You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्लीतील डॉ. आंबेडकर विद्यापीठात भीम जयंतीलाही विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आणि समानतेसाठी अखेरपर्यंत अखंड झगडत राहिले. संविधानाचे निर्माते असलेल्या बाबासाहेबांनी भारतीय समाजात सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या मूल्यांना मूर्त स्वरूप दिलं.
एकीकडे देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जात असताना दिल्लीत त्यांच्याच नावाने असलेल्या विद्यापीठात मात्र विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
रॅगिंग केल्याचा आरोप असलेल्या विद्यार्थ्यांचं निलंबन मागे घेतलं आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना निलंबित केल्याच्या विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक झाली आहे. त्याबाबतचा बीबीसीचा हा रिपोर्ट.
दिनांक 14 एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती)
स्थळ- दिल्लीतील आंबेडकर विद्यापीठाचा परिसर
भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टीमुळं विद्यापीठ परिसर बंद आहे.
प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आलं असून अनेक सुरक्षारक्षक तैनात आहेत. तर दुसरीकडे एका मोठ्या झाडाखाली स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेशी संबंधित विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. आंबेडकर विद्यापीठातील एका विद्यार्थिनीच्या कथित रॅगिंगवरून सुरू झालेला हा वाद आता लोकशाही हक्कांसाठीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनापर्यंत पोहोचला आहे.
रॅगिंगचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनानं कोणतंही कारण न देता एका वर्षासाठी निलंबित केल्याचा आरोप आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे. ही घटना फेब्रुवारी महिन्यातील आहे.
मार्चमध्ये तीन विद्यार्थ्यांना केलं निलंबित
गेल्या शुक्रवारी पाच विद्यार्थी नेत्यांनी निलंबित विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ निदर्शनं केली होती. तेव्हा त्यांनाही प्रशासनानं चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
दुसरीकडे विद्यापीठ प्रशासनानं पाच विद्यार्थ्यांच्या निलंबनाच्या आपल्या निर्णयाचा बचाव केला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वाहनांची तोडफोड करून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांनी दावा केला आहे.
विद्यार्थ्यांनी कुलगुरू अनुसिंह लाठेर आणि माझी गाडी अडवून रास्ता रोको केल्याचा दावा रजिस्ट्रार नवलेंद्र कुमार सिंह पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला.
नवलेंद्र कुमार सिंह यांनी दावा केला की, "ते माझ्या गाडीला लटकले, त्यांनी कुलगुरूंच्या गाडीला पुढं जाऊ दिलं नाही. यासाठी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करावा लागला. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे आणि या प्रकरणी एफआयआरही दाखल केला जाईल."
मार्चमध्ये झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या निलंबनाबाबत रजिस्ट्रार म्हणाले की, या विद्यार्थ्यांना माध्यमांमध्ये चुकीची विधानं करणं आणि एका संवेदनशील विषयावर राजकारण केल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.
रॅगिंगच्या आरोपावरून विद्यापीठानं निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांचं निलंबन मागं घेतलं आहे, मात्र रॅगिंगविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांचं निलंबन कायम असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
शुक्रवारी निलंबित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रार यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांना शांततेच्या मार्गानं कुलगुरूंपर्यंत त्यांचं म्हणणं मांडायचं होतं, असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
एसएफआयची विद्यार्थी नेता आणि आंबेडकर युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनची सरचिटणीस शरण्यानं बीबीसीला सांगितलं की, "आम्हाला आमचा मुद्दा कुलगुरूंपर्यंत पोहोचवायचा होता. आम्ही त्यांना भेटीची वेळ मागितली होती, ती त्यांनी दिली नाही.
आम्ही त्यांना लेखी विनंतीही केली होती, पण आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. आम्ही कुलगुरूंसमोर आमचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला मारहाण करून फरफटत नेलं."
पुरुष सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप शरण्यानं केला आहे. या घटनेच्या व्हीडिओमध्येही सुरक्षा रक्षक शरण्याला विद्यापीठाच्या गेटमधून फरफटत नेताना दिसत आहेत. बीबीसीने हा व्हीडिओ पाहिला आहे.
