्ये बऱ्याच सुधारणा होऊ लागतात.
आणखी एक विशेष बाब म्हणजे, संशोधनातून हे समोर आलं आहे की, अतिसंवेदनशील असण्याचे काही फायदेही आहेत.
अतिसंवेदनशील आई-वडिल त्यांच्या मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतात आणि त्यांच्या गरजांनुसार अधिक लवकर आणि चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात, असं प्लूइस सांगतात.
भारतातही याबाबत चर्चा नक्कीच सुरू झाली आहे, पण देशात नेमके किती लोक अतिसंवेदनशील आहे, याबाबत अधिकृत आकडा आलेला नाही.
भारतात अशा प्रकारचा शोध अद्याप लागलेला नाही. पण भारतात हा मोठा मुद्दा आहे, असं समजणाऱ्या पालकांची संख्या खूप मोठी आहे, असं डॉक्टर शेख अब्दुल बशीर म्हणाले.
पेरेंटिंग कोच रिद्धी देवरा यांच्या मते, आई-वडिलांना संवेदनशील किंवा असंवेदनशील अशा गटांत ठेवता येणार नाही. हे मोठ्या प्रमाणात आपल्या आजुबाजुचं वातावरण आणि तुमच्या मूडवरही अवलंबून असतं.
अतिसंवेदनशील असणं यात वाईट असं काही नाही, पण कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा असणं वाईट असतं, असंही रिद्धी यांनी म्हटलं.
त्यांच्या मते, पालकत्वाचे दोन मुद्दे महत्त्वाचे असतात, केअर आणि कंट्रोल. जर तुम्हाला मुलांची फक्त काळजी असेल, पण तुम्ही त्यांना मर्यादा घालत नसाल, तर ते मुलांसाठी तोट्याचं ठरू शकतं. जास्त प्रेमामुळंही मुलांचं नुकसान होऊ शकतं, असंही त्या म्हणाल्या.
परमिसिव्ह पॅरेंटिंग मुलांसाठी योग्य नाही, असंही रिद्धी यांनी सांगितलं. परमिसिव्ह पॅरेंटिंग म्हणजे, मुलांना अशा प्रकारे वाढवणं की, त्यांना थोडाही त्रास झाला तर ते आई-वडिलांना सहन होत नाही.
असं करणं मुलांसाठी हानिकारक ठरू शकतं. कारण जेव्हा मुलं घराबाहेर पडतात तेव्हा ते यामुळं नव्या वातावरणात, अॅजेस्ट करू शकत नाहीत.
मुलांची तुलना रोपाबरोबर करत रिद्धी यांनी हे समजावून सांगितलं. ज्या प्रकारे रोपाला पाणी सूर्याचा प्रकाश दोन्हीची गरज असते, त्याच प्रकारे मुलांनाही केअर आणि कंट्रोल दोन्ही गरजेचं असतं.
मूल जर इलेक्ट्रिकल बोर्डला हात लावत असेल, तर त्याला थांबवणं हे तुमचं कर्तव्य आहे.
पालकांप्रमाणे मूलही अतिसंवेदनशील असेल तर...
रिद्धी देवरा सांगतात की, बहुतांश मुलं ही संवेदनशील असतात. त्यांच्या मते, सर्व मुलाच्या चार इच्छा असतात.
त्या म्हणजे - मला प्रत्येक गोष्ट मिळायला हवी, मला कोणीही कशासाठीही नकार द्यायला नको, मी एखाद्या स्पर्धेत भाग घेतला तर मीच पहिल्या स्थानी असायहला हवं आणि माझ्याकडे प्रत्येक गोष्ट सर्वोत्तमच असली पाहिजे. जर पालक मुलांना या सर्व गोष्टी देऊ शकले नाही, तर मूल संवेदनशील बनतं.
मुलांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवावं, हे आई वडिलांनी मुलांना समजवायला हवं.
अतिसंवेदनशील लोकांची तुलना ऑर्किडच्या फुलाशी आणि कमी संवेदनशील लोकांची तुलना डॅनडेलियनबरोबर केली जाते.
ऑर्किडच्या फुलाशी तुलना करण्याचे कारण म्हणजे, योग्य परिस्थिती नसेल तर, त्यांच्यासाठी सर्वाइव्ह करणं आणि पुढे जाणं कठिण ठरतं.
कमी संवेदनशील लोकांची तुलना डॅनडेलियन फुलाशी करण्याचं कारण म्हणजे, ते कोणत्याही वातावरणात सहज सर्वाइव्ह करतात.
अतिसंवेदनशीलता आणि सर्वाइव्हल
रिद्धी देवरा यांच्या मते, आपण जग बदलू शकत नाही. त्यामुळं मुलांना या जगात सर्वाइव्ह करण्यासाठी तयार करणं हे आई-वडिलांचं काम आहे. मुलं बाहेर पडतील तेव्हा त्यांना इतरांबरोबर प्रेमानंही राहायचं आहे, पण सोबतच त्यांना स्वतःचा बचावही करायचा आहे.
स्वतःला वाचवण्यासाठी त्यांच्याच डॅनडेलियनचा गुण असायला हवा, तर इतर लोकांशी संबंध निर्माण करण्यासाठी ऑर्किडचं वैशिष्ट्य असायला हवं.
मूल असं असावं यासाठी पालकांनी मुलांना तशा पद्धतीनं मोठं करणं किंवा वाढवणं गरजेचं आहे.
तुम्ही प्रत्येकवेळी मुलांनी कठोरपणे वागत असाल तर, कदाचित ते मूल बंडखोर बनण्याची शक्यता असते. तसं झालं नाही तर ते तुमच्या प्रत्येक गोष्टीत होकार देत राहिल्यानं त्याचं व्यक्तिमत्वच दबून जाईल. त्यामुळं मुलांनी बंडखोर बनणं किंवा दबून राहणं दोन्हीही मुलांसाठी योग्य नाही.
म्हणजेच, पालकांनी मुलांना ऑर्किड आणि डॅनडेलियन दोन्हींची वैशिष्ट्ये रुजवत वाढवणं हेच सर्वोत्तम असल्याचं, रिद्धी देवरा म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)