बिकट परिस्थितीत वाढलेली काही मुले यशाचं शिखर कसं गाठतात?

    • Author, आदर्श राठोड
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका छोट्याश्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात गंगा सहाय मीणा यांचा जन्म झाला.

त्यांचं बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेलं. घरी हालाखीची परिस्थिती असल्याने पोटभर अन्न मिळण्याचीही मुश्किल होती. कधी शेजाऱ्यांनी दिलेल्या ताकाची कढी करून तर कधी वाटलेल्या मिरचीसोबत तर कधी कांद्यासोबत भाकरी खाऊन पोट भरलं.

सरकारी शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एम ए करण्यासाठी दिल्ली गाठलं. इथे त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) प्रवेश मिळाला आणि आज ते त्याच भारतीय भाषा केंद्रात सहयोगी प्राध्यापक आहेत. जेएनयूमध्ये ते सर्वात तरुण सहयोगी प्राध्यापक ठरले.

हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील द्रंग येथील संगीताची देखील गोष्ट थोड्या फार फरकाने अशीच आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा आणि अभ्यासाचा खर्चही निघावा म्हणून पालकांसोबत जत्रेत बांगड्या आणि खेळणी विकायला जायच्या.

कॉलेज संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी शिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याचं दरम्यान त्यांच्या वडिलांना कर्करोग झाल्याचं निदान झालं.

अभ्यासासोबतच त्या वडिलांच्या उपचारासाठी शिमला ते चंदीगड दरम्यान प्रवास करत राहिल्या. त्यांनी याच काळात हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या कॉलेज कॅडरमधील सहाय्यक प्राध्यापकाची परीक्षाही उत्तीर्ण केली.

प्राध्यापक गंगा सहाय मीणा आणि संगीता या दोघांसाठी इथपर्यंतचा प्रवास करणं सोपं नव्हतं. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले, अनेक सामाजिक-आर्थिक आव्हानांवर मात करत हे यश मिळवलं.

आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. लहानपणी हालाखीत दिवस काढलेले लोक पुढे जाऊन नव्या यशोगाथा लिहितात. कोणी क्रीडाविश्वात नाव कमावतं तर कोणी प्रशासकीय अधिकारी बनतं तर कोणी शास्त्रज्ञ, व्यावसायिक होतं.

हे असं का घडतं या प्रश्नाचं कोणतंही सरळ उत्तर नाहीये. पण एका मोठ्या संशोधनातून आलेले परिणाम यावर प्रकाशझोत टाकतात.

वेळोवेळी साथ आणि सोबत करणारे नातेसंबंध

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या 'यंग लाइव्हज' या संशोधन पथकाने भारत, व्हिएतनाम, पेरू आणि इथिओपियातील 12 हजार मुलांचा 20 वर्ष अभ्यास केला.

या अभ्यासात कठीण परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या मुलांमध्ये काही समानता आढळून आली. अशीच काही कारणं होती, ज्यामुळे ते बाकीच्यांच्या तुलनेत पुढे जाऊ शकले.

संशोधनात पहिलं कारण समोर आलं की, मुलांच्या आयुष्यात कोणीतरी असं होतं की, ज्यांनी अडचणींवर मात करण्यासाठी या मुलांना मदत केली, ज्याच्याकडून त्यांना वेळोवेळी साथ मिळाली.

ब्रिटीश लेखक आणि कवी लेम सिसे यांनी त्यांचं बालपण अनाथ आश्रमात घालवलं. त्यांना नेहमीच एक आश्रमातून दुसऱ्या आश्रमात पाठवलं जायचं. पण आज ते एक यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे.

ते सांगतात, "माझ्याकडे कुटुंब नव्हतं आणि यामुळे मला हे समजून घेण्याची संधी मिळाली की मुलांसाठी आधार देणारे नातेसंबंध किती महत्त्वाचे असतात."

सिसे यांच्यासाठी ही भूमिका एका सामाजिक कार्यकर्त्याने बजावली होती. त्यांच्यावर सिसे यांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांच्या हे लक्षात आलं नाही.

सिसे सांगतात, "ते माझ्यासाठी आदर्श नव्हते. ते मित्रासारखे देखील नव्हते, पण त्याहून जास्त काहीतरी होते. ते माझ्या भावनिकतेवर लक्ष ठेऊन असायचे आणि हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची ठरली."

संशोधनात असं आढळून आलं आहे की लहान मुलांना पुढे नेण्यासाठी छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जसे की पालक आणि मुलांचं नातं उबदार असावं लागतं.

शिवाय, सुरुवातीच्या काळात मुलांना वाचणं, शिकवणं आणि त्यांची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं.

