'5 लेकरांच्या शेतकरी बापाची आणि आमच्या आईच्या कुंकवाची किंमत तुम्ही कशी लावाल?'

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

“शेती केली होळी केली, कर्जातून मी या धरतीला कंगण साडी चोळी केली. आणि आता असं झालंय की, राख उचलली त्यांनी माझी अन् बंदुकीची गोळी केली.”

21 वर्षांची प्रतीक्षा तिच्या या भावना बोलून दाखवते आणि त्याक्षणी तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं.

प्रतीक्षाचे वडील भगवान जाधव यांनी 10 जून 2023 रोजी आत्महत्या केली. भगवान जाधव शेती करत होते.

25 जून रोजी आम्ही प्रतीक्षाच्या घरी पोहोचलो तेव्हा घराच्या दारासमोर काही कांदा साठवलेला दिसून आला. हा कांदा पूर्णपणे सडलेला होता.

प्रतीक्षाचा इयत्ता दुसरीत शिकणारा भाऊ सायकल खेळत होता. आपले वडील आता या जगात नाहीत, हेसुद्धा कळण्याचं त्याचं वय नाही.

प्रतीक्षा औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या बाहेगावात राहते.

आम्ही प्रतीक्षाच्या घरी पोहोचलो तेव्हा काही नातेवाईक मंडळी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आले होते.

वडिलांविषयी विचारल्यावर प्रतीक्षानं बोलायला सुरुवात केली.

ती म्हणाली, “दोन महिन्यांपासून वडील एकच गोष्ट वारंवार म्हणायचे की, कांदा खराब झालाय, सडलाय सगळा. शेतीत पिकं दुसरे काहीच नाहीये. आता पैशाची आवकच संपली, आता मी काय करू?

“आतूनच पूर्ण कांदा सडला होता. कांद्याचा खर्च तर सोडाच पण काहीच निघालं नाही यंदा. पूर्ण कांदा फेकून द्यावा लागला.”

जाधव कुटुंबीयांकडे जवळपास 6 एकर शेती असून शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शेतीत कांदा,कापूस, सोयाबीन, मका ही पीकं घेतली जातात.

प्रतीक्षा पुढे म्हणाली, “मी वडिलांना विचारलं की, तुम्हाला एवढी चिंता आहे, तर आपल्यावर किती कर्ज आहे? पण त्यांनी मला कधीच कर्जाचा आकडा सांगितला नाही. त्यांना वाटायचं की हिचं अभ्यासात चित्त लागणार नाही. फक्त एवढे सांगायचे की आहे, दोन बँकांचं कर्ज आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि आयडीबीआय बँकेचं कर्ज होतं.”

वडिलांच्या आत्महत्येनंतर प्रतीक्षावरच कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी आलीय. प्रतीक्षाचं नुकतंच बीएससीचं शिक्षण पूर्ण झालंय. तिच्या कुटुंबात वयानं तिच्याहून लहान 3 बहिणी आहेत, दुसऱ्या इयत्तेत शिकणारा भाऊ आहे आणि आई आहे.

प्रतीक्षाहून लहान असलेल्या वैष्णवीनं दहावीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल तिचं अभिनंदन करणारे बॅनर गावाच्या प्रवेशद्वारापाशीच लावण्यात आलेत.

“वडील खंबीर होते. त्यांना आम्हा चौघींना शिकवायचं होतं. ते कायम म्हणायचे की, तुम्ही माझ्या मुली नाहीत, माझे मुलं आहेत. आम्हा चारी जणींना माझ्या वडिलांनी गाडी चालवायला शिकवलं,” प्रतीक्षा सांगते.

भगवान जाधव दरवर्षी दिवाळीत आपल्या मुलींना ओवाळायचे. प्रतीक्षाच्या गावातील मैत्रिणींचे लग्न झाले आहेत. पण भगवान जाधव यांना प्रतीक्षाला शिकवायचं होतं.

आता सरकारकडून काय अपेक्षा आहेत, या प्रश्नावर प्रतीक्षा जे सवाल उपस्थित करते, ते माणूस म्हणून अस्वस्थ करतात.

