You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'ऑपरेशन सिंदूर'बाबतची पोस्ट रिशेअर केल्यानं विद्यार्थिनी 20 दिवस तुरुंगात; जामीन देताना कोर्टानं पोलिसांना का फटकारलं?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट रिशेअर केल्यानं पुण्यातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला अटक झाली. तुरुंगात जवळपास 20 दिवस घालवल्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अखेर त्या तरुणीची सुटका झाली.
हायकोर्टानं तिला परीक्षेला बसू देण्याचे आदेशही दिले.
या पार्श्वभूमीवर हे नेमकं प्रकरण काय होतं? या प्रकरणात हायकोर्टानं नेमकं काय म्हटलं? जाणून घेऊयात.
नेमकं काय घडलं होतं?
पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढला.
याच काळात पुण्यातील खातिजा शेख या इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या तरुणीला अटक झाली. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट रिशेअर केली असून यामधून दोन समाजात तणाव निर्माण होऊन शांतता भंग होण्याचा धोका असल्याचा आरोप एफआयआरमधून करण्यात आला.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबलनं दिलेल्या तक्रारीवरून या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 9 मे रोजी तिला अटकही करण्यात आली.
ही तरुणी सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. या कॉलेजनं सुद्धा तिच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
सुरुवातीला तरुणी पोलीस कोठडीत होती. त्यानंतर पुणे कोर्टानं तिची रवानगी येरवडा तुरुंगात केली.
दरम्यान तिची चौथ्या सत्राची परीक्षाही सुरू झाली होती. त्यामुळे आपल्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यात यावा आणि परीक्षेला बसू द्यावं, अशी याचिका तिनं मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.
कोर्टानं नेमकं काय म्हटलं?
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार, कोर्टानं या प्रकरणात तरुणीवर केलेली निलंबनाची कारवाई स्थगित केली असून कॉलेजला उत्तर देण्यास सांगितलं आहे.
तसेच तरुणीची परीक्षा असल्यानं तिची तत्काळ तुरुंगातून सुटका करावी, असे आदेश दिले आहेत. इतकंच नाहीतर परीक्षा देताना तरुणीला पोलीस सुरक्षा पुरवण्याचेही आदेशही दिले आहेत.
मुंबई हायकोर्टानं काही निरीक्षणं देखील नोंदवली आहेत.
"पेट्रोलिंग ड्युटीवर असल्याचा दावा करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलनं दाखल केलेल्या एफआयआरनुसार 19 वर्षांच्या एका विद्यार्थिनीला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. ही एक अतिशय धक्कादायक घटना आहे," असं कोर्टानं म्हटलं.
या तरुणीनं 2 तासांच्या आत पोस्ट डिलीट करून माफी मागितली होती. त्यानंतरही तिच्यावर 9 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला हे धक्कादायक आहे.
पोस्ट डिलीट करून माफी मागितली या गोष्टी लक्षात न घेता तपास अधिकाऱ्यांनी तिला अटक केली. या तरुणीला अटक करण्याचं कुठलंही कारण आम्हाला दिसत नाही, असं म्हणत कोर्टानं नाराजी व्यक्त केली.
"ही पोस्ट शेअर करण्याच्या कृत्याला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणानं केलेला अविवेकीपणा म्हणता येईल. संबंधित तरुणीला उत्तर सादर करण्यासाठी कुठलाही वेळ न देता घाईघाईत कॉलेजनं निलंबनाची कारवाई केली."
"तरुणीनं पोस्ट डिलीट करून माफी मागितली या गोष्टी निलंबनाची कारवाई करताना लक्षात घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे निलंबनाची कारवाई स्थगित करत आहोत," असं कोर्टानं म्हटलं.
यावेळी विद्यापीठ परीक्षा घेत असल्यानं या तरुणीला परीक्षेला बसू देण्याचा निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेऊ शकत नाही, असा युक्तीवाद कॉलेजची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी केला होता. मात्र, कोर्टानं या तरुणीला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली.
या मुलीची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. त्यानंतर तिची बुधवारी (28 मे) जामिनावर सुटका करण्यात आली.
तरुणीनं संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन चौकशीला सहकार्य करावे. पण, तिच्या परीक्षेच्या काळात पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावू नये, असेही बजावण्यात आले.
तसेच संबंधित तरुणीनं कोर्टाच्या परवानगीशिवाय राज्यातून बाहेर जाऊ नये, असंही कोर्टानं नमूद केलं.
कोठडीत असल्यानं दोन पेपरला मुकली
संबंधित तरुणी कोठडीत असल्यानं तिला 24 आणि 27 मे रोजी झालेले दोन पेपर देता आले नाही.
पण, पुढचे पेपर तिला देता यावे यासाठी कोर्टानं तिची लगेच सुटका करण्याचे आदेश दिले. तसेच ती फक्त 19 वर्षांची मुलगी आहे, तुम्हाला तिला गुन्हेगार बनवायचं आहे का? असा सवाल सुद्धा हायकोर्टानं केला.
कोर्टाच्या आदेशानुसार तरुणीची तुरुंगातून सुटका करण्यात आली असून तिनं 29 मे रोजीचा पेपरसुद्धा दिला आहे, अशी माहिती या तरुणीच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वकील फरहाना शाह यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना दिली.
तसेच 31 आणि 3 जूननंतरचा पेपर सुद्धा तिला देता येणार आहे. तिच्या परीक्षेच्या काळात पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावू नये, असंही हायकोर्टानं बजावलं आहे.
दरम्यान, कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरनुसार, या तरुणीनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट रिशेअर केली होती. ती पोस्ट त्या तरुणीची स्वतःची नव्हती. तर दुसऱ्या अकाऊंटवरील पोस्ट रिशेअर केली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)