You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'ऑपरेशन सिंदूर'वरील पोस्टमुळं इन्फ्लुएन्सर तरुणीला अटक, पुण्यात घेत होती कायद्याचं शिक्षण, नेमके काय घडले?
'ऑपरेशन सिंदूर'च्या मुद्यावरुन विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना दुखावणारी सोशल मीडिया पोस्ट केल्याबद्दल पश्चिम बंगाल पोलिसांनी 22 वर्षीय विद्यार्थिनीला अटक केली आहे.
शर्मिष्ठा पनोली असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेत आहे. ती सोशल मीडिया इनफ्लुएन्सरही आहे.
शर्मिष्ठा विरोधात कोलकात्याच्या गार्डनरीच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलकाता पोलिसांनी तिला गुरुग्राम येथून अटक केली आहे. कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
कोलकाता पोलिसांच्या सुत्रांनी बीबीसीचे पत्रकार प्रभाकर मणि तिवारी यांना सांगितलं की, "शर्मिष्ठाने 'ऑपरेशन सिंदूर'बाबत एका विशिष्ट धर्मावर आक्षेपार्ह टिप्पणी करणारा व्हीडिओ अपलोड केला होता.
यात तिने बॉलिवूड कलाकारांनी कशाप्रकारे मौन बाळगून आहेत यावरदेखील टीकात्मक भाष्यही केलं होतं."
शर्मिष्ठा पानोलीला गुरुग्राम कोर्टात हजर केल्यानंतर, ट्रान्झिट रिमांडवर कोलकात्याला आणण्यात आलं. त्यानंतर शनिवारी (31 मे) अलीपूर कोर्टात हजर करण्यात आलं.
शर्मिष्ठाच्या अटकेविरुद्ध कोर्टात जामीन अर्ज दाखल केल्याचं तिच्या वकिलांनी सांगितलं आहे. शर्मिष्ठाचा मोबाईल फोन आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शर्मिष्ठाचे वकील शमीमुद्दीन म्हणाले, "काही गोष्टींचा वापर करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला होता. पण आम्ही कोर्टात जामीन अर्ज सादर करताना उल्लेख केलेल्या मोबाईल फोन, लॅपटॉपसारख्या या वस्तू आधीच जप्त करण्यात आल्याचंही सांगितलं."
पुढे बोलताना वकील म्हणाले की, "कोर्टानं आमचा अर्ज मान्य केला आणि पोलीस कोठडीची मागणी फेटाळली. शर्मिष्ठाला 13 जून 2025 पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे."
दरम्यान, आयएएनएस या वृत्तसंस्थेचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात शर्मिष्ठा पोलिसांच्या वाहनात बसण्यापूर्वी "लोकशाहीत माझा छळ झाला, ही लोकशाही नाही" असं म्हणताना दिसत आहे.
शर्मिष्ठाच्या अटकेवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये 'तुष्टीकरणाचं राजकारण' सुरू असल्याचा आरोप केला आहे. तर पवन कल्याण यांनी, पोलिसांनी योग्य पद्धतीने काम करायला हवे, असं म्हटलं आहे.
काय घडलं?
सोशल मीडियावर शर्मिष्ठाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात ती एका विशिष्ट धर्माबाबत आक्षेपार्ह भाष्य करताना दिसत आहे. पोलिसांनी याच व्हीडिओवरुन दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे कारवाई केल्याची माहिती आहे.
कोलकाता पोलिसांच्या सुत्रांनी प्रभाकर मणि यांना दिलेल्या माहितीनुसार, शर्मिष्ठाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. मात्र, नंतर तिने पोस्ट डिलीट करत माफीही मागितली होती.
त्यानंतर 15 मे रोजी कोलकात्यातील गार्डनरीच पोलीस ठाण्यात शर्मिष्ठाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, या तक्रारीनंतर शर्मिष्ठाला नोटीस पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, ती संपूर्ण कुटुंबासह भूमिगत झाली होती. त्यानंतर तिच्याविरुद्ध जारी करण्यात आलेल्या वॉरंटच्या आधारे तिला अटक करण्यात आली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, वादग्रस्त व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरावरून संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
यानंतर, तिने बिनशर्त माफी मागत सदर व्हीडिओ आणि संबंधित पोस्ट काढून टाकल्या. परंतु, कोर्टाने या प्रकरणात वॉरंट जारी केला होता, त्यानुसार कारवाई करण्यात आली.
विद्यापीठानेही केली कारवाई
इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्रो चान्सलर (प्रभारी कुलगुरू) च्या हवाल्यानं सांगितलं की, युनिव्हर्सिटीने शर्मिष्ठाला शैक्षणिक आणि अशैक्षणिक उपक्रमांतून तीन महिन्यांसाठी निलंबित केलं आहे.
युनिव्हर्सिटीच्या प्रो चान्सलर विद्या यरवडेकर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाल्या, "शर्मिष्ठाने केलेल्या कृत्याबाबत आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली. त्यात ज्या प्रकारच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे, ते अत्यंत अशोभनीय आहे."
