You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दोन मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची 15 किलोमीटरची पायपीट, गडचिरोलीत नेमकं काय घडलं?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
गडचिरोली जिल्ह्यात दोन्ही भावंडांचा अर्ध्या तासाच्या फरकाने संशयास्पद मृत्यू झाला. पण, मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या यातना संपल्या नाहीत. त्यांना जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं.
डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचं समोर आलं. पण, त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं दोन्ही लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पायी चिखलाचा रस्ता तुडवत 15 किलोमीटरवर असलेलं घर गाठण्याची वेळ या दुर्गम भागातल्या कुटुंबावर आली.
गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातल्या जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ही घटना घडली आहे.
'आरोग्य केंद्राजवळ असलेली रुग्णवाहिका गरोदर महिलेला आणण्यासाठी गेली असल्यामुळे वेलादी कुटुंबीयांसाठी ती उपलब्ध करता आली नव्हती,' असं आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तर, 'सदर घटनेची दखल घेण्यात आली असून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत', असं अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले आहे.
बाजीराव रमेश वेलादी (6 वर्ष) आणि दिनेश रमेश वेलादी (3 वर्ष) अशी मृत भावंडांची नावं आहेत. पण, त्यांचा मृत्यू कसा झाला? राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलं? हे या बातमीत पाहू.
वेलादी तेलुगु भाषिक असून अहेरी तालुक्यातल्या जिमलगट्टा येथून 15 किलोमीटर अंतररावर अतिशय दुर्गम भागात येरागर्डा इथं ते राहतात. येरागर्डा गाव अहेरीच्या घनदाट जंगलात वसलेलं आहे. तिथं फोनला अजिबात नेटवर्क नसतं.
रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं खांद्यावर मृतदेह घेऊन चिखलातून पायपीट
झालेला घटनाक्रम जिमलगट्टा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. दुर्गा जराटे यांनी बीबीसी मराठीला सांगितला.
डॉ. जराटे सांगतात, रमेश यांना बाजीराव, दिनेश हे दोन मुलं तर एक दोन वर्षांची मुलगी आहे. रमेश आपल्या दोन्ही मुलांना घेऊन पत्नीच्या माहेरी पत्तीगावला गेले.
पत्तीगावातच दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन दोघेही पती, पत्नी 4 सप्टेंबरला चार वाजण्याच्या सुमारास जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले.
तिथं आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून त्यांनी गाडीची मागणी केली. मृतेदह शवविच्छेदनासाठी पाठवायचे आहे, असं त्यांना सांगितलं आणि आतमध्ये बोलावलं. पण ते दवाखान्यात येण्यासाठी तयार नव्हते.
डॉ. जराटे सांगतात, "दोन्ही मुलांना मुख्य प्रवेशद्वाराजवळच तपासलं तर दोघांचाही आधीच मृत्यू झाला होता. त्यांच्या पल्स सुरू नव्हत्या. मुलांनी काय खाल्लं, त्यांना काय झालं होतं अशी विचारणा केली. तेव्हा पत्तीगावच्या पुजाऱ्याकडून दोन्ही बाळांना औषध खाऊ घातली असं सांगितलं. त्यांना आणखी सखोल विचारण्याचा प्रयत्न केला. पण, ते तेलुगु भाषा बोलत असल्यानं संवाद साधण्यात अडचण येत होती."
"पुजाऱ्याचं नावही त्यांनी सांगितलं नाही," असं जिमलगट्टा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. दुर्गा जराटे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
दोन्ही मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन वेलादी पती पत्नी पायी चालतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. दोघेही खांद्यावर दोन्ही मुलांचे मृतदेह घेऊन रडत चिखलातून पायपीट करताना दिसत आहेत.
त्यांनी 15 किलोमीटर पायपीट करत घर गाठलं. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका का दिली नाही?