जेएनयूमधील सहायक प्राध्यापक गंगा सहाय मीणा सांगतात की, त्यांचे आईवडील अशिक्षित होते पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं.

ते सांगतात, "छोट्या शेतकर्‍यांच्या घरात खूप कामं असतात. जसं की शेतात जावं लागतं, गुरंढोरं सांभाळावी लागतात. पण घरच्यांनी माझ्यावर कधीच भार टाकला नाही. जमेल तेवढा हातभार लावायचे. यात माझ्या बहिणीची भूमिका खूप महत्त्वाची होती. अनेकदा ती माझ्या वाट्याचंही काम करायची. यामुळे मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकलो."

संगीताच्या आयुष्यात त्यांच्या वडिलांनी अशीच भूमिका घेतली होती. त्या सांगतात की, त्यांच्या वडिलांना डॉक्टर व्हायचं होतं पण कौटुंबिक कारणांमुळे ते शालेय शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. पण आपल्या मुलांना कोणतीही अडचण येऊ नये असं त्यांना वाटत होतं.

संगीता सांगतात, "ज्या वर्षी माझ्या वडिलांनी मला पहिलीत टाकलं त्याचवर्षी त्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यानंतर ते पुन्हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याच्या धडपडीत गुंतले, पदवीनंतर मला एम.ए. करायचे होते. पण घरच्यांकडे पैसे नव्हते. तरीही वडिलांनी मला शिक्षणासाठी विद्यापीठात पाठवलं."

सेफ्टी नेट

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या 'यंग लाइव्हज' संशोधन पथकाच्या संशोधनानुसार, खडतर परिस्थितीतून बाहेर पडलेल्या मुलांच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'सेफ्टी नेट'.

सेफ्टी नेट ही अशी एखादी गोष्ट असते ज्यावर तुम्ही कठीण परिस्थितीतही अवलंबून राहू शकता.

ब्रिटनमध्ये केलेल्या अनेक संशोधनातून असं दिसून आलं आहे की गरिबीचा मुलांवर वाईट परिणाम होतो. पाच वर्षापर्यंतच्या वयोगटातील गरिबीत वाढलेली मुलं नवीन शब्द शिकण्याच्या बाबतीत शेवटच्या 10 टक्के मुलांमध्ये असतात.

यंग लाइव्हजला असं आढळून आलं की इथिओपिया आणि पेरूमधील ज्या मुलांना अन्न स्वरूपात सरकारी मदत मिळाली होती, त्यांची वयाच्या 12 व्या वर्षी स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता अशी मदत न मिळालेल्या मुलांच्या तुलनेत जास्त होती.

कुटुंब जितक्या जास्त गरिबीत जगले, तितकाच वाईट परिणाम त्यांच्या मुलांवर झाला.

अमेरिकेतही एका नियंत्रित संशोधनात हेच दिसून आलंय. शहरातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत दिल्याचा त्यांच्या मुलांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे.

एका गटातील कुटुंबांना दरमहा 20 डॉलर तर दुसऱ्या गटातील कुटुंबांना 333 डॉलर मदत देण्यात आली.

या कुटुंबातील मुले एक वर्षाची झाल्यावर त्यांच्या मेंदूची तपासणी करण्यात आली. ज्या कुटुंबांना जास्तीची आर्थिक मदत मिळाली, त्यांच्या मेंदूचा एक भाग भाषा आणि नवीन गोष्टी शिकण्यात सक्रिय होता.

इथे सरकारी मदत किंवा गरीब कुटुंबांना आर्थिक मदत हे एकप्रकारचं सेफ्टी नेट म्हणता येईल. जागतिक बँकेच्या मते, सेफ्टी नेट कार्यक्रम कुटुंबांना आर्थिक, नैसर्गिक आणि इतर धोक्यांपासून संरक्षण देतात.

गंगा सहाय मीणा यांच्या मते अशा सामाजिक सेफ्टी नेट कार्यक्रमांमधून मिळणारी मदत दुर्बल घटकातील मुलांच्या प्रगतीसाठी मदत करते.

स्वतःचं उदाहरण देताना ते सांगतात, "मी बीएच्या शेवटच्या वर्षाला असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबावर कर्ज होतं. मी पुढील शिक्षण घ्यावं अशा मनस्थितीत कोणीही नव्हतं. पण जेएनयूमधील निवड प्रक्रिया पारदर्शक असून शुल्कही कमी आहे. त्यानंतर यूजीसीची फेलोशिप मिळाल्यानंतर मला माझ्या अभ्यासासाठी माझ्या कुटुंबावर अवलंबून राहावं लागलं नाही."

