बिपाशा बासू : माझ्या मुलीच्या हृदयाला दोन छिद्रं होती, सर्जरीशिवाय पर्याय नाही हे कळल्यावर वाटलं

अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर या जोडप्याला नोव्हेंबर 2022 कन्यारत्न प्राप्त झालं. त्यांनी या मुलीचं नाव देवी ठेवलं.

दरम्यान या जोडप्यानं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत त्यांच्या छोट्याश्या परीचा फोटो शेअर केला आणि एक खुलासा केला. या खुलाशानं सगळेच भावूक झाले.

नेहा धुपियासोबतच्या इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये आपल्या मुलीच्या ओपन हार्ट सर्जरीचा खुलासा करताना बिपाशा बासूला रडू कोसळलं. ती खूपच भावुक झाली होती.

बिपाशा बासूच्या मुलीच्या हृदयात दोन छिद्रं

बिपाशाच्या मुलीला जन्मतःच हृदयाला दोन छिद्रं आहेत,असं तिला सांगण्यात आलं.

त्यांना डॉक्टरांकडून सांगण्यात आलं की, दर महिन्याला स्कॅनिंग करून छिद्रं सर्जरी न करता भरून निघेल की नाही, हे जाणून घ्या.

त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की, ही छिद्रं एवढी मोठी आहेत की सर्जरी शिवाय भरून निघणार नाहीत.

त्यामुळे सर्जरीचाच पर्याय आमच्यापुढे होता आणि आम्ही तो स्वीकारला, असं बिपाशाने सांगितलं.

नेहा धुपियासोबतच्या या इन्स्टा लाइव्हमध्ये बिपाशाने पुढे सांगितलं की, "मला आणि करणला 'व्हीएसडी' म्हणजे काय माहित नव्हतं, या आजाराविषयी डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. ही सर्जरी कशी होणार याची माहिती 10 डॉक्टर आम्हाला माहिती देत होते."

इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये बिपाशा भावूक

तीन महिन्यांच्या आपल्या मुलीची सर्जरी यशस्वी झाल्यानंतर तिने प्रथमच इन्स्टाग्राम लाईव्हमधून भावना व्यक्त केली आहेत.

बिपाशाने नेहा धुपियाला सांगते की, "माझ्या मुलीच्या जन्मानंतर तीन दिवसांनंतर मला कळलं की तिच्या हृदयात दोन छिद्रं आहेत.

"चिमुकल्या देवीवर ओपन हार्ट सर्जरी होणार हा पालक म्हणून आमच्यासाठी कठीण निर्णय होता, मी यासाठी काहीशी तयार होते, पण पती करण मात्र तयार नव्हता."

हे सांगताना तिच्या भावना अनावर झाल्या.

'करण ग्रोव्हर धीट पिता'

या इवल्याशा बाळाची सर्जरी करण्याबाबत पिता करण ग्रोव्हर हळवा झाला होता. पण सर्जरीच्या वेळी मी पुढे नव्हते, तर आयसीयूत तिची काळजी तोच घेत होता.

ती सांगते, "करण हा धीट आहे. त्यामुळं आयसीयूत सर्जरीच्या वेळी तोच धावपळ करत होता. जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या इवल्याशा मुलीला आयसीयूत पाहिलं तेव्हा कितीतरी मॉनिटर तिच्या आजूबाजूला होते आणि तिच्या छातीवर बँडेज होतं.

या सर्वांमध्ये ती मला 'हिरो' वाटत होती.

आम्ही तिच्या व्हीएसडी आजाराविषयी कुटुंबियांना काही सांगितलं नव्हतं. आम्ही दोघं पण तणावातच होतो," बिपाशा सांगते.

अखेर सर्जरी यशस्वी झाली

डॉक्टरांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि तीन महिन्याच्या मुलीची ओपन हार्ट सर्जरी यशस्वी झाली

"मला माहित होतं की, ती यातून बरी होईल आणि आता ती बरीही झालीय. मुलीची सर्जरी नेमकी केव्हा करायची आणि कुठे करायची, याचा निर्णय घेण्याची वेळ कसोटीची होती."

"अखेर तो दिवस आलाच 6 तास ही सर्जरी सुरु होती,त्यावेळी मला वाटलं की, माझं आयुष्यच थांबलंय. इतर पालकांपेक्षा एक पालक म्हणून माझा प्रवास वेगळा आहे. बऱ्याच काळानं माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आहे."

"हे शेअर करावं की नाही हा मी विचार करत होते आणि मी आता ते सगळ्यांसोबत शेअर करतीये. कदाचित अशाच एखाद्या आईसाठी माझे अनुभव उपयुक्त ठरतील."

वेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट (व्हीएसडी)म्हणजे काय

"वेंट्रीक्युलर सेप्टल दोष ही गर्भधारणेननंतर होणारी समस्या आहे. बाळाच्या दोन वेंट्रिकल्समधील भिंत पूर्णपणे विकसित होत नाही आणि त्या जागी छिद्र पडते. वेंट्रीक्युलर सेप्टल दोष असलेल्या मुलांमध्ये, डाव्या वेंट्रीकलमधून उजव्या वेंट्रीकलस आणि फुफ्फुसामध्ये रक्त प्रवाहित होतं.

या स्थितीत हे अतिरिक्त रक्त फुफ्फुसात पंप केल्यामुळं हृदय आणि फुफ्फुसाला अधिक कार्य करावं लागत.वेळेत उपचार न केल्यास हा धोका वाढू शकतो."

कार्डिओलॉजिस्ट डॉ. विजय सुरसे सांगतात की,"जन्मांनंतर पाच वर्षांच्या आत ऑपरेशन करणं गरजेचं असतं, अन्यथा रुग्णाचं आयुष्य कमी होतं."

डॉ.विजय सुरसे पुढे सांगतात की, "ही व्याधी जन्मतः आलेली असते. यात शरीर निळं पडू शकतं. दम लागतो, मुलं खेळू शकत नाहीत, बौद्धिक वाढ होत नाही. यात कधी कधी चार कप्पे तयार होतात, तर कधी कधी 'वॉल' लीक होतो. कधी कधी चाळणीसारखी असंख्य छिद्रही असतात."

सर्जरी कशी केली जाते

"सर्जरी दरम्यान हृदयाचं बाहेरील आवरण 'पेरी कार्डियन'चा वापर करून ही छिद्रं बंद केली जातात. बाहेरील कोणताही घटक या सर्जरीत वापरत नाहीत.फक्त पेरी कार्डियनचाच वापर होतो .यानंतर पुन्हा सर्जरीची गरज भासत नाही," असं कार्डिओलॉजिस्ट डॉ.विजय सुरसे सांगतात.

छिद्र मोठं असल्यास सहा महिन्यांच्या आत सर्जरी आवश्यक आहे. प्रत्येक छिद्राच्या आकारानुसार त्याच्या सर्जरीचा कालावधी ठरतो.

"दोन ते तीन मिलीमीटर आकाराच्या व्हीएसडीचा शरीरावर परिणाम होत नाही.डॉक्टरांची टीम ठरवते की सर्जरी नेमकी कधी करायची."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)