You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगभरातील महिलांवर पूर्णवेळ नोकरी सोडून स्वयंरोजगार करण्याची वेळ का आली आहे?
- Author, आदर्श राठोड
- Role, बीबीसी हिंदीसाठी
कोरोनाची साथ असताना 34 वर्षीय उर्वशी यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता.त्यावेळी त्या मेरठमधील एका खासगी शाळेत सामाजशास्त्र शिकवत होत्या.
काही काळ त्यांनी घरूनच ऑनलाइन क्लासेस घेणं सुरू ठेवलं पण नंतर त्यांना शाळेत येण्यास सांगण्यात आलं.
उर्वशी सांगतात, "माझा नवरा बँकिंग सेक्टरमध्ये असल्यामुळे त्यांना सतत ऑफिसला जावं लागायचं. मी पण शाळेत जाऊ लागली तर मुलाची काळजी कोण घेणार? खूप विचारविनिमय केल्यानंतर, मी नोकरी सोडली आणि तेव्हापासून ट्युशन घेत आहे."
असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील हर्शे शहरात बालरोगतज्ज्ञ डॉ.अमाका नामानी यांच्यासोबत घडला. 38 वर्षांच्या नमानी यांना दोन मुलं असून एक आठ वर्षांचा आणि दुसरा सहा वर्षांचा आहे.
जेव्हा कोरोनाची साथ आली तेव्हा त्या तिसऱ्यांदा गरोदर होत्या. 2020 च्या उन्हाळ्याच्या काळात त्यांनी तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्या बऱ्या होत होत्या, तर दुसरीकडे त्यांना घरी मोठ्या मुलांचा अभ्यास घ्यावा लागलं होतं. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात त्यांना आणि त्यांच्या नवरा दोघांनाही ऑफिसला जावं लागलं.
डॉ. नमानी म्हणतात, "मला रूग्णांना तपासायला आणि हॉस्पिटलमध्ये सहकाऱ्यांसोबत काम करायला खूप आवडायचं. परंतु बाल संगोपन व्यवस्थेच्या अभावामुळे काम करणं शक्य झालं नाही."
डॉ. नामानी एक सल्लागार म्हणून स्तनपानावर मार्गदर्शन करतात आणि लेखिकासुद्धा आहेत.
ज्यांनी कोव्हिडमुळे पारंपारिक नोकऱ्या सोडून स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारला आहे अशा गटात त्या सामील झाल्या.
स्वयंरोजगार आणि उद्योजकतेचे अनेक फायदे आहेत, परंतु उर्वशी आणि डॉ. नमानी सारख्या महिलांसाठी नोकरी सोडणं हा पर्याय नसून जबरदस्तीचा निर्णय होता हे एक कटू वास्तव आहे.
कोव्हिडच्या साथीच्या काळात अनेक महिलांना स्वयंरोजगाराचा अवलंब करावा लागला.
कुटुंबाच्या जबाबदारीचं ओझं
भारतात स्वयंरोजगार स्वीकारणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे असं बंगळुरूच्या अझीम प्रेमजी विद्यापीठानं सप्टेंबर 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे.
'स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2023' या शीर्षकाच्या अहवालात असं म्हटलं आहे की जून 2018 मध्ये संपलेल्या तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये भारतातील स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांची संख्या 14 टक्क्यांनी वाढून 65 टक्क्यावर गेली आहे.
या अहवालानुसार, 'आर्थिक प्रगतीमुळे नाही तर पर्याय नसल्यानं असं घडलं असण्याची शक्यता आहे.'
त्याचप्रमाणे, अमेरिकेच्या सेंटर ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च (CEPR)च्या अहवालात असं म्हटलं आहे की, 2019 ते 2022 च्या पहिल्या सहामाही दरम्यान स्वयंरोजगार करतो असं सांगणाऱ्या अमेरिकन लोकांच्या संख्येत चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोरोनाच्या साथीदरम्यान, पुरुषांपेक्षा जवळजवळ दुप्पट महिलांनी आपण स्वयंरोजगार करत असल्याचं सांगितलं.
