नाशिक : अंत्यसंस्कारासाठी पैसे ठेवून निवृत्त प्राचार्यांनी केली बायकोची हत्या आणि स्वतःलाही संपवलं

फोटो स्रोत, UGC
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
सूचना- या बातमीतील तपशील काही लोकांना विचलित करू शकते.
सेवानिवृत्त वृद्ध प्राचार्यांनी स्वत:च्या पत्नीचा गळा दाबून हत्या करण्याची आणि त्यानंतर स्वत:देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (9 एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजता नाशिकमध्ये घडली आहे.
नाशिक उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर रामचंद्र जोशी (78 वर्षे) यांनी त्यांची पत्नी सेवानिवृत्त प्राचार्य लता मुरलीधर जोशी (76 वर्षे) यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मुरलीधर जोशी यांनीही गळफास घेत आत्महत्या केली.
नाशिकमधील जेलरोडवरील, दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे, सावरकर नगरमधील देवनगरी कॉलनीत हे वृद्ध जोडपं राहत होतं. दोघेही सेवानिवृत्त प्राचार्य होते. त्यांची दोन्ही मुलं कामानिमित्त मुंबईत स्थायिक झालेली आहेत.
मुरलीधर रामचंद्र जोशी (78 वर्षे) आणि त्यांची पत्नी लता मुरलीधर जोशी काही वर्षे मुंबईत मुलांकडे वास्तव्यास होते. मात्र तिथे त्यांचं मन रमत नसल्यामुळे ते दोघेही नाशिकमधील जेलरोड येथील एकदंत अपार्टमेंट मधील त्यांच्या जुन्या घरी येऊन राहू लागले होते.
पत्नी लता जोशी या दोन ते तीन वर्षापासून आजारपणामुळे त्रस्त होत्या. मुरलीधर जोशी, त्यांच्या वृद्ध पत्नीची व्यथा बघू शकले नसावे आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व इतर अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना घटनास्थळी मुरलीधर जोशी यांनी लिहून ठेवलेलं शेवटचं पत्रदेखील मिळालं आहे.
या पत्रात म्हटलं आहे की, "मी सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर जोशी माझ्या पत्नीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे. तसेच माझी पत्नी सेवानिवृत्त प्राचार्य लता मुरलीधर जोशी हिचा गळा दाबून शेवट करत आहे. आमची सेवा करणारी घरकाम करणाऱ्या महिलेला मी माझ्या बँक खात्यातून 50 हजार रुपये देत आहे.
कारण तिनं आमची खूप सेवा केली आहे,पत्नीच्या गळ्यातलं, कानातलं सोनं, आमची सेवा करणाऱ्या सीमाला देण्यात यावं. आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये."
या वृद्ध दाम्पत्यानं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी देखील पैशांची व्यवस्था करून ठेवली होती.
आम्ही जे काही करतो आहे यात कोणाचाही दोष किंवा कारस्थान नसून, आम्ही हे स्वत:च्या इच्छेनं करत आहोत. आमच्या दोघांच्या अंत्यविधीसाठी दागिने व पैसे देखील ठेवले आहेत. माझ्या मुलांनी मला माफ करावे.
अशा आशयाचं पत्र पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











