1972 मध्ये बेपत्ता झालेली महिला तब्बल 52 वर्षानंतर सापडते तेव्हा

फोटो स्रोत, West Midlands Police
- Author, शॉर्लेट बेन्टोन
- Role, बीबीसी
- Reporting from, वेस्ट मिडलँड्स
एखादी व्यक्ती हरवल्यानंतर तिच्यासाठी बरीच शोधाशोध केली जाते तरीही तिचा पत्ता लागत नसतो. हळूहळू काळ पुढे सरकतो, दिवसानंतर दिवस मागे पडू लागतात आणि अचानक ध्यानीमनी नसताना तब्बल 52 वर्षांच्या काळानंतर ती अगदी सुखरूप सापडते.
एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणेच शैला फॉक्स यांची ही कहाणी आहे, त्या तब्बल 52 वर्षानंतर आपल्या कुटुंबीयांना भेटल्या आहेत. शैला फॉक्स इतक्या वर्षानंतर सुखरूप सापडल्या हा त्यांच्या कुटुंबासाठीही एक आश्चर्याचा धक्काच होता.
1972 सालची ही गोष्ट 16 वर्षीय शैला कोव्हेन्ट्री येथून अचानक बेपत्ता झाल्या, आणि इतक्या वर्षानंतर त्या सुखरूप सापडल्याचं वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी डिसेंबर महिन्यात शैला फॉक्स यांचे त्या बेपत्ता झाल्या त्या वेळेसचे फोटो आपल्या बेवसाईटसह सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. या फोटोंसह त्यांची माहिती देत काही कळाल्यास संपर्क करण्यांच आवाहन केलं होतं.
शैला यांची माहिती प्रसिद्ध होताच, काही जणांनी अशाच वर्णनाची एक व्यक्ती काही वर्षांपूर्वी मिळाल्याचं सांगितलं. त्या आधारे पोलिसांनी तपास केला आणि एक दीर्घकाळ चाललेली शोधमोहिम यशस्वी झाली.
नागरिकांनी माहिती दिलेली ती महिला शैला फॉक्स असल्याचं निष्पन्न झालं आणि बेपत्ता व्यक्तीची नोंद असलेल्या तब्बल पन्नास वर्ष जुन्या केसचा उलगडा झाल्या. शैला फॉक्स सध्या देशाच्या दुसऱ्या भागात राहत आहेत.


याबाबत बोलताना कोल्ड केस इन्व्हेस्टिगेशन टीममधील डिटेक्टिव्ह सार्जंट जेना शॉ म्हणाल्या की, पाच दशकांहून अधिक काळानंतर शैला फॉक्स या सुरक्षित सापडल्या आहेत. आमची मोहीम यशस्वीरीत्या पार पडली याचा संपूर्ण पथकाला आनंद आहे.
डिटेक्टिव्ह सार्जंट शॉ पुढे म्हणाल्या, "प्रत्येक बेपत्ता व्यक्तीची एक कहाणी असते. ती कशी हरवली, कुठे होती, इतकी वर्ष कशी राहिली, काय झाले हे सगळं जाणून घेण्याचा कुटुंब आणि मित्रांना अधिकार व उत्सूकता असते. शैला आणि त्यांच्या कुटुंबाची भेट ही एक सुखद घटना आहे, असंही त्यांनी नमूद केलं."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











