हैदराबादच्या कर्णधाराची शतकी खेळी, बाकी गोष्टीत हाराकिरी सुरूच

आयपीएल, हैदराबाद, राजस्थान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एडन मारक्रम

हैदराबादने आयपीएलच्या या हंगामासाठी संघ बदलला, कर्णधार बदलला, प्रशिक्षकांची फौज बदलली पण एवढं सगळं करुनही त्यांच्या खेळात काहीच बदल झाला नाही. हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर घरच्या मैदानावर राजस्थानविरुद्ध हैदराबाद संघाचा दारुण पराभव झाला.

हैदराबादचा कर्णधार एडम मारक्रम राष्ट्रीय कर्तव्याप्रति म्हणजेच दक्षिण आफ्रिकेसाठी खेळतो आहे. विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसाठी आवश्यक अशा या लढतीत मारक्रमने 175 धावांची मॅरेथॉन खेळी केली. मारक्रमचं एकदिवसीय सामन्यातलं हे पहिलंच शतक आहे.

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय राजस्थानच्या पथ्यावर पडला. जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी 85 धावांची धुवांधार सलामी दिली.

फझलक फरुकीने बटलरला बाद केलं. त्याने 22 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 54 धावांची खेळी केली. यशस्वी जैस्वाल 54 धावांची खेळी करुन बाद झाला.

कर्णधार संजू सॅमसनने 32 चेंडूत 55 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शिमोरन हेटमायरने 16 चेंडूत 22 धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. हैदराबादतर्फे फझलक फरुकी, टी.नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या.

आयपीएल, हैदराबाद, राजस्थान

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, संजू सॅमसन

प्रत्युत्तरादाखल खेळताना, हैदराबादच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठीला बाद केलं.

कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी20 अशा तिन्ही प्रकारात भन्नाट फॉर्मात असलेल्या हॅरी ब्रूककडून खूप अपेक्षा होत्या. पण ब्रुकला चहलने त्रिफळाचीत केलं.

अनुभवी मयांक अगरवालही 27 धावांची खेळी करुन तंबूत परतला. अब्दुल समदच्या 32 धावांचा अपवाद वगळता हैदराबादच्या उर्वरित फलंदाजांना काहीही चमक दाखवता आली नाही. चहलने 17 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या.

नियुक्त कर्णधार एडन मारक्रम राष्ट्रीय संघासाठी खेळत असल्याने भुवनेश्वर कुमारने हैदराबादचं नेतृत्व केलं. हैदराबादने आधीच्या हंगामातील कर्णधार केन विल्यमसनला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता.

हैदराबादने लिलावात मयांक अगरवाल, हॅरी ब्रूक, आदिल रशीद, अकिल हुसेन, हेनरिच लासेन, ग्लेन फिलीप्स या खेळाडूंना संघात समाविष्ट केलं होतं.

मारक्रमची मॅरेथॉन खेळी

दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषकासाठी अद्यापही पात्र ठरलेला नाही. पात्र होण्यासाठी त्यांना नेदरलँड्सविरुद्धची मालिका जिंकणं अनिवार्य आहे. यामुळेच नेदरलँड्सविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने पूर्ण ताकदीचा संघ जाहीर केला आहे.

जोहान्सबर्ग इथे झालेल्या लढतीत नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने या निर्णयाचा पुरेपूर फायदा उठवला. मारक्रमने 126 चेंडूत 17 चौकार आणि 7 षटकारांसह 175 धावांची शानदार खेळी साकारली.

डेव्हिड मिलरने 61 चेंडूत 91 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 118 चेंडूत 199 धावांची खंडप्राय भागीदारी रचली. या दोघांच्या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने 370 धावांचा डोंगर उभारला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)