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, "आम्ही युनिव्हर्सिटीच्या आचारसंहितेचे पालन करत शिस्तभंग समितीची बैठक घेतली.
शर्मिष्ठाला तीन महिन्यांसाठी शैक्षणिक आणि अशैक्षणिक उपक्रमांतून तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. यासह युनिव्हर्सिटीने तिच्या प्लेसमेंटवरही बंदी घातली आहे."
कोणी काय प्रतिक्रिया दिली ?
शर्मिष्ठाच्या अटकेवर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगाल पोलिसांवर ताशेरे ओढले. प्रत्येकाने निष्पक्षपणे काम करायला हवं, असं ते म्हणाले.
पवन कल्याण यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं की, "ऑपरेशन सिंदूरबाबत, शर्मिष्ठाने आपली भूमिका मांडली. तिचे वक्तव्य खेदजनक आणि जनतेच्या भावना दुखावणारे होते. त्यासंदर्भात तिने आपली चूक मान्य करत माफी मागितली आणि व्हीडिओही काढून टाकला. तरीही पश्चिम बंगाल पोलिसांनी शर्मिष्ठाविरोधात तत्काळ कारवाई करत कठोर पावलं उचलली.
परंतु, जेव्हा निवडून आलेले तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार सनातन धर्माची थट्टा करतात तेव्हा लाखो लोकांच्या भावना दुखावतात, त्यांचे काय? जेव्हा आमच्या धर्माला 'अतिशय वाईट धर्म' म्हटलं जातं, त्यावेळी हा रोष का दिसत नाही? त्यांची माफी कुठे आहे? त्यांना तत्काळ अटक का होत नाही."
पवन कल्याण यांनी या पोस्टसोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हीडिओदेखील शेअर केला आहे.
पवन कल्याण म्हणाले, "धर्माची निंदा नेहमीच निषेधार्ह आहे. धर्मनिरपेक्षता काहींसाठी ढाल आणि काहींसाठी तलवार असं असू शकत नाही. ती दोन्ही बाजूंनी समान असावी लागते. पश्चिम बंगाल पोलिसांनो, देश पाहत आहे. पक्षपात न करता सर्वांसाठी समान काम करा."
एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी म्हणाले, "मोइना मित्रा यांनी काली मातेबाबत अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवला होता, परंतु काही कारवाई झाली का?
टीएमसीच्या खासदार सयोनी घोष यांनी महादेवाबाबत पोस्ट केली होती, त्यावर काही कारवाई करण्यात आली का?"
"फिरहाद हकीम यांच्यावर अनेक एफआयआर दाखल झाले, पण कुठलीही कारवाई झाली नाही. कारवाई फक्त सनातन धर्म मानणाऱ्यांवरच होते. इथे सनातनींना शिवीगाळ करण्याचा परवाना आहे" असंही ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार कार्ती चिदंबरम यांनी शर्मिष्ठाची अटक म्हणजे पोलीस अधिकारांचा गैरवापर असल्याचं म्हटलं आहे.
त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले, "जोपर्यंत हे स्पष्टपणे सिद्ध होत नाही की एखाद्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाला आहे, तोपर्यंत अशा पोस्टसाठी आंतरराज्यीय अटक करणं हे पोलिसांच्या अधिकारांचा गैरवापर आहे."
अटकेची मागणी करणारे नेते काय म्हणाले?
शर्मिष्ठाच्या वक्तव्यानंतर तिच्या अटकेची मागणी करणाऱ्या नेत्यांमध्ये एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांचा समावेश आहे.
त्यांनी 14 मे रोजी 'एक्स'वरील शर्मिष्ठाचा व्हीडिओ पोस्ट करत लिहिलं की, "हिने आमच्या नबींबाबत अतिशय अपमानास्पद शब्द वापरले आहेत, जे कोणीही मुसलमान सहन करणार नाही.
जेव्हा संपूर्ण देश एकत्रितपणे उभा आहे अशावेळेस अशाप्रकारची भाषा वापरुन ती देशात जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहे."
वारिस पठाण यांनी सदर पोस्टच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे शर्मिष्ठाच्या अटकेची मागणी केली होती.
शर्मिष्ठाच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना वारिस पठाण म्हणाले की, "कोणालाही दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार नाही. संपूर्ण देश एकत्रितपणे उभा असताना तुम्ही अशा शब्दांचा वापर करत आहात, हे सहन केले जाणार नाही."
ते पुढे म्हणाले, "अशा प्रकारची भाषा कोणीही सहन करणार नाही. अनेक लोकांनी तिच्याविरोधात तक्रारी दाखल करत कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. आम्हीही सरकारकडे याबाबत विनंती केली होती आणि तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे."
वारिस पठाण म्हणाले, "आम्ही नेहमीच हिंसाचाराचा विरोध करत आलोय. कोणालाही कायदा हाती घेण्याचा अधिकार नाही. अशा गोष्टींवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी जेणेकरुन कोणीही अशाप्रकारचं गैरकृत्य करणाऱ्याची हिम्मत करणार नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.