ती विचारते, “तुम्ही किंमत लावसाल एका कष्टकऱ्याची जो मातीत राबतोय. पण, पाच लेकरांच्या बापाची आणि आमच्या आईच्या कुंकवाची किंमत तुम्ही कशी लावाल?

“आम्ही शेतकऱ्याची लेकरं घरातल्या दोऱ्या लपवून ठेवतो. तर कशासाठी की बापानं आत्महत्या करू नये. पण आमच्या बापानं गळ्यातल्या उपरण्यानं आत्महत्या केली, आता याच्यापुढे बोलावं तरी काय?”

महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या

ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या पिकाला उत्तम हमीभाव मिळवून देणे, नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याला तातडीने मदत करणे आणि त्याचबरोबर शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणे हा आमच्या सरकारचा संकल्प आहे.”

शेतकरी आत्महत्येची आकडेवारी पाहिल्यास, महाराष्ट्रात 1 जानेवारी 2001 पासून 31 मे 2023 पर्यंत 41 हजार 859 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.

यातल्या 1 हजार 61 शेतकरी आत्महत्या यंदाच्या, 2023 च्या सुरुवातीच्या 5 महिन्यांमधील आहेत आणि यापैकी 434 आत्महत्येची प्रकरणं सरकारी मदतीसाठी पात्र ठरली आहेत.

1 जुलै 2022 ते 31 मे 2023 या शिंदे सरकारच्या 11 महिन्याच्या काळात महाराष्ट्रात 2 हजार 566 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. याचा अर्थ महाराष्ट्रात दररोज सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत.

शेतकरी आत्महत्यांविषयी महाराष्ट्र सरकारचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही कृषीमंत्र्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी अजूनही प्रतिक्रिया दिलेली नाही.

त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर बातमीत त्याचा समावेश करु.

‘त्याच्याऐवजी आम्ही गेलो असतो तरीबी फायद्याचं होतं’

7 मार्च 2023 रोजी बीडच्या बोरखेड गावातील 23 वर्षीय तरुण संभाजी अष्टेकर यानं आत्महत्या केली. संभाजीच्या नावावर शेतजमीन नव्हती. पण बारावीनंतर तो शेतीच करत होता. 3 एकर क्षेत्रावर त्यानं मोठ्या अपेक्षेनं कांदा लागवड केली होती.

मातीनं सारवलेलं घर आणि त्यावर असलेली पत्रं, अष्टेकर कुटुंबाची स्थिती दाखवून देतं.

संभाजीचे वडील अर्जुन अष्टेकर सांगतात, “संभाजीनं कांद्याचं वावर केलेलं होतं. ते कांदे वावरात गेले नासून-फिसून. लोकाचं दोन-चार लाख कर्ज होतं म्हणून त्याच्या त्याच्या जीवाला काय वाटलं आणि त्यानं तसं केलं.

“कांद्याचा भाव तेव्हा काय दोन रुपयानी, तीन रुपयानी किलो भाव होता. त्याला वाटलं लोकांचं कर्ज आपण कशानं फेडावं, आई-बाप कसे जगवावं, म्हणून त्यानं तसं केलं."

साठी ओलांडलेल्या अष्टेकर दाम्पत्याकडे 6 एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. त्यांचा मोठा मुलगा भोळसर आहे. जावयाच्या मृत्यूनंतर मुलगी आणि तिची 2 मुलं अष्टेकर यांच्याकडेच राहायला आलेत. या सगळ्यांची जबाबदारी लहान मुलाच्या म्हणजेच संभाजीच्या खांद्यावर होती.

अर्जुन सांगतात, “संभाजी गेल्यापासून आम्ही त्याचा फोटो पेटीतून बाहेर काढला नाही. फोटो बाहेर काढला की त्याची आठवण येणे. आमच्या मनात काही-बाही विचार येतात. आम्हाला वाटतं की आम्ही गेलो असतो आणि तो जगला असता तरीबी फायद्याचं होतं ना. असं वाटतं दोघा नवरा-बायकोला.”

विहिर खोदण्यासाठी मजुरी करताना झालेल्या अपघातात अर्जुन यांच्या पायाची वाटी सरकलीय. आता आपल्याकडील 6 एकर क्षेत्र कसं कसायचं, हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे.