कॅन्सस विद्यापीठातील स्कूल ऑफ पब्लिक अफेअर्स अँड अॅडमिनिस्ट्रेशनमधील सहयोगी प्राध्यापक मिस्टी ए. हेगिनेस यांचं म्हणणं आहे की नवीन काहीतरी शोधणार्या लोकांमुळे स्वयंरोजगार करणाऱ्यांमध्ये उसळी निर्माण झाल्याचं दिसत आहे.
नऊ ते पाच पर्यंत काम करणं हे अनेक लोकांसाठी, विशेषतः नोकरी करणाऱ्या मातांसाठी योग्य नाही असं त्यांचं मत आहे.
प्रोफेसर हेगिनेस म्हणतात, "लोकांना काम करण्याची वेळ आणि कार्यपद्धती यात अधिक लवचिकता हवी आहे.
"अशा परिस्थितीत स्वयंरोजगार हे मातांसाठी योग्य आहे. त्या इतकं काही करून कंटाळल्या आहेत पण तरीही त्यांना काम आणि करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे.
अशा परिस्थितीत, त्यांनी ठरवलंय की स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा बॉस बनून त्या करिअर आणि आयुष्य यांच्यात चांगला समतोल निर्माण करू शकतात.
नोकरी सोडण्याचं कारण
प्राध्यापक मिस्टी ए. हेगिनेस म्हणतात की अमेरिकेत नोकरी करणाऱ्या पालकांसाठी मुलांची काळजी घेणं कठीण आणि खूप महाग आहे. त्यामुळं जबाबदारी फक्त महिलांवरच पडते.
त्या म्हणतात की काही महिलांकडे इतर संसाधनं किंवा बचतीचे पैसे होते किंवा त्यांचा जोडीदार जास्त कमवत होता. अशा स्थितीत मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिनं आपलं काम सोडलं.
पण प्रत्येकाला नोकरी सोडणं सोपं नसतं. प्रो. हेगिन्स म्हणतात, "अनेक मातांकडे काम सोडण्याचा पर्याय नव्हता. त्यांच्या कमाईतूनच घर चालत, अशा परिस्थितीत, त्यांना स्वयंरोजगार करणं भाग पाडतं, जेणेकरून त्या त्यांच्या मुलांचं पालन पोषण करू शकतील."
भारतातही नोकरदार महिलांवर पारंपरिक सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा दबाव असतो. नोकरीसोबतच त्यांना मुलांची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी लागते.
'स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2023' अहवालात असंही म्हटलं आहे की, भारतातील विविध व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या नोकरीसोबतच मुलांची काळजी घेण्याची जबाबदारीही उचलावी लागते.
त्याच वेळी, ज्यांनी सीईपीआरच्या संशोधनात योगदान दिलं आहे अशा अर्थशास्त्रज्ञ ज्युली काई म्हणतात की ज्या अमेरिकन महिलांनी नोकऱ्या सोडून स्वयंरोजगार केला त्यापैकी बहुतेकांची मुलं खूपच लहान होती.
त्या सांगतात की, "डेटा दाखवतो की सहा वर्षांखालील मुलांच्या पालकांनी स्वयंरोजगार स्वीकारण्याची शक्यता जास्त असते. " कमी उत्पन्न असलेल्या आणि अल्प शिक्षित स्त्रियांच्या बाबतीत असंच घडतं."
यावर उपाय काय?
मजबुरीनं नोकरी सोडून स्वयंरोजगार स्वीकारण्याची प्रवृत्ती थांबवण्यासाठी सूचना देताना अर्थतज्ज्ञ काई या सांगतात की , "कंपन्यांनी मुलांचं संगोपन आणि महिलांच्या कामांच्या वेळेबाबत लक्ष द्यायला हवं."
हे अल्पशिक्षित आणि कमी उत्पन्न असलेल्या महिलांसाठी महत्वाचं असेल कारण सीईपीआर संशोधनानुसार, बहुतेक महिलांनी या समस्यांमुळे नोकरी सोडली.