ते पुढे सांगतात, "सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये मदत करण्यासाठी सरकारने केलेली सकारात्मक कृती देखील खूप फायदेशीर ठरते. एम.ए. साठी माझी अनुसूचित जमाती या राखीव प्रवर्गातून निवड झाली. पण एम. फिल. साठी प्रवेश परीक्षा ही सामान्य वर्गातून द्यावी लागली. जर एम.एसाठी संधी मिळाली नसती तर मी एम.फिल पर्यंत पोहोचलो नसतो."

संगीताचाही अनुभव असाच काहीसा आहे.

त्या सांगतात, " एम. ए नंतर एम.फिल करणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. कुटुंबीय जास्त पैसे देऊ शकत नव्हते हे माहीत होतं.आर्थिक मदत मिळेल या आशेने मी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) दिली. मला जेआरएफ मध्ये 1.5 टक्के कमी होता पण गुणवत्तेच्या आधारावर, मला सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राष्ट्रीय फेलोशिपमध्ये स्थान मिळाले. त्यामुळे मला खूप मदत मिळाली.

विश्वास ठेवा आणि दुसरी संधी द्या

'यंग लाइव्हज'च्या संशोधनातून समोर आलेली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे - दुसरी संधी मिळणे.

कठीण परिस्थितीत वाढणाऱ्या मुलांवर विश्वास ठेवला तर त्यांचे मनोबल वाढते आणि त्यामुळे त्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळते. ब्रिटीश कवी लेम सिसे म्हणतात, "मुलांचं संगोपन कुठेही होत असेल पण त्याला जी गोष्ट आवडते ती त्याला मिळणं खूप गरजेचं असतं."

ते सांगतात, "लहानपणी मला कोणीतरी समजून घ्यावं असं मला वाटायचं. एखाद्याला दुसरी संधी देणं म्हणजे तुम्ही त्यांना समजून घेत आहात. जेव्हा मी 13 वर्षांचा होतो, तेव्हा आश्रमातील एका शिक्षकाने मला कवितांचं एक पुस्तक दिलं. पण ते केवळ पुस्तक नव्हतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला पुस्तक देण्यास पात्र मानलं जात होतं. मी भाग्यवान होतो की हे पुस्तक मला मिळालं कारण मला कविता आवडायच्या."

संगीतासाठी तो काळ खूप कठीण होता जेव्हा एम.फिल करत असताना त्यांना समजलं की त्यांच्या वडिलांना कर्करोग आहे. त्यावेळी करिअर निवडायचं की कुटुंब सांभाळायचं अशी त्यांची द्विधा मनस्थिती झाली होती.

त्या सांगतात, "मी माझ्या वडिलांना उपचारासाठी शिमल्यात बोलावलं. त्यानंतर पुढच्या उपचारासाठी त्यांना चंदीगड येथील पीजीआय मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च इथे न्यावं लागलं. जिथे राहायचो तिथे पाण्याची अडचण होती, स्वयंपाकासाठीही दुरून पाणी आणावं लागायचं. त्यावेळी वाटलं की मला आता हे शक्य नाही. पण माझ्या कॉलेजच्या मार्गदर्शकाने धीर दिला आणि आधी माझ्या वडिलांची काळजी घ्यायला सांगितलं."

गरीब परिस्थितीतून येणाऱ्या मुलांना इतर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्या काळात जर आत्मविश्वासाचा अभाव असेल आणि प्रोत्साहन नसेल तर त्यांचं मनोधैर्य खचू शकतं.

प्राध्यापक गंगा सहाय मीणा सांगतात की, "जेएनयूमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मला वाटलं की इथले लोक खूप चांगली भाषा बोलतात. मी खूप निराश झालो होतो. पण पहिल्या सत्रात चांगले गुण मिळाले आणि वर्गात पहिलाच मुलगा होतो ज्याला पहिल्याच प्रयत्नात जेआरएफ मिळाली. जेएनयूमधलं वातावरण असं होतं की तिथे सिनियर विद्यार्थी खूप मदत करायचे. याशिवाय जेव्हा-जेव्हा मी चांगलं काम केलं तेव्हा माझ्या शिक्षकांनीही मला प्रोत्साहन दिलं आणि निराशेपासून मी दूर राहिलो."

लेम सिसे यांच्या कवितेतील काही ओळी आहेत -

I'm not defined by darkness confined in the night.

Each dawn I am reminded I am defined by lights.

त्याचा भावार्थ असा आहे की,

रात्रीच्या अंधारात माझं व्यक्तिमत्त्व कळून येत नाही

पहाटेच्या किरणांसोबत मला माझं अस्तित्व जाणवतं

या कवितेच्या ओळी त्या मुलांना समर्पित करण्यात आल्यात, ज्यांनी अडचणींच्या अंधारातून बाहेर पडून यशाच्या प्रकाशात आपलं स्थान निर्माण करण्याची क्षमता दाखवून दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)