असं विचारलं असता, डॉ. दुर्गा जराटे म्हणाल्या, "आमच्याकडे रुग्णवाहिका आहे. पण, ती रुग्णवाहिका एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी आणायला गेली होती. त्यामुळे दुसऱ्या आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका बोलावतो, तुम्ही काही वेळ प्रतीक्षा करा अशी विनंती वेलादी कुटुंबाला केली. पण, ते काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन ते पायी चालत गेले. त्यांच्यासोबत आणखी चार महिला, पाच पुरुष आणि आणखी एक छोटी मुलगी होती."
पुजाऱ्याकडे नेल्यानं मृत्यू झाला?
रमेश वेलादी आपल्या तिन्ही मुलांना घेऊन 4 सप्टेंबरला सकाळीच त्यांचं सासर पत्तीगावला गेले. ते येरागर्डा इथून पायी चालत 15 किलोमीटरवर असलेल्या पत्तीगावला पोहोचले. त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला देखील चालतच नेलं. तिथं त्यांनी एका पुजाऱ्याकडे दोन्ही मुलांना दाखवलं.
पुजाऱ्याने दोन्ही मुलांना काहीतरी औषध प्यायला दिलं. त्यानतंर अर्ध्या तासांत मोठा मुलगा बाजीरावचा मृत्यू झाला, तर त्याच्या अर्ध्या तासानंतर लहान मुलगा दिनेशचा मृत्यू झाला.
'आमच्या पोराला कोणीतरी जादू केली म्हणून आमच्या मुलांचा जीव गेला', असं रमेश वेलादी यांच्या पत्नीनं आपल्याला सांगितल्याचं येरागर्डाच्या आशा सेविका मनिषा तालपल्ली यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
पण, 30 ऑगस्टला गावातल्या सगळ्या घरांना भेटी दिल्या तेव्हा बाजीराव आणि दिनेश दोन्ही मुलांची तब्येत चांगली होती. त्यांना काहीही झालेलं नव्हतं. अचानक त्यांनी पुजाऱ्याकडे का नेलं हे माहिती नाही, असंही त्या म्हणाल्या.
ही घटना समोर येताच अहेरी पोलिसांनी येरागर्डा इथं चौकशी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरीला पाठवले. तसेच पत्तीगावच्या संबंधित पुजारी संभा गिल्ला तलांडीला चौकशीसाठी बोलावलं आहे.
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे समोर येईल असं अहेरीचे मेडिकल सुपरीटेंन्डट डॉ. कन्ना मडावी यांनी सांगितलं.
'इव्हेंटबाज सरकारनं प्रत्यक्षात जाऊन लोकांच्या मरणयातना बघाव्या' – वडेट्टीवार
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेचा व्हिडिओ एक्स अकाऊंटवर शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे.
त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कॅबिनेट मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्यावर टीका केली आहे.
तसेच या दोन्ही मुलांना वेळेत उपचार मिळाले नसल्याचा दावाही वडेट्टीवारांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, "दोन्ही लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला."
"रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत 15 किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले."
"गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ."
असं वडेट्टीवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.
पुढे ते म्हणतात, "दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोक कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे.’’
पुजाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश
पण, वडेट्टीवार यांनी केलेला दावा खोटा असून त्यांनी चारशे किलोमीटवर बसून त्यांनी वाऱ्यावर असं काहीही बोलू नये, असं अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कॅबिनेट मंत्री धर्माराव बाबा आत्राम बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले.
ते पुढे म्हणतात, "मी कोणत्या इव्हेंटमध्ये फिरत असतो हे वडेट्टीवारांनी सांगावं. आमचं आमच्या मतदारसंघावर लक्ष असतं. वडेट्टीवारांनी घटनेची पूर्ण माहिती घ्यावी आणि मग बोलावं. आदिवासी लोक दोन किलोमीटरवर दवाखाना असून तिथं जात नाहीत आणि मांत्रिकाकडे जातात. येरागर्डाच्या वेलादीनं सुद्धा आपल्या मुलांना पुजाऱ्याकडे नेलं. तिथं मांत्रिकानं मंत्र म्हणेपर्यंत त्या चिमुकल्यांचा जीव गेला. पुजाऱ्याची चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत," असं अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)