मार्चमध्ये निलंबित करण्यात आलेल्या नादिया, अनन आणि हर्ष या तीन विद्यार्थ्यांचं निलंबन मागं घेण्याची मागणी हे विद्यार्थी करत होते.
आठ दिवसांपासून उपोषण
सोमवारी विद्यापीठानं आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वार्षिक आंबेडकर व्याख्यानमालेत काही विद्यार्थ्यांनी निदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर हातात घेऊन हे विद्यार्थी इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या व्याख्यान हॉलमध्ये कुलगुरूंसमोर उभे राहिले. एसएफआयशी संबंधित हे विद्यार्थी म्हणाले- "आंबेडकर विद्यापीठात लोकशाही नाही, विद्यार्थी उपोषणावर आहेत. त्यांच्या मागण्या तरी ऐका."
विद्यार्थ्यांना मध्येच अडवत आंबेडकर विद्यापीठाचे प्रॉक्टर सत्यकेतू सांक्रित यांनी "हे तेच लोक आहेत, ज्यांनी विद्यापीठात दहशत पसरवली आहे," असं म्हटलं.
मात्र, विद्यापीठ प्रशासनाशी संबंधित दुसऱ्या लोकांनी शांततेनं आंदोलक विद्यार्थ्यांना सभागृहातून बाहेर काढलं आणि प्रॉक्टर सांक्रित यांना गप्प केलं.
बीबीसीला विद्यापीठ प्रशासनाशी संबंधित लोकांकडून या घटनांवर प्रतिक्रिया घ्यायची होती पण ती मिळू शकली नाही.
विद्यापीठाचे प्रवक्ते आदित्य सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, "प्रशासनानं प्रसारमाध्यमांना आधीच निवेदन दिलं आहे. सध्या यापुढं कोणतीही चर्चा होणार नाही."
तर दुसरीकडे विद्यार्थी नेता शरण्या सांगते की, "विद्यार्थी आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची एकच मागणी आहे की, कुलगुरूंनी येऊन त्यांच्याशी बोलावं. कॅम्पसमधील संवादाची जागा, लोकशाहीतील चर्चेची जागा प्रशासनाने नष्ट केली आहे."
शरण्या म्हणते, "व्यवस्थापनाने सुरुवातीला तीन विद्यार्थ्यांच्या निलंबनाचं कारण सांगितलं नाही आणि आता शुक्रवारी त्यांनी विद्यार्थी संघटनेशी संबंधित दोन विद्यार्थ्यांसह पाच विद्यार्थ्यांना निलंबित केलं. आम्हाला फक्त कारण जाणून घ्यायचं आहे."
विद्यापीठ प्रशासनावर हुकूमशाहीचा आरोप
विद्यापीठ प्रशासन हुकूमशाही वृत्तीचा अवलंब करत वादाला चालना देत असल्याचं काही निलंबित विद्यार्थ्यांचं मत आहे.
निलंबित संशोधक विद्यार्थी शुभोजीत म्हणतो, "मी पीएच.डी करत आहे, समाजाला तर्कशुद्धपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण इथं आमची विचारसरणी नष्ट केली जात आहे.
जर मी माझ्या कॅम्पसमध्ये रॅगिंगच्या विरोधात आवाज उठवू शकत नसेल, तर मी एवढा अभ्यास करून किंवा पीएच.डी करण्यात काय अर्थ आहे?"
निलंबनामुळे आपल्या अभ्यासावर परिणाम होऊन पीएच.डी पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात, अशी शुभोजीतला भीती आहे.
विद्यार्थ्यांकडून इतरही अनेक प्रकारचे आरोप होत आहेत. दि. 26 मार्च रोजी विद्यापीठ प्रशासनानं कॅम्पस आणि लगतच्या प्रशासकीय परिसरात निदर्शनं करण्यास बंदी घातली होती.
शरण्या सांगते, "विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी मोकळी जागा उरलेली नाही. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. या बॅरिकेड्सवर त्याच आंबेडकरांचे चित्र आहे, ज्यांनी समाजासाठी असे अडथळे तोडण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं.
