आदिपुरुष : वाद, ट्रोलिंग आणि बंदीची मागणी होत असताना 'अशी' केली 240 कोटींची कमाई

आदिपुरुष

फोटो स्रोत, Facebook

    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आदिपुरुष या चित्रपटाने फिल्म रिलिज व्हायच्या दोन दिवसात जगात 240 कोटी रुपयांचा व्यवसाय केलाय.

जर पहिल्या दोन दिवसांचा ट्रेंड असाच राहिला तर पुढच्या तीन दिवसात 300 कोटींचा आकडा सहज पार होईल.

या चित्रपटाला समीक्षकांनी अजिबात चांगलं रेटिंग दिलेलं नाही, सोशल मीडियावर याला जबरदस्त ट्रोलिंग होतंय, तरीही हा चित्रपट कमाई करतोय.

पहिल्या दोन दिवसांच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूडसाठी हा नवा रेकॉर्ड आहे. बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंतची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाणने पहिल्या दोन दिवसात 127 कोटी इतकी कमाई केली होती. यातुलनेत आदिपुरुष बराच पुढे आहे.

चित्रपट समीक्षकांनी केलेली टीका, प्रेक्षकांनी दर्शवलेली नापसंती, या चित्रपटातल्या डायलॉग्सच्या भाषेवरून झालेले वाद असं सगळं बाजूला सारून लोक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे जात आहेत.

सिनेमातले डायलॉग वादग्रस्त ठरल्याने निर्मात्यांनी काही डायलॉग काढून टाकण्याचं तसंच त्या ठिकाणी नवे डायलॉग टाकण्याचं वचन दिलं आहे.

वादग्रस्त डायलॉगचा बचाव

लोकांनी सर्वात मोठा आक्षेप घेतलाय तो लंक दहनाच्या आधी असणाऱ्या हनुमानाच्या संवादाचा. या हनुमान म्हणतात, “कपडा भी तेरे बाप का, तेल भी तेरे बाप का, आग भी तेरे बाप की और जलेगी भी तेरे बाप की.”

चित्रपटातले इतरही काही डायलॉग चर्चेत आहेत. एका दृश्यात रावणाचा एक राक्षस हनुमानाला म्हणतो, “तेरी बुवा का बगीचा है, जो हवा खाने चला आया.”

तसंच जेव्हा रावणाला अंगद आव्हान देतात तेव्हा म्हणतात, “रघुपति राघव राजा राम बोल और अपनी जान बचा ले, वरना आज खडा है, कल लेटा हुआ मिलेगा…”

या सिनेमातली भाषा ‘अपमानास्पद’ आणि ‘आपत्तीजनक’ असल्याचं काही प्रेक्षक सोशल मीडियावर लिहिताहेत.

या सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी या डायलॉग्सचा बचाव केलाय.

मनोज मुंतशिर

फोटो स्रोत, MANOJ MUNTASHIR

फोटो कॅप्शन, मनोज मुंतशिर

रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मनोज मुंतशिर यांनी म्हटलं की, “आपल्याकडे कथावाचनाची परंपरा आहे. रामायण एक अशी कथा आहे जी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. आपल्याकडे आज्या रामायणाची कथा सांगताना याच भाषेत सांगायच्या. देशाचे मोठे संत, आणि कथावाचक हे संवाद अशाच प्रकारे बोलतात जसे मी लिहिलेत.”

जेव्हा त्यांना हनुमानाच्या तोंडी घातलेल्या संवादांबद्दल विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले, “ही चूक नाहीये, आम्ही जाणूनबुजून असं केलं. बजरंग बलीसाठी लिहिलेले डायलॉग खूप विचार करून लिहिले गेलेत. सिनेमातली सगळीच पात्र एकच भाषा बोलू शकत नाहीत.”

चित्रपटाचा बचाव

अनेक प्रेक्षकांनी आरोप केलाय की या सिनेमात रामायण चित्रपटाला वेगळ्याच पद्धतीने दर्शवलं गेलंय. पण चित्रपटाशी संबधित लोकांन याचा बचाव केलाय.

