मानसिक ताणः इमोशनल बर्नआऊट कसा टाळाल?

तुमची फार चिडचिड होतेय का? दमल्यासारखं वाटतंय? ताण आलाय का? सगळी शक्ती गेल्यासारखं वाटतंय का?

तुम्हाला आता फारच घाबरल्यासारखं वाटत आहे का?

सध्या तुमच्या समोर असलेल्या प्रश्नांमधून काहीच मार्ग दिसत नाही असं वाटतंय का?

असं असेल तर कदाचित तुम्ही इमोशनल बर्नआऊटच्या दिशेने प्रवास करत आहात.

पण घाबरण्याची काहीही गरज नाही. सगळं पुन्हा मार्गावर आणण्यासाठी ब्रॉडकास्टर आणि डॉक्टर राधा मोडगील यांनी काही उपाय सुचवले आहेत.

इमोशनल बर्नआऊट म्हणजे काय? हे समजलं की पुढच्या वेळेस तशी स्थिती येण्यापूर्वीच आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग माहिती असतील.

इमोशनल बर्नआऊट म्हणजे नक्की काय?

हर्बर्ट फ्रॉइडेनबेर्गर यांनी 1974 साली एका शोधनिबंधात 'इमोशनल बर्नआऊट' ही टर्म वापरली.

सतत स्वतःला सिद्ध करण्यासारख्या अनेक कसोट्यांचा ताण असलेल्या व्यावसायिक जीवनामुळे एखाद्याला पराकोटीचा शारीरिक व मानसिक थकवा येणं म्हणजे 'इमोशनल बर्नआऊट' अशी व्याख्या त्यांनी केली होती.

आताच्या काळामध्ये भरपूर आणि दीर्घकाळ ताण आलेला असेल तर त्याला 'इमोशनल बर्नआऊट' म्हटलं जातं, असं डॉ. राधा सांगतात. त्या म्हणतात की, यामुळे जीवनातील आव्हानांशी जुळवून घेता येत नाही अशी भावना मनात तयार होते.

हे ताण निर्माण करणारे घटक फक्त कामाच्या ठिकाणीच नाही तर आपल्याशी संबंधित प्रत्येक क्षेत्रातून येतात असं त्या सांगतात.

'इमोशनल बर्नआऊट'मध्ये कसं वाटत असतं?

इमोशनल बर्नआऊट हे फोनमध्ये संपत आलेल्या बॅटरीप्रमाणे (लो बॅटरी) असतं असं डॉ. मोडगील सांगतात.

संपूर्ण ऊर्जा संपल्यासारखं वाटतं. कदाचित तुम्ही ताणाशी नेहमी सामना करू शकत असाल पण आता मात्र ते कठीण वाटत असेल.

डॉ. मोडगील म्हणतात, "हे कदाचित तुमचा भावनांचा साठा संपल्याचं चिन्ह असू शकेल. कामाच्या ठिकाणच्या भावना आणि घरातल्या भावना यांना तुम्ही भावनांचा साठा म्हणू शकता. यातल्या एखाद्यामधल्या भावना कमी झाल्या आणि दुसऱ्यामधून योग्यप्रकारे भावनांचा पुरवठा होत असेल तर कदाचित तुम्ही ताणाला सामोरे जाऊ शकता. पण जर दोन्ही साठे संपले तर प्रश्न तयार होऊ शकतात."

या साठ्याकडे लक्ष असणं आवश्यक आहे. जसं तुमचं फोनच्या बॅटरीकडे लक्ष असतं तसं. रिचार्ज करण्याची गरज आहे का? असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे.

इमोशनल बर्नआऊट पासून रक्षण कसं करायचं?

डॉ. राधा सांगतात-

  • थोडं स्वतःचं ऐका
  • ज्या गोष्टी चांगल्या पद्धतीने होत आहेत त्यावर एकाग्र व्हा.
  • मित्रमैत्रिणींशी बोला,
  • नेहमी व्यायाम करा.
  • तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, त्याला प्राधान्य द्या.
  • आवडतं संगीत ऐका.
  • पुरेशी झोप घ्या.

वरील गोष्टींची सवय करून त्यांना आपल्या जीवनाचा भाग बनवा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)