अष्टेकर यांच्या घराशेजारी तांबोळी कुटुंब राहतं. संभाजीबद्दल विचारल्यावर रफिक तांबोळी म्हणाला, “संभाजी सकाळी 7 वाजताच शेतात जायचा. तेव्हा तर मी झोपेतच नसायचो. तो खूप कष्टाळू होता. कामाशी काम करायचा. कुणाशी भांडण नाही की काही नाही.”

शेतकरी आत्महत्या थांबत नाहीयेत, कारण...

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार कमी-अधिक फरकारनं प्रत्येकच सरकार करतं. मग ते भाजप-शिवसेना युतीचं सरकार असो की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचं.

पण या निर्धारानंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र चालूच असतं. त्यामुळे मूळात प्रश्न हाच आहे की, राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबत का नाहीयेत?

शेती प्रश्नांचे अभ्यासक आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट सांगतात, “शेतकरी आत्महत्येची प्रमुख 2 कारणं आहेत. एक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नापिकी आणि दुसरं कारण म्हणजे कर्ज. शेतकऱ्यांवर कर्ज होण्याचं प्रमुख कारण म्हणजे सरकार शेतीमालाला भाव मिळू देत नाही.

“ज्या ज्या वेळेला शेतीमालाला चांगले भाव मिळण्याची शक्यता तयार होते, त्या त्या वेळेला सरकार निर्यातबंदी करतं, बाहेरून माल आयात करतं, स्टॉक लिमिट लावतं आणि शेतीमालाचे भाव पाडतं.”

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कोणता पर्याय असू शकतो, या प्रश्नावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि कृषीतज्ञ डॉ. शरद निंबाळकर सांगतात, “स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर 50 % अधिक भाव द्यायला हवा. ही गोष्ट सरकारनं कायदेशीर करायला हवी. यापेक्षा कमी दरानं व्यापारी शेतमाल खरेदी करत असेल, तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. पण कोणतंच सरकार हे करायला तयार नाही.”

केंद्र सरकार दरवर्षी वेगवेगळ्या पिकांसाठीचा हमीभाव जाहीर करतं. यात दरवर्षी काही रुपयांनी वाढ केली जाते.

पण, महागाईच्या तुलनेत ही वाढ तुटपुंजी असल्याचं निंबाळकर सांगतात.

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा ऐकल्यावर काय वाटतं, असा प्रश्न विचारल्यावर प्रतीक्षा सांगते, “सरकारनं मागच्या वेळेस घोषणा दिली होती की, आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करू. पण नुसतं घोषणा देऊन हे साध्य कधी होणार? शेतकऱ्याला योजना माहिती नाहीयेत. योजना निघाल्या तरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही.”

सरकारच्या शेतकऱ्यांसाठी प्रमुख योजना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या 'कृषिपंढरी व तृण धान्य' महोत्सवाचे उदघाट्न केले.

यावेळी त्यांनी त्यांच्या सरकारनं शेतकऱ्यांविषयी केलेल्या कामांविषयी सांगितलं.

ते म्हणाले, “शासनाने बळीराजासाठी अनेक निर्णय घेतले. यामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देणे असो, शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे राज्य शासनही प्रतिवर्षी सहा हजार रूपये देण्याचा निर्णय असो, किंवा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीला मदत करणे असे अनेक निर्णय घेतले आहेत.”

याशिवाय, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तयार केलेल्या ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज’ योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मे महिन्यात शुभारंभ करण्यात आला.

या योजनेंतर्गत आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवी शिक्षणासाठी 0 ते 4 टक्के व्याजदराने 15 लाखांपर्यंत शेक्षणिक कर्ज देण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्यातील आत्महत्याग्रस्त 15 जिल्ह्यांसह विविध भागातील शेतकरी आत्महत्यांवर उपाययोजना आखता याव्यात म्हणून सरकारनं सात प्रकारच्या समित्या नेमल्याची माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मे महिन्यात दिली होती.

या समित्यांनी आतापर्यंत नेमकं काय काम केलं आणि त्यातून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठीच्या काही विधायक बाबी समोर येतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)