समाचार चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत मनोज मुंतशिर यांनी म्हटलं की, “या चित्रपटाचं नाव आहे आदिपुरुष. जेव्हा आम्ही आदिपुरुष बनवत होतो तेव्हा आम्ही रामायण बनवलं नाही. आम्ही रामायणावरून प्रेरित आहोत. मार्केटिंग स्ट्रॅटेजीनुसार आमच्या चित्रपटाचं नाव रामायण ठेवणं आणखी सोपं होतं.”

पण एबीपीला दिलेल्या मुलाखतीत मुंतशिर यांनी म्हटलं, “जे रामायण लोकांनी पाहिलं, वाचलं आणि ऐकलंय, तेच सिनेमात आहे.”

एका प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, “आम्ही मुळ रामायणापासून हटलो आहोत का? आम्ही त्याला आधुनिक करण्याचा प्रयत्न केला का? यात काही वेगळं दाखवलं का? या प्रश्नांचं सरळ सोपं उत्तर आहे - नाही. लोकांनी जे रामायण पाहिलंय, ऐकलंय तेच रामायण आहे, त्यापेक्षा वेगळं काही नाही.”

विरोध असूनही दणदणीत कमाई

चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर लोकांच्या निशाण्यावर आहेत. चित्रपटाला सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोलिंगही होतंय. याशिवाय चित्रपटाविरोधात कोर्टात याचिकाही दाखल केली गेलीये.

आदिपुरुष चित्रपटाच्या विरोधात वाराणसीत निघालेला मोर्चा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, आदिपुरुष चित्रपटाच्या विरोधात वाराणसीत निघालेला मोर्चा

चित्रपट पाहून येणाऱ्या अनेक प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देताना दूरदर्शनवर लागणाऱ्या रामानंद सागर यांच्या रामायण सीरियलशी तुलना करून त्या तुलनेत हा चित्रपट कमी पडला असं म्हटलंय.

आदिपुरुष भारतातली सगळ्यात चर्चित कथा रामायण – एका नव्या थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातल्या अनेक भाषांमध्ये सादर केली जातेय

या सिनेमावर फक्त संवादांमुळे टीका होत नाहीये तर याच्या व्हीएफएक्स, ग्राफिक्सवरही टीका होतेय.

या सिनेमात ‘बाहुबली’ सिनेमामुळे घराघरात पोचलेला स्टार प्रभास राघव (राम), क्रिती सेनन (सीता) आणि सैफ अली खान (रावण) मुख्य भुमिकांमध्ये आहेत. याचं दिग्दर्शन ओम राऊतने केलंय.

टी-सीरीजचे भूषण कुमार याचे निर्माते आहेत.

पात्रांच्या लूकवरूनही प्रश्न

या सिनेमातल्या पात्रांच्या वेशभूषा आणि रंगभूषेवरूनही टीका केली जातेय.

पण सगळ्या बाजूंनी टीका होत असतानाही निर्मात्यांना विश्वास आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल.

टी-सीरिजने म्हटलं की या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसात जगभरात 240 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 140 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 100 कोटी रुपये कमवले.

हा चित्रपट हिंदीसह तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलिज झाला आहे.

चित्रपटावरून राजकारण

आता या चित्रपटावरून राजकारणही सुरू झालंय. आम आदमी पक्षाने म्हटलं की या चित्रपटामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्यात आणि भाजपने आपल्या सवंग राजकारणासाठी हा चित्रपट रिलिज होऊ दिला.

तर दिल्ली भाजपचे प्रवक्ते शंकर कपूर यांनी म्हटलं की जोवर या चित्रपटाचे वादग्रस्त डायलॉग आणि दृश्यांची समीक्षा केली जात नाही तोवर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं पाहिजे.

तर छत्तीसगडच्या महेंद्रगढ-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यांमध्ये या चित्रपटांच्या विरोधात निदर्शनं झाली आणि यावर राष्ट्रीय पातळीवर बंदी घालावी असं आवाहन केलं गेलं आहे.

