शिक्षक दिनः झाडावर अँटिना लावून शाळा डिजिटल करणाऱ्या गडचिरोलीतील मांतय्या गुरुजींची गोष्ट

    • Author, अविनाश पोईनकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

गडचिरोली म्हटलं की, माओवाद अन अतिदुर्गम आदिवासीबहूल भागाचं चित्र आपसूकच डोळ्यापुढं उभं राहतं. याच गडचिरोली जिल्ह्यातील एका शिक्षकाला यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या या शिक्षकाचं नाव आहे मांतय्या चिन्नी बेडके.

हे शिक्षक राहतात, तिथे ना नेटवर्क आहे ना कुठले वृत्तपत्र येते. त्यामुळे राज्य व देशभर पसरलेली त्यांची ही बातमी त्यांच्या परिसरातील जवळच्या लोकांनाच माहिती नाही.

या आदर्श शिक्षकाचं काम, त्यांची शाळा, पाहण्यासाठी बीबीसी मराठीनं या अतिदुर्गम भागात जायचं ठरवलं.

आम्ही सकाळी दहा वाजता शाळेत पोहोचतो, असा निरोप त्यांना दिला. पण चंद्रपुरातून सकाळी 7 वाजता निघाल्यानंतरही एटापल्ली या त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचायला आम्हाला दुपारचा एक वाजला.

या भागातल्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. एटापल्लीहूनही त्यांचं गाव 45 किमी लांब होतं. दरम्यान, रिमझिम पाऊसही सुरू होता. घनदाट जंगलातून वाट काढत आम्ही गट्टा या गावी पोहोचलो.

ते वाट पाहत होते तिथूनही शाळा आणखी 2 किलोमीटर अंतरावर असल्याचं त्यांनी सांगितलं. पण गाव आणि शाळेपर्यंत आमची गाडी जाणं शक्य नव्हतं.

त्यामुळं दुचाकीवरून अत्यंत कठिण वाटेनं खडतर प्रवास करत आम्ही 3 वाजता गावात पोहोचलो. रस्ता नसल्यानं आम्हाला पायवाटेनंच पुढं जावं लागलं.

अखेर हा सगळा प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो त्यांच्या जाजावंडी गावात.

नैसर्गिक समृद्धीनं नटलेल्या या गावात आल्यानंतर मात्र आमच्या खडतर प्रवासाचा सगळा थकवा कमी झाला.

माडिया, उराव समुदायांच्या 40-50 कुटुंबांची या गावात वस्ती आहे. पण सिमेंट-विटांचं एकही पक्क घर दिसत नाही.

शेती हाच गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय. अगदी साधेपणानं जगत उदरनिर्वाह भागवणाऱ्या या गावातील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे परिषदेची शाळा.

अशा प्रकारच्या अत्यंत दुर्गम भागामध्ये रुजू होण्यास शिक्षक कचरतात. इथून लवकरात लवकर कसं बाहेर पडता येईल, असा विचार करतात. पण मांतय्या बेडके हे अपवाद ठरले आहेत.

गेल्या अकरा वर्षापासून बेडके सर इथंच स्थायिक झालेत.

दहशतीलाही घाबरले नाहीत

पोलीस-माओवाद्यांच्या कायमच्या चकमकींमुळं कायम याठिकाणी एक भीतीचं वातावरण असतं. पण बेडके सरांनी त्याला न घाबरता याठिकाणच्या विद्यार्थ्यांचा विचार करत प्रामाणिकपणे त्यांचं काम सुरू ठेवलं.

या भागात पालकांसह मुलांमध्येही शिक्षणाविषयी रुची नव्हती. तेच सरांसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. हे आव्हान पेलत बेडके गुरुजींनी त्या दहशतीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा ध्यास घेतला.

क्रमिक अभ्यासक्रमासोबतच शाळेच्या सौंदर्यीकरणावर त्यांनी भर दिला. वनभोजन, क्षेत्रभेट, अनुभवातून शिक्षण असे उपक्रम राबवले.

विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी करून घेतलं. शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन केलं.

गावपरिसरात माडिया आणि उराव आदिवासी समुदायाचे लोक आहेत. त्यांची स्वतःची भाषा आहेत. मुलांना शिकवण्याआधी त्यांची माडीया-गोंडी भाषा बेडके यांनी अवगत केली.

बेडके सर मूळचे तेलंगणा सिमेवरील सिरोंचा येथील असल्यानं त्यांना तेलगू भाषाही येते. याचा सकारात्मक उपयोग बेडके यांना शाळेत, गावात विद्यार्थी, पालकांशी संवाद साधताना झाला.

विद्यार्थी संख्या 7 वरून 138 पर्यंत गेली

मांतय्या बेडके 2010-2011 मध्ये जाजावंडी शाळेत रुजू झाले. त्यावेळी तिथं फक्त 7 विद्यार्थी होते. त्यातही फक्त 4 विद्यार्थी शाळेत यायचे. इतर 3 विद्यार्थी पालकांसोबत शेती कामं किंवा जंगलात जायते.

मुलांची संख्या वाढवण्यासाठी म्हणून बेडके सरांनी सर्वांत आधी गावात आणि पालकांमध्ये शैक्षणिक जनजागृती केली.

