सीताक्काः नक्षलवादी चळवळ ते तेलंगणात सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या कॅबिनेट मंत्री

सीताक्का

फोटो स्रोत, SEETHAKKA

दहावीत असताना नक्षलवादी चळवळीत सामील झालेल्या धनसरी अनसूया सीताक्का यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि हैदराबादच्या लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर एकच जल्लोष झाला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या अकरा मंत्र्यांसह हैदराबादच्या लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर शपथ घेतली.

तेलंगणाची निर्मिती झाल्यापासून सत्तेत असणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांची सत्ता उलथवून टाकत तेलंगणामध्ये पहिल्यांदाच काँग्रेस सत्तेत आली आहे.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा शपथविधी झाला.

तेलंगणाचे पहिले दलित उपमुख्यमंत्री म्हणून मल्लू भट्टी विक्रमार्का यांनी शपथ घेतली. पण, सगळ्यात मोठा जल्लोष जेव्हा धनसरी अनसूया सीताक्का या शपथविधीसाठी मंचावर दाखल झाल्या.

त्यांची शपथ सुरु होण्यापूर्वी सुमारे 20 सेकंद समोर उपस्थित असलेला जनसमुदाय त्यांच्या नावाचा जयघोष करत होता.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनाही त्यांची शपथ सुरु करण्याआधी एवढा वेळ थांबावं लागलं नव्हतं, पण धनसरी अनसूया सीताक्का यांच्या शपथविधीसाठी मात्र खूप मोठा जल्लोष केला गेला.

काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत तेलंगणाच्या मतदारांनी केलेला हा अभूतपूर्व जल्लोष लक्ष वेधून घेत होता.

हे दृश्य पाहून तेलंगणाच्या राजकारणाची माहिती नसणाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या या बाई कोण? असा प्रश्न पडला नसता तरच नवल.

मुलुगू विधानसभेच्या तीनवेळा आमदार राहिलेल्या धनसरी अनसूया सीताक्का यांचा तेलंगणाच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास जाणून घेण्यासारखा आहे.

दहावीत असताना हातात बंदूक घेतली आणि नक्षलवादी चळवळीत सामील झाल्या

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार सीताक्का वयाच्या 14 व्या वर्षीच जनशक्ती नक्षल चळवळीत सामील झाल्या होत्या.

'गोट्टी कोया' या आदिवासी जमातीमध्ये जन्मलेल्या सीताक्का यांनी अगदी कमी वयातच वंचित घटकांच्या हक्कांसाठीचा संघर्ष सुरु केला होता.

नक्षल चळवळीत सामील होण्याबाबत त्या म्हणतात की, "आजूबाजूच्या चळवळीने प्रेरित होऊन मी तो निर्णय घेतला होता."

सीताक्का

फोटो स्रोत, Danasari Seethakka/FACEBOOK

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चळवळीत असतानाच त्यांनी श्रीराम यांच्याशी प्रेमविवाह केला पण नंतर ते दोघे विभक्त झाले.

नक्षलवादी चळवळीत सुमारे दोन दशकं सक्रिय राहिल्यानंतर अखेर अखेर 1997ला त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि त्या मुख्य प्रवाहात परतल्या. त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आणि उपजीविकेसाठी एका स्वयंसेवी संस्थेत काम सुरु केलं.

वारंगल जिल्हा न्यायालयात वकील म्हणून काम करत असताना त्यांनी समाजातील गरीब आणि गरजू आदिवासींना कायदेशीर मदत करण्यास सुरुवात केली.

पुढे समाजातील वंचित घटकांना मदत करण्यासाठीच 2004 मध्ये विधानसभेची निवडणूकही लढवल्याचं त्या सांगतात.

तेलगू देसम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सीताक्का यांना राजकारणात आणल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.

सीताक्का यांनी तेलगू देसम पक्षाकडूनच पहिली निवडणूक लढवली मात्र त्या निवडणुकीत त्यांना यश आलं नाही.

काँग्रेसचे उमेदवार पोदेम वीरैया यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतरच्या निवडणुकीत सीताक्का यांनी पोदेम वीरैया यांना हरवलं आणि त्या पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या.

2014 ला त्यांनी पुन्हा टीडीपीकडून विधानसभेची निवडणूक लढवली पण तेलंगणा राष्ट्र समितीचे उमेदवार चंदुलाल यांनी त्यांचा पराभव केला.

2018 च्या निवडणुकीत सीताक्का यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वातच सीताक्का काँग्रेसमध्ये आल्या.

हे दोघेही चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देसम पक्षात एकमेकांचे सहकारी होते. 2018 ला झालेल्या तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत सीताक्का यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला.

आमदार सीताक्का बनल्या डॉ. सीताक्का

राजकारणात प्रगती करत असताना सीताक्का यांनी शिक्षण मात्र सोडलं नाही.

2022 मध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रात पीएचडी पूर्ण केली.

'पूर्वीच्या आंध्र प्रदेश राज्यातील स्थलांतरित आदिवासींचे सामाजिक बहिष्कार- वारंगळ आणि खम्मम जिल्ह्यांतील गोट्टी कोया जमातींचा अभ्यास' हा त्यांच्या पीएचडीचा विषय आहे.

कोरोनाकाळात सीताक्का यांनी केलेल्या कामांची प्रशंसा झाली.

लॉकडाऊनमुळे प्रत्येक माणूस घरात अडकलेला असताना आमदार सीताक्का यांनी दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत मदत पोहोचवली.

या गावांमध्ये धान्य पोहोचवण्यासाठी त्यांनी कधी पायी तर कधी ट्रॅक्टरवरून प्रवास केला आणि त्या मदतकार्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सीताक्का

फोटो स्रोत, Danasari Seethakka/FACEBOOK

विरोधकांनी सीताक्का हे सगळं प्रसिद्धीसाठी करत असल्याची टीका केली असली तरी सीताक्का यांनी नेहमीच स्थानिक आदिवासींसाठी 'अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची' सोय करणं हेच आपलं ध्येय असल्याचं सांगितलं होतं.

...आणि सीताक्का ढसाढसा रडल्या

यावर्षी जुलै महिन्यात तेलंगणामध्ये महापूर आला होता.

मुलुगू जिल्ह्यातल्या कोंडाई गावातील परिस्थिती बघून सीताक्का भावनिक झाल्या आणि त्या गावातील लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्याची विनंती करत असताना माध्यमांसमोरच त्यांना रडू आलं.

सीताक्का यांचा हाही व्हीडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता.

यावेळी सीताक्का यांनी मुलुगुच्या निवडणुकीत भारत राष्ट्र समितीच्या उमेदवार बडे नागज्योती यांचा 33,000 मतांनी पराभव केला.

नागज्योती या मुलुगू जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत आणि माओवादी नेते बडे नागेश्वरा राव आणि राजेश्वरी यांच्या त्या कन्या आहेत.

 सीताक्का आणि सोनिया गांधी

फोटो स्रोत, Danasari Seethakka/FACEBOOK

सीताक्का यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही त्यांचं कौतुक केलं. राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेतही सीताक्का सहभागी झाल्या होत्या.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)