हिंदू सेना नावाच्या एका संघटनेने दिल्ली हायकोर्टाच याचिका दाखल करून या सिनेमावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

या सिनेमाला विरोध करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की हा चित्रपट ‘सनातन धर्माच्या विरोधातला एक कट आहे.’

मग हा चित्रपट एवढी कमाई का करतोय?

आदिपुरुषच्या आधी पठाण चित्रपटावरूनही मोठा वाद झाला होता आणि या चित्रपटाच्या विरोधात निदर्शनं झाली होती. पण पठाणने बॉक्स ऑफिस कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले आणि जगभरात या चित्रपटाने 1050 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पठाण आता बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

आदिपुरुषच्या बॉक्स ऑफिस कमाईनंतर टी-सीरिजने केलेलं ट्वीट

फोटो स्रोत, T-series

फोटो कॅप्शन, आदिपुरुषच्या बॉक्स ऑफिस कमाईनंतर टी-सीरिजने केलेलं ट्वीट

आदिपुरुषही वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असताना दणदणीत कमाई करतोय.

विश्लेषकांच्या मते लोकांना कुतुहल आहे आणि त्याचा फायदा या चित्रपटाला मिळतोय.

बीबीसीच्या सहकारी पत्रकार सुप्रिया सोगळे यांच्याशी बोलताना निर्माते आणि बॉलिवूड व्यवसायाचे विश्लेषक गिरीश जोहर म्हणतात, “या सिनेमाला ज्या नकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत त्या मुख्यत्वे सोशल मीडियावर आहेत. बरेचसे लोक चित्रपट पाहून आल्यानंतर त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. लोकांच्या प्रतिक्रियांचा परिणाम सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसत नाही. एका आठवड्यानंतर त्याचा परिणाम दिसतो. जर अशाच नकारात्मक प्रतिक्रिया येत राहिल्या तर सिनेमाच्या कमाईवर परिणाम होईल.

स्टार पावर

या चित्रपटाच्या जोरदार कमाईचं कारण सांगताना गिरीश जौहर म्हणतात की, “प्रभास एक मोठे स्टार आहेत, विशेषतः दक्षिण भारतात. त्यांच्या स्टार पावरनेही प्रेक्षकांना सिनेमाकडे खेचलंय. याशिवाय सिनेमाबद्दल लोकांमध्ये कुतुहल जागवलं आहे.”

ते पुढे म्हणतात, “निर्मात्यांनी दावा केलाय की ते रामायणाचं आपलं व्हर्जन दाखवत आहेत. या चित्रपट खूप जास्त पैसे खर्च करून बनवला गेलाय आणि लोकांना हेही बघायचं आहे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून रामायण कसं दाखवलं जातंय.”

आदिपुरुष

फोटो स्रोत, T-series

भगवान राम यांच्याबद्दल लोकांना असणाऱ्या श्रद्धेचाही या चित्रपटच्या कमाईत वाटा आहे असं म्हटलं जातंय. जौहर म्हणतात, “भारतात लोकांनी घराघरात रामायण पाहिलं आहे. दीर्घ काळानंतर रामायण पुन्हा पडद्यावर आलंय. त्यामुळे लोकांना ही कथा नव्याने पाहाण्याची उत्सुकता आहे.”

चित्रपटाचं संगीत

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्या असल्या तरी उत्तर भारतात अजूनही मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत. गिरीश जौहर म्हणतात की लोक सुट्ट्यांमध्ये संपूर्ण कुटुंबासोबत हा चित्रपट पाहात आहेत.

विश्लेषकांना असंही वाटतं की या चित्रपटाद्वारे लोकांना आपल्या मुलांना हिंदू धर्माशी जोडायचं आहे. त्यामुळे ते मुलाबाळांना घेऊन चित्रपट पाहायला जात आहेत.

गिरीश जौहर म्हणतात, “आधीच्या काळात आजी गोष्टी सांगायची पण आता कुटुंब छोटी झाली. प्रत्येक पालकाला वाटतं की त्यांनी या कथा आपल्या मुलांना सांगाव्यात, त्यांना संस्कार द्यावेत. त्यामुळे कुटुंबासोबत लोक हा चित्रपट पाहायला जात आहेत.”

