ज्योती मल्होत्रासह चौघांना अटक, पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप; आतापर्यंत काय माहिती समोर?

पाकिस्तानला गुप्तचर माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये हरियाणातील हिसार येथील ट्रॅव्हल व्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रा, कैथलमधील मस्तगढ गावातील 25 वर्षीय देवेंद्र सिंग, पंजाबमधील मालेरकोटला येथील एक मुलगी आणि आणखी एका पुरूषाचा समावेश आहे.

ज्योती मल्होत्राला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोन्ही राज्यांच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या लोकांवर काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा आणि 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित माहिती त्यांच्यासोबत शेअर केल्याचा आरोप आहे.

ज्योती मल्होत्राविषयी आतापर्यंत काय माहिती समोर आलीय?

ज्योती मल्होत्रा ​​ही एक ट्रॅव्हल व्लॉगर आहे. तिच्या यूट्यूब चॅनेलचं नाव 'ट्रॅव्हल विथ जो' असं आहे.

तिनं तिच्या युट्यूब चॅनेलवर अनेक वेगवेगळ्या देशांमधील प्रवासवर्णनं शेअर केली आहेत. यात पाकिस्तान भेटीबद्दलच्याही अनेक व्हिडिओंचाही समावेश आहे.

बीबीसी प्रतिनिधी कमल सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील हिसारचे डीएसपी कमलजीत म्हणाले, "आम्ही हिसार येथील रहिवासी ज्योती मल्होत्राला सरकारी गोपनीय कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 152 अंतर्गत अटक केली आहे."

ज्योतीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून काही संशयास्पद माहिती सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस म्हणाले, "आम्ही तिला पाच दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे आणि चौकशी सुरू आहे. ती सतत एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होती, याबद्दल माहिती मागवली जाईल."

ज्योतीच्या वडिलांनी काय म्हटलं?

गुरुवारी (15 मे) सकाळी 9.30 वाजता पोलीस अधिकारी घरी आले आणि ज्योतीला सोबत घेऊन गेले, अशी माहिती ज्योतीचे वडील हरीश कुमार यांनी दिली.

हरीश कुमार म्हणाले, "पाच-सहा लोक आले. त्यांनी सुमारे अर्धा तास घराची झडती घेतली. त्यानंतर पोलिसांनी एक लॅपटॉप आणि तीन मोबाईल फोन जप्त केले."

हरीश कुमार यांनी सांगितले की, ज्योती फक्त एकदाच पाकिस्तानला गेली आहे.

ते पुढे म्हणाले, "माझी मुलगी सरकारच्या परवानगीने गेली होती. तिची तपासणीही करण्यात आली आणि नंतर तिला व्हिसा देण्यात आला. त्यानंतर ती पाकिस्तानला गेली."

ज्योती कोणते युट्यूब चॅनल चालवते हे त्यांना माहित नाही, असंही हरीश कुमार यांनी नमूद केलं.

कैथलमधून अटक केलेला तरुण कोण आहे?

हरियाणा पोलिसांच्या स्पेशल डिटेक्टिव्ह युनिटनं (एसडीयू) पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली कैथलमधील मस्तगढ गावातील रहिवासी 25 वर्षीय देवेंद्र सिंगला अटक केली आहे.

देवेंद्र सिंगवर भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित माहितीसह गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे, अशी माहिती डीएसपी वीरभान सिंह यांनी दिली.

वीरभान सिंह म्हणाले, "देवेंद्र सिंगला यापूर्वी 13 मे रोजी फेसबुकवर बेकायदेशीर शस्त्रांबद्दल पोस्ट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आलं होतं."

"देवेंद्र सिंग कर्तारपूर साहिबला भेट देण्याच्या बहाण्याने पाकिस्तानला गेला होता. तिथे तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात आला. भारतात परतल्यानंतर तो लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत राहिला", अशी माहिती डीएसपी वीरभान सिंह यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "पटियाला येथे शिक्षण घेत असलेल्या देवेंद्र सिंगनं आपल्या मोबाईल फोनमध्ये आर्मी कॅन्टोन्मेंट परिसरातील काही छायाचित्रे काढली होती आणि ती आयएसआय एजंट्सला पाठवली होती."

पोलिसांनी देवेंद्रचा मोबाईल फोन आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत आणि त्यातील डेटा तपासला जात आहे.

पोलिसांनी देवेंद्रला न्यायालयात हजर केले आणि त्याची अधिक चौकशी करण्यासाठी त्याला रिमांडवर घेतलं.

मालेरकोटला येथून ताब्यात घेतलेली महिला कोण आहे?

बीबीसी प्रतिनिधी चरणजीव कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मे रोजी पंजाब पोलिसांनी माहिती दिली होती की, पाकिस्तान उच्चायोगात तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली पंजाबमधील मालेरकोटला येथे एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी त्यांच्या 'एक्स' पोस्टमध्ये ही माहिती दिली.

डीजीपी गौरव यादव यांच्यानुसार, अटक केलेल्या व्यक्तींची नावं गुजाला आणि यामिन मोहम्मद अशी आहेत. ते मालेरकोटला येथील रहिवासी आहेत. पोलीस पथकांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोनही जप्त केले आहेत.

डीजीपी गौरव यादव म्हणाले, "प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, अटक केलेले आरोपी गोपनीय माहिती शेअर करण्याच्या बदल्यात ऑनलाइन माध्यमातून पैसे घेत असत."

डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी त्यांच्या ऑपरेटर्सच्या सतत संपर्कात होते आणि त्याच्या सूचनेनुसार इतर स्थानिक ऑपरेटर्सना पैसे पाठवत होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)