अक्षय शिंदेचा एन्काउंटर 'फेक,' अहवालात नेमकं काय?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणावर आज (20 जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायधीशांनी पाच पोलीस अधिकारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूस जबाबदार असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी न्यायालयीन चौकशी समितीनं मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर केला होता. या चौकशी अहवालानुसार त्याच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं निरिक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.

पाच पोलीस अधिकारी होते, ते परिस्थिती हाताळू शकले असते परंतु, त्यांना परिस्थितीवर नियंत्रण का आणता आलं नाही? असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला.

तसंच, अक्षय शिंदे याने अधिकाऱ्यावर गोळी झाडल्याचं सांगितलं गेलं पण त्याच्या हाताचे ठसे बंदुकीवर आढळलेले नाहीत. एपीआय मोरेंच्या स्टेटमेंटमध्ये अक्षय शिंदे याने गोळीबार केल्याचं कुठेही नमूद नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

या प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया

न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या, "अक्षय शिंदे हा कोणी समाजसुधारक, साधुसंत किंवा क्रांतीकारी नेता नव्हता. त्याला त्याच्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा व्हायलाच हवी होती. मात्र, ही शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे कायदा आहे, न्यायालय आहे. ती शिक्षा देण्याचा अधिकार फक्त न्यायव्यवस्थेला आहे आणि न्यायव्यवस्थेची संपूर्ण प्रक्रिया ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न कोणीही करु नये.

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण हे फेक आहे, आणि पोलिसांच्या संगनमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली हत्या आहे, हे सांगितलं होतं. सरकारनं हस्तक्षेप केला आहे हे वाईट आहे. आता जबाबदार असणाऱ्या असणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली."

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरील सुनावणीवर एक्स अकाउंटवरुन प्रतिक्रिया देताना म्हणाले, "बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे! त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेचे बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजप संस्थाचालकांवर कारवाई झालीच नाही तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर करून भाजपशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे."

या एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. कारण 'एकनाथचा एक न्याय' आणि 'देवाभाऊचा न्याय' म्हणून स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटर'चे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

बदलापूर अत्याचार प्रकरणात काय घडलं?

पोलिसांनी एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेविरोधात ठाणे पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस 23 सप्टेंबरला सायंकाळी तळोजा कारागृहातून पोलिस व्हॅनने घेऊन जात होते. यावेळी वाहनामध्ये चार पोलीस उपस्थित होते.

गाडी मुंब्रा बायपास रोडवर आली असता अक्षयने पोलिस निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेली पिस्तुल बळाचा वापर करुन खेचू लागला. त्यानतंर निलेश मोरेनं आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, झटापटीत पिस्टल लोड झाली आणि त्यामधील एक राऊंड त्यांच्या डाव्या मांडीत घुसल्यानं ते खाली पडले.

त्यानंतर अक्षयनं पिस्टलचा ताबा घेऊन एकलाही सोडणार नसल्याचं ओरडू लागला. त्यानं आमच्या दिशेनं दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे स्वतःच्या सरक्षणार्थ आम्ही अक्षय शिंदेच्या दिशेनं गोळी झाडली यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

'आम्ही स्वसंरक्षणार्थ गोळी घातली', असा दावा पोलिसांनी केला आहे. पण, अक्षय शिंदेच्या मृत्यूवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दुसऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेंला मारलं असा आरोप विरोधकांनी केला.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्याचार झाला तेव्हा विरोधक फाशीची मागणी करत होते. आता एन्काउंटर केल्यानंतर विरोध करत आहेत. यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे, असं म्हटलं होतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.