असं असतानाही अनेक महिलांना स्वयंरोजगारामध्ये आशेचा किरण दिसत आहे.
उर्वशी सांगतात की, त्यांना स्वयंरोजगाराचं अनेक फायदे मिळाले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्या आपल्या मोठ्या मुलाचीही काळजी घेण्यास सक्षम आहे
तसंच मुलांना शिकवण्याचं त्यांचं आवडतं काम देखील त्या करू शकतात. ट्युशन मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा खर्चही भागवला जात आहे.
त्याचप्रमाणे डॉ.नामानी देखील आपल्या मुलांची चांगली काळजी घेण्यास सक्षम आहेत. रोजगारासाठी त्यांनी स्तनपानाचं मार्गदर्शन देणारी कंपनी तयार केली आहे. याव्यतिरिक्त, त्या हॉस्पिटलसाठी फ्रीलान्स काम करत आहे आणि लहान मुलांशी संबंधित विषयांवर एक पुस्तक देखील लिहिलं आहे.
कॅन्सस विद्यापीठातील स्कूल ऑफ पब्लिक अफेअर्स अँड अॅडमिनिस्ट्रेशनमधील सहयोगी प्राध्यापक मिस्टी ए हेगिनेस सांगतात की "स्वयं-रोजगार आणि वर्क फ्रॉम होम करणं हे मुलं असलेल्या स्त्रियांसाठी सोप नाही. घरी मुलं असताना घरून काम करणं अवघड आहे."
प्राध्यापक हेगिन्स यांच्या मते, स्वयंरोजगाराचे अनेक फायदे असले तरी काही तोटे देखील आहेत.
त्या सांगतात की, "चांगल्या कंपन्यांमध्ये काम केल्यानं आरोग्य विमा किंवा सेवानिवृत्तीसाठी बचत यासारख्या सुविधा मिळतात, ज्या स्वयंरोजगारात मिळत नाहीत."
भारतीय दृष्टिकोनातून याकडे पाहिलं तर येथील बहुतांश कामगार वर्गातील महिला या असंघटित क्षेत्राशी निगडीत आहेत जिथं अशी व्यवस्था नाही.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या 2018 च्या अहवालानुसार भारतातील सुमारे 82 टक्के कामगार महिला असंघटित क्षेत्रात काम करतात.
'स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2023' च्या अहवालानुसार कोव्हिड साथीच्या काळात भारतातील कामगार वर्गातील महिलांचा सहभाग 30 टक्क्यांवरून 33 टक्क्यांपर्यंत वाढला, जो अजूनही खूपच कमी आहे.
भारतात कालांतरानं अधिक महिलांनी स्वयंरोजगार स्वीकारला असला तरी जून 2019 मध्ये संपलेल्या तिमाहीच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नात 15 टक्क्यांनी घट झाली आहे असंही म्हटलं आहे.
'आर्थिक मंदी' आणि 'साथीच्या रोगामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे' असं घडलं असावं, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
भारतातील नोकरदार वर्गातील महिलांची संख्या वाढली आहे, पण 'घरगुती जबाबदाऱ्यांमुळे स्वयंरोजगाराकडे महिला वळल्या आहेत, असं त्यांचं मत आहे.
कुटुंबाचं उत्पन्न कमी झाल्यामुळं स्वयंरोजगार स्वीकारणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढलं आहे असंही या अहवालात म्हटलं आहे.
पण त्या तुलनेत आर्थिक प्रगती आणि कामगारांच्या वाढत्या मागणीत महिलांचा सहभाग वाढला आहे. यामुळे वेगवेगळे परिणाम दिसून येतात.
" नोकरदार महिलांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात आधुनिक आणि उत्पादन क्षेत्रात त्यांच्यासाठी रोजगाराचं नियोजन करावं लागेल." असंही संशोधकांनी सुचवलं आहे.
अन्यथा आधीच गजबलेल्या स्वयंरोजगार क्षेत्रात गर्दी आणखी वाढेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)