या चित्रपटाच्या संगीताचाही बॉक्स ऑफिसवरच्या कमाईत हात आहे असं मानलं जातंय. गिरीश म्हणतात, “चित्रपटाचं संगीत लोकांना आवडतंय. ‘जय श्री राम’ गाणं लोकांना भावलंय. त्या गाण्यासाठीही लोक चित्रपट पहायला येत आहेत.”

पण त्यांना असंही वाटतं की नकारात्मक रिव्ह्यू आणि लोकांच्या प्रतिक्रियांमुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो आणि येत्या काही दिवसात ‘चित्रपटाची कमाई घसरू शकते.’

ते म्हणतात, “जर लोकांना वाटलं की ते 200-300 रुपयांचं तिकीट खरेदी करू शकतात तर ते जरूर सिनेमागृहांपर्यंत येतील. पण जर लोकांना वाटलं की हे पैसे वाया घालवण्यासारखं आहे मग सिनेमाची कमाई कमी व्हायला लागेल.”

“शनिवारी बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी झालंय, जर रविवारीही ते कमी झालं तर मग याचा सरळ अर्थ असा की आता सिनेमाची कमाई कमी होणार.”

विरोधामुळे चर्चा

बहुतांश समीक्षकांनी या चित्रपटावर टीका केली आहे. पण विश्लेषकांना असंही वाटतं की अनेकदा समीक्षक ज्या नजरेने चित्रपटाकडे पाहातात त्यापेक्षा प्रेक्षकांचा दृष्टीकोन वेगळा असतो.

गिरीश म्हणतात, “अनेकदा असं होतं की समीक्षकांना चित्रपट आवडतो पण लोकांना आवडत नाही. अनेकदा याच्या उलट होतं.”

या चित्रपटावरून माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या आणि त्याला होणारा विरोध यामुळेही चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळतेय. या प्रसिद्धीमुळे चित्रपटाची कमाई वाढतेय.

गिरीश म्हणतात, “प्रसिद्धी नकारात्मक असली काय किंवा सकारात्मक असली काय, त्याचा परिणाम होतोच. लोक जेव्हा या चित्रपटाबद्दल अनेकदा ऐकतात तेव्हा त्यांना पडद्यावर जाऊन ते पाहण्याची इच्छाही असते.”

पण बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आतल्या गोटातली एक व्यक्ती या चित्रपटाच्या कमाईवर प्रश्नचिन्ह लावत आहे.

आदिपुरुष

फोटो स्रोत, T-series

आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ती व्यक्ती म्हणते, “चित्रपटाच्या पहिल्या दोन दिवसांची कमाई भरपूर दाखवण्यासाठी चित्रपट निर्माते आणि वितरकांनी आपली पूर्ण ताकद लावून दिली आहे.”

ते म्हणतात की, “शाळकरी मुलंही हा सिनेमा मोठ्या संख्येने पाहात आहेत.”

बीबीसीच्या सहकारी पत्रकार सुप्रिया सोगळे जेव्हा थिएटरमध्ये हा चित्रपट पाहायला गेल्या तेव्हा तिथेही मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलं होती जे गटागटाने आली होती.

वादामुळे नुकसान?

इंडस्ट्रीतल्या लोकांना असंही वाटतंय की या चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादांमुळे चित्रपटाचं नुकसान होऊ शकतं.

हे इंडस्ट्री इनसाडर म्हणतात, “दो प्रकारचे वाद असतात. एक ज्यात अभिनेते आणि निर्मात्यांची काही चूक नसते. जसं पठाण चित्रपटाच्या बाबतीत झालं. चित्रपटाला वादामुळे फायदाच झाला. दुसऱ्या प्रकारचे वाद असतात ज्या चित्रपटातल्या काही गोष्टी न पटल्यामुळे होतात आणि अशा प्रकारच्या वादांनंतर प्रेक्षक अशा चित्रपटांपासून लांब राहातात.”

