विजय देवरकोंडाविरोधात पोलीस तक्रार दाखल, माफीनाम्याची वेळ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

फोटो स्रोत, YT/SITHARA ENTERTAINMENTS
- Author, अमरेंद्र यर्लागड्डा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अभिनेता विजय देवरकोंडाविरुद्ध हैदराबादमधील पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना विजयने आदिवासींचा अपमान करणारं वक्तव्य केल्याने या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
हैदराबादमधील एस आर नगर पोलीस स्टेशन आणि रचकोंडा आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कीसरा पोलीस ठाण्यात आदिवासी नेत्यांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत.
दुसरीकडे, विजय देवरकोंडाने या आरोपांबाबत माफी मागितली आहे.
या तक्रारींमध्ये काय म्हटलं आहे?
आदिवासी वकील संघटनेचे अध्यक्ष किशन राज चौहान 30 एप्रिल रोजी एस आर नगर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली.
हैदराबादमध्ये 'रेट्रो' चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अभिनेता विजय देवरकोंडाने आदिवासींचा अपमान करणारं वक्तव्य केल्याबाबत ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
त्यांनी या तक्रारीत विनंती केली आहे की, "अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे."

फोटो स्रोत, YT/SITHARA ENTERTAINMENTS
एस. आर. नगर पोलिसांनी म्हटलं आहे की, त्यांच्याकडे याबाबत एक तक्रार आली आहे आणि पुढे गुन्हा दाखल करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेणार आहोत.
राष्ट्रीय बंजारा मिशन भारतचे जिल्हाध्यक्ष रविराज राठोड यांनी याच प्रकरणात कीसरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "आदिवासींचा अपमान करणारं वक्तव्य केल्यामुळे विजय देवरकोंडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे."
कीसरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांनीही बीबीसीला सांगितलं की, त्यांना या प्रकरणात तक्रार अर्ज मिळाला असून, गुन्हा दाखल करायचा की नाही यावर त्यांनी निर्णय घेतलेला नाही.
अभिनेता विजय देवरकोंडा काय म्हणाला?
हैदराबाद येथे 26 एप्रिल रोजी रेट्रो चित्रपटाच्या पूर्वप्रदर्शनाच्या कार्यक्रमात विजय देवरकोंडा सहभागी झाला होता. या कार्यक्रमात विजयच्या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.
विजयने या कार्यक्रमात पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या.
विजय म्हणाला होता, "काश्मिरी नागरिक हे आपलेच आहेत. दोन वर्षांपूर्वी 'खुशी' चित्रपटाच्या निमित्ताने मी तिथे चित्रीकरणासाठी गेलो होतो. त्यांच्यासोबत (काश्मिरी नागरिकांसोबत) माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत. पाकिस्तान त्यांच्याच देशातल्या नागरिकांची काळजी घेऊ शकत नाही. त्यांच्या देशात पाणी नाही, वीज नाही. त्यांना इथे नेमकं काय करायचं आहे? भारत पाकिस्तानवर हल्ला करणार नाही, याउलट पाकिस्तानचे नागरिकच चिडून पाकिस्तान सरकारवर हल्ला करतील."
"ते निर्बुद्धपणे कारवाई करत आहेत. 500 वर्षांपूर्वीच्या आदिवासींप्रमाणे ते वागत आहेत. आपण सगळ्यांनी एकजुटीने राहिलं पाहिजे," असं विजय म्हणाला.
आदिवासी संघटनांच्या सदस्यांनी हा आदिवासींचा अपमान असल्याचं म्हणत तक्रारी दाखल केल्या आहेत. या वादानंतर विजय देवरकोंडाने सोशल मीडियावर पोस्ट करून दिलगिरी व्यक्त केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मला कुणालाही दुखवायचं नव्हतं - विजय देवरकोंडा
विजयने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलं, "रेट्रो सिनेमाच्या कार्यक्रमात मी केलेल्या वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मला इथे हे स्पष्ट करायचं आहे की, माझा हेतू कोणत्याही व्यक्ती, समूह किंवा आदिवासी समूहांना दुखवायचा नव्हता."
"मी कधीही कोणत्या समूहासोबत भेदभाव केला नाही. मी त्यानं सगळ्यांना माझ्या कुटुंबीयांप्रमाणे, भावाप्रमाणे मानतो. माझ्या वक्तव्याने कुणाला दुःख झालं असेल तर मी त्यांची माफी मागतो."
विजयने पुढे स्पष्ट केलं की, "मी ऐतिहासिक दृष्ट्या शब्दकोशात जो अर्थ दिला आहे त्यावरून 'ट्राइब' हा शब्द वापरला. माझ्या वक्तव्यासाठी मी माफी मागतो."
कोण आहे विजय देवरकोंडा
मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या विजय देवेरकोंडाला पहिल्यापासून अभिनेताच बनायचं होतं.
अभिनय शिकण्यासाठी त्यानं थिएटर ग्रुपही जॉइन केला. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नाटकं केल्यानंतर लगेचच त्याला चित्रपटांसाठीही विचारणा व्हायला लागली.
त्यांपैकी दोन ऑफर अतिशय दिग्गजांकडून आल्या होत्या- एक होते विजयेंद्र प्रसाद (बाहुबलीचे लेखक) आणि दुसरे होते दिग्दर्शक तेजा.