पटसंख्येअभावी कदाचित शाळा बंद झाली असती. पण बेडके सरांच्या प्रयत्नांमुळं आज या शाळेत आजूबाजूच्या 10 गावातील विद्यार्थी दाखल शिक्षणासाठी येतात.

आधी इथं चौथीपर्यंतच शाळा होती. पण आता सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. सुरुवातीला केवळ एक शिक्षक असणाऱ्या या शाळेत आता चार शिक्षक आहेत. सध्या इथं 138 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

30 शाळाबाह्य मुलांचेही संगोपन

मांतय्या बेडके हे केवळ त्यांच्या जाजावंडी शाळेपुरते मर्यादित राहिले नाही. शेजारच्या गावात फिरताना त्यांना बरीच शाळाबाह्य मुलं दिसली. त्या मुलांनाही त्यांनी शाळेत प्रवेश दिला. या मुलांच्या निवास आणि जेवणाची व्यवस्थाही शाळेतच केली.

त्यासाठी काही प्रमाणात शासन आणि काही प्रमाणात समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था त्यांना सहकार्य करत आहेत.

सध्या 30 शाळाबाह्य मुलांना त्यांनी दत्तक घेतलं आहे. त्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना आई-वडील नाहीत. यासाठी गावकऱ्यांनीचीही त्यांना सहकार्य केलं.

निरक्षरांसाठी प्रौढ शिक्षण वर्ग

गावात आधीच शिक्षणाचं वातावरण नसल्यानं अशिक्षितपणाचं प्रमाण जास्त होतं. गावातील नागरिकांना लिहिता वाचता येत नसल्यानं त्यांना फसवणुकीसारख्याही अनेक अडचणींना सामोरं जाावं लागायचं.

ही बाब लक्षात घेऊन बेडके गुरुजींनी गावामध्ये प्रौढांसाठी सार्वजनिक शिक्षणाचे वर्ग सुरू केले.

गावातील 120 निरक्षर सायंकाळी सात ते आठ या वेळात या प्रौढ शिक्षण वर्गात येऊन शिकतात.

आधी फक्त अंगठ्याचा ठसा देणारे प्रौढ आता शिक्षणातून स्वतःचं नाव कसं लिहायचं, सही कशी करायची? हे शिकले आहेत.

त्यांना अक्षर ओळख झाली आहे. त्यामुळं गावातील शंभरावर निरक्षर आता अंगठा पुढं न करता सही करू लागले आहेत.

शाळा ऑनलाईन, डिजिटल केली

जाजावंडी गावात कोणत्याही मोबाईलला नेटवर्क नाही. त्यामुलं हे गाव नेहमीच जगापासून तुटलेलं असतं. यामुळं मुलांनाही डिजिटल शिक्षण कसं द्यायचं, असा प्रश्न होता.

बेडके गुरुजी दिल्लीत कामानिमित्त गेल्यानंतर त्यांना त्यावर उपाय सापडला. उंचावर अँटिना लावून 100 मीटर परिसरात नेटवर्क आणू शकतो, हा प्रयोग त्यांनी पाहिला. आपल्या शाळेत हा प्रयोग करायचं त्यांनी ठरवलं.

बेडके सरांनी वीस हजार रुपये खर्च करत शाळेत साहित्य मागवून घेतलं. जवळच्या उंच झाडावर नेटवर्कचा अँटिना लावला. त्यांचा प्रयोग यशस्वी झाला.

आता या शाळेच्या शंभर मीटर परिसरात मोबाईलला नेटवर्क असल्यानं इंटरनेटची सुविधाही उपलब्ध झाली आहे. त्यामुळं या शाळेच्या परिसरात ते मुलांना ऑनलाइन शिक्षण देऊ शकतात.

विद्यार्थ्यांना इंग्रजी यावं, यासाठी केरळ राज्यातून एका दाम्पत्याला बोलावून त्यांनी शाळेत ग्रामसभेच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न केले.

गावकऱ्यांनीही त्यासाठी आर्थिक योगदान दिलं. त्यामुळं आता इथल्या मुलांना मराठीसह इंग्रजीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.

मांतय्या बेडके यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “या पुरस्कारामुळं अतिदुर्गम भागात देत असलेल्या सेवेची शासनाने मोठी दखल घेतली. यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे.

माझं जगणं विद्यार्थ्यांप्रती नेहमीसाठी समर्पित राहील. पुढील काळात पुन्हा अतिदुर्गम भागातील आदिवासी आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यतत्पर राहणार आहे."

जाजांवाडीचे ग्रामसभेचे अध्यक्ष शामराव तुमरेटी म्हणाले, "बेडके गुरुजींमुळे आमची शाळा, आमचं गाव खूप पुढे गेलं आहे. गावातील अशिक्षित लोकांना त्यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. आता गावात चांगलं वातावरण तयार झालं आहे. गुरुजींना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने आमच्या शाळेचं, गावाचं नाव गुरुजींनी मोठं केलं. गुरुजींच्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो."

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांच्या या सेवेचा सन्मान जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याचं म्हटलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)