जुनी पिढी, ज्यांनी आधीचं रामायण पडद्यावर पाहिलं आहे त्यांना असं वाटेल की या चित्रपटात देवीदेवतांची थट्टा केलीये आणि ते चित्रपटगृहांपर्यंत येणारच नाहीत.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाची नकारात्मक समीक्षा केलीये आणि त्यांनी चित्रपटाला फक्त दीड स्टार दिलाय.

पण दुसरीकडे ते स्वतः मान्य करतात की या चित्रपटाने जबरदस्त कमाई केलीये.

चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर त्यांनी ट्वीट करून म्हटलं की, “या चित्रपटाला मोठी ओपनिंग मिळणारच होती कारण या चित्रपटाचा खूप प्रचार झाला होता आणि याची अॅडव्हान्स बुकिंगही होतं. आदिपुरुषच्या हिंदी व्हर्जनने भारतात पहिल्याच दिवशी 37.25 कोटींचा व्यवसाय केला.”

नेपाळमध्ये वाद

आदिपुरुष चित्रपटात सीतेला भारत की बेटी संबोधण्यावरून शेजारी देश नेपाळमध्ये वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

आदिपुरुष

फोटो स्रोत, T-SERIES

या संवादांवर काठमांडूच्या महापौरांनी आक्षेप घेतला असून तत्काळ तो हटवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आदिपुरुषच्या निर्मात्यांनी हा संवाद चित्रपटातून हटवावा, अशी मागणी महापौर बालेंद्र शाह यांनी केली आहे.

चित्रपटातील एका संवादामध्ये सीतेला भारत की बेटी असं संबोधण्यात आलेलं आहे.

पण सीतेचा जन्म नेपाळच्या जनकपूरमध्ये झाल्याचा दावा नेपाळकडून केला जातो. यामुळेच नेपाळमध्ये या डायलॉगवरून वाद सुरू झाला.

बालेंद्र शाह म्हणाले, “आदिपुरुष चित्रपटात सीतेला भारत की बेटी संबोधल्याचा डायलॉग हटवला जात नाही, तोपर्यंत कोणताही हिंदी चित्रपट काठमांडूमध्ये चालवू दिला जाणार नाही.”

ही चूक सुधारण्यासाठी बालेंद्र शाह यांनी निर्मात्यांना 3 दिवसांची मुदत दिली आहे.

नेपाळच्या सेन्सॉर बोर्डाकडूनही या प्रकरणी आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

जगातील इतर कोणत्याही देशांप्रमाणेच नेपाळमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्ड ते पाहतो. त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळून आल्यास ते हटवण्याची सूचना निर्मात्यांकडे केली जाते.

नेपाळच्या फिल्म असोसिएशनचे उपाध्यक्ष भास्कर धुनगना यांनी म्हटलं, “महापौर बालेंद्र शाह यांच्या इशाऱ्यानंतर त्यांना सोशल मीडियावरून अनेक धमक्या मिळाल्या.

सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही थिएटर मालकांना सकाळी हा चित्रपट दाखवू नका, असं सांगितलं आहे.

काठमांडूशिवाय नेपाळमध्ये इतरत्र हा चित्रपट योग्य पद्धतीने सुरू आहे. वादग्रस्त संवाद हटवल्यानंतर मी आणि इतरांनीही वाद करण्याची गरज नाही. सेन्सॉर बोर्डने आधीपासूनच त्याला परवानगी दिलेली आहे, असं ते म्हणाले.

त्यांनी याचं उदारण देताना दुसऱ्या एका चित्रपटाचाही उल्लेख केला.

अक्षय कुमारच्या चांदनी चौक टू चायना चित्रपटात भगवान बुद्धांबाबत वादग्रस्त माहिती चित्रपटात सांगण्यात आली होती.

त्याला नेपाळमध्ये विरोध झाल्यानंतर तो संवाद कापून त्याचं प्रदर्शन करण्यात आलं होतं.

आता या वादामुळे काठमांडूमध्ये सगळ्याच बॉलिवूडच्या चित्रपटांचं प्रदर्शन थांबण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)