" डॉ. आंबेडकरांच्या नावावर असलेल्या विद्यापीठात अशाप्रकारे लोकशाही अधिकारांचा गळा घोटला जात आहे, ही शोकांतिका आहे."
पाच वाजल्यानंतर कर्फ्यूसारखी स्थिती...
दिल्ली सरकारने 2008 मध्ये कायदा करून आंबेडकर विद्यापीठाची स्थापना केली होती. त्यांचे दिल्लीत चार कॅम्पस आहेत. येथे पदवीपासून संशोधनापर्यंतचा अभ्यास आहे.
जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणाला बसलेला विद्यार्थी नेता समीरने बीबीसीशी बोलताना सांगितलं.
आंबेडकर विद्यापीठातील विद्यार्थी सलग उपोषण करत आहेत, म्हणजेच एक-एक करून विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.
समीर म्हणतो, "हे लोकशाहीचं कॅम्पस आहे. बाबासाहेबांनी बनवलेल्या राज्यघटनेत आपल्याला अभिव्यक्ती आणि निषेधाचं, विरोध करण्याचं स्वातंत्र्य आहे.
परंतु, आंबेडकरांच्या नावाने बांधलेल्या या कॅम्पसमध्ये या संविधानिक मूल्यांची गळचेपी होत आहे. या मूल्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आम्ही लढा देत आहोत."
अलीकडच्या काळात कॅम्पसमध्ये नियम कडक करण्यात आले असून सायंकाळी 5 नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नसल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे.
समीर सांगतो की,"अनेक विद्यार्थ्यांना सायंकाळी आयटी लॅब आणि लायब्ररीमध्ये अभ्यास करावा लागतो. पण इथे पाच वाजल्यानंतर एक प्रकारचा कर्फ्यू लागू होतो. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे."
शरण्यानेही अशाच आरोपांचा पुनरुच्चार केला आणि ती म्हणते की, "विद्यार्थी कॅम्पसमध्ये एकत्र येऊ शकत नाहीत, लोकशाही मार्गानं त्यांचं मत मांडू शकत नाहीत. प्रशासन विद्यार्थ्यांवर कठोर होऊन त्यांचा आवाज दाबत आहे."
दुसरीकडे रॅगिंगविरोधात तक्रार केल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या तीन विद्यार्थ्यांनी दिलासा मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
निलंबित विद्यार्थी अनन म्हणतो, "आम्हाला दोन सेमिस्टरसाठी म्हणजे वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. शिक्षण हा आमचा हक्क आहे आणि आम्ही विद्यापीठाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्हाला आशा आहे की, उच्च न्यायालय आम्हाला दिलासा देईल."
आत्तापर्यंत काय-काय झालं?
- 28 फेब्रुवारी : एका विद्यार्थीनीवर रॅगिंग केल्याचा आरोप
- 01 मार्चः नादिया, अनन आणि हर्ष नावाच्या विद्यार्थ्यांनी या घटनेची माहिती दिली
- 03 मार्चः घटनेची चौकशी सुरू, रॅगिंगच्या आरोपाखाली 8 विद्यार्थी निलंबित
- 04 मार्चः विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत एसएफआयचा विजय
- 05 मार्चः प्रॉक्टरने नादिया, अनन आणि हर्ष यांना निलंबित केलं
- 20 मार्चः प्रॉक्टरने रॅगिंगप्रकरणी निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांचं निलंबन रद्द केलं, परंतु, आंदोलक विद्यार्थ्यांचं निलंबन मागे घेतलं नाही
- 26 मार्चः कॅम्पसच्या काही भागात निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली
- 27 मार्चः एसएफआयने बॅरिकेड्सचा अडथळा बाजूला करण्याचा प्रयत्न केला, बंदीची नोटीस जाळली
- 08 एप्रिल: विद्यार्थ्यांच्या निलंबनाचा आढावा घेतला जात आहे, असं विद्यापीठानं दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं.
- 09 एप्रिल: विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं.
- 11 एप्रिल: विद्यार्थी संघटनेच्या निवडून आलेल्या दोन पदाधिकाऱ्यांसह आणखी पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनानं निलंबित केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)