फोटो स्रोत, Twitter/Vijay Deverkonda
या सगळ्या प्रवासाबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना विजयने म्हटलं होतं की, दिग्दर्शक तेजा यांच्या ऑफिसबाहेर बसलो होतो तेव्हा हे सगळं किती सोपं आहे असंच मला वाटत होतं.
पण हे दोन्ही चित्रपट काही कारणानं बारगळले. त्याचवेळी माझं कॉलेज संपलं होतं आणि अचानक मला जाणवलं की, आता आपल्या हातात करायला काहीच नाहीये.
"त्याकाळात कुटुंबीयांनी आपल्याला अभिनय सोड असं कधीच सांगितलं नाही. पण इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी मी किमान सहायक दिग्दर्शक किंवा लेखक म्हणून काम करावं असं वडिलांनी मला सुचवलं. माझी आई एखादा पार्ट टाइम जॉब बघ असं सांगत होती. माझी बहीण मला बँकेतल्या नोकऱ्यांचे अर्जही आणून द्यायची, विजय देवेरकोंडानं त्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या होत्या."
2011 साली त्यानं नुविल्ला चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर लाइफ इज ब्युटीफूल नावाच्या सिनेमात एक छोटासा रोल केला. यव्वडे सुब्रमण्यममध्ये तो अभिनेता नानीसोबत दिसला.
विजय देवेरकोंडाचा पहिला लीड रोल होता 'पेल्ली चूपुलू' हा रोमँटिक सिनेमा. त्यानंतर त्याने द्वारका सारखा मसालापटही केला. पण खऱ्या अर्थानं मोठं यश मिळालं ते अर्जुन रेड्डीमुळे. 2017 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. विजय देवेरकोंडाच्या अभिनयाचंही कौतुक झालं. हिंदीतही 'कबीर सिंग' नावानं 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक झाला.
विजयनं लायगरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'लायगर'मध्ये विजय देवरकोंडासोबत अनन्या पांडे, राम्या कृष्णन, रोनिक रॉय, विष्णू रेड्डी, मकरंद देशपांडे हे कलाकारही होते. या चित्रपटाची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रसिद्ध माजी बॉक्सिंगपटू माइक टायसन यानेही विजयसोबत स्क्रीन शेअर केली.
'हुकूमशाही योग्य आहे, केवळ...'
विजय देवेरकोंडा हा केवळ अर्जुन रेड्डीच्या व्यक्तिरेखेमुळे चर्चेत आला होता असं नाही, तर एका मुलाखतीत लोकशाहीबद्दल केलेल्या विधानामुळे तसंच कोव्हिड काळातील मदतीमुळेही तो वादात अडकला होता.
अनुपमा चोपडा आणि बरद्वाज रंगराजन यांना दिलेल्या मुलाखतीत विजय देवेरकोंडाला भविष्यात तू राजकारणात जाणार का असा प्रश्न विचारला होता.
त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यानं म्हटलं होतं की, "प्रत्येकाला मतदानाचा अधिकार हवा असंही मला वाटत नाही. स्वस्त दारू आणि पैशांच्या जोरावर मतं मिळवली जातात, हे वाईट आहे. केवळ श्रीमंतांनाच मतदानाचा अधिकार हवा असंही मी म्हणत नाही. मला वाटतं की, मध्यमवर्गीयांना मतदानाचा अधिकार द्यायला हवा, ते लोक जे सुशिक्षित आहेत आणि थोडक्या पैशांसाठी आपली भूमिका बदलणार नाहीत."
"माझ्याबाबतीत बोलायचं तर मला हुकूमशहाच बनायला आवडेल. त्याच पद्धतीने बदल घडवून आणता येऊ शकतो. कुठेतरी मला वाटतं की, हुकूमशाही योग्य पद्धत आहे, फक्त त्या पदावर चांगली व्यक्ती हवी."
सोशल मीडियावर जेव्हा त्याच्या मुलाखतीचा हा भाग ऐकला तेव्हा अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती.
'त्याला खरंच असं वाटतं की, एखादा चित्रपट प्रदर्शित होतोय ज्यासाठी निगेटिव्ह पब्लिसिटीची गरज आहे,' असंही काही जणांनी म्हटलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











